सरकारी कार्यालयातील एक अनुभव

Submitted by मनीमोहोर on 7 May, 2017 - 14:06

गाडीच लोन फिटलं आणि मग गाडीचं एच पी कॅन्सल करुन घेण्यासाठी आर. टी. ओ. च्या कार्यालयात जावं लागणार असल्याचं कळलं. बँकेतल्या माणसाने ही " बाई, तुमचा कोणी एजंट असेल तर त्याला सांगा. तो सगळ नीट करुन देईल. " असा सल्ला दिलाच होता. मैत्रीणीने ही थोड्याच दिवसांपुर्वी आर टी ओ मध्ये जाणं आपल्याला शक्यच नाहीये असं म्हणून तिच काम एजंट मार्फतच करुन घेतल होतं . मी काय करू या म्हणून खूप गोंधळून गेले होते कारण विनाकारण त्या कार्यालयात चार चार चकरा मारायची मानसिक तयारी ही होत नव्हती आणि एजण्ट कडे ही जायच नव्हतं. चार पाच दिवस ह्यातच गेले. पण काही तरी हालचाल करायला हवीच होती कारण बँकेने दिलेल्या पत्रावर एक महिन्याच्या आत कारवाई करणं आवश्य्क होतं. शेवटी नेट वरुन थोडी महिती मिळवली. कागद्पत्र गोळा केली. आणि पहिला डाव देवाला ह्या विचाराने " आज नुसतं जाऊन तर येऊ या " म्हणून सगळी कागदपत्र घेऊन पोचले आर. टी. ओ. ऑफिसात.

एका खूप जुन्या एक मजली इमारतीत हे ऑफिस आहे. बाहेरच सगळे संबंधित फॉर्म आणि स्टेशनरी घेऊन एक फेरीवाला बसलेला होता. त्यालाच विचारुन आत गेले . दर्शनी भागातच कोणत्या खिडकीवर कोणते काम होईल ह्याचा मोठा फलक लावलेला पाहिला आणि एक सुखद आश्चर्याचा धक्काच बसला . माझा काउंटर नंबर शोधुन मी तिथे पोचले तर महिला आणि जे. नां साठी वेगळी लाईन होती. त्यामुळे नंबर ही लगेच आला. तशी ही त्या खिडकीवर फारशी गर्दी ही नव्हतीच . बाईनी माझे कागद पत्र तपासुन पाहिले आणि मला काय काय करायला हवं आहे ते अंगावर न येता नीट समजावुन सांगितले. त्या दिवशीच काम अगदी अर्ध्या तासातच झालं.

आता पुढची पायरी म्हणजे बँकेत जाऊन एक लेटर आणायच होतं . तस ते आणलं आणि पुन्हा गेले आर टी ओ मध्ये . ह्या वेळेस एक कोणती तरी रिसीट मी जोडली नव्हती असं त्या बाई म्हणाल्या. मला वाटलं ... " गेली फेरी फुकट ! आता घरी जा आणि या घेऊन ती कॉपी " पण त्या बाईनी मला आत जाऊन त्यांच्या रेकॉर्ड वरुन लिहुन आणा तो रिसीट नंबर. घरी जाऊन आणायची गरज नाही असं सांगितल तेव्हा तर माझा ऊर भरुन आला अगदी. मी आत गेले . एकंदर लुक सरकारी कार्यालयाचा असतो तसाच होता. आजुबाजुच वातावरण फार उत्साही करणार नव्ह्तं . सगळी कडे पेपरचे, फायलींचे गठ्ठे वैगेरे... एसी नाही... मो़कळेपणा नाही... पण तरी ही तिथल्या कर्मचार्‍याने पी. सी. वरुन मला एवढ जुनं रेकॉर्ड काढुन दिलं. मी धन्य झाले . त्यांचे खरोखर मनापासून आभार मानले. त्यांच्या डेटा स्टोअर करुन ठेवण्याचं कौतुक केलं आणि सगळे पेपर्स परत काउंटर वरच्या बाईना आणुन दिले .

त्यांनी मला एक आठवड्यानी परत बोलावले. मी गेले तर त्या नेहमीच्या बाई नव्हत्या काउण्टरवर . आज कोणीतरी दुसरच बसल होत. मला वाटल आता परत पुन्हा याव लागणार आज त्या नाहीत म्हणून. पण असं काही ही न होता त्याच दिवशी बँकेच एच पी रिमुव केलेलं आर सी बुक माझ्या हातात आलं . इतक सहज सुरळित सरकारी काम होईल अशी मी थोडी ही कल्पना केली नव्हती. मला त्यांच्या कार्यक्षमतेच आणि त्यांच्या ह्या प्रो कस्ट्मर अ‍ॅटिट्युडच मनापासुन कौतुक वाटलं. हे लिहिण्यासाठी मी त्यांच्या कडे रिमार्क बुक आहे का अशी चौकशी केली पण पटकन नाही मिळालं मला ते म्हणुन मी ही नाद सोडला आणि निघाले. जनरली रिमार्क बुक तक्रार करण्या साठीच मागतात आणि ते टळण्यासाठी ते कुठेतरी पटकन मिळणार नाही असच ठेवल गेलं असेल कदाचित. .

रिमार्क बुक मध्ये तर मी त्यांच कौतुक नाही करु शकले म्हणून मी इथे हा अनुभव शेअर करतेय. कामाच्या ठिकाणी फार सोई सुविधा नसुन ही त्यांची कार्यक्ष्मता, कामाच्या प्रति असलेली आपुलकी , माझ्याशी बोलतानाचा मृदु टोन या सगळ्या मुळे हायपोथिकेशन रिमुवल हा अनुभव अविस्मरणीय झाला आहे.

आपले ही कोणाचे असे चांगले अनुभव अस्तील तर इथे जरुर शेअर करावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला अनुभव आहे.
हा अनुभव तुम्हाला निव्वळ चांगली माणसे भेटली म्हणून आला नसून त्या डिपार्टमेंटच्या कार्यपद्धतीत तसा बदल घडावा म्हणून प्रयत्न केले गेले असावेत. सिस्टीमबदलाचे हे चांगले लक्षण आहे.

असाच चांगला अनुभव मला मागच्या वर्षी ठाण्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये आई वडिलांच्या पासपोर्ट करतेवेळी आला होता. वृद्धांसाठी खास लाईन, त्यांना प्रायोरिटी, त्यांची विचारपूस (हे सगळं TCS चे लोकं करत होते) अगदी 3 दिवसात त्यांचा पासपोर्ट घरी आला होता.
असाच चांगला अनुभव या वर्षी RBI मध्ये 500 च्या नोटा भरायला गेलो होतो तेव्हा आला.
कोणी काहीही म्हणो पण भारतात सकारात्मक बदल नक्कीच होताहेत हे गेल्या दोन वर्षात जाणवले!

छान वाटले वाचून.
शिर्षक वाचून वाटले होते कि त्रास, मनस्ताप असे काही वाचावे लागेल Happy त्रासदायक अनुभवांची/ती वाचायची इतकी सवय झाली आहे ना कि असे सुखद धक्के बसतात. खरच चांगला बदल होतो आहे.

मस्त! मीही अलीकडे असे अनुभव पासपोर्ट ऑफिस, आरबीआय, दिल्ली मुंबई एअरपोर्टस वगैरे ठिकाणी आलेले ऐकले आहेत. मला हवी असलेली सरकारी माहिती ऑनलाईनही सहज मिळू शकते असा अनुभव आलेला आहे. पण आरटीओ सुधारेल असं कधी वाटलं नव्हतं हो! थँक्स फॉर शेअरिंग.

मस्त अनुभव. मलाही सरकारी ऑफिसात चांगले अनुभव आलेले आहेत. इथे आरटीओ मध्ये driving लायसेन्स रेन्यू करायला गेले होते तिथे गर्दी होती पण माहितीपत्रके व्यवस्थित लावलेली होती. तरीही आपण विचारत बसलो तर लोक माहिती देत होती. पण ऑफिस ज्या इमारतीत होते तिथे वर जायचा जिना इतका तुटका आणि अंधारलेला होता की मला वर नक्की ऑफिस आहे की मी चुकीच्या जागी आलेय हे कळत नव्हते. शेवटी 2 माणसे तिथूनच वर जाताना पाहिल्यावर धीर करून वर गेले Happy

सरकारी हाफिसे अंधाऱ्या जागेत असावीत, वॉश रूमचा दरवळ 200 फुटांवरून सुद्धा जाणववा, जिन्याच्या पायऱ्या तुटक्या आणि जिना पाहिला तर वर फक्त खंडहर असावेत याची खात्री खालूनच पटावी असे काही नियम आहेत का? इतक्या खच्चीकरण करणाऱ्या वातावरणात राहून काम करणारे लोक हसतमुख आणि सेवतत्पर असतील ही अपेक्षा करणे मला खूप कठीण जाते. तरीही अशा जागी सेवातत्पर लोक मी पाहिलेले आहेत.

ठाणे पासपोर्ट ऑफिस गेल्या दहा बारा वर्षांपासून अशीच चांगली, उत्तम सेवा देत आहे असा माझ्या स्वतःचा अनुभव आहे, कोणी काहीही म्हणो!

आरटीओ मध्ये एजंट शिवाय काम होत नाही हा गैरसमज असावा. लर्निंग लायसंस आणि परमनंट लायसन्स ( स्कुटर चे ) आणि नंतर चारचाकीचे एजंट शिवायच काढले होते. गर्दी असेल तर रांगेत जास्त वेळ लागतो. पण सगळी कागदपत्रे असल्यास आरामात काम होते.

४-५ वर्षापूर्वी लायसन्स हरवले होते. लायसंस नंबर, फोटोकॉपी असे काहीही नव्हते. महिना आणि वर्ष आठवत होते. तेवढ्या माहितीवर आठवड्याभरात मला नव्या स्मार्ट कार्ड फॉरमॅट मध्ये लायसन्स मिळाले औरंगाबाद आरटिओ मधून.

पहिल्यांदा गेल्यावर २-४ खिडक्यांमध्ये चौकशी करावी लागली. रेकॉर्ड सेकशन मधली व्यक्ती रजेवर असल्याने परत दोन दिवसांनी यायला सांगितले. दुसऱ्यांदा गेल्यावर मात्र वेळ लागला. दोनेक तासांनी माझे रेकॉर्ड सापडले. लगेचच त्या दिवशी स्मार्ट लायसन्स साठी फॉर्म भरणे आणि फोटो काढणे केले. त्यानंतर चार दिवसांनी नवे लायसंस हातात.

छान अनुभव.
मी पुणे अार. टी. ओ.त अजून पर्यंत एकाही एजंटला न गाठता अनेक कामे स्वतःच केलेली अाहेत.... कधीही काहीही अडचण अालेली नाही...

चांगला अनुभव आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
आपला बोलतानाचा स्वर नम्र असेल तर बरिचशि कामे पुर्ण होतात. हा माझा अनुभव आहे

कळ काढायची क्षमता, थोडे लवचिक धोरण, आणि आवश्यक कागदाची पुर्तता इतके असेल तर कुठल्याही सरकारी कामात अडथळे येत नाही.
तुमच्याकडे कागद पुर्ण असतील तर समोरचा आडकाठी सहज करत नाही. कारण तुम्ही नंतर आवाज उठवू शकतात याची कल्पना त्याला असते.
रेशनकार्ड वगैरे बनवण्यासाठी अवघे ३-४ दिवस लागले मग ती मुंबई मधे असो अथवा अजुन दुसरी ट्रान्स्फरची जागा असो. पासपोर्ट मधे तर फार आधीपासून दलालांची/एजंटची मक्तेदारी सरकारने मोडून काढली होती. सगळी कामे अगदी फॉर्म भरण्यापासून ते पैसे भरण्यापर्यंत ऑनलाईन असल्याने वेळेची बचत होते आणि आपल्या पसंदीनुसार अपॉईंटमेंट ची वेळ आणि जागा ठरवण्याची सोय मिळते. अर्थात हे आधी पासून होते.
पण काही जण कागद पुर्ण नसल्याने, स्वतःला वेळ देता येत नसल्याने इ. कारणांमुळे त्यांच्याकडे एजंटच्या मागे लागण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे स्वतःच्या चुकांचे खापर ते सरकारी लोकांवर बिन्धास्त फोडत होते. सगळे सरकारी लोक पैसे घेऊनच काम करतात हा एक गैरसमज अशा आळशी लोकांमुळे जास्त पसरला आहे.

मला नेहेमीच सरकारी ऑफिसेस चा अनुभव चांगला/बरा येतो (क्वचित अपवाद वगळता),
हे कदाचित कुणाला पटणार नाही, पण माझ्या दृष्टीने हा देखिल नशिबाचाच भाग असतो असे माझे ठाम मत आहे.

छान अनुभव ममो! मी पण मागच्या महिन्यात रजिस्ट्रार ऑफिस्मध्ये गेले होते. दिलेल्या वेळेत काम झाले व दुसरी एक विचारपूर्वक छोटीशी गोष्टही आनंद देऊन जाते. कागदपत्रांवर अंगठ्याचे ठसे दिल्यावर हात पुसायला चक्क एक कापड लटकवून ठेवले होते. आण्खी एक गोष्ट म्हणजे ते ऑफिस सरकारी वाटत नव्हते.... स्वच्छ व नीटनेटके होते. मी खूप वर्षांनी सरकारी ऑफिसात गेले होते मनातल्या जुन्या कल्पनांसह म्हणून कदाचित सुखद बदल जाणवला असावा. मी तसं तिथल्या कर्मचार्‍यांना अभिप्रायही दिला.

रजिस्ट्रार म्हणजे जमिनी-खरेदी-विक्रीसाठी ना? आताशा (म्हणजे गेल्या पाच-दहा वर्षांपासून, मग कोणी काहीही म्हणो) ते आधुनिक झाले आहेत तसेच बरेच आदबशीर झाले आहे, खरेदीविक्रीच्या करांमधून मजबूत महसूल गोळा होतोय म्हणून आता सुविधा दिल्या जात आहेत. बसायला खुर्च्या, चहा वगैरे मिळतो. कामे वेळेत होतात. ठाण्यातल्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये २००९-१० साली जो अनुभव आला तो टीपिकल अजागळ सरकारी ऑफिसचा होता. पण नाशिकमध्ये तर २०१३ च्या सुमारास रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खाजगी कंपनीत आल्यासारखी व्यवस्था होती. चहा, आसनव्यवस्था, वेळेत व अचूक काम हा तेव्हाचा अनुभव. आता जस्ट मागच्या आठवड्यात भाडेकरार करायला गेलो तेव्हाही अशीच ट्रिटमेंट मिळाली.

{{{ पण हा अनुभव कुठल्या शहरातला आहे ते कळले नाही. }}}

खरंय हे लिहायला हवं होतं. असो. सरकारी कार्यालये चांगली सेवा देतात जर तिथला प्रमुख प्रामाणिक आणि शिस्तप्रिय असेल तर. त्याची बदली झाली की पुन्हा परत पहिल्यासारखेच..

माझही पुणे आ टी ओ मधे ट्रान्सफरच काम असच पटकन झाल गेल्या महिन्यात. पासपोर्ट ऑफीसमधे दिवस गेला पण चौथ्या दिवशी पासपोर्ट घरी आला Happy

मी आजपर्यंत आरटीओ मधली सगळी कामं, पासपोर्ट, पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र FIR, दुकानासाठी शॉप अ‍ॅक्ट, फूड लायसन्स अश्या बर्‍याच गोष्टी कधीही कुठल्याही एजंटला मधे न घेता, कोणालाही लाच न देता करून घेतल्या आहेत. कोणिही काहिही म्हणो माझा देश आधीपासूनच असा होता. आताच (गेल्या ३ वर्षात) असा बदल होत आहे असं कोणी म्हणत असेल तर ते मात्र मला पटत होत नाही Happy

हां, बरी आठवण दिलीत शॉप अ‍ॅक्टची.. माझं शॉप अ‍ॅक्ट ऑक्टोबर २०१३ मध्ये काढलेलं, स्वतः सगळं केलं होतं, काही त्रास झाला नाही, कोणीही पैसे मागितले नाही. एजंटतर्फे कामे करणार्‍यांना जास्त पैसे द्यावे लागतात हे मात्र बघितले इतरांच्या अनुभवावरुन... ते मात्र गेल्या तीन वर्षात काहीही बदललेले नाही, कोणी काहीही म्हणो. Wink

तसेच रेशनकार्डचे. नाशिकला आल्यावर रेशनकार्ड बनवून घ्यायला गेलो ते कोणत्याही आडमार्गाने काम होणार नाही असे कळले, आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करा आणि रेशनकार्ड बनवून घ्या असे मला स्पष्ट सांगितल्या गेले. (माझे मूळ रेशनकार्ड अकोल्याचे आहे, ते मी अजून बदलून घेतलेले नाही) ते सर्व उपद्व्याप करायचा कंटाळा आल्याने अजून रेशनकार्ड बनवले नाही. Wink

खूप छान अनुभव. शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

पुष्कळ वेळा आपण हॉरर स्टोरीजच जास्त ऐकलेल्या असतात त्यामुळे थोडाही प्रयत्न न करता एजंटच गाठतो. पण तुम्ही प्रयत्न केलात आणि चांगला अनुभव आल्यावर तोसुद्धा शेयर केलात!!!

'कोणी काहीही म्हणो' हे मायबोलीवरच्या वेचक लोकांना बरंच जिव्हारी लागलं आहे. त्याबद्दल दुसऱ्या एका धाग्यावर पण चर्चा सुरू आहे असं लक्षात आलं. तर असं लिहिण्यामागे मोदी सरकार आणि आधीचे सरकार असा हेतू नव्हता. तसं लिहायचं असत तर मी 'गेल्या दोन वर्षात' न लिहिता 'गेल्या तीन वर्षांत' लिहीलं असतं. "कोणी" मध्ये "भारतीय सरकारी कार्यालयांना नावं ठेवणारी जगातील तमाम जनता" एव्हढंच म्हणायचं होतं!

या वाक्यामुळे कोणाला मानसिक त्रास झाला असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे!

एवढे प्रतिसाद ! चांगले अनुभव तरी किती ! खूप छान वाटतंय .

असाच चांगला अनुभव या वर्षी RBI मध्ये 500 च्या नोटा भरायला गेलो होतो तेव्हा आला. >> वत्सला, मान अभिमानाने उंचावली हे वाचून .

मी ही जनरली एजन्ट कडून कामं नाहीच करून घेत आणि ती होतात आपण गेलं तरी ही. हा अनुभव ठाणा RTO चा आहे . साधनाने लिहीलयं त्याप्रमाणे काम करण्याची इच्छा मारली जाईल अशीच आहे तिथली परिस्थिती . मी ही हे लिहिलं होतं सविस्तर कारण त्या मुळे त्यांनी दिलेली सेवा अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाली असती पण खोडलं ते नंतर कारण त्यांची work condition जी फार चांगली नाहीये, सार्वजनिक होऊ नये ह्या विचाराने .

सरकारी कार्यालयांमधली परिस्थिती सुधारते आहे हे नक्कीच. बदल हळू हळू होतोय पण होतोय . एकंदरच हल्ली तक्रारींकडे गंभीर पणे पाहिलं जातं, माहितीचा अधिकार आहेच, पारदर्शकता वाढली आहे, नेटवर खूप माहिती उपलब्ध आहे, सामान्य जनता जास्त नेटसॅव्ही झालीय, सोशल मीडियाचा प्रभाव वाढला आहे , नेते मंडळी ट्विटर वगैरेंच्या माध्यमातून जनसामान्यांच्या अधिक सम्पर्कात असतात आणि शिक्षणामुळे व्यक्तिमत्वाला मिळणारी प्रगल्भता अशी बरीच कारणं सांगता येतील .

काही वर्षा पूर्वी पासपोर्ट च्या पोलीस व्हेरिफिकेशन साठी पोलीस ठाण्यात गेले होते तो अनुभव मनात कायमचा कोरला गेलाय . त्या हवालदारा कडे पेन नव्हतं आणि त्याला काहीतरी आमचे फॉर्म वैगेरे भरायचे होते म्हणून यजमानांनी त्याला त्यांचं रिजर्व बँकेचा छापा असलेलं, नवं कोरं, उत्तम पेन दिलं . आमचं काम झाल्यावर आम्ही निघालो. त्याच काम चालूच होतं . पेन परत मागायचा तर विचार ही शिवला नाही आमच्या मनाला . पण आम्ही थोडे बाहेर गेलो तर तो हवालदार आमच्या मागे धावत आला पेन परत करायला . तुमचं काम आहे तर ठेवा तुमच्या कडे असं आम्ही सांगून सुद्धा त्याने ते पेन आम्हाला परत केलंच. असो .

लिंबू म्हणतात तसं नशिबाचा भाग ही असतोच कोणतं हि काम सुरळीत पणे होण्यात तसेच आपली भाषा, देहबोली ह्यांचा ही असतोच .

जाता जाता ... ठाणा पास्पोर्ट ऑफिस चा माझा ही नुकताच आलेला अनुभव ही असाच सुपर आहे वर वत्सलाने लिहिल्या प्रमाणे .

वत्सला, तुझ्या प्रतिसादात मला तरी काही गैर वाटले नाही . माझा कोणताही गैरसमज नाही .

शेवटी धागा न भरकटवल्या बद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार . थोडा वेळ वाटत होत तसं पण आता नाही वाटत आहे . चांगलं काही दिसलं तर जरूर शेअर करा .

तर असं लिहिण्यामागे मोदी सरकार आणि आधीचे सरकार असा हेतू नव्हता. तसं लिहायचं असत तर मी 'गेल्या दोन वर्षात' न लिहिता 'गेल्या तीन वर्षांत' लिहीलं असतं

'गेल्या८-१० वर्षापासून ' असंही लिहिता आलं असतं की.
६ वर्षापूर्वी ठाणे RTO त कच्चे व पक्के लायसन्स एजंटच्या मदतीशिवाय काढले. गेट मधून आत शिरल्यावर डाविकडील चौकीत कामाचे स्वरुप सांगितल्यास तेथील कर्मचारी योग्य ते मार्गदर्शन करतात. तुम्हाला रहदारीचे नियम नीट माहीत असल्यास व गाडी आत्मविश्वासाने चालवता येत असल्यास लायसन्स मिळण्यास काहीही अडचण येत नाही. फक्त तेथील एकच गोष्ट खटकली सगळे अर्ज बाहेरील दुकानातून विकत घ्यावे लागतात.

Pages