मोगरा फुलला !!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 6 April, 2017 - 06:10

ज्या रस्त्यावरून आपण गेली कित्येक वर्ष सायकल किंवा बसने जायचो, त्याच रस्त्यावरून आज चारचाकी गाडीतून जाताना स्वातीला एकदम भारी वाटत होतं. तोच रस्ता, तिच झाडं, अन तिच घरं ,पण आज सगळं कसं छान वाटत होतं. त्यात शिरीषची आठवण होतीच साथ द्यायला. शिरीषच्या आठवणीने अंगभर मोहरत होती आणि स्वतःशीच हसत होती. हळदीने पिवळ्या झालेल्या हातावरच्या मेहंदीमध्ये त्याचच नाव शोधत होती. सकाळी माहेरी यायला निघाली तेव्हाची त्याची साखरमिठी अजून ताजीच तर होती. ती इथे आणि मन तिथे, अशी तिची अवस्था झाली होती.
गाडी गावच्या वेशीतून आत शिरली आणि आधीच ठरल्याप्रमाणे ड्राईवरने गाडी शाळेच्या गेटवर थांबवली. स्वातीला बघताच पारावर बसलेले आप्पा काका पुढे होत म्हणाले, 'काय गं पोरी कशी हायेस? जावईबापू दिसत न्हाईत ते?'. 'काका मी मजेत आहे, यांना जरा महत्वाच्या कामासाठी परगावी जावं लागलं म्हणून आले नाहीत. त्यांचं काम झालं कि मला न्यायला येणार आहेत चार दिवसांनी', स्वातीने एका दमात सांगून टाकले. तितक्यात रमा दिसली, अन स्वातीने हातानेच खुण करून तिला बोलावून घेतले. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणींनी मिठीच मारली एकमेकींना. आणि मग आप्पा काकांचा निरोप घेवून दोघी घरच्या वाटेला लागल्या. रमा नुकतीच शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. तशा दोघी अगदी बालमैत्रिणी. शाळा, कॉलेज एकत्रच झालं दोघींचं.

गाडीत बसताच रमाने तिची फिरकी घ्यायला सुरुवात केली, 'हम्म....काय मग डॉक्टरीणबाई, काय म्हणतोय तुमचा नवीन संसार? मज्जा आहे बुवा एका माणसाची, गाडी, बंगला, डॉक्टर नवरा...', असे म्हणत तिने हळूच कोपरखळी मारली. स्वाती लाजेने अगदी गोरी मोरी झाली, अन लटक्या रागाने रमाकडे पाहू लागली. रमा पुढे म्हणाली, 'स्वाती! खूप खुश आहे मी, अगदी मनासारखं सासर मिळालं बघ तुला, अशीच आनंदात रहा'. स्वाती पुढे काहीतरी बोलणार इतक्यात गाडी वाड्याच्या अंगणात येऊन थांबली आणि पोरांनी 'ताई आली, ताई आली' असा कल्ला करत गाडीला गराडा घातला.

स्वाती गाडीतून उतरते न उतरते तोच पोरांनी तिला ओढतच घरात नेलं. सख्खी आणि चुलत भावंडं मिळून जवळ जवळ अर्धा डझन पोरांनी एकमेकांच्या तक्रारी सांगून तिला भंडावून सोडलं. चहाचा कप स्वातीच्या हातात देत आईने विचारपूस केली, 'कशी आहेस बाळ? सासू, सासरे, दीर, जावईबापू बरे वागतात ना? सगळं तुझ्या मनासारखं आहे ना? नाही, परवा फोनवर म्हणालीस सगळं उत्तम आहे, पण एकदा खात्री करून घ्यावी म्हणून विचारलं परत'. आईची माया अन काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती. तिचा हात हातात घेत स्वाती म्हणाली, 'आई काही काळजी करू नको, सगळं अगदी छान आहे. सासूबाई आहेत जरा जुन्या विचारांच्या, पण हे मला खूप जपतात.'

'अगं सासूच ती, सासू सासुरवास करेल नाहीतर कोण गं', असं म्हणत आजी घरात आली अन एकच हशा पिकला. हळूहळू बाबा, काका, काकू सगळे जमा झाले अन गप्पांना ऊत आला. सगळ्यांना तिच्याशी काय बोलू आणि काय नको असे झाले होते. गप्पा झाल्यावर, स्वाती आणि रमाला उद्देशून आजी म्हणाली, 'जा गं पोरींनो, हात पाय धुवा आणि देवळात जाऊन या, लग्नानंतर पहिल्यांदाच आलीये पोर माहेरी, देवाचं दर्शन घेऊन या. पण दिवे लागणीच्या आत माघारी फिरा. 'रमे', हळदीच्या अंगानं हाय पोर, अंधार पडायच्या आत घरी या'.

'स्वाती, गाडी नको चालतच जाऊ दोघी', रमा बोलली आणि स्वातीनेही होकारार्थी मान डोलावली. रस्त्यात भेटलेल्या लोकांनी नव्या नवरीची विचारपूस केली. काही लोकांनी जावईबापू आले कि चहापानाला येऊन जाण्याचा आग्रह केला. गप्पा टप्पा करत, एकमेकींना चिडवत, आणि रस्त्यात जे ओळखीचे भेटतील त्यांची विचारपूस करत दोघी देवळात पोहोचल्या.

दर्शन झालं. दोघी बाहेर आल्या. नेहमीप्रमाणे स्वाती धावली, अंगणातल्या चाफ्याकडे. पण यावेळी तिने ओंजळ भरली, ती चाफ्याच्या बुडाशी असलेल्या मोगऱ्याच्या फुलांनी. ओंजळ नाकाजवळ नेत पोटभर वास घेतला. पाहिजे ती वस्तू मिळाल्यावर लहान मुलांना जो आनंद होतो तोच आनंद तिला झाला होता. 'लहानपणापासून मोगराच आवडतो ना गं तुला? पण 'त्या'ला आवडायचा म्हणून तूही, उगाचच चाफा आवडतो म्हणायचीस'. रमा बोलली, तशी एवढावेळ ओंजळीत खुपसलेलं तोंड वर काढत स्वाती पुटपुटली, 'त्याची आवड तीच माझी आवड, असं समजून उगाचच चालत राहिले त्याच्याबरोबर, माझ्या नसलेल्या वाटेवर. त्याला मनोमन माहित होता त्याचा मार्ग, एका सुंदर वळणावर त्याने तो निवडला आणि निरोप घेतला. मी मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले.........'शिरीष' नावाचा मोगरा फुलला आणि जीवनच बदलून गेलं. आता मला माझ्या आवडीनिवडी बदलाव्या लागत नाहीत, कि कुठल्याही वळणावर तो मला एकटीला सोडेल अशी भीतीही नाही'.
शिरिष बद्दलचं अतीव प्रेम आणि त्याच्याशी लग्न झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. मोगरा आज जरा जास्तच दरवळत होता....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे! आम्हाला अकरावीत मराठीला अरविंद गोखल्यांची ' कातरवेळ' नावाची कथा होती तिची आठवण झाली. त्यात मुलगी अशीच माहेरी येते आणि पूर्ण दिवस आनंदाच्या हिंदोळ्यावर घालवल्यानंतर तिला कातरवेळी मात्र सरसरून ' त्या' ची आठवण येते असा शेवट होता. तुम्ही​ही छानच लिहिले आहे​!

मस्त

छान लिहिली आहे! आम्हाला अकरावीत मराठीला अरविंद गोखल्यांची ' कातरवेळ' नावाची कथा होती तिची आठवण झाली. त्यात मुलगी अशीच माहेरी येते आणि पूर्ण दिवस आनंदाच्या हिंदोळ्यावर घालवल्यानंतर तिला कातरवेळी मात्र सरसरून ' त्या' ची आठवण येते असा शेवट होता. तुम्ही​ही छानच लिहिले आहे​!>>अगदी बरोबर ..खरच मला सुद्धा 'कातरवेळ' कथा च आठवली..कातरवेळी होणारी जीवाची घालमेल अचूक मांडलेली त्या कथेत ..

छान लिहिली आहे! आवडली. Happy

आम्हाला अकरावीत मराठीला अरविंद गोखल्यांची ' कातरवेळ' नावाची कथा होती तिची आठवण झाली. >>+१