स्पर्श……………

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 5 May, 2017 - 08:10

स्पर्श……………

संध्याकाळचे सात वाजत आले होते, सारिका आता घरी येईलच या विचाराने राधिकाने झटपट आवरायला सुरुवात केली, अन दारावरची बेल वाजली. रियाने दार उघडताच " तायडे, कोल्ड कॉफी प्लिज " अशी आरोळी कानी पडणार या विचारात असतानाच दरवाजा आदळल्याचा आवाज आला, अन सारिका तिच्या रूम मध्ये काही न बोलताच निघून गेल्याच तिने पाहिलं. १२ वर्षाच्या तिच्या लाडक्या भाचीशी रियाशी सुद्धा ती एक चकार शब्द बोलली नाही... आज इतकं काय बिनसलंय हीच की माझ्या लेकीशीही बोलली नाही? काय झालंय? राधिका काळजीनेच रिया ला घेऊन सारिकाच्या रुमपर्यंत पोहोचली. " सरे दार उघड, काय झालं?" तिच्या या प्रश्नावर सारिकाने दार उघडलं आणि " रियू तू जा जरा, मला ताईशी बोलायचंय" असं म्हणून तिने रियाला परत पाठवलं. मावशीचा रडवेला की रागावलेला विचित्र चेहरा पाहून रिया निमूटपणे मागे फिरली.

सारिका एकदम खेळकर, बिनधास्त मुलगी होती.. रोखठोक वागणारी; मुळूमुळू रडत बसणारी तर ती अज्जिब्बात नव्हती पण आज तिला पाहून राधिकाला एवढं नक्की कळलं, की काहीतरी चुकीचं घडलंय... पण बहिणीचा स्वभावही तिला माहित होता... लहानपणापासूनच... असं काहीही वावगं घडलं की ती धुसफुसत रहायची , इकडचं तिकडंच, मागचं, पुढचं सगळं बोलून झालं की मग एकदम वीज कोसळल्यासारखी तडकायची, खऱ्या मुद्द्यावर यायची त्यामुळे राधिका वाटच पाहत होती की ती कधी बोलतेय... अन सारिकाने तोंड उघडलं... " ताई तुझी मुंबई... अज्जिब्बात सेफ नाहीये... किती अभिमान होता मला ह्या शहरावर...तुला मुंबईला देणार हे कळल्यावर सगळ्यात जास्त सुखावले होते ती मी .. शिक्षण अन नोकरी इथेच करणार... हा हट्ट धरला. तू अन भाऊजी दोघांनीही मला आधार दिलात अन मी इथली झाले... अगदी स्मार्ट अन बोल्ड ... ह्या शहरातल्या गर्दीमुळे अन रोजच्या धक्क्यांमुळे शिकत गेले, घडत गेले, सावरायला शिकले... नवीन अनुभव मिळवत गेले... मला वाटायचं की मी एकदम धाडसी झालेय आता.. कोणालाही कुठंही सडेतोड करू शकेन... पण नाही ग... मी अजूनही घाबरट आहे ग... खूप विचित्र वाटलं मला आज... तुला माहितीय, आत्ता घरी येताना, त्या नेहमीच्याच गर्दीतून येत होते.. माझे आज घातलेले कपडे बघ... सगळं ठीक आहे... मागून थोडा गळा अन पाठ फक्त उघडी आहे.. म्हणजे तुमच्या त्या ब्लाउज मधूनही जेवढी पाठ दिसते त्यापेक्षाही कमी पाठ उघडी आहे ग माझी..." तिचे हे असलं बोलणं सुरु झालं आणि राधिका मनातून पूर्ण घाबरली..काही अभद्र विचार मनात येत राहिले अन सारिकाच्या बोलण्याकडे ती कान, हृदय, मेंदू सगळं एकवटून ऐकू लागली.... " ताई ताई... घरी येताना त्या गर्दीत पाठीवरून बोट फिरवली ग कोणीतरी... अगदी किळस आली मला... तो स्पर्श... तो स्पर्श... पुरुषाचा नव्हता ग... माझ्यासारख्याच स्त्री चा होता... एका तरुणीची बोटे होती ती... मागे वळून पाहिलं तर तिने ओठांचा चंबू करून डोळे मिचकावले... कोणी पुरुष असता तर थोबाड फोडलं असत ग... पण तिला पाहून गांगरून गेले ग मी... अन जीव मुठीत घेऊन पळत आले घरी.... स्त्री म्हणजे... मायेचा, ममतेचा, प्रेमाचा स्पर्श इतकच माहित होतं आजपर्यंत... पण आजचा अनुभव, आजचा स्पर्श नवीन होता ग... " ती कितीतरी वेळ ताईच्या कुशीत लपून मुसमुसत, रडत राहिली... राधिका तिच्या डोक्यावरून, केसातून हात फिरवत राहिली... जे झालं ते फक्त विचित्र होतं, बदलत्या काळाचं, आयत्या मिळालेल्या पैशाचं किंवा न मिळालेल्या संस्कारांचं की एका घाणेरड्या मनोवृत्तीच प्रतीक होतं...ज्यावर चर्चा करून मनस्ताप होणार होता..त्यामुळे त्या क्षणाला..राधिकाला तिच्या बहिणीला फक्त सावरायचं होतं...अन तिने नव्याने अनुभवलेल्या स्पर्शाच्या जखमा मिटवण्यासाठी, जुन्या स्पर्शाचा औषध म्हणून वापर करणं हातात होतं...

बराच वेळ स्तब्धतेत गेल्यानंतर रियाने दार लोटलं... "आय एम सॉरी , मी तुमच्या दोघींचं बोलणं चुकून ऐकलं... मी खरं तर परत आले होते तुला पाणी द्यायला... तुझा चेहरा ठीक नाही वाटला मला... थकल्यासारखी वाटलीस पण इथपर्यंत आले अन तुझा रडताना आवाज ऐकला... घाबरून तिथेच थांबले...अन सगळं ऐकलं मावशी... पण एक सांगू का... पुन्हा असं कधी घडल ना... तर मग जो कोणी असेल त्याला एक पंच मारायला मागे पुढे पाहू नकोस... आम्हाला शाळेत विषयच आहे .. पर्सनल सेफ्टी एज्युकेशन... चुकीचं काही घडतंय असं वाटलं तर विरोध सुरु करायचा ..जे घडलंय ते वाईट आणि १०० टक्के चुकीचं होतं ना? मग त्याबाबत तू किळस वाटून घेण्याऐवजी तिला तिची जागा दाखवून द्यायला हवी होतीस... म्हणजे उद्या ती त्याचं गर्दीत दुसऱ्या कोणासोबत असं करायची हिम्मत दाखवू शकली नसती... बरं आता हे सगळं रडणं सोड अन बी ब्रेव्ह... झालं गेलं विसरून जा..अन कामाला लाग... तूच म्हणतेस असं..." त्या दोघी थक्क होऊन तिच्याकडे पाहत होत्या... किती तरी वेळ... जे स्वीकारायला त्यांना जमलं नव्हतं ते स्वीकारून त्यावर तोडगा देखील त्या १२ वर्षांच्या पोरीने काढला होता...

कदाचित काळ, समाज जसा बदलतोय त्याला उत्तर म्हणून का असेना माणूसही तितकाच सामर्थ्यवान, स्वसंरक्षण जपणारा घडतोय... नवीन संघर्ष नवीन लढा... जमतोय.. नवीन पिढीला..

……मयुरी चवाथे - शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mastach

Mayuriji, tumchya katha vachto. Agdi vastavala dharun asatat. Navin ahe MAbo var. Ajun marathi typing jamat nahi

छान लिहिलय अगदी वस्तुस्थिती मांडलीये फक्त ते शेवटचे जरा खटकले - 10 वर्षाची चिमुरडी कसे काय स्पर्शाचे तत्वज्ञान असल्यागत सल्ला देते. मान्य आहे की स्त्रियांना उपजत जाणीव असते ह्यातील भेदाभेद ओळखण्याची पण 10व्या वर्षी स्त्रीला दुसऱ्या एका स्त्रीचा वाईट हेतुने स्पर्श /लेस्बियन वगैरे संज्ञा कुठून समजल्या ?

अंबज्ञ +१
मी ते लिहायचा कंटाळा केलेला..
१० ऐवजी १६ कर

पाथफाईंडर धन्यवाद.

अंबज्ञ , रीया धन्यवाद... मी पण १०,१२,१४ असं दोन तीनदा लिहून पाहिलं..पण खरं सांगू का, माझी सहा वर्षांची मुलगी देखील सांगते... PSE पर्सनल सेफ्टी एजुकेशन... मला न विचारता कोणीच टच करू शकत नाही... बदलत्या काळानुसार याच शिक्षण घरी आणि शाळेत मुलांना दिल जातंय... आणि कथेतल्या रियाला लेस्बियन वगैरेच ज्ञान नसेल पण मावशीला न आवडणारी गोष्ट कोणीतरी केलीय आणि त्यामुळे ती नाराज आहे एवढं तर तिला त्यांच्या बोलण्यातून कळलं असावं कारण तिने सगळंच ऐकलं होत अगदी स्पष्टीकरणासकट; अशा अंदाजाने लिहिलंय...

बरोबर आहे मयुरीजी
New generation is smart generation
ते बरोबर काय आणि चुकीच काय!
खर तर , आजच्या या पिढीच्या मुली self protection करू शकत्यात हे त्यांनी बर्याच वेळा दाखवलचं आहे