आमची मंगळ वारी !

Submitted by vijaykulkarni on 14 April, 2017 - 23:39

मंगळावर स्थायीक झालेली माझी उच्चशिक्षित मुलगी व उच्चशिक्षित व अंतररग्रहीय कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत असलेले आमचे जावई यांचा आम्हाला मंगळ भेटीचे निमंत्रण देणारा ई मेल आला व अमचा आनंद गगनात मावेना. आमची कागदपत्रे, पासपोर्टस वगैरे मंगळ एम्बसीला ईमेल केले व आमचा व्हिसा ईमेल मध्ये आला. नंतर सुरु झाली ती मंगळ भेटीची लगबग. तिथली करंसी कपर्दिक ही असून आपले डॉलर्स तिथे चालणार नाहीत हे माहित असल्याने आम्ही उभयता बँकेत गेलो व दोन हजार डॉलर्स देऊन वीस कपर्दिक आणले. ते कपर्दिक पाकिटात नीट जपून ठेवले. तिथे पोहोचल्यावर अगदीच काही अडचण आली तर असावेत म्हणून. कॅलिफोर्नियात स्थायीक असलेल्या लहान मुलीने "श्री व सौ कुलकर्णी मंगळावर रवाना !" अशी बातमीही हौसेने न्यू यॉर्क टाईम्स मध्ये छापून आणली व आमचे फोटोही ! "आजकाल मंगळावर घरकाम करणार्‍या बायका मिळत नाहीत व तिथे गेलेले पृथ्वी वासीय आपल्या आईवडिलांना बाळंतपणात स्वस्त मदत म्हणून बोलवून घेतात !" हा आमचे शेजार्‍यांचा टोमणा नजरेआड केला. त्यांच्या मुलाला आमच्या मुलीप्रमाणे हार्वर्ड ला अ‍ॅडमिशन न मिळाल्याने तो कम्युनिटी कॉलेजातून पदवीधर होऊन बँक ऑफ अमेरिका मध्ये कीबोर्ड बडवत होता. त्यमुळे त्यांचा जळफळाट होणे साह्जिक होते. मुलीने व जावई बापूंनी पृथ्वीवरील काही वस्तू आणू नयेत, सर्व काही मंगळावर मिळते असे कळवले असले तरीही त्यांना न्यू जर्सी ची खास भेट म्हनून बाकरवडी, अनारशाचे पीठ, कडवे वाल, कैरीचे लोणचे वगैरे घेतले होते. आजकाल या वस्तू सदाशिव पेठेतही मिळत नाहीत पण न्यू जर्सीत मिळतात. पिज्झा व बर्गर खाऊन कंटाळलेले आमचे पुणेकर नातेवाईकही न्यू जर्सीतून येताना थालीपीठ किंवा कोथिंबीर वडी ची फर्माईश करतात. असो,

अखेर तो दिवस उजाडला व आम्ही उभयता जे एफ के अवकाशयान तळावरून मंगळावर निघालो. अवकाशयानात सर्व व्यवस्था होती व अवकाश सुंदरी व सुंदर अधून मधून चक्कर टाकून हवे नको बघत होते. जेवण व चहा ही बसल्या ठिकाणीच दिला गेला.

आमचे अवकशयान मंगळावर पोहोचताच आम्ही उतरलो व काय आश्चर्य! आमच्या बॅगा ऑटोमॅटिक ट्रॉलीवरून आमच्या मागोमाग येऊ लागल्या. विमान उतरताच चेंगराचेंगरी, कॅरोसोल वरून आपली सुटकेस ओळखण्याची धडपड, नको तिथे हात लावून सिक्युरिटी चेक करणारे टी एस ए चे लोक, पन्नास ठिकाणी पासपोर्ट दाखवणे, एडिसन, एडिसन ओरडणारे उबरवाले वगैरे नव्हते. मंगळावर लोकसंख्या कमी असल्याने असेल.

सिक्युरिटी चेक व स्मगलिंग रोखणे हे हडूप, बिग डाटा व स्पार्क वापरून अ‍ॅटोमॅटिक केलेले होते. आमच्या पुढेच चालत असलेल्या एका माणसाच्या अंगावर अचानक दहा एक रोबोटिक कुत्री धावून आली व त्याच्या डोक्यावर छतावरून अ‍ॅटोमॅटिक वरवंटा पडला व त्याला टेंगूळ आले. त्याने कॅलिफोर्निया मधून तीस तोळे प्लॅटिनम डिक्लेयर न करता आणलेले होते.

अवकाशयान तळावर आमचे जावई बापू आम्हाला रिसिव्ह करायला स्वतःचे हेलिकॉप्टर घेऊन आले होते. मंगळावर प्रत्येकाकडे स्वतःचे हेलिकॉप्टर असते. माझी मुलगी व जावईबापूंना एकेक स्वतंत्र हेलिकॉप्टर आहे, इतकेच काय पण त्यांच्या घरी येणार्‍या मोलकरिणीलाही स्वतःचे हेलीकॉप्टर आहे हे ऐकून आश्चर्य वाटले. असो. जावईबापू व मुलगी यांच्या बरोबर अवकाशयानतळावरच कॉफी घेतली. एका कॉफीचे तीन कपर्दिक म्हणजे जवळ जवळ तीनशे डॉलर्स ऐकून आम्ही उभयतांनी एकच कॉफी दोघात वाटून घेणे पसंद केले. आता हा कपर्दिक / डॉलर्स हिशेब करायची सवय सोडा हा मुलीचा प्रेमळ सल्ला ऐकला तरीही आम्ही एक रिकामा कप मागून घेतला व रोबोट ने तो हसतमुखाने आणून दिला. न्यू जर्सीच्या स्टार बक्स मधल्या मुली रिकामा कप मगितला तर मारक्या म्हशीप्रमाणे बघतत.

(क्रमशः )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol !! हहपुवा Lol
सकाळ मधल्या मुक्तपीठ सदराची आठवण झाली Proud
मंगळ ग्रहांच्या जागी फक्त अमेरिका हाच काय तो फरक .
(तसही अमेरिका 'वेगळाच' ग्रह आहे म्हणा )

मस्त ! Lol

{{{
मंगळ ग्रहांच्या जागी फक्त अमेरिका हाच काय तो फरक .
(तसही अमेरिका 'वेगळाच' ग्रह आहे म्हणा )
नवीन Submitted by जाई. on 15 April, 2017 - 09:36 }}}

तसे तर जामात हादेखील एक ग्रह आहेच की.

>>मंगळ ग्रहांच्या जागी फक्त अमेरिका हाच काय तो फरक .<<

हो, अगदि कंट्रोल एफ्/आर वापरलाय असा विश्वास बसण्या इतपत... Wink

छान. आता मंगळावरील सामाजिक चालीरिती, राजकारण, हॉलीमार्स (पृथ्वीवर जसे हॉलीवूड, बॉलिवूड, करतात तसे मार्स वर वूड शब्द वापरत नाहीत, कारण तिथे वूड एव्हढे सर्वत्र आढळत नाही. म्हणून तिथे हॉलीमर्स म्हणतात असे ऐकले होते.) ची गाणी, नाच या सर्वांचे वर्णन येऊ द्या. तिथेहि मार्स भाषा वाचवा असा आक्रोष चालू आहे का? कुठल्या भाषेत?