डोंबिवली पश्चिम

Submitted by सूनटून्या on 10 May, 2017 - 04:06

डोंबिवली पश्चिम मुख्यतः उल्हास नदी तटावर वसलेलं आहे. उल्हास नदी राजमाचीला उगम पावते व पुढे कर्जतला मागे टाकून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याला स्पर्श करून पुढे ठाकुर्ली पौवरहाऊस शेजारून डोंबिवलीच्या राजूनगर-कुंभारखाणपाड्यावरून मोठागाव ठाकुर्लीला येते. मोठागाव ठाकुर्लीला चौपाटी केली आहे आणि भक्तांनी निर्माल्याची पखरण करून उकीरडा बनवलाय तो भाग अलहिदा. (ठाकुर्ली स्टेशन वेगळे आणि डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव ठाकुर्ली वेगळे) तिथून पुढे उल्हास नदी दिवा-मुंब्रा करीत ठाण्याला जाते आणि पुढे वसईच्या खाडीला मिळते. कल्याण-डोंबिवली ते ठाणे परिसरात उल्हास नदीला खाडीच म्हणतात. समुद्राच्या भरती ओहोटीमुळे दिवसभरात पाण्याची पातळी खालीवर होत राहते आणि भरतीचे पाणी थेट कल्याणपर्यंत आत येते. त्यामुळेच तिचा आधीच प्रवास नदी म्हणून होतो तर कल्याण पासून ती खाडी म्हणूनच ओळखली जाते.

पश्चिमेला देविचा पाडा गावानजिक असलेल्या उल्हास नदीवर असलेला रेल्वेचा पूल परिसर पक्षीप्रेमींसाठी अनुकूल. खाडीकिनारी खाजण भागात अजूनही कोल्हे आहेत. कौंक्रीट जंगल वाढत असल्याने ते सुद्धा ईतिहासजमा होतील. या पुलावरून (सातपुल) चालत पलिकडील तटावर पिंपळास गावात जाता येते. ठाण्यावरून भिवंडीकडे जाताना माणकोली नंतरच गाव-पिंपळास. (माणकोलीच्या आधी ठाणे-भिवंडी रोडवर अंजूरदिवा नावाच गाव आहे जिथला नाईकांचा गणपती प्रसिद्ध आहे. दिवा-मुंब्रा या तटावर तर अंजूर पलिकडील तटावर).

पिंपळासमधील गावकरी मंडळी डोंबिवलीला येताना या पुलावरील चिंचोळ्या पट्टीवरून सायकल हाकत येतात. आधी या मार्गावर एकच ट्रैक होता, त्यामुळे मागेपुढे दोन्हीकडै लक्ष ठेवावे लागायचे. खाली तुडूंब भरलेली खाडी आणि समोरून किंवा मागून येत असलेली रेल्वे, त्यात वाहनमार्गिका म्हणून असलेली ति लोखंडी चिंचोळी पट्टी. त्यातच त्या पट्टीचे मधले बोल्ट्स निघालेले असायचे, त्यामुळे सायकल गेल्यावर तिचा फटफट आवाज येत राहायचा, हे बॅकग्राउंड म्युझिक. त्यात त्या पट्टीला मध्ये मध्ये पाव-अर्धा फूटभर फट असायची. अक्षरशः सर्कस करीत त्यावर सायकल चालवायचे ते गावकरी. त्यात एखादी स्त्री आपल्या नवऱ्याच्या सारथ्यावर संपूर्ण भरोसा ठेऊन डबलसीट बसलेली दिसली कि त्या माउलीला कौतुक भरल्या नजरेनेंच पाहायचो. गाडी आली की सायकल उचलून थोड्या थोड्या अंतरावर बनवलेल्या बाल्कनीत जाऊन उभे राहायचे. या बाल्कनीत उभे राहण्याचा अनुभव भन्नाट असायचा. गाडी धडधडत याची आणि इथे बाल्कनीही धडधडायची आणि आपल्याही कपाळात.

पिंपळास गावातून खाडीवरील पुलावरून गावकरी स्त्रिया ताजी भाजी घेऊन डोंबिवलीमध्ये विकावयास येतात. डोंबिवली पश्चिमेला गुप्ते रोडवर छोट्या छोट्या टोपल्या घेऊन बसतात. आता संख्या कमी झालीय. बिनदिक्कत यांच्याकडून भाजी घ्यायची. परसदारातली विहिरीच्या पाण्यावर वाढवलेली भाजी मिळते.

पिंपळास गावात पंधरावीस वर्षांपूर्वी शुद्ध ताडी मिळायची आता मिलावट. या पिंपळास गावासमोरच्या टेकडीवर किल्ला होता, आता काहीच अवशेष नाहीत.

पुलाच्या पिलर्सवर तासनतास बसणे हा आमचा रविवारचा कार्यक्रम. डोक्यावरून रेल्वे धडधडत जायची आणि आपण दूरवर माहुली किल्ल्यापर्यंत नजर लावून ध्यानस्थ बसायचे.

खाडीकिनारी जवळपास शंभर फुटांपेक्षा जास्त उंचीचे विटांनी बांधलेले मनोरे ठिकठिकाणी आहेत. स्थानिक लोक हे मनोरे वीटभट्टीचे असल्याचे म्हणतात. पण इथली खाडी उथळ असल्याने बोटींना दिशादर्शनासाठी बांधले असावेत असा कयास आहे. जर तुम्ही सध्याची वीटभट्टी पाहिली असेल तर त्यात विटा एकावर एक रचताना मध्ये गवत-भुसा वगैरे भरलेला असतो. धूर जाण्यासाठी मनोरा वगैरे काहीच नसतं. जर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मनोरे वेगळ्याच वीटभट्टीचे असतील तर यांचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे.

डोंबिवली पश्चिम खाडीकिनारी विलायती चिंचेची भरपूर झाडे होती. हिवाळा संपता संपता बहर असायचा. दुपारी जेऊन बाहेर पडायचं आणि खाडीकिनारी चिंचा काढीत बसायचे. तिथल्या विहिरीचे पाणी तर अप्रतिम होते. खाडीकिनारी असूनही तिथल्या विहिरींचे पाणी गोड होते. तिथल्या पाण्याने खाडीचा खारेपणा आपल्याला लागू दिला नव्हता. ठाकुर्ली स्टेशन किनारी भागात बोराची भरपूर झाडे होती. तिथला रेल्वे वैगनमधून पडलेला कोळसा तुडवत जाव लागायचं. सगळा अवतार काळा व्हायचा.

सतीश कुडतरकर
IMG-20170510-WA0000[1].jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, पिंपळास गावाशी व्यावसायिक संबंध असल्यामुळे वाचून चांगले वाटले.

डोंबिवलीकर असून पश्चिम भागाची माहीती अगदीचं तुटपुंजी आहे, ह्या लेखाने माहीतीत भर पडली. वेस्ट म्हंटलं की आम्हा पूर्व वासियांना मच्छी मार्केट चं आठवतं Happy

डोंबिवलीकर असून पश्चिम भागाची माहीती अगदीचं तुटपुंजी आहे >>>>> तसही 'डोंबिवली पश्चिम' हा काय माहिती घेण्याचा आणि लेख लिहिण्याचा विषय आहे का ? Wink
(कॉलिंग कविता नवरे.. Proud )

मस्त लेख.

डोंबिवली पश्चिमेशी संबंध कधी आला तर स्टेशनजवळ असलेला माझा टायपिंग क्लास, कॉलेजला असताना रोज जायचे. काका, चुलत बहीण घनःश्याम गुप्ते रोड भागात रहायचे, एक चुलत बहीण क्रांती जवळ नवापाडा, आता ह्यापैकी कोणीच त्या भागात रहात नाही म्हणून जाणं येणं होत नाही. बाकी असेच काही नातेवाईक शास्त्रीनगर, डोंबिवली नागरीक सोसायटी. पण जाणं क्वचित तिथे. कधी गोपीला चित्रपट बघायला गेले तर. मुनमुन मिसळ आणि क्वचित द्वारका मधे गेलो तर.

मागे रेतीबंदरला फिरायला वगैरे गेलो होतो. बाकी डोंबिवली इस्ट मधेच राहीलेलो त्यामुळे तिथेच आवडतं जास्त. आता ब्रिजवरुन फिरायला जायला आवडतं दोन्ही बाजूंनी पण डोंबिवली वेस्ट अजूनही परकंच वाटतं.

मला डोंबिवली वेस्टबद्दल काही म्हणजे का ही ही माहिती नाही. क्वचित एखाद दोन वेळा जाणं झालं असेल पण खरं सांगायचं तर वेस्ट बाजू एरवी खिजगणतीतही नसते (जे अजिबात चांगलं नाही).

मस्त लेख.
वरील पूर्वेकडील प्रतिक्रीयांशी सहमत. Lol
पश्चिम म्हणजे गुप्ते रोड, राणाप्रताप, गोपी, स्टेशन जवळच्या खाण्याच्या टपऱ्या आणि इस्टच्या तिकीटघराला अशक्य रांग असेल (म्हणजे असायचीच) तर विनातिकीट पूल ओलांडून वेस्टला जाऊन तिकीट काढणे इतकीच ओळख झालेली. नंतर एकदा मित्राबरोबर पावसात खाडीच्या इकडे गेलेलो. अशक्य सुंदर परिसर आठवतोय. हे डोंबिवलीत आहे आणि आपण कधी बघितलंच नाही पाहून फार वाईट वाटलेलं. छान लिहिलंय तुम्ही. Happy

डोंबिवली वेस्ट हे १५/२० वर्षांपुर्वीपर्यंत अतिशय सुंदर होते. खाडीचा परिसर, ठाकुर्ली, बावनचाळ, राजु नगर, मिलाप नगर, चिंचोळ्याचा पाडा, रेतीबंदर हे ज्यांनी पाहिलेले आहे ते सांगतील. वेस्टला एक निवांतपणा, गावात असतो तसा शांतपणा अनुभवायला मिळायचा (स्टेशनजवळील परिसर सोडुन). पायी फिरायला छान वाटायचे कारण वाहनांची वर्दळ नसायची. इस्टला जाणे तेव्हाही नको वाटायचे.

>>>हे डोंबिवलीत आहे आणि आपण कधी बघितलंच नाही ---- हो असं व्हायचं. ईस्टकडील मंडळींना आम्ही फिरवुन आणायचो तेव्हा ते असेच म्हणायचे. रेतीबंदर्ला पुर्वी भाजीवाल्यांच्या बोटीने प्रवास करता यायचा. काय अनुभव होता तो. अगदी आउट ऑफ द वर्ल्ड वाटायचा लहानपणी.

इस्टलाही होताकी खूप परीसरात निवांतपणा पण पंचवीस वर्षापूर्वी, आयरे रोडचा टोकाकडचा भाग जिथून दिवा वसई गाडी जाते त्याला आम्ही लाल मातीचा डोंगर म्हणायचो आणि फिरायला जायचो. पेंढारकर कॉलेजच्या पुढचा परिसर, बालाजी मंदिर परिसर, नांदिवली, ठाकुर्ली स्टेशनजवळचा भाग, राजाजी पथ भागात काही ठिकाणी बंगले होते तिथेपण निवांतपणा वाटायचा. भोपर टेकडी परिसर तर हल्ली हल्ली गजबजलाय.

बावनचाळ परिसर बघितलाय एकदोनदा. खूप लहानपणी आणि कॉलेजमधली मैत्रीण होती तेव्हा. मस्त आहे तो. रेतीबंदर बोटीने प्रवास केलाय पण आठ वर्ष झाली, तेपण मस्त वाटलं. वेस्ट ला रेशन ऑफिस होतं तेव्हा जायला लागलं होतं. बाकी आपण जिथे राहतो तोच परिसर आपल्या जास्त परिचयाचा आणि आवडीचा असतो हे मात्र खरं.

सुंदर लिहिलंय.
हे असं बऱ्याच जागांविषयी लिहिता येईल. विशेषतः जिथे बालपण गेले असेल तिथलं तर अधिक.

शाळा कादंबरीत जे वर्णन आहे ते सुद्धा डोंबिवलीच्या आसपासचे असावे असे वाटते. कुणी अधिक सांगू शकेल?

तसही 'डोंबिवली पश्चिम' हा काय माहिती घेण्याचा आणि लेख लिहिण्याचा विषय आहे का ? Wink
(कॉलिंग कविता नवरे.. Proud )>>>>>>

खरं आहे परागसाहेब....
काही लोकांचं अस्तित्व दाखल घेण्यालायक नसतं. धन्यवाद!

शाळा कादंबरीत जे वर्णन आहे ते सुद्धा डोंबिवलीच्या आसपासचे असावे असे वाटते. कुणी अधिक सांगू शकेल?>>> हो, मिलिंद बोकील डोंबिवलीत डी. एन. सी. शाळेत होते आणि तो एरिया डोंबिवली इस्ट डी.एन.सी. शाळा, श्रीखंडेवाडी वगैरे आसपासचा होता असं ऐकून आहे कारण ही फार पुर्वीची गोष्ट आहे.

त्या खाडीत रेतीबंदरवरून एक मोठी बोट(१००-१५०फुट लांबीची) फिरण्यासाठी असायची. (२००४-६)दहा रु तिकिट, शंभरदिडशे माणसे मावायची. त्या पुलापर्यंत नेऊन आणायचे. दशमी एकादशीला संध्याकाळी भरती असली की असायची. एरवी एक वीसफुटी पडाव चालवायचे.

८०-८५ साली मुंब्रावरच्या धक्क्क्यावरून पलीकडच्या अंजुरदिवेला बोटीने गेलेलो. (१रु तिकिट) आता बंद आहे.

मस्त लिहीलंय....खरं आहे पूर्वी डोंबिवलीत कित्येक भाग फार सुंदर होते त्यात खाडीचा भाग होता.

फार-फार वर्षापूर्वी डोंबिवली पश्चीमेशी आमचा संबध फक्त गोपी टॉकिजवर लागलेले सिनेमे पाहणे इतकाच असायचा, व कधीतरी मासळी बाजारातून मासे आणण्यापुरता. फुल और कांटे हा अजय देवगणचा पहिला सिनेमा ह्याच गोपी थेयटराला पाहिलेला.
--
आता आहे का हे गोपी टॉकिज ?

गूगल मॅपवर Vehele Reti Bandar Bird Watching असे एक ठिकाण दिसते. तिथे कारने जाणे शक्य आहे का? एकट्याने जाणे सुरक्षित आहे का?

सुंदर लिखाण. बृहन्मुंबईच्या झपाट्याने बदलत्या भूगोलाची माहिती नोंदली गेली पाहिजे. अशी अधिकृत नोंदणी झाली नाही तर नंतर आख्यायिका आणि किंवदंत्यांचे पेव फुटते. मुंबई विद्यापीठाच्या कलीना जागेचे नाव कोळे कल्याण आहे. कोळी लोक राहातात ते कल्याण म्हणून कोळे कल्याण. पण काही लोक वेगळीच व्युत्पत्ती सुचवतात. येथे पूर्वी खूप कोल्हे निघायचे. ईस्ट इंडियन क्रिस्तिअन भाषेत ' कोले', म्हणून हा परिसर कोले कल्याण! मुंबईत पूर्व वांदरे ते पूर्व सांताक्रूझही सगळी मोठी खारटाण होती. मिठी नदीच्या मुखातून समुद्राचे पाणी पार शीव कुरले आणि खार सांताक्रूझपर्यंत पसरायचे. कोळ्यांच्या छोट्या गावठाणांव्यतिरिक्त बाकी काही नव्हते. त्यामुळे खूप मासेमारी व्हायची. कोळी लोकच मुख्यत्वे इथे वसले होते. असो. ' कल्याण' हा शब्द पोर्तुगीझ स्पेलिंगनुसार caliana असा लिहिला जायचा. त्याचेच पुढे कलीना/ कालीना झाले.
आपल्याला छोट्याछोट्या गोष्टींच्या डॉक्युमेंटेशनची सवय नाही. त्यामुळे इतिहासभूगोलातील कितीतरी गोष्टी अद्न्यात राहिल्या आहेत. वरती अणजूरचा उल्लेख आहे. त्याविषयी एक छोटीशी नोंद नंतर.