वाचनाची गोडी

Submitted by उदे on 17 April, 2017 - 01:54

आईच्या घनिष्ट परिचयाच्या दळवीबाईंनी 'कोवळी उन्हे' हे पुस्तक 'उदयला वाचायला द्या' असं आईला सांगितलं आणि आईने जेंव्हा 'कोवळी उन्हे' हे विजय तेंडुलकर यांचं पुस्तक मला वाचायला दिलं आणि जेंव्हा मी ते वाचून संपवलं,तेंव्हा कळलं वाचनानंद काय असतो ते! ही गोष्ट १९७४ सालची. साल नक्की लक्षात आहे कारण लगेच २/३ महिन्यात सिध्दांती (माझी जवळची मैत्रीण नंदिनी आत्मसिद्ध) ने,'सावित्री' हे पु.शि.रेगे यांचं पुस्तक हातात ठेवत, 'हे पुस्तक वाच.तुला आवडेल.'असं म्हटल्याचे लक्ख आठवतंय. सीगल हे बाख चं पुस्तक देखील नंदिनीनेच वाचायला दिल होतं. पूर्ण वाचलेलं ते माझं पाहिलं इंग्लिश पुस्तक.

जवळपास याच काळात त्यावेळी तावरीपाड्यात राहणाऱ्या हिरेशने (नंदिनी आणि हिरेश यांची कॉलेज च्या पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला बघताचक्षणी ओळख झाली. आणि दोघेही आयुष्यभराचे मित्र/मैत्रीण झाले.) मला रोज एक पुस्तक वाचायला द्यायचा सपाट लावला. मी ते पुस्तक त्याला दुसऱ्या दिवशी वाचून परत करीत असे. या आमच्या रोजच्या कार्यक्रमात खानोलकर,सदानंद रेगे,तेंडुलकर असे बरेच लेखक वाचून झाले. वाचनाने एक प्रकारचं झपाटलेपण आलं होतं त्याकाळात. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत सावंतने सत्यकथेचा 'खानोलकर विशेषांक' आणि त्यानंतर जया दडकर यांचं पुस्तक वाचायला दिलं होतं. ते चांगलं आठवतंय.

१९७८ मध्ये विल्यम शिरर चं 'राईज अँड फॉल' वाचलं. तेंव्हा मोठं पुस्तक वाचल्याचा आनंद झाला. अॅलन बुलक यांचं 'हिटलर स्टडी इन टिरनी' हे पुस्तक वाचल्यावर,'चांगलं पुस्तक वाचल्याचा आनंद झाला होता.' गोविंद तळवलकरांची त्या पुस्तकावरची टीपण्णी वाचून,माझं,'थोडं समजायला लागल्याचं उडणार विमान धाडकन खाली कोसळलं होत!' पुस्तकं कशी वाचायची ते तेंव्हा कळू लागलं!

नोकरीला लागलो तेंव्हा पहिल्या पगारातून,माझ्या त्यावेळेच्या आवडत्या जी.ए. कुलकर्णी यांचं 'सांजशकून' हे पुस्तक १९७९ साली घेतलं. ते मी विकत घेतलेलं पहिलं पुस्तक. त्यानंतर मी पुस्तकं साठवू लागलो.

इतिहासकार शेजवलकर फार आवडीचे झाले. इतक्या ज्ञानी माणसाच्या विरुद्ध अथवा त्यांचे दोष दाखवणारं त्रुटी दाखवणार लिखाण आहे का?झालंय का?
असा प्रश्न मी 'परामर्श' मासिकात लेखन करणाऱ्या अशोक चौसाळकरांना विचारला होता आणि त्यांनी कुरुंदकरांचं 'मागोवा'हे पुस्तक वाचा असं पत्रात लिहून कळवलं होत! पुढे कुरुंदकर अतिशय आवडीचे झाले. त्यांची सगळी उपलब्ध पुस्तकं माझ्याकडे आहेत.

याच दरम्यान दोन लेखक आवडू लागले. पहिले अशोक शहाणे. दुसरी मेघना पेठे. महत्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हंजे (हे म्हंजे शहाण्यांकडून उचललंय!)
कुणाकडून काहीही न घेणारा मी, मेघनाकडून मात्र तिने दिलेल्या गोष्टीगुपचूप स्वीकारल्या आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी? ३ शाम मनोहर यांची पुस्तकं आणि ३ अरुण कोलटकर यांची पुस्तकं! जणू तिला म्हणायचं असावं,की दुसरं तू वाच. पण 'हे' आधी वाच. मेघनाने लिहिलेली आणि स्वतःच्या स्वाक्षरीसकट मला भेट दिलेली तिची सर्व पुस्तकं हा माझ्या जीवनातला आनंदाचा खाजगी कप्पा आहे यात शंका नाही.

क्रीडालेखन करण्याच्या निमित्ताने पायपीट करून शोधून,निवडलेली पुस्तकं हा आनंददायी भाग आहेच. परंतु माझ्याकडे कला विषयक पुस्तकांचा देखील मोठा संग्रह आहे. पण खरं सांगायचं तर त्यातला बराच साठा वाचायचाय!

अलीकडच्या काळात ज्येष्ठ मित्रवर्य अनंत देशमुख यांच्या र. धों. या ८ खंडी पुस्तक संचाने अपार आनंद दिला आहे. आता कुमार आणि गायतोंडे यांची विकत घेतलेली महत्वाची पुस्तके वाचायला बसायचे आहे.

मधल्या काळात गुंतवणुकीत रस वाढल्याने वेगळीच,छान बाजाची पुस्तके वाचायला मिळाली.
सध्या राल्फ व्यानगर यांचं 'झेब्रा इन लायन्स कंट्री' हे सुंदर पुस्तक वाचतो आहे.

आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टीबद्दल बोलताना,लिहिताना, आपली अवस्था कशी आनंददायी होते? तशी वाचनाबद्दल लिहिताना माझी अवस्था होते.

आजच्या घडीला दर रविवारी इंग्लंडहून येणारं 'द इकॉनॉमिस्ट' हे साप्ताहिक आणि दर महिन्याच्या २५ तारखेला दापोलीच्या कुडावले गावातून येणारं ' गतिमान संतुलन' हे मासिक आणि यांच्यासोबत अनेक पाक्षिकांच्या आणि वृत्तपत्रांच्या जोडीने वाचनसाहित्य घरी रोज वाचायला मिळतं. आणि मी ते वाचीत जातो. (नेहेमी घेतली जाणारी पुस्तकं साथीला असतातच.)

बरेचजण मुद्याचा एक प्रश्न विचारतात. एवढं वाचून तू काय करतोस? मी त्यांना सांगतो, काही मिळवायचं म्हणून वाचत नाही. वाचलं कि उगाचच आपण अनुभवाने समृद्ध झालो असं वाटतं. मन शांत होतं. मन आनंदी होतं. रक्तवाहिन्यांतून रक्त नीट वाहतं असं वाटतं . वाचन चांगलं जगण्याची वाट हि दाखवून देतं!

अगदी लहानपणी कॉलेजकुमार असताना 'श्री' वगैरे साप्ताहिकं आवडायची. घरात 'म.टा.' यायचा. मी १९७४ मध्ये ११वीत असताना 'म.टा.' त अब्राहम कोवूरचा लेख आल्याने झपाटल्यागत झालो होतो (लगेच त्यांचं 'बी गॉन गॉडमेन' हे पुस्तक मिळवून वाचलं होतं) ते आठवतं! त्याचवेळी दुसऱ्या बाजूला डॉ. विठ्ठल प्रभू आणि पुण्याहून लिहीणाऱ्या डॉ. लीना मोहाडीकर या डॉक्टरांचे कामजीवनाविषयीचे लिखाण न चुकता वाचायचो! डॉ. विठ्ठल प्रभूंच्या ऐन तारुण्यात वाचलेल्या
'निरामय कामजीवन' या पुस्तकामुळेच र. धों. कडे वळायला झालं. पुढे तोच मार्ग य. दि. फडके यांच्या पुस्तकांपासून निघून पुढे अनंत देशमुखांच्या र. धों.वरच्या खंडात्मक पुस्तकापर्यंत येऊन थांबला. आणि वाचनाचा तो अनुभव मला समृद्ध करून गेला.

'चिन्ह' हे कलाविषयक अनियतकालिक वाचता वाचता त्यांचे सर्व अंक संग्रही असण्याइतपत मजल गेली. 'पुस्तक पंढरी'चा सदस्य बनताना, त्यांचे अप्रतिम दिवाळी विशेषांक साठवीत राहिलो. (मला वाटतं 'पुस्तक पंढरी'चा 'पारितोषिक' विशेषांक आणि अप्रतिम असा 'दलित विशेषांक' माझ्याजवळ असावेत!)

दिवाळी अंक वाचायची तर मला एवढी प्रबळ इच्छा असायची कि बँकेत मी लायब्ररी सुरु करून माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना सर्व दुर्मिळ दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून देत असे. अतिशय माफक वर्गणीत सुमारे १५०-२०० अंकांची ओझी उचलण्यापासून ते ३ महिन्यानंतर ते अंक सभासदांना वाटून टाकण्याइतपत माझा उत्साह टिकलेला असे.

आणि वृत्तपत्राबद्दल तर काय..... किती बोलू आणि किती नको अशीच अवस्था आहे. सुरुवातीला फक्त 'म.टा.',नंतर श्री',नंतर अनेक साप्ताहिकं, मासिकं,आणि त्यानंतर माझे आवडते 'द इंडियन पोस्ट' आणि 'द इंडिपेंडंट' हे इंग्रजी पेपर्स! वाढतच गेलं सगळं! मग मी दिल्लीचा 'पायोनिअर',कलकत्याचा 'टेलिग्राफ' मद्रासचा 'हिंदू' असे पेपर्स देखील रोज वाचीत गेलो. त्याच्याच जोडीला 'टाइम ','नॅशनल जिओग्राफी' हि परदेशी मासिक सुद्धा येऊ लागली.

वरील खटाटोपातून ज्या काही बऱ्या-वाईट गोष्टी बाहेर आल्या त्यांच्याविषयी नंतर केंव्हातरी.

------उदय ठाकूरदेसाई.
uthadesai.comFullSizeRender.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद.
त्या एका छंदातून केवढ्या गोष्टी झाल्या!