मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती

Submitted by ओबामा on 4 May, 2017 - 23:35

मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती

काहीही हं… भाऊजी!!!

करमणूक या नावाखाली असली काही नावे निवडली की आपण वाचकांची करमणूक करतो आहोत असे वाटते का तुला??

इश्श... भाऊजी, तुम्ही पण??? या काय गोष्टी आहेत का, चार लोकांत बोलण्या आणि लिहिण्याच्या. हे विषय घरातल्या घरात मिटवायचे असतात.

माझ्या या लेखाचे शीर्षक वाचून, सज्जन व्यक्तिमत्व म्हणून मला जवळून ओळखणारे नक्कीच अशा काही टिप्पणी करतील. कार्यालयीन कंटाळवाण्या कामकाजानंतर, कुटुंबाला वेळ देऊन उरलेल्या वेळेत प्रत्येक जण स्वतःच्या मनाला रिझवता येतील, मनाची करमणूक होईल अशा वक्ती, साधने इ. वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतो. तसा मी एकदम पत्नीव्रता पती आणि कुटुंबात रमणारा माणूस आहे, पण काय आहे ना १० वर्ष त्याच व्यक्तिबरोबर घालविल्यानंतर माणसाला काही चेंज हवा की नको?? सिंगापूरमध्ये आल्यावर तसा मी बर्‍याच जणींच्या प्रेमात पडलो. “सैलाब मेरे रोके ना रूका, जीवनमे मची हलचल.” काही जणींशी पहिल्याच भेटीत तर काहींना दूरूनच होले होले न्याहाळत. मग बरेच नयनसुख घेऊन झाल्यानंतर, माझ्या रंगात ढळू शकतील, मला झेपतील अशी खात्री पटल्यावरच यातीलच तिघींना मी जवळ केले, बायकोचा काही प्रमाणातील विरोध डावलूनच. माझ्यावरील तिच्या प्रेमात तिला नवीन वाटेकरी नको होते… पण मी ठणकावूनच सांगितले… नो वे. या तिघीही माझ्या स्वभावाच्या अगदी विरूध्द, तरी पडलो ना राव यांच्या प्रेमात. जाम झिंगाट झालोय या तिघींच्या सहवासात. हे एक बरं आहे की या तिघींची एकमेकींबद्दल जरासुध्दा तक्रार नाही. मी जेवढा वेळ देतो प्रत्येकीला त्यात समाधानी असतात बिचार्‍या. चला तर मग तुम्हांला या तिघींबद्दल जरा सविस्तरच सांगतो.

यातली पहिली तशी माझी बालमैत्रीणच. अगदी शाळेपासूनची ओळख, फक्त येथे आल्यावर नवीन रूपात, ढंगात भेटली. रंगाने काळी, पण शाळेत अगदी दोन वेण्या घालून, वर्गात मान खाली घालून येणार्‍या सज्जन सोज्वळ मुलीसारखीच ही पण एकदम साधी होती. येथे मात्र एकदम मॉर्डन रूपात भेटली. इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही मी हिच्या आगळ्या वेगळ्या रूपाने पागलच झालो. दिवसरात्र हिच्याबद्दल अधिक माहिती काढणे, सतत तिचेच विचार डोक्यात त्यामुळे घरात आणि कामात लक्षच लागेना. हिच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टींची, भागांची नीट माहिती काढूनच मग मी हिची निवड केली. नवीन रूपातल्या हिला मी जेव्हां घरी घेऊन आलो तेव्हा बायकोने हिला घरात घ्यावयास चक्क नकार दिला. मग काय, ही बिचारी जराही न हिरमुसता, हिंदी पिक्चरमधील सोशीक आशा पारेख सारखी दाराबाहेरच मै तुलसी तेरे आंगनकी बनून गेले कित्येक वर्षे उभी आहे. आमच्या नात्याला आता ५ वर्ष झाली. सकाळी ऑफिसला जाताना, एकटाच कोठेही बाहेर जाताना ही कायमच माझी सोबत करते व मला आधार देते. बर्‍याच वेळा ही माझ्या हातातील वजन घेऊन, माझ्यावरचा भार हलका करते. बरं, वर्षांतून एकदा नवीन वस्त्र आणले तर हिच्यावर फारसा खर्चही करावा लागत नाही. फार दिवस लक्ष दिले नाही तर मात्र थोडीशी कुरकूर करते, पण मग थोडेसे प्रेमाचे वंगणकाम केले की ही परत खूश आणि लगेच माझ्या सेवेला तत्परतेने हजर.

माझी दुसरी सखी रंगारूपाने व बांध्याने पहिलीपेक्षा कितीतरी उजवी. पांढराशुभ्र रंग व कमनीय बांधा या गुणांमुळेच मी हिच्यावर भाळलो. पण या गुणांबरोबरच हिच्या स्वभावात एक प्रकारचा ताठरपणा आला आहे. माझ्या कार्यालयातील एका गोर्‍याने पहिल्यांदा हिची माझ्याशी ओळख करून दिली. पहिल्यांदा मला हे प्रकरण जरा कठीण आणि खर्चिकच वाटले. पण हळूहळू आमच्यातली मैत्री फुलत गेली व आमच्या दोघांमधले नाते एकदम घट्ट धाग्यात विणले गेले. हळूहळू मी हिला व्यवस्थित हाताळायला शिकलो व लिलया फिरवू लागलो. बाकी दोघींपेक्षा ही एकदम बेधडक. अंगावर झालेले जवळजवळ सगळेच आघात अतिशय निर्भयपणे तिने परतवून लावले व कित्येक वेळा मला विजयी केले. माझ हे खटल जरा खर्चिकच आहे पण मी हिच्याबरोबर छान रमतो. हिच्याबरोबर वेळ घालवताना माझी चांगलीच दमणूक होते पण तो वेळ कसा भूर्रकन उडून जातो हे कळतच नाही. आतातर माझी बायकोपण हळूहळू हिच्या प्रेमात पडू लागली आहे, आता बोला. तुम्ही म्हणाल… नवरा तर नवरा आता बायको पण!! त्या दोघींच मेतकूट आजकाल जरा फारच जमल आहे, त्यामुळे माझी अवस्था सध्या दोघींत चोंबडा अशी झाली आहे. काही शारिरीक बाबींमुळे आमच्यात सध्या जरा दुरावा आला आहे, त्यात सध्या मी तिसरीच्या लांगूलचालनात व्यस्त आहे. त्यामुळे माझी ही सखी हळूहळू माझ्यापासून दूर जाणार बहुतेक.

तिसरी पण पहिलीप्रमाणेच माझी बालमैत्रीण. हिला मात्र घरात फार मानाचे स्थान होते आणि म्हणून हिचा घरभर मुक्त संचार. आई - बाबा हिच्याशी मैत्री वाढव म्हणून माझ्यामागे सतत धोशा लावत असत, काश मी त्यावेळी तिला सिरीयसली घेतल असत तर कदाचित आज चित्र फार वेगळ असत. हिला स्वतःचे असे काही विशेष रंगरूप नाही, दरवेळी वेगळ्या रंगात, रूपात समोर हजर होते माझ्या सेवेला. ही नेहमीच माझी बौध्दिक भूक भागवते. माझ्या डोक्यातील सगळ्या कल्पना, विचार ती अगदी तंतोतंत टापटीपपणे उतरवते. आजकाल वेळ मिळेल तेव्हा मी हिच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करतो. रात्र-रात्र जागवल्या आहेत आम्ही दोघांनी एकत्र. आमचा प्रणय निरव शांततेत, एकांतात व गरम पेयांच्या सहवासात जास्त फुलतो. ही थोडी फटकळ आहे. जे जसे आहे तसे सरळ सरळ समोर मांडते, कसलीही लपवालपवी न करता. कधी विनोदाचे कारंजे फुलवते तर कधी शृंगार, वीर, विरह इ. रस आळवते.

काय, काय म्हणालात… तुम्हांला पण हव्या आहेत अशा मैत्रिणी? अहो, पण त्यासाठी संयमाला कठीण मेहनतीची जोड द्यावी लागते. बराच घाम गाळावा लागतो आणि पाण्यासारखा पैसा खर्च करायची तयारी हवी.

काय म्हणालात, आहे तुमची तयारी… तर मग दिल थाम के बैठिये… आता मी तुम्हांला त्या तिघींची नावे सांगतो.

त्या अनुक्रमे आहेत… माझी सायकल, टेनिसची रॅकेट आणि लेखणी.

काय मग, बसला ना धक्का ?? अहो मी तुम्हांला सांगितले त्याप्रमाणे मी एकदम सरळमार्गी पत्नीव्रता पती आहे. कॉर्पोरेट स्पर्धेच्या जगात आणि त्यानंतर येणार्‍या ताणातून मुक्तता करून माझ्या निरस आयुष्यात (माझं कुटुंब सोडल तर) ह्यांनीच तर माझ्या चेहर्‍यावर हसू फुलवून, आनंद देऊन एक प्रकारे माझी करमणूक केली आहे. त्यामुळे जेव्हां जेव्हां मला वेळ मिळतो (आजकाल तर स्वतःचा असा फारच कमी मिळतो) तेव्हां तेव्हां मी यांच्या संगतीत घालवतो, यांच्या सहवासात रमतो. प्रत्येकाची करमणूकीची साधने, मार्ग वेगळे वेगळे… उद्देश मात्र त्यातून निखळ आनंद मिळवणे एवढा एकच असतो. जे साधन स्वतः बरोबरच इतरांची पण करमणूक करते ते माझ्या मताप्रमाणे लोकांत जास्त प्रसिध्द. आता आशा करतो की, या माझ्या तिसर्‍या मैत्रिणीच्या मदतीने लिहिलेला हा लेख तुमच्या चेहर्‍यावर हसू आणेल आणि परत परत हा लेख वाचून तुमचे तो मनोरंजन करेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा मस्त. शेवट असाच काहीतरी असणार अस अपेक्षित होत पण तुमच्या बायोकोच्या सवतीमध्ये अडकलो आणि प्रत्येक सवतीच्या वर्णनावेळी वेळी तर्क बदलत गेले . तुमची लिखाणाची स्टाईल (तुमची तिसरी मैत्रीण ) भारी आहे. लिहित राहा. पु.ले.शु.