भावनांक वाढवता येतो का? मुले आणि आपण ( भाग३ )

Submitted by स्मिता द on 23 May, 2017 - 08:48

भावनांक वाढवता येतो का ?

हल्ली सतत ऐकू येणारा शब्द. भावनांशी निगडीत असणारा. भावनांक हा शब्द का वापरला जातो ? याचा शोध घेतला तर हे शब्द मुलांचा बुध्यांक आणि भावनांक , असे मुलांशी संबधीत असलेले जाणवतात.
आपल्या प्रत्येकातच असतात भावना. हसणे, राग,लोभ, प्रेम, माया, जिव्हाळा , असूया, मत्सर या सगळ्या खरेतर भावना आहे. मध्यंतरी वाचले की मुलांचा भावनांक कमी होतोय. हे सिद्ध झाले आहे. भावनांक चांगला असणाऱ्या मुलांची एकाग्रता, अभ्यास मग्नता आणि मानसिक स्थिरता उत्तम असते
थोडक्यात काय तर भावना असणे, त्या समजावून घेणे, भावनांना प्रतिसाद देणे. या गोष्टी भावनांकात येतात. भावना ओळखणे , जाणवणे हे जसे महत्वाचे तसे त्यावर प्रतिक्रिया देणे हे ही महत्वाचेच. भावनांमध्ये वाहून जाऊन काहीतरी चुकीचे पाऊल उचलणे हे मात्र घातक. त्यासाठी त्या भावना ओळखून, त्यावर सकारात्मक विचार करून सकारात्मक पाऊल उचलणे हे भावनांक चांगला असण्याचे लक्षण. मुलांना तर फार गरज आहे या भावना ओळखून, त्या व्यवस्थित चॅनलाईज करण्याची. कालचीच बातमी, एका मुलाने आईचा खून केला आणि त्या बद्दल त्याला यत्किंचितही वाईट वाटत नाहीये. या बातमीने खरेतर या बातमीने अंतरबाह्य ढवळून आले. काय चाललंय हे ? कोठे जातोय आपण,आणि आपली पुढची पिढी? भयंकर अस्वस्थ वर्तमान आहे आज समाजमानसाचे. त्यावर मग विचार येतो भावनांक चांगला असणे हे गरजेचे अन महत्वाचे.
भावनांक खरेतर अगदी आपसूक वाढतो नाही तर वाढावयास हवा. कारण लहान मुलं हे सगळे मोठ्याच्या केलेल्या निरीक्षणातून शिकत असते. या भावना त्याच्या पर्यंत पोहोचवणे, त्याला त्याचा प्रत्यय येणे हे सगळे लहान मुलापर्यंत जाते ते संवादातून, गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ अशा अनेक माध्यमातून. मोठ्याच्या वागण्यातून, बोलण्यातून त्या मुलाला भावना कळत असतात.
" मला आनंद झाला, मला वाईट वाटले, मला राग आला, मी खूप खुष आहे" या अशा भावना प्रसंगानुरूप बोलून मुलांपर्यंत पोहोचू द्या. मूल मग ते शिकेल, याला आनंद म्हणतात, याला राग म्हणतात हे त्याला कळायला लागेल.
केवळ भावना विषयी बोलून चालणार नाही, तर त्या भावना आपण कशा व्यक्त करतो? , करायला हव्या त्या मुलांना हसत खेळत समजावून द्यायला हव्या. तू असे केले म्हणून मला आनंद झाला, हे त्या मुलाजवळ व्यक्त करायला हवे.
आई, बाबा, मोठी माणसे काही झाले की कशी बोलतात, वागतात याचे निरीक्षण लहान मुलं कायम करते आणि स्वतः देखील तसे वागण्याचा प्रयत्न करत असते.असे भावनांशी ओळख करून देणे, भावना व्यक्त करायला शिकवणे हे काम आपण मोठयांनी करावयास हवे. माझे असे निरीक्षण आहे की गोष्टीतून भावना चागल्या रीतीने मुलांपर्यत पोहोचवता येतात. भावनांची ओळख उत्तमरीत्या होते. जसे" आईने कौतुक केले, राधाला फार आनंद झाला. आजीने खाऊ दिला, विनू फार आनंदला. कावळे दादाचे घर शेणाचे होते ते वाहून गेले तो फार दुःखी झाला. अचानक तिथे परी आली, तिने त्या संकटातून सोडवले. हत्ती एकदम आकाशात उडाला" , या आणि अशा प्रकारच्या वाक्यातून मुलाची ओळख भावनांशी होते. त्यावरच्या प्रतिक्रियांशी होते.
खेळातून सांघिक भावना, मैत्री वाढीस लागते, आनंद मिळतो. आनंद झाल्यावर कसे व्यक्त व्हायचे ते मुलांना हळू हळू कळायला लागते.एकदा त्यांना भावना कळणे त्यावर व्यक्त होणे जमले की भावनांक वाढीस लागतो.
मुलांना नकार पण ऐकायला, पचवायला शिकवायला हवे. नकारच जर ऐकला नाही तर जेव्हा कधी तो समोर येतो, तेव्हा मग त्यावर कसे व्यक्त व्हावे ते मुलांना कळत नाही. आज आपण खूपदा ऐकतो , काही आणले नाही, काही घ्यायला नकार मिळाला म्हणून मुलाने आत्महत्या केली. हे किती समाजघातक आहे. येणारी पिढी जर अशा मानसिकतेतून तयार झाली तर एकूणच समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने किती विघातक आहे.
आज भारत हा उद्याचा तरुणांचा देश असेल , हे विधान करताना मन धास्तावते. आजची लहान मुले जर उत्तम भावनांकाची असतील तर उत्तम आणि उज्ज्वल भवितव्य असेल हे निश्चित.
थोड्या थोड्या कारणावरून मारणारी किंवा मारणारी पिढी नको आहे. समतोल विचार, आणि त्यातून समतोल कृती करणारी पिढी तयार व्हायला हवी. बुध्यांक मुलांचा चांगला असेल पण भावनांक कमी असेल तर नक्कीच ती मुले अपयशी ठरतील. अभ्यासातून असे लक्षात आले आहे की बुध्यांक चांगला असली तरी ही मंडळी व्यवहारी जगात अपयशी ठरतात. कारण भावनांक त्यांचा जास्त नसतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कुमारवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. जगात या वयाच्या मुलांमध्ये दिसणाऱ्या आत्महत्येच्या 10% आत्महत्या एकटया भारतात होतात ! भावनांकामध्ये आपल्या व दुसर्‍याच्या भावना ओळखणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे, दुसर्‍यांच्या भावनांचा आदर करणे, आपल्या भावनांना योग्य रीतीने चॅनलाईज करणे जाणीवपूर्वक विकसित केले पाहिजे नाही तर छोट्या छोट्या अपयशाने मुले डिप्रेशनमध्ये जातात.
कुठेतरी हा बुध्यांक आणि भावनांकाचा समतोल साधला जायला हवा.बुध्यांक वाढवता येते नाही, तो जन्मजात असतो असे आज पर्यंत मानले जायचे. आता बुध्यांक पण वाढवता येते असे मांडले जातेय. गंमत म्हणजे भावनांक वाढवता येतो, असे मात्र वाचनात आलेय. स्वतःच्या व दुसऱ्यांच्या भावना ओळखणे, त्यांना योग्य दिशा देणे, योग्य कृती करून त्या भावनांचे समायोजन करणे हे मुलांना शिकवायला हवे. डॅनिअल गोलमन याने ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या पुस्तकात बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवला आहे. गोलमन यांच्या मते योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते
आज भावनाकांत , जर येणारी पिढी कमजोर ठरत असेल तर त्यांचा भावनांक आपण वाढवू शकतो. भावना ओळखणे, भावनाचे नियोजन करणे , भावनाना वाट दाखवणे आणि त्यावर उपाय योजना करणे ही झाली भावनांक वाढीची लक्षणे,
भावनांक वाढीसाठीची पंचसूत्री आपण अशी म्हणू शकतो
संवाद
गोष्टी
गाणी
खेळ
सभोताल
या पाच गोष्टीतून पूरक अशी भक्कम भावनांकाची बैठक साधता येईल.
भावनांक वाढ यावर अनेक अनुभव, विचार मांडता येतील. अभ्यासू, अनुभवी मंडळींनी यावर आपले विचार सांगावे, जे निश्चितपणे भावी पिढीला उपयुक्त ठरतील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कृष्णा ....:)
यात अजून अनुभवी लोकांनी भर घालावी अशी अपेक्षा आहे

आजची लोकसत्ताचे बातमी ," आईच्या हत्त्येचा पश्चाताप नाही" वाचून पुनश्च मुलांचा भावनांक या विषयावर विचार वर आले
खरेच आजच्या अस्वस्थ वर्तमानात आपण भावनाशून्य होत चाललोय का?

जगात या वयाच्या मुलांमध्ये दिसणाऱ्या आत्महत्येच्या 10% आत्महत्या एकटया भारतात होतात>>>>>

भारता ची लोकसंख्या जगाच्या २०% आहे. कुमार वयातल्या मुलांची संख्या जगातल्या कुमार मुलांच्या संख्येच्या २५% असतील. म्हणजे १०% आत्महत्या होत असतील भारतात तर जगाच्या पेक्षा प्रमाण निम्मेच आहे असे म्हणायला पाहिजे.

चांगली माहिती आहे .

<<आजची लोकसत्ताचे बातमी ," आईच्या हत्त्येचा पश्चाताप नाही" वाचून पुनश्च मुलांचा भावनांक या विषयावर विचार वर आले
खरेच आजच्या अस्वस्थ वर्तमानात आपण भावनाशून्य होत चाललोय का?>>
मागच्या आठवड्यात ह्या बातमीने अस्वस्थ झाले होते , इतक्या लहान वयात असे का वागत असतील मुले अशी ,असा विचार आला . मुलाने असे हि म्हटले आहे कि आई खूप सेल्फ centric होती . पालकांचे प्रेम , माया ना मिळाल्याने तो मुलगा डिप्रेशन मध्ये गेला होता असे बातमीत म्हटले होते.
संवाद कमी होत चाललाय, खूप स्पर्धा , अवाजवी अपेक्षा ठेवणे ही कारणे असावीत .
मुलांना लहानपणापासून योगा, मेडिटेशन चे महत्व ,stress management घर व शाळा दोन्ही ठिकाणी शिकवायला हवे .

धन्यवाद टोचा, सिंथेटिक जीनियस आणि स्वराली Happy

biology is destiny.भावनांक बदलता येत नाही >>>>>> भावनांक वाधवता येतो असे अनेक तज्ञ म्हणतात. आपल्याला य्या संबंधी अधिक माहिती असेल तर लिहा. कारण भावनांक वाढवता येतो आणि त्या संबधी कार्यशाला डॉ. संदीप केळकर घेतात. emotional कोशंट या विषयावर ते गेली अनेक वर्षं अभ्यास करत आहेत. इतकेच नव्हे तर बुध्यांक स्थिर नसतो तो ही वाढवता येतो का याबाबत शोध सुरू आहेत, असेही वाचनात आले होते.

संवाद कमी होत चाललाय, खूप स्पर्धा , अवाजवी अपेक्षा ठेवणे ही कारणे असावीत .
मुलांना लहानपणापासून योगा, मेडिटेशन चे महत्व ,stress management घर व शाळा दोन्ही ठिकाणी शिकवायला हवे >>>>> स्वराली खरे आहे तुमचे. योग, मेडिटेशन महत्त्वाचे आहेत. खरेतर पुन्हा त्याच गोष्टीकडे वळले जाते आपली कुटुंबसंस्था , नातेसंबध, सणवार या सगळ्या गोष्टी विचार केल्या तर भावनांक वाढीसाठी महत्त्वाच्या वाटायला लागतात,
आज घराघरात कमी होत चाललेला संवाद हे मुख्य कारण आहेच त्या शिवाय मुलांना सतत आधार, नाही हा शब्दच माहित नाही. केवळ नाही असेच नाही तर थांब हा श्ब्द सुध्दा हल्ली मुलांना सहन होत नाही. लगेचच्या लगेच हवे असते. तर पालकांनीच आता या गोष्टींवर विचार करायची वेळ आली आहे.