ट्वायझेल !

Submitted by उदे on 16 April, 2017 - 02:20

IMG_5632.JPEGखास प्लॅन करावं तसं स्वातीच्या वाढदिवसाला म्हंजे २१ फ्रेब्रुवारी २०११ ला म्हणून निघणार होतो. परंतु २४ फेब्रुवारी २०११ या जवळच्या तारखेला टूर निघणार होती. म्हणून आम्ही असेही खुशीतच होतो. परंतु २३ तारखेलाच म्हंजे निघायच्या आदल्या दिवशीच सगळीकडून फोन यायला, मेल यायला सुरुवात झाली. ख्राईस्टचर्चमध्ये भूकंप झाला. ५६२ माणसं मृत्युमुखी पडली. म्हणजे सर्व क्लीनबोल्डच की ! आम्ही ज्या ख्राईस्टचर्चला उतरणार होतो तो विमानतळ ३ दिवस बंद केला होता. मनात म्हटलं आपलं न्यूझीलंड बघण्याचं लांबलं बहुतेक आणि आम्ही दोघे त्वरित आपापल्या कामावर रुजूही झालो. मित्रमंडळी म्हणाली, " हे काय एका दिवसात न्यूझीलंड बघून झालं सुध्दा ?" तेवढ्यात, दोन दिवसात परत फोन थडकू लागले या बुधवारच्या ऐवजी पुढच्या बुधवारी निघायचं. एक ना दोन. नुसती पळापळ .

आमचं एक बरं असतं बाहेर पडायचं म्हटल्यावर आम्ही आम्हाला आमच्यातून मोकळं करून निसर्गात आणि तिथल्या वातावरणात त्वरित पोहोचायचा प्रयत्न करतो. रडकथा न करता. त्यामुळे कार्यक्रम झाला छान. रद्द झाला तरी छान. या 'मोड' मध्ये आम्ही सदैव असतो. बॅगा तर भरलेल्या होत्याच! पुढच्याच बुधवारी त्या उचलल्या आणि न्यूझीलंडला जायला निघालो.

प्रवास कसा होता? मुंबई-सिंगापूर-सिडनी-ख्राईस्टचर्च. मुंबई आणि ख्राईस्टचर्च दरम्यान साडेसहा तासांचा वेळेतला फरक, आणि एकूण प्रवास होता ३९ तासांचा! खरं तर ३९ तासांच्या प्रवासाने शरीर आणि मन मलूल होऊन गेलं होतं. त्यामध्ये नुकत्याच 'ओपन ' झालेल्या ख्राईस्टचर्च विमानतळाची अवस्था कशी असेल?या विचाराची भर पडली! सुदैवाने आमचा रथ (कोच ,गाडी) आणि सारथी,चक्रधर (ड्रायव्हर ), ही चांगला होता.

बॉब ने सांगायला सुरुवात केली,"तुमचं स्वागत. भूकंपात आमचं नुकसान झालं असलं तरी, आमची रडकथा तुम्हाला कशाला सांगू? आपण ख्राईस्टचर्च शहराची तोंडओळख करून घेऊन ट्वायझेल मुक्कामी पोहोचू!"

ऐकताना वाईट वाटलं. ख्राईस्टचर्च शहराच्या बाहेर पडल्यावर,भूकंपाच्या आठवणी मागे पडू लागल्या. सुंदर निसर्गचित्रं दिसू लागली. आखीव-रेखीव कुंपणाच्या आत चरणाऱ्या मेंढ्या,लांबचलांब शेतजमिनीवर यांत्रिकपणे फिरणारे पाण्याचे स्वयंचलित फवारे, आणि मुख्य म्हणजे हिरवीगार चादर पांघरलेले भूभाग पाहून, उत्तम रथातून भरधाव जाताना या सगळ्या गोष्टींनी कुणी खूष झालं नसतं तरच नवल!

तेवढ्यात कॅनटरबरी हे थांब्याचं ठिकाण आलं. न्यूझीलंड मुक्कामी पहिली स्वरछ हवा अक्षरशः पिऊन घेऊन, पोटपूजा करून, आम्ही ट्वायझेलच्या मार्गाला लागलो. वाटेत सुंदर तळी दिसली. लेक टिकापो त्यातलंच एक.

तुम्ही छांगू लेक पाहिलाय ? धामापूरचं तळ पाहिलंय?मग तुम्हाला लेक टिकापो म्हणजे काहीच वाटणार नाही. पण थांबा. निष्कर्ष काढायची घाई करू नका.
लेक टिकापोचं पाणी त्यांनी जपलंय. तळ्याकाठचं वातावरणही त्यांनी जपलंय. स्वच्छता त्यांनी जपलीय. वाटेल तिकडे गाड्या 'लागत' नसल्याने ठराविकच ठिकाणांहून तुम्ही तळ्यांचं दर्शनघेऊ शकता. शहरं सर्व देशांनी जपलीत. न्यूझीलंडने मात्र गावंही जपलीत. त्यांची सुरक्षा जपली. वन -रान -माती जपली. त्याबद्दल 'वुई आर सिरियस अबाऊट इट' असं म्हणायलादेखील कमी केलं नाही. तेंव्हा कुठे सर्व छान दिसतं .

अशी मजल-दरमजल करीत आम्ही एकदाचे ट्वायझेल मुक्कामी येऊन पोहोचलो. रात्रीचे साडेनऊ झाले होते. हॉटेलमध्ये जे मिळेल ते खाऊन सर्वजण कधी एकदा झोपायला जातो या विचारानेच घेरले गेले होते. आम्ही देखील बेड ला पाठ टेकवायचाच अवकाश होता, कधी 'गुडूप' झालो काही कळलंच नाही.

४० तास प्रवास करून थकून झोपल्याने,गडद झोप झाली. झोप पूर्ण झाली. मैत्रिणीच्या एका शब्दात सांगायचं तर आम्हा सर्वांचं बॉडीक्लॉक ठीक झालं! मी माझ्या पारंपरिक सवयीने कोवळ्या उन्हात फोटो काढायला म्हणून हॉटेलबाहेर पडलो.

बाहेर येऊन बघतो तो काय! आभाळ भरून आलेलं होतं. स्वच्छ हवेने भारलेलं वातावरण होतं. ढगांची बदलती महिरप फोटोग्राफर्सना फोटो काढण्यासाठी उद्युक्त करीत होती. या सर्व गोष्टी मनात साठवत असताना गावातील कमी माणसं आणि परिसरातली अफाट स्वच्छता न्यूझीलंड बद्दलचं कुतूहल वाढवीत होती!

पुन्हा एकदा पारंपरिक सवयीने, सर्वजण निघण्याची तयारी करण्यात मग्न असताना आणि नेमका 'बॉब' तेंव्हा रिकामा असताना, 'बॉब' ला ट्वायझेलबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. शेवटी,'बॉब' आमच्या रथाचा सारथी आणि गाईडसुद्धा होता ना!

बॉब ने सांगितलं,"न्यूझीलंडमध्ये ट्वायझेलहा औद्योगिक विभाग म्हणून खास वसवलं गेला. साठीच्या दशकातली ही गोष्ट. या परिसरात मुख्यतः हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं मुख्य काम होतं. आजूबाजूला तलाव असल्याने मॅकेन्झीच्या या लहानसर खोऱ्यात असा प्रकल्प उभारणं चांगलं ठरून गेलं. परंतु मुख्य मुद्दा कामगार कामासाठी मिळवणं हा होता. त्यामुळे मुद्दाम घर उभारणी करावी लागली. तेंव्हा कुठे वस्ती जेमतेम हजारभर झाली."

अरेच्चा! म्हंजे आम्ही रुक्ष प्रांतात होतो तर! मनाने अलगद साद घालून सांगितलं की, कृत्रिम बांधलेला औद्योगिक विभाग जर का इतका नेटका वाटत असेल, तर नैसर्गिक भागात गेल्यावर आनंदाची पर्वणीच असेल.

लवकरच आम्ही रात्रीपुरतं राहतं हॉटेल मॅकेन्झी सोडलं आणि जवळच्या ओमारामा गावातून प्रत्यक्ष दर्शन घेता येऊ शकणाऱ्या रॉटेनिव्हा या तलावापाशी येऊन निसर्ग बघण्यात गुंगून गेलो.

जवळच्या स्टोअरमध्ये आम्ही जाणार तोच, बाजूच्या कुंपणाच्या आत,आम्हाला बघून बऱ्याच साऱ्या मेंढ्या धावत आल्या. जणू त्या माणसांच्या भुकेल्या होत्या. माणसांच आणि मेंढ्यांचं जोडून राहणं आणि अलिप्त राहणं न्यूझीलंडमध्ये विशेष उठावाने दिसून येतं.

बॉब ने आणखीन एक हादरा दिला. बॉब म्हणाला, "लेक रॉटेनिव्हा हे मानवनिर्मित असून वाढत्या मागणीचा पुरवठा त्यामुळे शक्य झाला." नैसर्गिक आणि कृत्रिम तळ्यातला फरक प्रथमदर्शनी न समजण्याईतपत लेक रॉटेनिव्हा देखणं होतं !

गाडीतले काहीजण एव्हाना नाराज झाले होते. 'हे' बघायला (औद्योगिक जड वस्तू ) का आलो?असं म्हणत होते. आम्ही गप्प ऐकत होतो. ८ दिवसात सर्व टूरचा
कार्यक्रम पूर्ण बदलून नव्याने आखणं हे आव्हान जटिल तर असणारच. या तणतणतात गाडी 'कुक माउंटन' बघून 'ओमर' या सुंदर गावाकडे वळली. आणि आमचा प्रवास उत्तरोत्तर रंगात गेला.

ट्वायझेल काही खास मुद्दाम वेळ काढून बघायला जाण्यासारखं ठिकाण नाही. पण जर का कुणी गेलं तर त्याच्या जाण्याचा आणि येण्याचा प्रवास रोचक होईल
हे मात्र नक्की!

---------उदय ठाकूरदेसाई
uthadesai.com
IMG_5633.JPEGIMG_5634.JPEGIMG_5635.JPEGIMG_5636.JPEGIMG_5649.JPEGIMG_5650.JPEGIMG_5651.JPEG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults