बाब्या मी इंजिनियर आहे ! :)

Submitted by विद्या भुतकर on 13 April, 2017 - 00:05

बाब्या मी इंजिनियर आहे !

मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.

एकदा संध्याकाळी ऑर्डर केलेले एक खेळणे घरी आले. आता पोरांना ते लगेच सुरु करायचे होते. मी आपली जरा निवांत टीव्ही बघत बसलेले असताना ते सर्व करायची माझी इच्छा नव्हती.
मी म्हटले, "मला नाही माहित त्यात काय घालायचे आहे."
स्वनिकने लगेच खेळणे चेक करून सांगितले, "त्यात बॅटरी लागणार आहेत" आणि स्वतःच स्क्रू-ड्रायव्हर घेऊन आला आणि AA बॅटरीही. आता नाईलाजाने टिव्ही बंद करून मला ते उघडावं लागलंच. त्यात पाहिलं तर AAA बॅटरी लागणार होत्या. त्या कुठे शोधणार, मग आठवले घरात वर लावलेल्या कागदाच्या दिव्यांमध्ये आहेत. म्हटले,"त्या वरच्या दिव्यापर्यंत माझा हात पोचणार नाही, बाबा आले की बघू."
आता माझे प्रयत्न आणि उत्साह पाहून त्याला कळलेच की बाबा आल्याशिवाय हे असलं काम होणार नाही.
शेवटी बाबा आल्यावरच त्यांचं काम झालं.

आपापली कामं वाटून घेतल्याने बरेच वेळा मी स्वयंपाक करताना संदीप मुलांचं आवरत असतो. किंवा त्यांना खेळायला बाहेर घेऊन जातो. अशा अनेक वेळा मी जेवण बनवत असताना तोच मुलांची खेळणी जोडणे इत्यादी कामं करतो. परवा मात्र हद्दच झाली. स्वनिकला काहीतरी टिव्हीवर लावायचे होते आणि त्यात काय सूचना लिहिल्या आहेत हे मी वाचेपर्यंत तो ओरडून रिकामा,"आई, प्रेस द स्मार्ट हब बटन, सिलेक्ट वेब ब्राऊझर, सिलेक्ट वेब ब्राऊजर". त्याचं ओरडणं ऐकून शेवटी मी म्हणाले,"बाबू जरा थांब, मी इंजिनियर आहे."

अर्थात त्याचा माझ्यावर विश्वास नव्हताच. त्यामुळे तो पुढे बोललाच,"बाबा आले की करतील, जाऊ दे".

तर या अशा घटनांतून एक गोष्ट मला जाणवते की घराप्रमाणे मोठ्या माणसांची कामं तशी वाटून घेतली जातात आपल्या सोयीप्रमाणे.पण त्यातून मुलांचे आपल्या आई-वडील, आजी आजोबा यांच्याबद्दल किती सहज ग्रह निर्माण होतात? मुलीला लहान असल्यापासून माहितेय की (कुठलीच)आजी दुचाकी गाडी चालवत नाही, फक्त आजोबा चालवतात. तिचा तो ग्रह दूर करण्यासाठी एक आजी दाखवाव्या लागल्या मला पुण्यात. Happy एकदा असेही झाले की मुलाना वाटत होते बाबांना जेवण बनवताच येत नाही. खरंतर, आम्ही दोघे असताना अनेकवेळा त्याने बनवलेही आहे पण आता कामाच्या वाटणीत स्वयंपाक करणे(भाजी फोडणी टाकणे आणि पोळ्या) माझ्याकडे असल्याने त्यांचा तसा ग्रह होणे स्वाभाविक आहे. तर मग त्यानंतर अनेकवेळा सॅन्डविच, सॅलड किंवा अंडाकरी असे ठराविक पदार्थ असले की संदीप करतो(मला काय तेव्हढेच बरे आहे!) आणि मुलेही त्याला मदत करतात.

माझ्यासारख्या अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. पण त्यातील किती जणींच्या मुलांना माहित असते की आपली आई काय करते? तिचं शिक्षण काय आहे? तिचे कलागुण काय आहेत? आमच्या मुलांना माहित आहे की मी लिहिते, चित्रं काढते, (त्यांच्यादृष्टीने) चांगला स्वयंपाकही करते. पण त्यापलीकडे बाहेरच्या जगात काय काम करते, कुणाशी बोलते, माझ्या कामामुळे लोकांना कसा फायदा होतो किंवा त्यांचे कुठले काम होते, हे सहज समजेल अशा भाषेत का होईना मुलांना सांगितले पाहिजे असं मला वाटत आहे सध्या. तसं मी सुरुही केलं होतं. अशी माहिती असल्याने मुलांच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टीत नक्की फरक पडेल.

बरं, नुसती आपल्या कामाची कल्पना देऊन उपयोग नाही. तर आपल्या घरातील कामांची अदलाबदलही करून पाहिली पाहिजे. म्हणजे, कधी गाडी चालवून कुठे जायचे असताना नवरा शेजारी आहे आणि मी गाडी चालवतेय किंवा तो जेवण बनवत आहे आणि मी त्यांचे ट्रेन ट्रॅक लावत आहे( हे अवघड आहे कारण ट्रेन ट्रॅक नवऱ्यालाच जास्त आवडतात पण आपलं उदाहरण) किंवा एखादी छोटी गोष्ट दुरुस्त करणे इत्यादी. यामुळे मुलांच्या मनातील आई किंवा बाबा म्हणून एक जी प्रतिमा निर्माण होत असते लहान वयात त्यात आपण त्यांचे सर्व पैलू दाखवणं गरजेचं आहे असं वाटू लागलं आहे.

मागच्या आठवड्यात मी जेवण बनवत असताना मुलं आणि नवऱ्याने एक खेळणं जोडलं. माझ्या पोळ्या चालू असल्याने मी काही गेले नाही. थोड्या वेळाने त्या खोलीत गेल्यावर स्वनिकने मला दाखवलं आणि विचारलं,"तुला माहितेय का ही ट्रेन कशी चालते?". म्हटलं,"हो, ते ट्रॅक मॅग्नेटिक आहेत." माझं उत्तर ऐकून बराच वेळ आ वासून उभा राहिला, मग मी मोठ्याने म्हणाले,"बाब्या मी इंजिनियर आहे !". Happy प्रत्येक आईने काही इंजिनियर असायची गरज नाही पण आपले सर्व गुण मुलांसमोर नक्की आणले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला? Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Agreed.

Happy सहमत, मलाही मुलांना, घरच्यांना सांगावे लागते, अरे मी इंजिनियर सुध्दा आहे

मस्त लिहिलय. आमच्याकडेही होतच की.. 'इट्स ओ के. बाबा विल फिस्किट'.. (होय फिस्कच .. फिक्स नाही).
पण काही बाबतीत .. ' बाबा नको.. आई तू कर' हे ही होतच Happy

छान लेख विद्या ! Happy
आमच्याकडे फक्त ईलेक्ट्रिक काही जुगाड/फिक्स करायचं असेल तरच बाबा लागतात...इतर गोष्टी आई करू शकते आणि करते हे मुलान्नी बघून बघून आता मान्य केलेय...

अवांतर, एकदा माझ्या मुलाने मला विचारलं की आई तुला मोठं होउन काय बनायचय? त्याला मी सांगितलं की मी कंप्युटर ईंजीनियर आहे, पुढे म्हणाला की तु पण मोठी होतेय का आमच्या सारखी ? मी म्हटलं, हो, आपण सगळेच मोठे होत आहोत, त्यावर म्हणाला आता सांग तुला मोठं होउन काय बनायचय? त्यावेळी वाटलं की त्यांना 'सांगता येईल' असं गोल पाहीजे स्वतःसाठी....

मस्त लेख! कामाचं रोटेशन करायला पाहिजे. पण तसं होत नाही. एखादं काम अंगवळणी पडलं की मग ते सोडावं वाटत नाही.
आमच्या घरी कार ड्रायव्हिंग संपूर्ण मी करते कारण माझ्या नवऱ्यानी पुण्यात गाडी आधीपासून चालवली नव्हती. ड्रायव्हिंग पण तो खूप उशिरा शिकला.
पण सैराट बघताना आर्चीचा आणि पारशाचा तो गाडीवरचा सीन पाहून तो अगदी उत्स्फूर्तपणे, "अरे हे तर आपल्यासारखे आहेत" असं म्हणाला तेव्हा मला फार छान वाटले. Happy

मी हे आवर्जून करते. खेळण्यांची दुरुस्ती वगैरे, उंचावर चढून काही काढायचं असेल, जड वस्तू सरकवायची असेल तर शक्यतो बाबा आल्यावर करेल असं सांगत नाही. कारही कधी मी, कधी नवरा चालवतो. नवर्‍याला स्वैपाकात मात्र रस नाही. पण जमेल तशी कामे त्याला सांगते Wink

>>>आमच्याकडे कॉम्प, फोन, टीव्ही याचं तांत्रिक खातं बहुतांशी माझ्याच अखत्यारीत आहे
Happy
>>मी हे आवर्जून करते. खेळण्यांची दुरुस्ती वगैरे, उंचावर चढून काही काढायचं असेल, जड वस्तू सरकवायची असेल तर शक्यतो बाबा आल्यावर करेल असं सांगत नाही. कारही कधी मी, कधी नवरा चालवतो. नवर्‍याला स्वैपाकात मात्र रस नाही. पण जमेल तशी कामे त्याला सांगते

मी पण हे ठरवून करते. अगदी खिळे ठोकणे, स्पॅनर घेऊन कॉट वगैरे सेट करणे, मॅन्युअल वाचून वस्तू असेम्बल करणे इत्यादी.
पण कधी कधी ते स्त्री-पुरुष समानतेसाठी नसते. मला नवरा घरी येईपर्यंत वाटच बघवत नाही.

नो सच इशू. ब्रेनची क्रिएटिव्ह कामे आम्ही बायका बायका करतो आणि जिथे शक्ती व पीळ कामे असतात जसे एसी फिट करून घेणे, प्लंबर, कार चालवणे, तिथे लो आयक्यू पुरुषांना बोलावून पैसे देउन करून घेतो. बाकी थिंकींग प्लॅनिन्ग सर्व स्त्रियाच.

आवडला लेख.

माझ्या वहिनीचा किस्सा सांगायलाच हवा. ती आणि माझा पुतण्या एकाचवेळी संध्याकाळी घरी येत. ती आली कि याचा आरडाओरडा सुरु, आई पाणी दे, आई भूक लागली. ती मग त्याला एक दिवशी ऑफिसमधे घेऊन गेली. दिवसभर त्याला बसवून ठेवले.

आईला किती काम असते ? किती लोकांना अटेंड करावे लागते ? ते सर्व त्याला नीट समजले. तेव्हापासून तो खरेच शहाण्यासारखा
वागू लागला.

आवडला आणि लक्षात ठेवेन. मी पण कार चालवायची असली,काही जड़ काम असलं, इलेक्ट्रिक फिटिंग वगैरे तर नवरयावार टाकते. येतं सगळं, पण तरी.. इथून पुढे लक्षात ठेवेन.

नवऱ्याला गुळाचा गणपती करून मखरात बसवायचं की काय! नवऱ्याची काम मला येत, मी करते, मी मी करत करायची आणि नवऱ्याला आपली काम जमत नाहीत म्हणून ती पण स्वतः:च करायची. नवरे कशाला तोंडातून ब्र काढतील. आयतीच स्त्री-पुरुष समानता त्यांच्या पथ्यावर!

मला मोडकीतुटकी वस्तू अजिबात खपत नाही त्यामुळे माझ्या आवाक्यातल्या सगळ्या दुरुस्त्या मीच करते. पडद्याचा रॉड एक दिवस माझ्याच डोक्यात धाडकन पडला तर जमेल तसा दुरुस्त केला. ड्रिलिंग मशीन नव्हतं म्हणून नाहीतर तोही उद्योग केला असता. बाथरूम मध्ला रॉड सैल झालेला घट्ट करणे, स्क्रू फिटींग, मच्छरदाणीसाठी पोईंट फिक्सिंग वगैरे मी करते हे मुलीला माहिती झालंय. आता सिमेंट कालवून किचनच्या जवळचा वीतभर कट्टा घट्ट करायचाय तोही मीच करणार. बल्ब बदलणे वगैरेही.... थोडक्यात, आई सगळं नीट करते त्यामुळे आई अगदी ऑलराऊंडर आहे याची खात्री मी तिला पटवून द्यायला सुरूवात केलिये! Proud

जोक्स अपार्ट, पण हा अ‍ॅटिट्यूड आपणच द्यायला हवा हे अगदीच पटलंय!

लिहिलयस छान पण मुलांचा तो ग्रह करण्यात तुझा सुरुवातीला थोडा हातभार लागलाच...

माझ्याकडे हा प्रकार नाहीच घडला..
वडील ऑफिसर नोकरीनिमित्त दुसर्‍या गावी असायचे आणि आम्ही तिघे आईच्या नोकरीमुळे इथे.. त्यावेळी त्यांना अन मुख्यत्वे आईला अगदी शुन्यातून सर्व करताना, घडविताना पाहिलयं..
अगदी मोठ्ठी अ‍ॅटलस सायकल चालवून मागे सिलेंडर घेउन येणं हेसुद्धा...इथे याच काही कौतुक वाटणार नाही पण तेव्हा हे काम करताना मी कुठल्याच स्त्रीला, आईला पाहिलं नव्हत.. ती न दमता जेव्हा सगळं करायची तेव्हा आता आठवून ती काय व्यक्ती होते हे बघुन एकदम प्राऊड फिल होतं.. आई आमची पप्पांपेक्षा काकणभर सरसच आहे हे आम्ही सर्वांनी अगदी पप्पांनीही अ‍ॅक्सेप्ट केलय त्यामुळे जेव्हा इतर पोरं त्यांच्या वडिलांना घाबरायचे आणि आई मौ साय असायची तेव्हा आम्ही कसे त्यांच्यापेक्षा जरा वेगळे याचं कोण कौतुक आम्ही सर्वांना गर्वाने सांगत फिरायचो ते आठवलं...
बाकी पोरींना कंप्युटर मधल फारस कळत नाही हा लोकांचा भ्रम अजुनही माझ्या वाटेला येतो..
कुठं काही दुकानात गेल्यावर त्याचे फिचर्स सांगताना दुकानदार काय सांगतो ते, सॉफ्ट्वेअर, ओएस इंस्टॉल करताना, कुठला प्रॉब्लेम टॅकल करताना मला समोरच्याला सांगाव लागत कि बाबा रे मी आय टी इंजिनिअर आहे..आणि नुसती अभ्यासानं नाही तर आवडीनं पास झालेली... Lol

नवऱ्याला गुळाचा गणपती करून मखरात बसवायचं की काय! नवऱ्याची काम मला येत, मी करते, मी मी करत करायची आणि नवऱ्याला आपली काम जमत नाहीत म्हणून ती पण स्वतः:च करायची. नवरे कशाला तोंडातून ब्र काढतील. आयतीच स्त्री-पुरुष समानता त्यांच्या पथ्यावर!>>>>>
इथे नवर्‍याला नुसतं मखरात बसवून ठेवण्याचं कौतुक नसून "अमूक एक काम बाबाचं आणि अमूक एक काम आईचं" असा फरक नसावा म्हणून लेख लिहिलाय असा माझा समज झालाय. जेंडर बायस किंवा कुठलाही अन्य बायस न येता दोघं आलटूनपालटून ही कामं करू शकतात/ करतात आणि आई फक्त स्वयंपाक/घरकाम करत नसून तिला इतर कामं येतात आणि ती बाबाप्रमाणेच हुशार आहे; तसंच बाबा फक्तच ऑफिस/ तत्सम कामं करत नसून स्वयंपाक, लॉण्ड्री किंवा घरकाम करतो हेही मुलांना कळावं हा हेतू आहे असंही वाटतंय.

हा हेतू आहे असंही वाटतंय.>> हाच हेतू आहे ...

विद्य्याने तसचं म्हटलय लेखात कि एकाचे एक काम हे ठरायला नको आणि पुढे जाऊन हि काम मुलींची आणि हि मुलांची असा संस्कार मुलांमधे झिरपायला नको..
छान लिहिलयसं विद्या.

Rajasee Lol

किती टक्के actually करतात? नाहीतर चळवळी च्या नादात असं नको व्हायला की सगळीच काम आई करते Sad
बाबा स्वतः उठून खिचडी टाकणार आहे का की आई आज मॅकेनो जोडत बसली आहे. नाहीतर त्याला हाले-हाले करायचं काम पण आईवर ? बाबा ला कसं कळणार की आज मला स्वयंपाकाचे बघायचंय कारण ही टेबल जोडत बसली आहे?

काही कामे पुरुषांनाच नीट जमतात असे आमचे मत.
माझा दादा (चुलत) परदेशात असताना वहीनीने माहेरी पुण्याला जायला गाडी बाहेर काढली.पुणे बंगेलोर हायवे लागल्यावर आजुबाजुच्या गाड्या सुसाट चाललेल्या बघून घाबरल्या. कश्याबश्या पुण्याला पोचल्या.कात्रजला भावाला बोलवून घेतले .गाडी तिथेच पडून ठेवली,येताना व्होल्वोने आल्या.भावाने आल्यावर खरडपट्टी काढली ती वेगळीच.
बायका ओव्हरकॉन्फीडन्सने एखादी गोष्ट करायला जातात व फसतात. असे आमचे मत.

काहीही हं ..... सिं जी ! ! ! ! तुमच्या वहिनीचे उदाहरण काही प्रातिनिधीक नाही अजिबातच!

बायका व पुरुष ...दोघेही चुका करतात, फसतात, तरतात- बुडतात. काही कामं एक्सलंटली करतात, काही मध्यम रीतीने...!!!
पण राजसीची अपेक्षा....... अवाजवी नाही.
मला तर वाटतं की फक्त बाळाला जन्म देणं, दूध पाजणं याखेरीज कुठलंच काम हे स्त्रीचं व हे पुरुषाचं...असं विभागण्या सारखं नसतं.......
मे बी काही बाबतीत कपॅसिटीज व्हेरी होतील थोड्या......उदा...फुटबॉल खेळणं...अथवा कार रेस.....
किंवा मग पुरुषांच्या बाबतीत पुरणपोळ्या करणे अथवा बाल संगोपन अथवा...........से....कुरडया करणे!

नागपूर हैद्राबाद, NH7 (४५० किमी) अर्धा रस्ता मी आणि अर्धा रस्ता बायको गाडी चालवायची. व्यवस्थित १४० स्पीड पर्यंत.

तुम्हाला स्वयंपाक हा शब्द माहित आहे , तो तुम्ही वापरलाही आहे.
पण काही ठिकाणी जेवण बनवणे हा हिन्दीतून मराठीत रुळत चाललेला शब्द समूह( खाना बनाना वरून आलेला असावा) राहून गेला आहे !
इतक्या छान मराठी लेखनात मात्र तो मधेच खड्यासारखा दाताखाली येतो.

Pages