देशपांडे आमचे वडील!

Submitted by अदित्य श्रीपद on 1 April, 2017 - 00:20

देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते (म्हणजे आमचे पूर्वज कोरडे) सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी शिवाजी महाराजांनी म्हणे त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो. त्यामुळे भारावून जाऊन वडलांनी स्वतःचे आडनाव परत कोरडे केले.( आता खरेतर ह्या लॉजिक नुसार शिवाजी महाराजांनी दिलेले वतन जे आता नाही राहिले त्याचे निशाणी म्हणून देशपांडे हे नाव अभिमानाने मिरवायला हवे होते ...असो ) मला हे भिकारडे कोरडे आडनाव अजिबात आवडले नव्हते आजही आवडत नाही पण मी तेव्हा लहान होतो. आणि माझ मत कुणी विचारलं नाही, माझ्या आईचाही नाव बदलण्याला विरोध होत पण तो म्हणजे असली काम नीट पूर्ण होत नाहित काहीतरी कुठे तरी राहते अन मग ऐन वेळेला त्यामुळे महत्वाची कामं अडतात असा technical कारणासाठी होता जो आजही खरा आहे-म्हणूनच आवडत नसूनही मी माझ आड नाव परत देशपांडे केलं नहि.पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे अजूनही त्यांचा उल्लेख मी देशपांडे असाच करतो. - आपला एक छोटासा सूड म्हणा हवा तर याला …पण ते एक असो!)
तर हे देशपांडे संघाचे कट्टर कार्यकर्ते. (मी काही संघ समर्थक/ स्वयंसेवक वगैरे नाहीये). आम्ही लक्ष्मिनगरला राहता असताना देशपांड्यांनी घराच्या गेट वर विश्व हिंदू परिषदेच्या मुखपत्रावर असतो तसा मोठाला ॐ लावला होता. आता लक्ष्मिनगरच ते, तिथले लोक काय कमी टारगट होते काय! त्यातून तो भाग दलित पंथर , R.P.I. अशा संघटनांचा प्रभाव असलेला. मग काय विचारता राव! एके दिवशी सकाळी सकाळी ( सोमवार असावा ) त्या ॐ ला हाडकांची माळ घातलेली, आणि ती पण बोकड किंवा कोंबडी नाही चांगली बैलाच्या किंवा गाईच्या मटणाची ( म्हणजे मला आपल साईज वरून वाटलं, केव्हढ मोठ एक एक हाड! आणि त्याची भोक एवढी मोठी होती कि त्यात दोरी नाही तर चांगली सुतळी ओवून पक्की माळ तयार केली होती सहज तोडता येऊ नये अशी. ) झालं , ते पाहून मातोश्रींचा फ्युज उडाला, आता रात्री कधीतरी जागून केलेल्या कष्टाच चीज होणार, तमाशा, गम्मत बघायला मिळणार या आशेने आसपासचे लोक लगेच आवंतण दिल्यासारखे गोळा होऊ लागले पण देशपांडे हुशार, त्यांनी शांतपणे माळ काढली , त्यातली हाडकं सोडवली आणि पिंटूला( आमचा कुत्रा) खायला त्याच्या ताटलीत वाढली. पिंट्याहि वस्ताद, बामणाच्या घरचं कुत्र ते,ते फुकट मिळाले मटाण सोडतय काय ? सकाळी सकाळी तिथे त्या ॐ च्याच खाली एक मोठ हाडूक तोंडात घेऊन जी समाधी लावली म्हणता ? देशपांडे अगदी सद्गदिद(!)होऊन तमाशा बघायला आलेल्यांना म्हणाले तुम्ही होता म्हणून पिंट्याला असं चांगलं चुंगलं खायला मिळतं नाहीतर आम्ही कुठे बडेका माल खरेदी करायला जाणार? आणि आम्हाला देतील तरी का ? एक काम कर शिवा ( हा उद्योग त्याचाच असा देशपांड्यांचा कयास होता )पुढच्या वेळे पासून अर्धा किलो पिंट्य़ा करता वेगळ घेऊन येत जा त्याचे ८ रु आधीच घेउन जा हो! ( म्हणजे १६ रु किलो बड्य़ाच मटण तेव्हा होत, हे देशपांड्यांना माहित होतं तर …अरे वा !) असो....
आज जर असा काही घडल तर दंगेच पेटायचे , पण नाही पेटणार कदाचित आमच्या देश्पाण्ड्य़ा सारखे डोकं ठिकाणावर आणि त्या डोक्यात पुरेशी विनोद बुद्धी आणि लहान सहन गोष्टीवरून दुखावली न जाणारी भावना असेल तर ….
आमचे देशपांडे बोलायला फार खडूस होते. खरं तर आई जास्त तिरकस बोलायची पण देशपांडे कधी हि भीड न ठेवता समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलत , आई तस करत नसे आणि कधी बोललीच तर ज्याला उद्देशून ती बोलली आहे त्याला हि त्यातली खोच पटकन लक्षात येत नसे आणि त्याला लगेच प्रत्युत्तर देणे तर अजिबात जमत नसे. पण दोघाही समोरच्याचा किमान शब्दात कमाल पाणउतारा करत.
माझ्या आत्याशी देशपांड्यांच अजिबात जमत नसे. मला आठवत कि एकदा ती घरी आलेली असताना पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या आणि मला आवडायच म्हणून नुसत वाटलेलं पुरण वेगळ काढून ठेवलं होतं. मी ते अगदी पुरवून पुरवून २-३ दिवस खात असे. आम्हा मुलांची जेवणं आधीच झाली होती आणि उरलेलं पुरण टेबलावर वाटीत तसच होतं आत्याला वाटल ते उरलच आहे, ती म्हणाली हे पुरण जर वाया जाणार असेल तर ते मी घेते, या वर एका क्षणाचा विलंब न लावता देशपांडे म्हणाले, “म्हणजे वायाच कि!”
देशपांडे आणि त्यांचा बँकेतला एक मित्र देवधर म्हणून होता. त्या दोघांनी एकदा कसली तरी बँकेतली परीक्षा दिली होती आणि ती ते दोघही पास झाले. म्हणून त्या देवधरच्या सांगण्याप्रमाणे देशपांड्यांनी एका रविवारी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आमच्या घरी मेजवानीलं बोलावले.त्याप्रमाणे ते देवधर काका, देवधरिणबाई आणि त्यांची मुलगी आरती आणि मुलगा सुजय एका रविवारी घरी आले. आता तो देवधर, पक्का कोकणस्थ त्यामुळे जेवायला मटण रस्सा, सुकं मटण, त्यांच्या पोरांना नळी फोडायला जमेल न जमेल शिवाय देवधर काकू मटण खात नाहीत( का? ह्या प्रश्नच उत्तर मला अजून मिळालेलं नाही) म्हणून चिकन, वर आणि तोंडी लावायला कोलंबी फ्राय( हो! त्यात काटे नसतात म्हणून) भाकरी, पुलाव वगैरे बेत होता. आता आम्ही जातीने वडलांकडून ब्राह्मण पण आई जातिवंत(?) पाठारे प्रभू – तिला मटण आणि मासे एकदम प्रिय. देशपांडे नास्तिक असण्याचा फायदा तिला सगळ्यात जास्त झाला.(आता माझ्या बायकोला होतो...आम्ही कोरडे- देशपांडे असेच, स्वतःच्या बायकोला फायदा मिळावा म्हणून असे कायम त्याग करतो...असो! )लग्नानंतर श्रावण,चतुर्थी, एकादशी गुरुवार कशशाकशाचा म्हणून तिला अडथळा उरला नाही, तिच्या माहेरी म्हणजे माझ्या मामाकडे ह्या गोष्टी अगदी काटेकोर पणे पाळल्या जात.म्हणजे श्रावणाचा अक्खा महिना मासे खायचे नाहीत. आता हे जरा अवघड व्हायचं म्हणून जेवताना शेगडीवर सुक्या बोम्बलाचा तुकडा जाळायचा आणि अख्ख घर त्या वासानं घमघमलं कि त्यासावर मेथीची भाजी नाहीतर शेपूची भाजी खायची असे आमचे आजोबा कट्टर(?)... तर ते एक असो, देवधरांनी जेवणावर चांगला अडवा हात मारल्यावर अगदी तुंदिल तनु झाल्यावर देशपांडे देवधरकाकूंना म्हणाले, “ वाहिनी आता पुढच्या रविवारी तुमच्याकडे अशीच पार्टी करूयात , काय म्हणताय , तुमचा नवरा हि परीक्षा पास झालाच आहे कि.“ त्यावर देवधर काकू म्हणाल्या, ”छे हो आम्हाला कुठे तुमच्या बायकोसारख मटण चिकन करायला जमणार? आमच्या घरी तर अंडही फुटलेलं चालत नाही. आणि आम्हाला हे मटण मासे करायला जमत हि नाही.” झालं देशपांड्यांचा फ्युज उडायाला एव्हढ पुरेसं होतं. म्हणजे एक तर माझ्या आई वडिलांचा आंतर जातीय विवाह, आई ब्राह्मण नाही ह्याची हेटाळणी आणि मटण मासे घरात शिजवण हि काही फार चांगली गोष्ट नाही(बाहेर, लोकांच्या घरी जाऊन खाण्याला काही हरकत नसावी बहुधा) असा एक सूर त्यात होता. (अर्थात हे मला नंतर कळलं)देशपांडे लगेच म्हणाले ,” त्यात काय एव्हढं! मटण, मासे करायला येत नसेल तर बासुंदी करा त्याला काही अक्कल लागत नाही.”
देवधर गेल्यावर आईने बाबांची अशी झाडी केली म्हणता पण ती देवधरांकडची बासुंदी पार्टी अजूनही झाली नाही.
--आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच होते देशपांडे..लिहिलं पन छान्च.. तेवढे पॅराग्राफ देता का? सलग वाचणे अवघड जाते... मजा येत नाही वाचताना...

हाहा भारी किस्से आहेत...
ते बासुण्दीचा तर.. त्याला काही अक्कल लागत नाही.. विचार करूनच हसायला आले Happy

असतील तर येऊद्या अजून ...

पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे >>> खरोखर खुप छान वाटले घरातील एवढे मस्त निकोप आणि हल्के फुल्के वातावरण अनुभवायला.

आवडलं. पाहुण्यांचा किस्साही छानच. अनेकदा अनुभव घेतलेला आहे अशा खवचट बोलण्याचा. दुसर्‍यांसाठी अगत्य करायची दानत आणि व्रुत्ती दोन्ही नसली की लोकं असे दुसर्‍याच्या पाहुणचारावर रिअ‍ॅक्ट होतात. >>देवधरांकडची बासुंदी पार्टी अजूनही झाली नाही-- हो आम्हीही अशा अनेक बासुंदी पार्ट्यांची वाट बघतोय Happy

पण पुढे मी बाबांना ओ ,देशपांडे! अशीच हाक मारत असे>> या वरुन दक्षिने इथं टाकलेला तिच्या बाबांवरचा वर्ल्ड फेमस लेख आठवला..

देवधरांकडची बासुंदी पार्टी अजूनही झाली नाही-- हो आम्हीही अशा अनेक बासुंदी पार्ट्यांची वाट बघतोय << आमच्याकडेही .. आता विचार केला तर त्या पार्ट्या का झाल्या नाहीत हे लक्श्यात आलं. Lol