झटका टूर !

Submitted by उदे on 8 May, 2017 - 01:53

मनात आल्यावर तासाभरात दौऱ्यावर निघणे याला आमचा चक्रधर (ड्रायव्हर) ज्योतिबा ,'झटका टूर ' असे म्हणतो.
शब्द गावरान असला तरी आमच्या अचानक झटपट निघण्याच्या लगबगीचं यथार्थ वर्णन करणारा आहे.

झालं असं कि काही वर्षांपूर्वी सकाळी स्वातीला आणि मला दोघांनाही लांबवर फिरायला जावंसं वाटलं. लगेच ज्योतिबाला फोन लावला. तो त्याच्या गाडीसह यायला तयार झाला आणि आम्ही सकाळी ७ वाजता कोकणात जायला निघालो.
IMG_4404.JPEG
कपडे,खाणं आणि गाण्याच्या सीडीज् तर घ्यायच्या होत्या! बाकीचं मुक्कामी किंवा वाटेत असा ठरलं. मजल दरमजल करीत वालावल मुक्कामी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच वालावलहून निघालो. दसरा होता. फोंडा घाटातून कोल्हापूर गाठायचं ठरलं. वाटेत दाजीपूर लागलं. अभयारण्यातून गाडी जात असता, राधानगरीडॅमचा जलाशय दिसला. ज्योतिबाला म्हटलं थांबूया. जलाशयाच्या काठावरच्या रम्य हिरवळीवर बसून पाय जलाशयात सोडून निवांत बसलो होतो. तेवढ्यात 'डुबुक डुबुक' असा आवाज ऐकू आला. समोर पाहिलं तर समोरच्या काठावर दूरवर काही लोक ढोल वाजवत होते. आणि त्या वाजवण्याचा प्रतिध्वनी आमच्यापर्यंत जराश्या अंमळ विलंबाने आम्हाला ऐकू येत होता. आकाशात ढगांच्या पार्श्वभूमीवर बगळ्यांची माळ शांतपणे जलाशय पार करीत होती. आम्ही केवळ स्वप्नील अशाच वातावरणाचा अनुभव घेत होतो.

गाडीत बसून थोडंसं पुढे गेल्यावर 'आई उगवाई मंदिर' असा फलक दिसला. थोडासा चालत जाऊन पुढे गेलं असता रम्य परिसर न्याहाळता आला. आई उगवाई मंदिरात कुणीतरी, नुकतीच प्रज्वलित करून गेल्यासारखी एक पणती रुपगर्वितेच्या दिमाखात पूर्ण तेजाने चमकत होती. या दोन ठिकाणच्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेऊन,वाटेत फोंडामधील उंचापुऱ्या धष्टपुष्ट बैलांची अवखळ दौड पाहून आम्ही कोल्हापूरच्या वाटेल लागलो.
IMG_6687.JPEG
दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला मुक्काम करून तिसऱ्या दिवशी मुंबईला परतलो. परंतु यावेळच्या झटकाटूर मध्ये दाजीपूर भोवतालच्या आणि आई उगवाई मंदिराच्या भोवतालच्या अविस्मरणीय नजाऱ्याने डोळ्याचे पांग फेडले या आठवणींचाच दरवळ मनात कायमचं घर करून राहिला.

झटका टूर च्या अनेक आठवणी आहेत!

कामानिमित्त जगभर सतत भ्रमंती करणारे ज्येष्ठ मित्र राजीव पाटील यांचा एकदा असाच भर सकाळी फोन आला. तयार आहात का? तासाभरात निघूया का?
कुठे जायचं ते वाटेत ठरवू. म्हटलं ठीक आहे. आणि तासाभराने म्हंजे सकाळी ८ वाजता राजीव-अमिता, मी आणि स्वाती भंडारदऱ्याला जायचं असं वाटेत ठरवून घोटीमार्गे भंडारदरा-रंधा फॉल बघून आलो. मुख्य बेत गप्पा मारण्याचा होता. भंडारदऱ्याला आम्ही चौघंही बऱ्याच वेळा जाऊन आलो होतो.

वरील घटनेच्या थोडं पाठी गेलं कि मला आठवतं, बँकेत मी चेस, कॅरम खेळत बसलेला असताना 'ठाकूर तुझा फोन' असं कुणीतरी सांगे. फोन शेटे,बागवे,गोखले,हिरेश यांच्यापैकी कुणाचा तरी एकाचा असे. रात्री त्यावेळेच्या व्हीटी ला अमुक अमुक वेळेला भेटायचं ठरलेलं असे. त्यावेळी हे असं भेटणं हे आजच्या झटका टूर चाच अवतार असे. कारण लगेच मी खेळ अर्ध्यावर सोडून,तातडीने नेहेमीची खरेदी करीत घर गाठून,तयार होऊन,सॅक पाठीवर घेऊन झटपट निघत असे.
IMG_6686.JPEG
आता बरंच काही बऱ्याच वेळा बघून झाल्याने पूर्वीसारखं १-२-३ दिवसांकरिता अचानक निघण्याचे कार्यक्रम अगदी अलीकडे कमी झाले आहेत. परंतु अजूनही बरोबरची मंडळी नवीन असली किंवा आळसावलेली असली कि त्यांना सांगावं लागतं कि बाबांनो आता झटका करा झटका.

----------उदय ठाकूरदेसाई.

टीप: इच्छुकांनी uthadesai.com वेबसाईटवर'चक्रधर'हा लेख पाहावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults