भटकंतीचं नियोजन -भाग-२ (खास तुमच्यासाठी)

Submitted by उदे on 5 May, 2017 - 01:12

भटकंती करताना दौरा आखणं हे महत्वाचं खरंच परंतु,त्याची अंमलबजावणी करणं हे फारच महत्वाचं!
हल्लीच्या भाषेत एका शब्दात सांगायचं तर प्रवासाच्या आखणीप्रमाणे प्रवासादरम्यान आपल्या हालचालींचे 'गियर बदलता यायला हवेत!'
म्हंजे काय ते पाहूया.

पावसात जव्हारला जाणारी बरीच मंडळी आहेत. परंतु कुठल्या मार्गाने तुम्ही जाणार?कसे जाणार?यावर त्या त्या वेळेची गम्मत अवलंबून आहे. इथे तरुण वृद्ध हा फरक नाही. वृत्तीतला फरक म्हणतोय मी. तडक चारोटीनाका जलदरित्या गाठून मग सावकाश हलत डुलत जव्हार गाठायचं? कसारा जलद गाठून खोडाळा -मोखाडा मार्गे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेत हळुहळु पुढे जायचं? की सरधोपट मुंबई-ठाणे -भिवंडी-वाडा -विक्रमगड करीत पुढे जायचं? हे महत्वाचं होऊन जातं.

बरं, इतकंच नव्हे,माझ्यासारखं तुम्हालाही जव्हार खूप आवडू लागलं की सगळे रस्ते आलटून-पालटून वेगवेगळ्या वाटांनी जव्हारवरून पुढे नेऊ शकतो. म्हंजे एकदा जव्हार गाठलं की दाभोसा-खानवेल-या आतल्या रस्त्याने धरमपुरी-वासंदा फाटा- वाघइ मार्गाने सापुतारा गाठू शकतो. वरील मार्गानेच खानवेल वरून फारकत घेऊन अप्रसिद्ध अतिशांत 'उद्वाडा' गावी जाऊ शकतो. जव्हारवरून त्र्यंबकेश्वर-नासिक-वणी-सापुतारा करून, सापुतारा-वाघइ-बलसाड-मुंबई अशीही फेरी मारू शकतो. किंवा मुंबई-जव्हार-खानवेल-वाघइ-सापुतारा जाऊन दुसऱ्या दिवशी सापुताऱ्याहून भंडारदरा बघून घोटीमार्गे परत येऊ शकतो.

वरील प्रवासातील मुख्य ग्यानबाची मेख समजली ना?
वरील सर्व रूट्स हे पावसात करायचे आहेत.
वरील सर्व रूट्स हे निसर्गप्रेमींसाठीच आहेत.
केवळ रिसॉर्ट्स आवडणाऱ्यांसाठी नाहीत. किंवा रिसॉर्टमधील खाद्ययात्रेच्या आमिषापोटी जाणाऱ्यांसाठी नाहीत. हे तर उघड आहे.

तुम्ही म्हणाल हे भर उन्हाळ्यात,पावसात जायचं आख्यान काय लावलंय?
तर तसं नाही मंडळी! आपलं (घुमक्कडांचं) संपूर्ण वर्षाचं चक्र भटकंती कुठे करायची हे आखण्यातच जात असतं नाही का?
डिसेम्बरमधे हिमालयात कुठे जायचं?
मे च्या ट्रेक मधे पावसाळ्यात कुठे जायचं?
पावसाळ्यात,श्रावणात आणि दिवाळीत कुठे जायचं?
आणि दिवाळीत नाताळ आणि न्यूइयर ला कुठे जायचं हे आपलं ठरतच असतं ना?

कोस्टल कर्नाटक हल्लीच्या सुटी न मिळण्याच्या काळात जायचं असलं तर शनिवार-रविवार ला लागून सुट्या आल्या तर ४ दिवसात होण्यासारखं आहे. परंतु त्यासाठी मुंबईहून आम्ही निघालो तसे सकाळी ६ वाजता निघायला हवं. खाणं -पिणं जवळ घेऊन म्हणजे तो वेळ वाचवून दुपारी १ ला जेवायला बेळगाव गाठायला हवं. तसंच सुसाट पुढे जाऊन हुबळी फाट्यावरून आडव्या रस्त्याने अंकोला गाठायला हवं. मग काय संध्याकाळी ७-८ वाजेपर्यंत ८४५ कि.मी. प्रवास करून तुम्ही एका दिवसात मुर्डेश्वरला जाऊन पोहोचता. अगदी आमच्यासारखे. गियर चेंज करणं म्हणतो ते हेच. एकदा मुक्कामी जलद पोहोचलात कि मग तुम्ही सुशेगात पुढचा कार्यक्रम आटपून निवांत परंतु शकता.

आणखीन एक रूट पहा. मुंबईहून सुसाट चाफळ गाठायचं. वेगाचा भर ओसरल्यावर पावसात भरून वाहणारी नदी,भोवतालचा सुंदर परिसर, रामदास स्वामींचा मठ,आदी बघून पाटण-कोयना रस्त्यावर आलात,कि भर पावसात असंख्य निसर्गदृश्य तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडतात. कोयनाडॅम -नवजा धबधबा बघून परतलात तर दीर्घकाळ पुरणारा निसर्गाच्या मायेचा ओलावा तुम्ही हृदयी धरू शकाल.

अशी कितीतरी स्थळं आहेत नेहेमीच्या भेट देण्याची!

मग? या पावसात निघायचं ना?

----------------उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults