' वारस ' (विज्ञानकथा) भाग १

Submitted by Vaibhav Gilankar on 8 April, 2017 - 00:53

दिनांक २१ फेब्रुवारी २०५७: एक अंत्ययात्रा चाललेली आहे, शहरातले सर्व आणि देशातले काही दिग्गज पोलिस अधिकारी, राजकारणी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक जमलेले होते. स्वतः श्रीमती तेजस्विनी विष्णू कुलकर्णी पुढे चालल्या होत्या, अर्थातच, अंत्ययात्रा त्यांच्या पतीची डॉ. विष्णू कुलकर्णी यांची होती. तेजस्विनीला माहित होते कि येथे जमलेला एकूण एक व्यक्ती हा फक्त उद्या येणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोत दिसण्यासाठी इथे जमलेला होता. प्रत्यक्षात जरी विष्णू कुलकर्णी यांनी कुणाशी शत्रुत्व केले नाही तरी त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना भरपूर शत्रू मिळाले होते. त्यांच्या मृत्यूच्या कारणानेही त्यांच्या चारित्र्यावर काही लोकांनी संशय घेतला होता पण ते देखील मोजकेच होते. विष्णूचा मृत्यू कर्करोगामुळे झाला होता, किरणोत्सारी युरेनियमच्या अतिसहवासात राहिल्यामुळे त्यांना जीवघेणा कर्करोग झाला होता. त्यांना स्वतःलाही पूर्ण खात्री होती कि ज्या प्रयोगासाठी त्यांनी जीव पणाला लावला होता त्या प्रयोगाच्या पूर्णत्वानंतर ते या जगात नसतील. मृत्युनंतर त्यांची कंपनी 'व्ही. & टि. टेक' आणि हा प्रयोग पूर्ण करण्यातही लागलेलं सगळं कर्ज त्यांच्या पत्नीच्या, तेजस्विनीच्या डोक्यावर येईल. तेजस्विनी खूप दुःखात होती , कर्जामुळे नव्हे तर आता एक खूप मोठा आधार तिने गमावला होता, विष्णूच्या मदतीने ती संपूर्ण जगाशीही लढली असती पण आता त्याच्या जाण्याने तिने जगायचीदेखील आशा ओडली होती.

अंत्यविधी झाल्यानंतर सर्व मंडळी एकदा परत शोक व्यक्त करून तेजस्विनीचा निरोप घेऊन निघून गेली. शेवटी फक्त रमाकांत गायकवाड वकिल थांबले होते. त्या सर्व लोकांत तेजस्विनी सकट गायकवाड वकिलांनाही विष्णुच्या निधनाचे खरोखर तीव्र दुःख झाले होते. विष्णुचे विश्वासू मित्र म्हणून गायकवाडांची ख्याती होती. गायकवाड तेजस्विनीशी बोलावं म्हणून थांबले होते. तेजस्विनीचं गायकवाडांकडे लक्ष नव्हतं, ती विष्णुच्या आणि तिच्या आनंदी क्षणांच्या आठवणींमध्ये गुंग होती. गायकवाड तिच्याजवळ आले आणि म्हणाले, "तेजस्विनी बाई..", तिचं अजूनही लक्ष नव्हतं. ते पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले, "तेजस्विनी बाई!" मग तेजस्विनी भानावर आली, तिने वकिलसाहेबांकडे पाहिलं आणि त्यांना बसण्याची खूण करून विचारलं, "बोला वकिलसाहेब, कर्ज फेडण्याची अंतिम तारीख कधी आहे तेच सांगायला आलात ना? पण खरं सांगू? विष्णू गेल्यापासून मला आता कशाचाही मोह उरला नाहीये अगदी जीवनाचाही नाही, आता बँकेने जरी माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं तरी मला त्याचं काहीच वाटणार नाही कारण आम्हाला मूलबाळही नाही ज्यांच्यासाठी मी जगावं." तेजस्विनीच्या डोळ्यांतून पाणी येत होत.
वकिलांनी तिचं बोलण ऐकून तिच्याकडे जरा वेळ पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली, "बाई तुमच्या नकारात्मकतेचं कारण मी समजू शकतो. माझा सर्वांत जवळचा मित्र मी गमावला आहे, पण विष्णूच्या शेवटच्या इच्छेखातर आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यासाठी आलो आहे. विष्णूला माहीत होत की त्याचा अंतिम क्षण जवळ आला होता म्हणून त्याने मला आधीच सांगितले होते की मी त्याचे मृत्यूपत्र त्याच्या अंत्यविधीच्याच दिवशी तुम्हाला दाखवावे. त्याचे मृत्यूपत्र आत्ता त्याच्याच कंपनीत व्हॉल्ट A१ मध्ये ठेवलेले आहे, तेव्हा माझी अशी विनंती आहे की विष्णूसाठी तुम्ही आत्ताच माझ्यासोबत चलाव आणि ते मृत्यूपत्र एकदा डोळ्याखालून घालावं, कदाचित त्याने तुम्हाला आशेचा किरणही मिळेल". तेजस्विनी फक्त विष्णूच्या इच्छेसाठी वकिलांसोबत जायला तयार झाली.
ते दोघं हवाई मोटारीत बसले आणि अर्ध्या तासातच त्यांची मोटार 'व्ही. ऍण्ड टि. टेकनॉलॉजिस' या ३० मजली उंच इमारतीच्या लॅण्डिंग पॅड वर उतरली. तेजस्विनीने विचार केला, विष्णूने अपार मेहनत घेऊन, कष्ट करून उभारलेली ही इमारत आता हिरावली जाणार आणि त्या विचाराने ती अजूनच दुःखी झाली. वकीलसाहेब आणि तेजस्विनी दोघंजण इमारतीच्या छताला असलेल्या लिफ्ट मधून ३०व्या मजल्यावर आली, छत आणि ३०व्या मजल्यामध्ये थोडी जास्त उंची होती त्यामुळे तेथूनही लिफ्टच वापरावी लागे. वकिलांच्या मागोमाग तेजस्विनी जाऊ लागली. व्हॉल्ट A१ मध्ये ती कधीच आली नव्हती, तशी त्या व्हॉल्टची कार्डस्वरूप चावी सिक्युरिटीमुळे विष्णूखेरीज गायकवाड वकील आणि तेजस्विनीकडेही होती पण त्या तिजोरीत विष्णूचे खास प्रकल्पच असल्यामुळे तिचा त्याच्याशी एवढा संबंध आला नव्हता. गायकवाडांनी व्हॉल्ट बाहेर असलेल्या साऊंड रेकगनायझरमध्ये स्वतःचा खास कोड सांगितला, त्याचक्षणी व्हॉल्ट बाहेर असलेला पहिला दरवाजा उघडला गेला, ते दोघं आत गेले, तिथे अजून एक दरवाजा होता, त्या दरवाज्याबाहेर असलेल्या पॅडवर गायकवाडांनी आपले कार्ड ठेवले त्याचबरोबर तो दरवाजाही उघडला गेला. ती एक खूप मोठी खोली होती. खोलीच्या मधोमध एक स्क्रीन टेबल ठेवला होता, त्या खोलीला समोर अजून एक दरवाजा होता, तेजस्विनीला कुठूनतरी मंद पियानोचे सूर ऐकू येत असल्याचे जाणवले, पण ती तिथे दुर्लक्ष करून पुढे गायकवाड काय करतात ते पाहू लागली. गायकवाडांनी त्यांच्या कोटमधून अजून एक कार्ड काढून त्या स्क्रीन टेबलवर ठेवले, त्या टेबलमधून बीप बीप असा आवाज आला आणि ते कार्ड स्कॅन झाले आणि त्यानंतर त्यातून एक यांत्रिक आवाज आला, "कृपया, तुमचा उद्देश सांगा", गायकवाड म्हणाले, "आम्ही मृत्युपत्र उघडायला आलो आहोत, ती वेळ आली आहे". तो यांत्रिक आवाज म्हणाला, "कार्ड वरील वेरिफिकेशन कोड तपासला आहे, 'प्रोजेक्ट लेगसी' आता तुमच्यासमोर सादर केला जाईल" आणि त्यानंतर त्या टेबलच्या स्क्रीनवर एक हिरवी डिजिटल फाईल उघडली गेली, त्यातून एक ध्वनिसंदेश यायला सुरुवात झाली.
"हा संदेश वकील रमाकांत गायकवाड आणि सौ. तेजस्विनी कुलकर्णी या दोघांसाठी आहे. वकीलसाहेबांना याबद्दल पूर्ण माहिती आहे, त्यामुळे सौ. कुलकर्णी यांनी हा संदेश काळजीपूर्वक ऐकावा-

"व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिस ही विष्णु कुलकर्णी यांनी २०३६ साली स्थापित केलेली एक नावाजलेली कंपनी आहे जी रोबोट्सना स्वयंचलित ठेवण्यासाठी गरजेचे असलेले एक मिनी न्युक्लिअर रिऍक्टर बनवते तसेच ती रोबोटचे इतर सुटे भागही बनवते. हे मिनी न्युक्लीअर रिऍक्टर स्वतः वैज्ञानिक विष्णु कुलकर्णींनी शोधून काढले होते, शहराला वीज पुरवणाऱ्या मोठ्या न्युक्लिअर रिऍक्टरचाच आकार ते यंत्रांच्या पोटात मावतील एवढा छोटा करून थोड्याश्या यूरेनियम आणि न्यूट्रॉन लहरींच्या मदतीने फिजन रिऍक्शन करून ते रोबोट स्वतःला ऊर्जा पुरवठा करू शकतील असा त्या रिऍक्टरचा उद्देश आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला होता आणि त्याच न्यूक्लीअर रिऍक्टर्सना बनवणारी कंपनी म्हणून आज 'व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिस'चा नावलौकिक आहे. याक्षणी या कंपनीची किंमत आहे ८००० कोटी आणि त्यावर १५००० कोटींचे कर्ज आहे. याच कारण म्हणजे, श्री. विष्णू यांनी १८ मार्च २० ४९ साली एक प्रकल्प चालू केला, ज्याचं नाव त्यांनी ठेवलं 'प्रोजेक्ट लेगसी'.
या प्रकल्पाची सुरुवात आणि तिचा उद्देश मोजक्याच लोकांना माहीत होता ज्यात गायकवाड वकील आणि कंपनीचे काही स्पर्धकही होते, हा प्रकल्प होता असा एक यंत्रमानव तयार करायचा ज्यामध्ये आत्तापर्यंतचा सर्वांत चांगला रिऍक्टर बसवलेला असेल, ज्यात युरेनियमचे प्रमाण अत्यंत कमी वापरावे लागेल पण त्याची कार्यक्षमता जास्त असेल म्हणजेच जास्तीत जास्त ऊर्जा कमीत कमी इंधनात त्या यंत्रमानवाला पुरवली जाईल, या रिऍक्टरमुळे तो यंत्रमानव कदाचित काही दशकांपर्यंतही अगदी नीटपणे कार्य करत राहील आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे त्या यंत्रमानवामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) टाकली जाईल जी त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यास शिकवेल आणि त्याला स्वतःहून विकसित करत जाईल, ह्या दोन गोष्टी त्या यंत्रमानवाला बाकी यंत्रमानवांपासून खास सिद्ध करणार होत्या, मूळ उद्देश हा प्रगत रिऍक्टर बनवण्याचा किंवा ती प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता बनवण्याचा नव्हता, या दोन्ही आविष्कारांची मदत घेऊनच तो पूर्ण यंत्रमानव बनवण्यात येणार होता. हा यंत्रमानव तयार करताना श्री. विष्णूंना खूप कर्ज घ्यावं लागलं, फसलेले प्रयोग, महागड्या युरेनियमचा आधीपासूनच होत असलेला वापर, तसेच यंत्रमानवाचे सर्व भाग शुद्ध टायटॅनियमचे बनविण्यात आल्यामुळे खर्च प्रचंड झाला होता, कर्ज वाढत वाढत १५००० कोटींवर गेलं आणि दि.१२ डिसेंबर २०५६ला हा यंत्रमानव पूर्ण झाला, त्याचं नाव ठेवलं गेलं, 'झ्यूस' (Zeus).
झ्यूसने तयार बनून लगेच विकसित व्हायला सुरुवात केली होती, श्री. विष्णूंनी त्याला त्याच दिवशी व्यवसायशास्त्र, संरक्षणशास्त्र आणि इतर अनेक शास्त्रांचे ज्ञान घेण्यास सांगितले आणि आश्चर्य म्हणजे झ्यूसने ते सर्व ज्ञान काही सेकंदातच ग्रहण केले त्याची बुद्धिमत्ता कैकपटीने वेगाने काम करत होती जे हा प्रयोग यशस्वी झाल्याचेच लक्षण होते, आता विष्णूंना अजून एक गोष्ट पाहायची होती ती म्हणजे झ्यूसला पूर्ण 'व्ही. अँड टि.' कंपनी चालवताना! पण दुर्दैवाने त्यांचा अंतिम क्षण जवळ आला होता आणि त्यांनी त्यांचे मृत्युपत्र तयार करवून घेतले ज्यात श्रीमती तेजस्विनी कुलकर्णींना विनंती आहे की त्यांनी झ्यूसच्या हातात कंपनीची धुरा द्यावी, अर्थात, झ्यूसला त्यांचा 'वारस' करावं; जेणेकरून तो त्याची बुद्धी वापरून कंपनीवरील कर्ज दूर करू शकेल आणि श्रीमती तेजस्विनींच्या पुढील आयुष्याची सोय होईल. आता यापुढील सर्व निर्णय हे तेजस्विनीबाईंचे असतील." एवढे सांगून तो संदेश थांबला.
Part 1 Finish(क्रमशः)

-वैभव प्रदीप गिलाणकर
vgilankar@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद!
श्री Abdul Hamid, तुमचे बरोबर आहे, मलाही वाटले कि प्रथम भाग थोडा छोटा आहे आणि वाचक पुढील भाग लगेच अपेक्षित करतीलच. कथा पूर्ण लिहून तयार आहेच, फक्त कामाच्या व्यापात असल्यामुळे एकदम सगळे भाग corrections करून टाकणे जमले नाही. दुसरा भाग आताच प्रकाशित केला, तुमची प्रतिक्रिया कळावी!