पळस ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 7 April, 2017 - 00:30

उभयता चढवणार होतो कळस
कसा पूर्ण व्हावा तुझ्याविण नवस ?

बहरला बहावा जणू सांगतो
समस्या निवळतील ध्यानस्थ बस !

तुझ्या स्पर्शण्याने अशी दाहते
जसा लाल होतो उन्हाने पळस

पिके संभ्रमांचीच घेशील तर ..
मनाचा कसा काय टिकणार कस ?

क्षणार्धात माझ्याकडे पोचते
तुझ्याहून ठरते तुझी सय सरस

नसेना सुशोभित... तरी औषधी !
तुझ्या अंगणी डोलणारी तुळस

पसरला किती रोग अंदाज घे
मनाची तुझ्या तू पकड नीट नस

तुला तीच रेटेल ध्येयाकडे
' प्रिया ' फक्त जा आणि गर्दीत फस !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users