अंजलीची गोष्ट - संवेदना .... सहवेदना

Submitted by आनन्दिनी on 10 April, 2017 - 04:29

"डॉक्टर, आत येऊ?" दरवाज्यातून आवाज आला. "हं, ये" अंजलीने पाहिलं काल रात्री डिलिव्हरी झालेली १२ नंबरची पेशंट आली होती. "अगं चालून का आलीस तू? काही होतंय का?" अंजलीने काळजीने विचारलं. "बस आधी". राधा समोरच्या खुर्चीवर बसली. राधा परवा डिलिव्हरी साठी बायकांच्या वॉर्डमध्ये ऍडमिट झाली होती. घरची परिस्थिती बरी होती म्हणून स्पेशल रूम घेतली होती. काल रात्री नॉर्मल डिलिव्हरी झाली. बाळ बाळंतीण दोघेही व्यवस्थित होते. पहिलंच बाळ, त्त्यामुळे घरच्यांमधे आनंदी आनंद होता. 

"बाळ कुठे आहे?" अंजलीने विचारलं. "सिस्टरने दिव्याखाली ठेवायला नेलंय"
"ओके, बोल..."
"मॅडम, मी ज्या खोलीत आहे त्याच्यासमोरच एका बाईचा बेड आहे. ती मुसलमान बाई....." राधाने चाचरत म्हटलं.

"रूही ...... तिचं काय?""तिला माझ्या रूम मध्ये हलवाल?"
"का आणि तू कुठे जाणार?" अंजलीने चक्रावून विचारलं.
"मला बाहेर जनरल वॉर्ड चालेल. खोलीचं भाडं आम्ही आधीसारखंच देऊ पण तिला सिंगल खोली वापरूदे."
"रूहीला सिंगल खोली? ती एकटीच आहे. तिचं बाळ गेलंय " अंजलीचा आवाज मऊ झाला होता.
"म्हणून तर.... इथे बाहेर प्रत्येक बाईकडे बाळ आहे किंवा होणार आहे. हीच एक एकटी आहे. नुकतंच तिचं बाळ गेलंय तिला कसं वाटत असेल ते मला माहितीये. माझंसुद्धा याआधी एकदा असं झालंय."
अंजलीने राधाच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाली, "तुझ्यासारखं कुणी भेटलं की बरं वाटतं, जे स्वतःच्या पलीकडेही बघतात. मी सांगते नर्सला तुमचे बेड बदलायला. तुझ्या घरच्यांना चालणार आहे ना?"
"हो मी विचारलंय त्यांना"

अंजली घरी आली. उद्या रविवार म्हणजे निवांत दिवस होता. रात्री जेवणं झाल्यावर रिया तिच्या जवळ येऊन म्हणाली, "मम्मी, आम्हाला प्रोजेक्ट करायचाय, सीझन्सवर (ऋतू) . टीचरने सांगितलंय इंटरनेटवरून माहिती घ्या, चित्र घ्या आणि चिकटवून पोस्टर बनवा. तू मला हेल्प करशील?"
"ऑफकोर्स सोनू. उद्या सकाळीच बनवूया. उद्या मी घरीच आहे." अंजलीने हसून म्हटलं.
दुसर्या दिवशी दोघीनी बसून पोस्टर पूर्ण केलं. अंजलीने पोस्टर गुंडाळून तो रोल रियाच्या बॅगमधे नीट भरला. "उद्या दे हं आठवणीने, नाहीतर बॅगमधे चेपेल "

दुसर्या दिवशी संध्याकाळी रिया पुन्हा अंजलीला म्हणाली, "मम्मी आपण अजून एक पोस्टर बनवायचं का?"
"आज पुन्हा बनवायला सांगितलंय? काय टॉपिक आहे?"
"नाही...... त्याच टॉपिकवर, पुन्हा"
"पुन्हा त्याच टॉपिकवर..... का?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. रिया काहीच बोलली नाही. "खराब झालं का ते पोस्टर?" रियाने नाही म्हणून फक्त मान हलवली. "मग काय झालं सोनू? सांग मला. मी काही बोलणार नाही." रियाला जवळ ओढून मांडीवर बसवत अंजलीने विचारलं.
"मम्मी, गार्गी आहे ना .... तिला दिलं मी ते पोस्टर."
"गार्गीने बनवलं नव्हतं का?" अंजलीने उत्सुकतेने विचारलं.
"हो" आता सगळा प्रकार अंजलीच्या लक्षात यायला लागला.
"तुला तुझ्या मैत्रिणीला मदत करायची आहे हे चांगलं आहे सोनू पण तिने पोस्टर बनवलं नाही म्हणून तू तिला दिलंस तर तू तिला तिच्या चुकीमध्ये मदत करत्येस असं होतं. अशाने ती अजून मागे पडेल."
"पण ती कशी करणार, मम्मी? मला तू हेल्प केलीस. गार्गीने मला सांगितलं की तिचे मम्मी पप्पा सारखे खूप भांडतात. तिची मम्मी तिला घेऊन लांब जाणार आहे. गार्गी रडत होती .
तिचा होमवर्क तर कोणीच घेत नाही....." रिया पुढे सांगत होती. अंजली स्तब्ध झाली. आईवडलांच्या भांडणात होरपळणाऱ्या त्या एवढ्याश्या पिल्लासाठी तिचं मन कळवळलं .
"टीचरला नाही का सांगितलं गार्गीने?" तिने काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"ती कशी सांगेल मम्मी? आपल्याला वाईट वाटतं तेव्हा आपण कोणाला सांगतो का?"
अंजलीने रियाला मिठीत कवटाळलं. तिचा पापा घेऊन ती म्हणाली ,"बरोबर आहे. बरं झालं तू गार्गीला पोस्टर दिलंस . आपण दुसरं बनवू. आणि मी तुझ्या टीचरशी बोलून ठेवेन गार्गीबद्दल. त्यांना कल्पना असेल तर त्यांना तिला मदत करता येईल ना!". पुन्हा एकदा पोस्टर पूर्ण झालं .

अंजली खिडकीत उभी होती. मनात विचारांची वावटळ. एवढीशी रिया, मैत्रिणीचं दुःख समजून घेत होती. मदतीच्या हाकेची वाट न बघता तिच्यासाठी जमेल ते सगळं करत होती. तिथे ती पेशंट राधा, बाळ झाल्याच्या आंनदात हरवून न जाता दुसर्या अनोळखी बाईचं दुःख समजून त्यावर फुंकर घालत होती. अंजलीला डॉक्टर दीक्षितांचं (सायकियाट्रिस्ट) बोलणं आठवलं, "कित्येकदा स्वतःच्या आनंदात मश्गूल असताना आपल्याला इतरांची दखलच नसते, किंवा कधी स्वतःच्या दुःखातच आपण इतके चूर असतो की आपल्यासारखंच, कधी त्याहूनही अधिक दुःख भोगणारे लोक आपल्या आजूबाजूलाच असूनही  आपल्याला ते दिसतंच नाहीत. फक्त आपली सुखं आणि आपली दुःख यांच्यापलीकडे, इतरांकडे आपली नजर गेली आणि त्यांच्यासाठी लहानशीही गोष्ट आपण केली तर ती आपल्याला शतपटीने सुख देऊन जाईल." किती बरोबर सांगितलं डॉक्टर दीक्षितांनी.

तिची नजर खिडकीच्या बाहेर गेली. सूर्य मावळत होता पण लुकलुकणार्या दिव्यांनी अंधार उजळून गेला होता. 

डॉ. माधुरी ठाकुर 

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/04/blog-post.html?m=1

Group content visibility: 
Use group defaults

Pages