येरगुंडे गुरुजी

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 March, 2009 - 07:15

हं तु उभा राहा रे, नवीन आलाहेस ना? नाव काय तुझं?

अं..गुर्जी माझं नाव विशाल कुलकर्णी आहे!

कानफटात आवाज काढीन ! बापाचं नाव घ्यायला लाज वाटते का? पुर्ण नाव सांग. आणि गुरुजी म्हणावं राजा, गुर्जी नाही, समजलं ?

हो गुरुजी. माझं नाव विशाल विजय कुलकर्णी. आधी पाषाणला होतो, वडिलांची बदली झाली म्हणुन इथे कुर्डुवाडीला आलो. आज पहिलाच दिवस आहे शाळेत माझा.

हं, ठिक आहे. पाटी बघु तुझी.

गुरुजींनी माझी पाटी घेतली, माझ्याच पेन्सीलने त्यावर एक ओळ लिहीली....ते मोत्यासारखे अक्षर मी पाहातच राहीलो.

हे घे, आता या ओळी सुवाच्य अक्षरात फळ्यावर लिही आणि नंतर सगळे मिळुन तास काढा. शेवटचे वाक्य सगळ्या वर्गाला उद्देशुन होते.

गुरुजी, तास म्हणजे? ..... मी

अरे हो, तु नवीन आहेस ना ! तास म्हणजे फळ्यावर लिहीलेल्या ओळी पाटीवर पाच वेळा काढायच्या.

पा.....च वेळा?

गुरुजींनी माझ्याकडे रागाने बघीतले, "तु आता दहा वेळा काढशील! समजले?"

मी गपचुप मान डोलावली आणि माझ्या अक्षरात फळ्यावर लिहीले.

"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे !"

गुरुजींनी एकदा फळ्याकडे पाहीले, मग हळुच माझ्या खांद्यावर हात ठेवला.

दहा जावु दे तु सात वेळाच लिही. तुला कळालं का मी तुला इतरांपेक्षा जास्त वेळा का लिहायला सांगतोय ते?

हो गुरुजी, माझी आई नेहेमी सांगते, मोठ्यांना प्रतिप्रश्न करु नये, त्यांचा अनादर केल्यासारखे होते ते. चुक केलीय तर शिक्षा भोगायची लाज का वाटावी? मला मान्य आहे.

शाब्बास, आत्ता मी दहावरुन पुन्हा तुला सातच वेळा का लिहायला सांगितले ते सांग बरं.

ते मात्र मला नाही समजलं गुरुजी. कदाचित तुम्हाला माझी दया आली असेल." मी एवढेसे तोंड करुन खालमानेने म्हणालो.

तसे गुरुजी खदखदुन हसले, "अरे वेड्या, हा तास लिहायचा प्रपंच कशासाठी तर तुम्हाला लिहीण्याची, सुवाच्य आणि शुद्ध लिहीण्याची सवय लागावी म्हणुन. आणि तु फळ्यावर लिहीलेली अ़क्षरे बघताना लक्षात आले की तुला हे तास लिहायची गरज नाहीये. पण तरीही हे हस्ताक्षर असेच टिकावे म्हणुन तास काढणे आवश्यकच आहे आणि प्रत्युत्तर केल्याची शिक्षा म्हणुन दोन वेळा जास्ती लिहायला लावले. समजले?

तुझं अक्षर छान आहे रे विशाल, ते असंच टिकव शेवटपर्यंत. सुंदर अक्षर हा खुप मोठा दागिना आहे लक्षात ठेव. समजलं?

त्यांना बहुदा प्रत्येक वाक्यानंतर समजलं ? म्हणुन विचारायची सवयच होती. हसताना मात्र त्यांच्या तोंडाचे बोळके होत होते. त्यांचे पुढचे, वरच्या रांगेतले दोन आणि खालच्या रांगेतला एक असे तीन दात पडलेले होते. पण ते हसणे..., ते हसणे मात्र एखाद्या निरागस बाळासारखे गोड होते.

येरगुंडे गुरुजींची आणि माझी ही पहिलीच भेट. पण पहिल्याच भेटीत माझ्या हस्ताक्षरामुळे मी त्यांच्या मर्जीस उतरलो आणि त्यांची शाबासकी मिळवली. आमच्या आईसाहेबांची कृपा. ती मला रोज सकाळी उठले की काहीतरी लिहायला बसवायची. काहीही लिही पण नीट लिही, शुद्ध लिही हा तिचा आग्रह असे. पुण्यातील पाषाण येथील संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर ति. आण्णांची कुर्डुवाडीला बदली झाली आणि कुर्डुवाडीच्या सरकारी शाळेत चौथीला प्रवेश घेतला. तिथला पहिल्या दिवसाचा हा प्रसंग. पुढे आयुष्यात खुप चांगले शिक्षक भेटले, खुप काही शिकायला मिळालं त्यांच्याकडुन. नांदी कुर्डुवाडीत झाली होती येरगुंडे गुरुजींच्या हाताखाली. खुप गोड होता हा माणुस. जातिवंत शिक्षक ... आजच्यासारखे ट्युशन्सवर जगणारे शिक्षक नव्हते आमचे येरगुंडे गुरुजी. तो माणुस खुप मोठा होता.... अगदी आभाळाएवढा.

गुरुजींनी फक्त अभ्यासक्रमातलेच धडे नाही शिकवले. त्यांनी जगण्याचे धडे दिले, जगणं समृद्ध कसं करावं ते शिकवलं. त्यावेळेस ते कळायचं नाही, कधी कधी तर जाचक वाटायचं पण आज ते दिवस आठवले की वाटतं गुरुजी किती पुढचा विचार करायचे. आता बर्‍याचवेळा कार्यालयीन कामात काही अडचणी निर्माण होतात. क्षणभर मेंदु ब्लॉक होवुन जातो. पण मग आपसुकच येरगुंडे गुरुजींची आठवण येते आणि मग जाणवतं की अरे हे तर गुरुजींनी शिकवलं होतं, सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेली उदाहरणे वेगळी असतील, संदर्भ वेगळे असतील पण निष्कर्ष तेच होते. अगदी साध्या साध्या गोष्टीतुन शिकवायचे ते.

एक प्रसंग आठवतो, शाळा सुरु झाल्यावर काही दिवसांनी गुरुजींनी सांगितलं की उद्यापासुन तु ही इतरांबरोबर शिकवणीला येत जा. माझ्या अंगावर काटाच आला. शिकवणीला जायचं म्हणजे २०-२५ रुपये महिना फ़ी भरणं आलं, आणि घरची परिस्थिती मला माहीत होती. आण्णा नाही म्हणाले नसते पण मग मला त्यांची पार्श्वभागावर ठिगळे लावलेली पॆंट आठवली. तिच्यावर अजुन एक ठिगळ नको होते मला. मी परस्परच गुरुजींना सांगुन टाकले की घरच्यांनी शिकवणीला नकार दिलाय म्हणुन. पण इतक्यात ऐकतील तर ते येरगुंडे गुरुजी कसले त्यांनी दुसर्‍या एका विद्यार्थ्याला घरी पाठवुन माहीती काढली आणि माझ्या दुर्दैवाने आण्णांनी त्याला सांगितले की काही हरकत नाही उद्यापासुन विशुलाही घेवुन जात जा शिकवणीला म्हणुन. दुसर्‍या दिवशी पहाटे साडे पाच वाजता वर्गातली चार दांडगी मुलं घरापाशी हजर झाली आणि चक्क माझा मोरया करुन शिकवणीला आणले. गुरुजींनी समोर उभे करुन विचारले

"का रे खोटे का बोललास? मला सगळ्या चुका चालतील पण माझा विद्यार्थी खोटे बोलतो हे नाही चालणार, समजले?"

मी रडतरडत मनातलं कारण सांगितलं तसे गुरुजी हसायलाच लागले. "इकडे ये!"

मी जवळ गेलो,

" वेड्या, तुला कुणी सांगितलं की या शिकवणीची फ़ी द्यावी लागेल म्हणुन? अरे जी मुलं खरोखर अभ्यासु आहेत आणि ज्यांना ज्यादा अभ्यासाची गरज आहे अशा दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी मी या शिकवण्या घेतो. इथे कसलीही फी नाहीय, असली तर फक्त नियमीत हजेरी आणि मनापासुन अभ्यास बस्स ."

मी गुरुजींकडे बघतच राहीलो. आजही माझ्याकडे दर शनिवार रवीवार आमच्या सोसायटीच्या मागे असलेल्या झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य. या सगळ्यांची पाळंमुळं बहुदा येरगुंडे गुरुजींनीच रुजवली असावीत.

तर माझी शिकवणी सुरु झाली. पहीले काही दिवस गेल्यावर गुरुजींनी एकदम शिकवणीची जागा बदलली. आधी ते शाळेतच शिकवणी घेत होते. पण आता त्यांनी सांगितलं की उद्यापासुन माझ्या घरी या. सकाळी साडे सहा वाजता. गुरुजींचं घर गावाबाहेर, कुर्डु रोडला आंतरभारती शाळेपाशी त्यांचं घर होतं. आम्ही राहायला गावाच्या दुसर्‍या टोकाला. गुरुजींकडे साडे सहाला पोचायचे म्हणजे घरातुन साडेपाचला निघणे आले. त्यासाठी कमीत कमी साडे चारला तरी ऊठणे आले. पण जवळ जवळ ८-९ जणांचा गृप होता. त्यामुळे आम्ही उत्साहाने लवकर उठुन गुरुजींच्या घराकडे पळायला लागलो. साडे पाचलाच आम्ही तिथे हजर असायचो. मग गुरुजी सांगणार,

"माझी पुजा व्हायची आहे अजुन, तोपर्यंत समोरच्या मैदानावर खेळा. "

मग सहा - सव्वा सहाला माई मैदानावर यायच्या बोलवायला. माई म्हणजे गुरुजींच्या पत्नी. गुरुजींचेच दुसरे रुप. साडे पाच फुटाची सावळ्या रंगांची माई मला अजुन आठवते. घरात गेलो की आधी गुरुजी तिला ऒर्डर सोडायचे.

"माई, पाखरं खेळुन दमलीत. आधी त्याना काहीतरी खायला दे. हात पाय धुवुन घ्या रे आधी."

मग कधी बटाट्याचे पापड, कधी मटकीची उसळ, कधी ताक भाकरीचा काला असा पौष्टिक, सात्विक आहार पोटात पडायचा. त्यानंतर गुरुजी आधी एखादा श्लोक शिकवायचे आणि मग शिकवणीला सुरुवात व्हायची. माझी मुंज तशी उशीराच झाली पण गायत्री मंत्रापासुन मृत्युंजयमंत्रासकट सगळे मंत्र गुरुजींनी आम्हाला चौथीतच शिकवले होते. रामरक्षा, हनुमान स्तोत्र, मनाचे श्लोक त्या काळी आम्हाला मुखोद्गत असायचे. अजुनही म्हणायला सुरुवात केली की डोळ्यासमोर गुरुजींची बुटकेली, गौरवर्णीय मुर्ती उभी राहते. श्लोक म्हणताना चुकले की वटारलेले डोळे अजुनही कुठलीही चुक झाली की डोळ्यासमोर येतात आणि आपोआपच ती चुक सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी अभ्यासापासुन ते शारिरीक मैदानी खेळापर्यंत सगळ्या चांगल्या सवयी त्यावेळी गुरुजींनी आम्हाला लावल्या होत्या. खरेच त्यावेळी जर गुरुजी भेटले नसते तर........! आज कदाचित विशाल कुणी वेगळाच असला असता.

कुर्डुवाडीत जास्त वर्षे नाही राहीलो आम्ही. दिड वर्षे असु फार तर. त्यानंतर दौंडला बदली झाली आण्णांची. मला फार राग यायचा त्यावेळी. कुठेही व्यवस्थित शाळा सुरु आहे म्हटले की आण्णांची बदली झालीच. माझे प्राथमिक शिक्षण (पहिली इयत्ता ते पाचवी इयत्ता) एकुण चार ठिकाणी मिळुन झाले. आता कुठे नवीन मित्र होताहेत म्हटले की निघालो नवीन गावाला. मला आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीचा फार राग यायचा. मी रागाने म्हणायचो की चुकुनही पोलीसात जाणार नाही.

येरगुंडे गुरुजींना सोडुन जायचे खरेच जिवावर आले होते. अवघ्या एक वर्षांचा त्यांचा सहवास होता, पण त्या माणसाने वेड लावले होते. कुर्डुवाडी सोडायच्या आधी मी गुरुजींना भेटायला गेलो. खुप रडलो आणि नेहेमीप्रमाणे आण्णांच्या पोलीसाच्या नोकरीला शिव्या दिल्या. तसे गुरुजींनी मला जवळ घेतले आणि मला म्हणाले...ते शब्द माझ्या मनावर कोरले गेले आहेत जणु.

"असं म्हणु नये राजा, अरे त्यांचं पोलीस खातं आहे म्हणुन आपण आरामात, बिनधास्तपणे सुखाने जगु शकतो. तुझ्या आण्णांची दर एक दिड वर्षांनी बदली होते याचं कारण माहीत आहे तुला?

वेड्या .. पोलीसात दोन प्रकार असतात

१) खाकी वाले : यांचा आपल्या खाकी गणवेशावर विश्वास असतो, निष्ठा असते. त्याच्यासाठी, त्याचा मान राखण्यासाठी ते आपलं सर्वस्व पणाला लावतात.

आणि

२) खा ......की वाले: यांच्यासाठी खाकी म्हणजे भ्रष्टाचार, शक्य होईल तेवढे खावुन घ्यायचे, लोकांना लुबाडत राहायचे हाच त्यांचा धर्म बनतो. आणि अशी माणसं मग वर्षानुवर्षे एका ठिकाणी चिकटुन राहतात.

सुदैवाने तुझे आण्णा पहिल्या वर्गात म्हणजे खाकीवर निष्ठा असलेल्यात मोडतात. पण त्यांचा हा प्रामाणिकपणाच त्यांना एका जागी टिकु देत नाही. पण म्हणुनच मला खुप अभिमान वाटातो तुझ्या आण्णांचा आणि तुलाही वाटायला हवा, समजलं ?

मी मान डोलावली .......

हे आणि असंच बरंच काही गुरुजींनी त्यावेळी सांगितलं. शब्द वेगळे असतील त्यांचे पण मतितार्थ हाच होता. खरेतर त्यावेळी मला काहीच कळालं नव्हतं. मी फक्त मान डोलावत होतो. मला फक्त एवढेच कळाले की आण्णा काहीतरी चांगलं काम करताहेत ज्याचा गुरुजींनासुद्धा अभिमान , आनंद वाटतोय. गुरुजींच्या त्या बोलण्याचा अर्थ आज खर्‍या अर्थाने कळतोय मला.

त्यानंतर परवा एक दोन तीन वर्षापुर्वी एकदा कुर्डुवाडीला गेलो होतो तेव्हा गुरुजींचं घर शोधत गेलो होतो. पण तिथे आत्ता एक मोठी सोसायटी उभी राहीलेय. गुरुजींच घर मला कुठे दिसलच नाही. शाळेत जावुन विचारले तर त्यांच्याकडेही गुरुजींचा सद्ध्याचा पत्ता मिळाला नाही. पण मला माहीत आहे , गुरुजी जिथे कुठे असतील तिथे आजुबाजुची चार मुले जमवुन त्यांना शिकवीत असतील.

सद्ध्या कंपनीतल्या कामगारांची बाजु घेवुन मी जेव्हा आमच्या मॅनेजर्सबरोबर वाद घालतो तेव्हा माझे सहकारी म्हणतात...

"यार विशाल, तेरेको क्या पडी है ! वो लोग निपट लेंगे उनका, क्युं अपनी नोकरी खतरेमें डाल रहे हों !"

त्यांना कसं सांगु ? हे मी नाही करत. माझ्या मनातला माझ्या आण्णांबद्दलचा आदर, येरगुंडे गुरुजींनी अंगात भिनवलेला आदर्शवाद हे करतोय. ते माझं कर्तव्य आहे, ते टाळायचे म्हणजे, यदाकदाचित कधी गुरुजी कुठे भेटलेच तर त्यांना तोंड नाही दाखवु शकणार मी.

अहं .... जर गुरुजी भेटलेच तर त्यांची नजर चुकवुन जाणे मला नाही जमणार, कदापी नाही.

अजुनही मी मुद्दाम सगळ्यांना पत्रे लिहीतो. लिहिताना मुद्दाम काहीतरी चूक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठूनतरी येतील आणि म्हणतील...

"विशाल, ती वेलांटी चुकलीय, चल आजपासुन पुन्हा तास काढायला सुरुवात कर !"

विशाल

गुलमोहर: 

अ...च्छा !!!तो ये राज है ! Happy

नशिब लागते रे असे गुरुजी मिळणे !

तुझ लिखाण नेहमीसारखेच ....नैसर्गीक...जवळचे....ओलावा तयार करणारे!

तुला ज्यांनी घडवले अश्या गुरुजींना सलाम ! Happy

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

विशाल, नशिबवान आहात, असे गुरुजी लाभले. तुमच्या गुरुजींना नमस्कार.

विशाल दादा... काय लिहु कळत नाहि... माझ्यापण आयुष्यात असेच एक शिक्षक आले आहेत... २ वर्षे झाली मी देशाबाहेर असल्यामुळे मी contact नाही ठेऊ शकलो. Sad सध्या त्यांना शोधतोय...

तुमच्या या लेखामुळे त्यांची दाटून आठवण आली ..

खुपच छान !!! असे शिक्षक मिळणे खरोखर भाग्याचे !!!

छान व्यक्तिचित्रण आहे. या लेखात पण शुद्धलेखनाच्या चुका मुद्दाम गुरुजींसाठीच केल्या आहेत का ?

लिहीताना मुद्दाम काहीतरी चुक करतो आणि इकडे तिकडे पाहतो. वाटतं, येरगुंडे गुरुजी कुठुनतरी येतील आणि म्हणतील...
>>

छान लिहिलंयस विशाल... नशीबवान आहेस...

~If better is possible then good is not enough~

शोनु,

धन्यवाद.
त्यांनी भरभरुन दिलं पण माझी झोळी फाटकी होती किंवा अपुरी होती, क्षमस्व !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

पुलंचे चितळे मास्तर आठवले. खुपच छान लिहीलय

सुंदर !!!
------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

हां, हा लेख खुपच छान झालाय! Happy व्हेरी गुड्ड!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

सगळ्यांचे आभार. लिंबुदा मनापासुन धन्यवाद.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

स्पीड मध्ये थ्रिल असेल, पण प्रवासातला आनंद उपभोगण्याचा पिरिअड त्यामुळे कमी होतो आणि सतत स्पीडकडे लक्ष राहिल्याने तोही उपभोगता येत नाही.

http://maagevalunpahataana.blogspot.com

खुप छान
मला आमच्या बाई आठवल्या,
त्यांनी पण आम्हाला खुप काही शिकवले

अतिशय सुन्दर .... खरच्.नशीबवान आहात... अशा गुरुजीन्चा सहवास लाभला.
<<<आजही माझ्याकडे दर शनिवार रवीवार आमच्या सोसायटीच्या मागे असलेल्या झोपडपट्टीतली १० वी पर्यंतची मुले येतात. मी शक्य होईल तेवढे त्यांना इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवतो, अगदी विनामुल्य.>>>> सहीच. गुरुजीन्ची शिकवण खर्या अर्थाने सार्थकी लावताय..
फुलराणी.

विशाल, छान लिहिलयस व्यक्तिचित्रण. आई-वडिलांनंतर गुरूजनांनीच थापटून-थोपटून घडवलेली असतात आपली मडकी!

खुपच छान !!! असे शिक्षक मिळणे खरोखर भाग्याचे !!!>>>

Happy

विशाल, खरंच येरगुंडे गुरुजींना मनापासुन धन्यवाद, त्यांनी असा शिष्य घडवला आणि आण्णांनाही.....

एक सांगू मला माझ्या आईचीच आठवण झाली!!!! तीच माझी शिक्षीका होती १ली ते ४थी पर्यंत!!!!!!!
धन्यवाद!!!! Happy
डब्बो!!!!!!

विशाल, खरंच येरगुंडे गुरुजींना मनापासुन धन्यवाद, त्यांनी असा शिष्य घडवला आणि आण्णांनाही.....

एक सांगू मला माझ्या आईचीच आठवण झाली!!!! तीच माझी शिक्षीका होती १ली ते ४थी पर्यंत!!!!!!!
धन्यवाद!!!! Happy
डब्बो!!!!!!

विशाल दा......मस्त एकदम.. Happy
खूप लकी आहात दादा तुम्ही..... इतके चांगले गुरूजी तुम्हाला लाभले....
चांगला शिक्षक / गुरू लाभायला सुद्धा मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं...
आमच्या बाबतीत नेमकं तेच कमी पड्लं असावं!!!
..................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

अतिशय छान लेख. थोडा वेळ मी भुत काळात हरवलो होतो. विशाल - तुमच्या गुरुजींना नमस्कार. तसेच प्रामाणिक पणे सेवा बजावलेल्या तुमच्या अण्णांना साष्टांग दंडवत. हा गुण अत्यंत दुर्मिळ होत चालला आहे.

विशाल,
सुरेख.. !
कविता म्हणते तस खरच पु लं च्या चितळे मास्तरांची आठवण झाली.
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

खरच असे तळमळिने शिकवणारे शिक्षक आता दुर्मिळच. त्यावेळि त्यांना पगार तो किति असेल पण त्यातहि पहाटे ऊठुन मुलांना शिकवणे , त्यांना जे काहि आहे त्यातल्यातच खायला देणे ,खरोखरच ते व त्यांच्या पत्नि म्हणजे त्यागमुर्तिच. ह्रुदयस्पर्शि माणसे तसेच लेखनहि.

Pages