कथुकल्या ८

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 20 May, 2017 - 04:40

१. शेवटची इच्छा

"तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?"

"चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात."

झाडाच्या फांद्यांनी अलगद तोललेल्या आपल्या लाकडी घरातून त्या तिघांनी आवश्यक तेवढं सामान गोळा केलं. फळे, कंदमुळे, आजूबाजूच्या पाण्याने वाहून आणलेल्या मृत मासोळ्या थैल्यांमध्ये भरल्या. बाहेर गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा कहर माजला होता, विजा आकाशीचा नगारा बडवत गर्जत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने लहानमोठ्या झाडांना तर केव्हाच उपटून फेकून दिलं होतं. त्या तिघांनी खांद्यांवर थैल्या अडकवल्या अन नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेल्या अथांग जलाशयात स्वतःला झोकून दिलं. पोहण्यात अतिशय निष्णात असूनही त्या शंभरेक मीटर अंतरावरील निलगिरीच्या झाडापर्यँत पोहोचायला त्यांना तब्बल एक तास लागला !

"हा पाऊस तर थांबता थांबत नाहीये." सह्याद्रीच्या सर्वात उंच शिखरावरील सर्वात उंच झाडावर बसलेला मंगेश म्हणाला. त्याचे मानेपर्यंत वाढलेले केस पाण्यामुळे पार विस्कटुन गेले होते.

"इतके दिवस कोसळणारा पाऊस मी अजून पाहला नाही. उन्हाळ्यातलं ते अंग जाळून टाकणारं ऊन अन पावसाळ्यातलं हे अतिभीषण रुद्रतांडव ! धैर्याची अजून किती परीक्षा पहावी निसर्गानं." वृक्ष हताश स्वरात बोलत होता. एका भक्कम फांदीच्या बेळफाट्यावर तो कसाबसा बसला होता.

"घाबरू नका पोरांनो. ईश्वराच्या मनात जे असेल तेच होणार." साठीला टेकलेल्या तात्यांनी दिलासा दिला. ते दोन्ही हातांनी झाडाची फांदी घट्ट पकडून बसले होते. वृध्दत्वाचं एकही लक्षण चेहऱ्यावर दिसत नव्हतं. तरूणाला लाजवेल अशी चपळाई, हिंमत, संयम यामुळेच ते आजतागायत जिवंत राहू शकले होते.

"निसर्ग सूड उगवतोय आपल्यावर. बरोबर आहे म्हणा त्याचं. आपल्या पूर्वजांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पर्यावरणाचा खून केला, प्रदूषण वाढवलं, फुलाफळांचे जंगल तोडून सिमेंटचे जंगलं वाढवले. मग काय होणार दुसरं. शेवटी पापं भरलीच न माणसाची. दिवसेंदिवस तापमान वाढत गेलं, हिमखंड वितळले, अख्खेच्या अख्खे देश पाण्याखाली बुडाले." बोलता बोलता तात्यांच्या डोळ्यांत आसवं गोळा झाली. पावसाच्या थेँबांनी ती चुपचाप दडवली.

"बरोबर आहे तुमचं तात्या. पूर्वजांच्या चुकीमुळेच आपल्यावर हा प्रसंग आलाय. एकेकाळी हरितसुंदर असलेल्या आपल्या वसुंधरेवर नावालासुद्धा जमीन उरली नाही." वृक्षने दूरवर क्षितीजाकडे पाहत म्हटलं. चहुबाजूंनी नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी होतं. ढगांनी सूर्याला गिळून समस्त पृथ्वीवर मृत्यूची काळी झिलई अंथरली होती. सह्याद्रीच्या कडेकपारींमधली थंडगार बोचरी हवा,अन्नपदार्थांची भीषण टंचाई व आशेचे मावळलेले सगळे दिवे. एवढं असूनही ते तगले होते. आजूबाजूच्या हजारो किलोमीटरच्या परिसरात ते तिघेच जिवंत उरले होते !!

"पाणी तर वाढतच चाललंय. तात्या, काहीतरी करा. नाहीतर थोड्याच वेळात आपल्याला जलसमाधी मिळेल." भितीने मुरकुंडी वळालेला मंगेश आपले फांदीखाली लोँबकळणारे पाय वर उचलत म्हणाला. त्याच्या तळपायांना नुकताच खालच्या अतिविशाल पाण्याचा स्पर्श झाला होता.
गेल्या तीन दिवसांपासून ते तिघे झाडावरच बसून होते. तिथेच त्यांनी अर्धवट पोट भरलं, फांद्यांच्या आधारे कशाबशा झोपा काढल्या, आपल्या लाकडी घराला डोळ्यांसमोर बुडतांना पाहिलं.

"आपल्या हातांत काहीच नाहीये बाळांनो. जे जे शक्य होतं ते आपण केलं. पण मानवी प्रयत्नांनाही मर्यादा असतात. आता त्या सर्वज्ञ देवाजवळच प्रार्थना करूयात."

"बरोबर. आता त्याचीच एक आशा."

"हे सर्वशक्तिमान ईश्वरा, करुणाकरा, हा पाऊस थांबू दे व सगळं पाणी सरुदे. जेवढी जमीन तू आम्हाला देशील त्याच्या कणाकणावर आम्ही झाडं लावू, एकही झाड कधी तोडणार नाही. फक्त हा पाऊस थांबूदे." वृक्षने कोपरापासून हात जोडून आकाशीच्या राजाकडे साकडं घातलं. पण पावसाचा जोर कमी झाला नाही. 'ही अक्कल तुम्हाला आधी का सुचली नाही?' असंच निसर्गाला सुचवायचं असेल.

पाण्याची पातळी वाढून आता पोटापर्यंत आली होती. तिघेहीजण विविधप्रकारे देवाच्या मिन्नतवाऱ्या करून थकले होते. जुन्या आठवणी काढून त्यांनी भरपूर रडून घेतलं होतं. तिघांना आपला मृत्यू स्पष्टपणे नजरेसमोर दिसू लागला. आता पाणी छातीपर्यंत आलं.
तात्यांनी आपले दोन्ही हात पाण्याबाहेर काढले. आकाशीच्या दिशेने आपले लालभडक डोळे वळवून आसमंताला चिरत जाणाऱ्या आवाजात त्यांनी आर्जव केलं, "हे दयानीधान परमेश्वरा... आम्ही तिघांनी आयुष्यभर निसर्गाची सेवा केली, एकही झाड कधी तोडलं नाही, प्रदूषण रोखण्यासाठी कित्येक मोहिमा काढल्या, निसर्गसंवर्धनासाठी आयुष्यभर झटलो. आमची एकतरी विनंती ऐक. आम्हाला पाण्यात बुडवून मारू नको."

अन काय आश्चर्य ! गेले तेरा दिवस क्षणाचीही उसंत न घेणारा पाऊस अवघ्या पाच मिनिटांत थांबला !! बोचऱ्या हवेचा जोर कमी झाला.

तिघाजणांनी एकमेकांकडे पाहिलं. मिट्ट काळोखात त्यांना चेहरे दिसत नव्हते. पाठीमागे कुठेतरी प्रकाशाची एक लकेर उमटली अन त्या उजेडात त्यांना एकमेकांच्या चेहऱ्यांवरील अत्यानंद स्पष्टपणे दिसला.

'हा प्रकाश कसला' हे कळायच्या आतच कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज गरजला अन विजेच्या लोळांनी निलगिरीचं ते झाड जाळून भस्मसात केलं.

२. हॅलो कोण ?

काल रात्री मित्राने मला खेचतंच घराबाहेर काढलं. आयपीएलमधे मुंबईकडून लावलेली बेट जिंकलीय म्हणे. आपल्याला काय... फुकट भेटलं अन पटकन गिटलं. त्यातही फुकटची दारू असेल तर मग विचारूच नका. मस्त बार शोधला अन एसीत जाऊन बसलो. चार पेग मारले अन दोन तंगड्या मटकावल्या तेव्हा लक्षात आलं की मोबाईल खिशात नाहीये. पिलेली सगळी झटक्यात उतरली न भाऊ. महागडा मोबाईल होता शिवाय नानाविध विदुषींचे फोटो आणि वगैरे वगैरे होतं त्यात.
टेबलाच्या खाली, वर आजूबाजूला, काउंटरजवळ, बाथरूममधे, सगळीकडे शोधलं. मित्राने गंमत केली असेल म्हणून त्याचेही खिसे पाहिले. जंगजंग पछाडलं पण काहीच फायदा झाला नाही.

शेवटी मित्राचा मोबाईल घेऊन लावला कॉल. फोन लागेल अशी खात्री नव्हतीच कारण भामटे मोबाईल सापडला की आधी सिम तोडून फेकून देतात. पण चक्क रिंग गेल्या अन दोनच रिंगमधे कुणीतरी रिसिव्हपण केला.

"हॅलो. कोणाकडे आहे फोन ?"

पलीकडुन फक्त गब्बर स्टाईल हसण्याचा आवाज आला.

"हॅलो."

कॉल कट.

पुन्हा लावला, उचलला नाही.

परत लावला, स्विच ऑफ.

"कुठं पळणारेस बेट्या. हा पठ्ठ्या तुला सोडणार नाही." या वाक्याने सुरुवात करून मी त्या अनामिक चोराच्या नावाने शिव्यांची बरसात करू लागलो. शेवटी मालकाने लाथ मारून काढून दिलं तेव्हा बारबाहेर पडलो. मित्राने घरी आणून सोडण्याचं कर्तव्य बजावलं.

लॉक उघडून आत आलो अन लाईट लावला. निराशेने सोफ्यावर कोसळलो.
पाहतो तर काय.... समोरच्या टेबलावर
माझा मोबाईल ठेवलेला होता ! हो माझाच... जातांना मी सोडून गेलो होतो अगदी तिथेच !!

३. वेदनांचा इतिहास

तिच्या ड्रेसची चैन मानेमागून सुरू होऊन हळूहळू खाली घसरत चाललीये. दोन बोटांच्या चिमटीत तिला पकडून मी हळूहळू खाली खेचतोय. एकमेकांमधे घुसलेल्या दातांचा विलग होतांना उमटणारा सूक्ष्म आवाज, तिच्या पाठीवर उमटणारे सूक्ष्म शहारे. ड्रेस उघडत चाललाय इंचाइंचाने. उघड होत चाललेत खांदा म्हणून मिरवणारे हाडांची दोन टोकं, पाठीवरचे जुनाट वळ, डागण्या अन चटक्यांची विकृत नक्षी.

अन...
जेव्हा तो ड्रेस पुर्णपणे गळून पडाला तेव्हा मला समजलं की ती का हसली होती मी एक साधा कारकून आहे म्हटल्यावर. का ती म्हणाली होती की मला पैसा नाही फक्त प्रेम पाहिजे.

४. पहिले बोल

पप्पा : बाळा पप्पा म्हण
बाळ : मम्मी
पप्पा : मम्मी नाही पप्पा
बाळ : मम्मी
पप्पा : प... प्पा
बाळ : म... म्मी
पप्पा : तुझ्या मायला तुझ्या

तेवढ्यात बाळाची मम्मी घरात येते.

मम्मी : काय म्हणतंय बाळ आमचं
बाळ : तुझ्या मायला तुझ्या
मम्मी : असं म्हणू नाही बाळा. कुणी शिकवलं तुला हे ?
बाळ : पप्पा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

2, 3 ज्यांना कळाली असेल ते सांगू शकतील का ? वाचकांना काय अर्थ लागतोय हे जाणून घेण्याची इच्छा.

दुसरी भारी कॉमेडी आहे Happy आवडली थिम रौंग नंबरची
आणि 3री अजुन भारी वाटली ... त्या केटेगरी मधल्या स्त्रीयांचे खरे दू:ख मांडणारी .....किंवा खरे तर कोणत्याही व्यक्तिस खरे काय हवेय ह्याची ओळख पटवणारी कथा.

१ली मध्ये पण विजेचे लॉजिक ओके. फक्त पाणी एवढ्या भरकन ओसरतेय म्हणजे ते पृथ्वीच्या पोटात जात सुप्त ज्वालामुखीने त्यांचा शेवट करता आला असता.

2, 3 ज्यांना कळाली असेल ते सांगू शकतील का ? वाचकांना काय अर्थ लागतोय हे जाणून घेण्याची इच्छा.>>>

२. स्वतःलाच घातलेल्या शिव्या - कॉमेडी.
३. एका वेश्येची व्यथा - सुख ओरबाडून घेणारे लोक.

फक्त पाणी एवढ्या भरकन ओसरतेय म्हणजे ते पृथ्वीच्या पोटात जात सुप्त ज्वालामुखीने त्यांचा शेवट करता आला असता.
>> बरोबर.सगळीकडे पाणी म्हटल्यावर ते इतक्या भराभर ओसरणार नाही. त्यामुळे ते वाक्यच कट केलंय. तुम्ही सुचवलेला पर्यायही विचार करण्यासारखा आहे.

तिसऱ्या कथेचं लॉजिक योग्य.

दुसऱ्यात तो wrong number कसा असेल.

मानवजी, दोन्ही अर्थ अगदी भारी लावलेत.

स्वतःला घातलेल्या शिव्या हेपण मस्तय. कुणीतरी गब्बरसारखं हसतय हा त्याचा भास असेल किंवा मोबाईलची रिंगटोन असेल Biggrin

बादवे, या कथेचा अजून एक अर्थ निघू शकतो

कथेचा अजून एक अर्थ >>> मला वाटलं घरात भूत व अमानवीय शक्ती असेल...

आवडीचा क्रम आहे का ? >>>हो..आवडीचा क्रम होता तो..

दुसरी मला गूढ वाटली. म्हणजे फोन जागच्या जागी असताना कॉल रिसीव्ह कोणी केला, एकतर मानवी (खिडकीतुन घुसलेला चोर वगैरे) किंवा अमानवी एखादा आत्मा वगैरे.

तिसऱ्या कथेचं मानव यांचं लॉजिक बरोबर आहे.

तिसरीचा आणखीन एक अर्थ... कारकून आहे हे ऐकून ती हसली म्हणून... मला वाटलं त्या वेदना देणारा तिचा नवरा असावा जो श्रीमंत आहे पण क्रूर आणि म्हणूनच त्यावर सूड म्हणून किंवा स्वतःच सुख म्हणून तिने कारकुनासारख्याशी (श्रीमंतांसाठी खालचाच दर्जा ) संबंध ठेवले असावेत.

आवडल्या कथुकल्या.

२ री न ३री कळाअली नव्हती, प्रतिसाद वाचुन समजली.

बादवे, या कथेचा अजून एक अर्थ निघू शकतो >>>>>>>>> थ्रीलर टाइप का ?

@ मॅगी- चोर मलाही सुचवायचं होत... पण मग त्याने फोनसुद्धा चोरला असता.. ठेऊन नसता गेला

मस्त कथुकल्या.
३. एका वेश्येची व्यथा - सुख ओरबाडून घेणारे लोक.>+!

दुसरी- मला वाटतं जास्त पेग झालेत. Lol

एक्झाटली Happy
मला तेच म्हणायचे होते म्हणून त्या केटेगरी मधील स्त्रीया असा उल्लेख केलाय माझ्या प्रतिसादांत
Bcoz its hermaphrodite Lol

बादवे, या कथेचा अजून एक अर्थ निघू शकतो>>>>>
फोन मध्येच जीव / इंटिलिजन्स / भुताटकी आहे? बारमधुन निघुन आधी जिथुन टेबलावरुन उचलला तिथे जाऊन बसला. त्याने फोन केला तेव्हा गब्बर सारखा हसला.

अजून एक शक्यता:
मित्राने खेचतच घराबाहेर काढलं असं लिहिलंय (खोली बाहेर नव्हे.)
म्हणजे कुटुंब. तुमचं (कथोतील "मी" या पात्राचं) लग्न झालंय.

तुम्ही फोन विसरुन आलात. बायकोने ते "नानाविध विदुषींचे फोटो आणि वगैरे वगैरे" सगळं पाहिलं.
तुम्ही मित्राच्या फोन वरुन कॉल केला तेव्हा तीच गब्बर सारखी हसली (पण पुरुषाच्या हसण्याचा आवाज ती कशी काढणार? तुमचा फोन येणार हे ताडून ती तयारीत होता. तिच्या फोन वरुन गब्बरच्या हसण्याची ऑडियो ऐकवली.)
आणि तिने फोन तुमचा फोन स्विच ऑफ करुन टाकला आणि जिथे होता तिथेच ठेवला.

आणि ती माहेरी निघुन गेली. तेव्हा तुम्हाला लॉक उघडावं लागलं, घरात अंधार होता दिवा लावावा लागला. ( दाराला रिम लॉक असले तरी हे व्हॅलिड ठरावे).

Pages