ढग दाटून आले कि....

Submitted by विनोद मेस्त्री on 18 May, 2017 - 01:55

माझ्या घरातून दिसणारं पावसचं ढगाळ वातावरण…काही वेळा हरवून जायला होतं…मन आणि आभाळ यातलं अंतर संपून जातं…मन आभाळ होऊन जातं आणि अशा या मंतरलेल्या क्षणात असं काहीसं सुचतं…ढग दाटून आले की…

ढग दाटून आले की मन आभाळ होऊन जातं
असंख्य आठवणी बरसू लागतात
भिजायचंही नसतं आणि स्वतःला वाचवताही येत नाही

ढग दाटून आले की हरवून जातो मी माझ्यातून
भटकत राहतो, काही न उलघडलेल्या प्रश्नांचे गुंते सोडवत
शोधायचंच नसतं कधी स्वतःला, म्हणून कदाचित सापडतही नाही...

ढग दाटून आले की पावसात असंख्य चेहरे आकर घेवू लागतात
भावनांचे अगणित हिशोब अर्ध्यावर सोडून गेलेले ते काही चेहरे
निटसे आठवतही नाहीत आणि पूर्णपणे विसरताही येत नाहीत

ढग दाटून आले की अंतरातील खोलवर झालेले घाव नव्याने वेदना द्यायला लागतात
असह्य असह्य होऊन जातं जगणं
या अशा वेदना, ज्या शमवायच्या तर असतात आणि गमवायच्याही नसतात

ढग दाटून आले की वेळ थांबलायसा वाटतो
वाटतं या क्षणातच जगून घ्यावं भरभरुन, आठवणींना थोडं दूर सारुन
पण वेळ हाती उरत नाही आणि आठवांचं मन भरत नाही

खरंच ढग दाटून आले की मन आभाळ होऊन जातं
असंख्य आठवणी बरसू लागतात
भिजायचंही नसतं आणि वाचताही येत नाही

13716056_1173403966055285_2018450504212235114_n-720x460.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!
होतं खरं असच काही ...
बरच काही!..आभाळ दाटून येता ...