तळवलकर - श्री. मुकेश माचकर

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

लहानपणी पेपर वाचायला मिळायचा गल्लीतल्या सार्वजनिक वाचनालयात. ते घराच्या सरळ रेषेत रस्त्यापलीकडेच होतं. त्याच्या आठ कप्प्यांमध्ये पेपर लागले की, लगेच धावत रस्ता पार करून त्यांच्यावर झडप घालायचो. पण, त्या काही सेकंदांमध्येही तिथे ठिय्या मारूनच बसलेले अधीर आणि ज्येष्ठ पेपरवाचक मिळेल त्या पेपरवर कब्जा करायचे. त्या मारामारीतही आरामात हाताला लागायचा तो महाराष्ट्र टाइम्स अर्थात मटा. प्रभातमधल्या सिनेमाच्या उत्तान जाहिराती, भविष्य, केसरीचे अग्रलेख, सकाळच्या इत्थंभूत बातम्या, बाजारभाव, लोकसत्तेतल्या मुंबईच्या बातम्या, पुढारी, ऐक्य वगैरेंचे प्रादेशिक संदर्भ यांना त्या गरीब-निम्न मध्यमवर्गीय वस्तीत जास्त भाव होता. या वाचकांना उच्चभ्रू ‘मटा’ फारसा अपील व्हायचा नाही. जरा जडच पडायचा. म्हणून तो मला सहज मिळायचा. मी वाचून काढायचो. नंतर त्याची गोडीच लागली.

मग लक्षात आलं की इथे हा पेपर हातात घेणारे मोजकेच लोक जरा खास आहेत… त्यांची मतं, त्यांची वैचारिक घडण, त्यांची जगदुनियेची समज अन्य मंडळींपेक्षा वेगळी आहे… आणि ती घडण्यात ‘मटा’चा मोठा वाटा आहे… आपलीही समज आणि दृष्टी घडवण्यात या वर्तमानपत्राचा हातभार लागू लागलाय, हे लक्षात यायला लागलं…

गोविंदराव तळवलकरांशी ही पहिली अप्रत्यक्ष ओळख…

****

पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेईपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं… त्यातून ‘मटा’प्रेम मात्र तुकारामाच्या गाथेसारखं तगून राहिलं होतं, उलट, बहरून आलं होतं… ‘मटा’ हा एक पंथ बनला होता आणि माझ्यासारखे वाचक त्या पंथाचे कट्टर अनुयायी बनले होते. गोविंदरावांच्या लेखणीच्या फटकाऱ्यांपुढे महाराष्ट्राचे सत्ताधारी चळचळा कापतात, असं आम्हा वाचकांना वाटायचं. लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाच्या शैलीचा एक आविष्कार तळवलकरांच्या लिखाणात होता. ते शेलके शब्द अचूक वापरायचे. जुने चपखल शब्द आणि शोधून काढायचे. रमणा, सहस्त्रभोजन अशी चंगळ असलेल्या अग्रलेखाच्या शीर्षकावरच आम्ही फिदा असायचो. ही शीर्षकं नंतर काही काळ भाषाव्यवहारात चलनी नाण्यांसारखी वापरली जायची. काही शब्द तर तळवलकरांमुळे विशिष्ट संदर्भांनी नंतर बरीच वर्षं वापरले गेले असतील. जन्मजात पुणेकर असल्यामुळे त्यांच्या लेखणीतून प्रकट होणारा तुच्छतावाद समजणं कठीण गेलं नाही. त्याच्याशी आंतरिक नाळही जुळायची. तुच्छता आणि आढ्यता म्हणजेच तळवलकरांची परंपरा असल्याचा, त्या काळात तरुण असलेल्या आणि नंतर पत्रकार बनलेल्या अनेकांचा गैरसमज झाला, त्यात काही आश्चर्य नव्हतं. महाराष्ट्रातले सगळ्या क्षेत्रांमधले झाडून सगळे मान्यवर मटामध्ये लिहीत होते. त्यामुळे नंतर नंतर मटामध्ये ज्याला स्थान नाही, त्याला जगात काहीच किंमत नाही, अशी भावना होऊ लागली. अभिजात काय, उच्च अभिरुचीचं काय, सामाजिक बाबतीत करेक्ट भूमिका काय, विद्वत्ता कशाला म्हणायचं इथपासून ते उत्तम नाटक कोणतं, बघणेबल सिनेमा कोणता इथपर्यंत (श्रेय कमलाकर नाडकर्णींचं) आणि कालच्या टेस्टमध्ये सुनीलकडून (गावसकर हो) नेमकी काय चूक झाली ते विविकंकडूनच (वि. वि. करमरकर) समजून घ्यायचं असतं, अशी शिस्त लागली. ‘मटा’च्या संवेदनपरिघापलीकडे बरंच काही आहे, याची जाणीव झाली, तेव्हा ‘मटा’चा मठ उद्ध्वस्त होऊन तिथे माहितीमॉल उभा राहिला होता आणि त्यातल्या काही चकचकीत विटा लावण्याचं ‘भाग्य’ही लाभलं आमच्यातल्या काहीजणांना. पण, ते एक असो.

तळवलकरांनी वाचस्पती बनून अनेक पुस्तकांचा परिचय करून दिला. ती सगळी वाचणं शक्य नव्हतंच; पण, त्यांचं सार काय आहे, हे कळू लागलं, लेखकांची नावं समजू लागली. मित्रपरिवारात चर्चेत संदर्भ देता येऊ लागले. समोरचा माणूसही मूळ पुस्तक न वाचता आपल्याप्रमाणेच तळवलकरांचा कॉलम वाचूनच संदर्भ देतोय, हे समजू लागलं. काखेत दोन पुस्तकं घेऊन फिरणाऱ्या आणि तीन-चार विदेशी लेखकांची नावं बोलण्यात सुयोग्य रीतीने गोवणाऱ्या माणसांविषयी आदर वाटण्याचा तो काळ होता. ती पुस्तकं त्याने वाचलेली असण्याची गरज नव्हती. वाचस्पती लयाला गेल्यानंतरही ही परंपरा कायम राहिली, हे विशेष.

****

रानडे इन्स्टिट्यूटमधल्या आमच्या-आमच्यातल्या ‘चहा-बिडी’ चर्चांमध्ये गोविंद तळवलकर विरुद्ध माधव गडकरी या संपादकांमध्ये आम्हीच काल्पनिक लढाई जुंपून द्यायचो. संपादक लोकाभिमुख असावा की हस्तिदंती मनोऱ्यातला असावा, याभोवती सहसा ती भिरभिरत असे. आम्ही आयव्हरी टॉवरवाल्या गोविंदरावांचे शिपाई आणि अनुयायी होतो. अभिजीत ताम्हणे तर जहाल‘मटा’वादी होता. अनेक वर्षांचे मटाचे अंक त्याने जपून ठेवले होते, त्यातले अनेक संदर्भ त्याला तोंडपाठ असायचे. तळवलकर आणि माधव गडकरी यांच्या एकाच विषयांवरच्या अग्रलेखांचा तौलनिक अभ्यास असा काहीतरी विषय त्याने त्याच्या डेझर्टेशनसाठी घेतला होता… त्याचा निष्कर्ष अभ्यासाआधीच निघालेला असणार हे आम्हाला माहिती होतं; तो निष्कर्ष काय असणार, हेही आम्हाला माहिती होतं आणि त्याच्याप्रमाणे तौलनिक अभ्यास न करताही आमचा निष्कर्ष तोच होता… गोविंदराव हे माधवरावांपेक्षा भारी आहेत… विषय संपला!

अभिजीतला रानडेचा ‘मटा’धीश असं नाव उगाच नव्हतं मिळालं.

****

रानडे इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत ताम्हणेने सहा महिन्यांतच मटात प्रवेश मिळवला आणि त्याने प्रवेशपरीक्षेची खबर दिल्यानंतर ती देऊन वर्षभरात मीही केसरी सोडून मटामध्ये दाखल झालो.

पत्रकारितेतल्या संपादक-सिंहाच्या गुहेत प्रवेश झाला. चंद्रशेखर कुलकर्णी, प्रवीण टोकेकर, समीर मणियार, श्रीकांत पाटील, प्रभाकर नारकर, रोहित चंदावरकर, सारंग दर्शने, संजय ढवळीकर, रोहित चंदावरकर, आशा मटाले, मृण्मयी रानडे, दिलीप आठवले, राजेंद्र फडके, इब्राहीम अफगाण… आम्हा सगळ्यांना मटाबद्दल प्रेम होतं, आदर होता, गोविंदरावांबद्दल तर नितांत आदर होता. पण, त्यांची भीती किंवा दरारा वाटत नव्हता. आमच्या आधीच्या पिढीपर्यंतच्या त्यांच्या दराऱ्याला आणि शिस्तीच्या परीटघडीला आमच्या हसण्याखिदळण्याने आणि हिरीरीच्या वादविवादांनी तडे जाऊ लागले होते. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर जुन्या सहकाऱ्यांइतकी तळवलकरांनी कधी त्याबद्दल खळखळ केली नाही.

आधीचे तळवलकर असते तर तुमची काही खैर नव्हती. तुम्ही त्यांचं फारच मवाळ रूप पाहताहात, असं सगळे वरिष्ठ आलटून पालटून सांगत असत.

तरीही, तळवलकरांशी आमच्यापैकी बहुतेकांचं वन टु वन नातं काही जुळलं नाही. तो त्यांचा स्वभाव नव्हता. मितभाषी हा शब्दही मोठा वाटावा, इतकं कमी बोलण्याकडे त्यांचा कल होता… निदान आमच्यात तरी. त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करण्याची संधीच मिळणं कठीण होतं. संपादकीय बैठका किंवा अन्य कारणांनी त्या थंडगार गुहेत अवचित प्रवेश करायला मिळालेला उपसंपादक किंवा कनिष्ठ वार्ताहर नंतर दोन-पाच दिवस ती रोमांचकारक घटना सगळ्यांना सांगत फिरे. कदाचित तारेने घरीही कळवत असेल. मटामध्ये बातमी छापून आली असती, तरी आश्चर्य वाटू नये, इतकी ती दुर्मीळ घटना होती.

तळवलकर मुळात ऑफिसातल्या अनेकांना ओळखतच नसत. बोलणं तर दूरच. एकदा म्हणे त्यांनी वृत्तसंपादक शिवाजी सावंतांना असं सांगितलं की, त्यांच्या केबिनसमोरच्या पेपरच्या रॅकसमोर एक उंच मुलगा रोज येऊन पेपर वाचत असतो. त्याला हटका. शिवाजीराव म्हणाले, ‘अहो, तो रोहित चंदावरकर आहे, भास्कररावांचा मुलगा. आपल्याकडे उपसंपादक आहे तो.’

तळवलकरांच्या केबिनमध्ये जाण्याच्या वरची पायरी म्हणजे तळवलकरांनी दोन शब्द आपल्याशी बोलणं. ते ‘हं’ आणि ‘हँ’ याच्यापलीकडे गरज नसल्यास फारसं बोलायचे नाहीत. जे बोलायचे, ते पुटपुटल्यासारखं. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा सराव नसलेल्यांना ते समजायचं नाही. शिवाय शब्दांचा व्यय त्यांना अजिबात चालायचा नाही.

रोज रात्री विशिष्ट वेळेला ते घरून डेस्कवर फोन करत. त्या वेळच्या चीफसबकडून बातम्या काय आहेत, पानात काय चाललंय, पहिलं पान काय करणार वगैरे माहिती घेत. एकदा चीफसब पान लावायला आत गेले होते. फोन मी घेतला. ते म्हणाले, ‘तळवलकर’. मी म्हणालो, ‘ते आता नसतात. ते पाच वाजताच घरी जातात.’ ते म्हणाले, ‘मी तळवलकर बोलतोय…’ मग मला पळता भुई थोडी झाली!

एकदा मुंबई महानगरपालिकेत आलेल्या एका ब्रिटिश तज्ज्ञाच्या व्याख्यानाच्या रिपोर्टिंगला मला पाठवलं गेलं. त्यांना त्या तज्ज्ञाविषयी माहिती आणि जिव्हाळा होता. त्यामुळे त्या बातमीवर त्यांचं खास लक्ष होतं. माझा एक ज्येष्ठ सहकारी व्याख्यान ऐकायला म्हणून सोबत आला आणि त्याने आल्यावर बातमी लिहून दिली. मी मुख्य वार्ताहरांना सांगितलं, बातमी कव्हर करायला मी गेलो होतो, तर माझ्याकडून बातमी घ्यायला हवी. आम्हा दोघांचे इन्ट्रो वेगवेगळे होते. प्रकरण तळवलकरांकडे गेलं. त्यांनी ‘हे निगेल काय असतं, नायजेल करा’ अशी सूचना केली आणि वरिष्ठ सहकाऱ्याच्या बातमीला ज्येष्ठत्वाचा मान दिला.

दुसऱ्या दिवशी एडिट मीटिंगमधून बाहेर आल्यावर मुख्य वार्ताहर प्रकाश अकोलकर मला म्हणाले, ‘इतर वर्तमानपत्रांमधल्या बातम्या वाचल्यानंतर तळवलकर म्हणाले, माचकरची बातमी बरोबर होती. ती वापरायला हवी होती. तोच इन्ट्रो योग्य होता. आपलं चुकलं.’

ही गोष्ट मी तारेने घरी कळवली असणार, हे सांगायला नकोच.

****

प्रकाश अकोलकरांनी मला रिपोर्टिंगला ओढलं आणि वेगवेगळ्या बीट्सवर माझी ट्रायल सुरू झाली. मी माहौल टिपण्यात आणि तो शैलीदार भाषेत लिहिण्यात पटाईत होतो. अशा साइड स्टोरीज किंवा बॉक्समधल्या क्षणचित्रांसाठी योगेश हा फॉन्ट वापरला जायचा. माझ्याकडून अशा इतक्या बातम्या जायच्या की, माझं नाव योगेश माचकर ठेवा, अशी सूचना यायला लागली. एकदा दत्ता सामंतांनी तिसऱ्या आघाडीचा मोर्चा काढला दादर ते सम्राट हॉटेल, चर्चगेट. अकोलकरांनी मला पाठवलं. मोर्चा कसा कव्हर करतात, याची मला कल्पना नव्हती. मी मोर्चाबरोबर सगळं अंतर चाललो. मोर्चाएवढीच लांबलचक बातमी लिहिली. ती पहिल्या पानावरून आत दणक्यात छापून आली.

तळवलकरांनी दुसऱ्या दिवशी नाराजी व्यक्त केली त्यांच्या बैठकीत. उडाणटप्पू असलेल्या तिसऱ्या आघाडीतल्या गणंगांना इतकं महत्त्व देण्याचं काय कारण होतं, असा त्यांचा प्रश्न होता. अकोलकर म्हणाले, ‘अहो, आपल्याकडचा एक रिपोर्टर अख्खा मोर्चा चालला. त्याने फक्कड लिहिलंय वाचलंत का?’ दुपारी साक्षात दिनू रणदिवेंनी फोन करून बातमीचं कौतुक केल्यावर ताबूत थंडे झाले असावेत.

जयवंत दळवींचा अखेरचा सत्कार, हा खरं तर तळवलकरांच्याही जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला तब्येतीची साथ नसताना पु. ल. देशपांडे पुण्याहून बोरिवलीला आले होते. बोरिवलीच्या एका शाळेच्या भरून ओसंडून गेलेल्या हॉलमध्ये सुरेख सोहळा झाला. वार्तांकनाला योगेश माचकर होते. बातमी पहिल्या पानावर फोटोसह सेकंड लीड लागली. तळवलकर दळवींचे मित्र असूनही म्हणाले, ‘बापरे, फारच मोठी लावलीत बातमी.’

पुढच्या दहा-पंधरा दिवसांत दळवी निवर्तले आणि तो त्यांचा अखेरचा सत्कार ठरला. तेव्हा मटाच्या समयोचिततेचं कौतुक झालं.

****

तळवलकर हे त्यांच्या धाटणीचे शेवटचे संपादक होते.

आजच्या काळात असा संपादक वस्तुसंग्रहालयातही पाहायला मिळणार नाही.

वर्तमानपत्राच्या तंत्राशी त्यांचा किती संबंध होता, याची कल्पना आम्हा ज्युनियर मंडळींना कधी आली नाही. तो फारसा नसावा, असा संशय घ्यायला मात्र वाव आहे. त्याची त्यांच्या काळात गरजही नव्हती. तेव्हा टीव्हीच मर्यादित होता. बातम्या आणि विचार देण्याची जबाबदारी सर्वस्वी वर्तमानपत्रांवरच होती. संपादकीय कामकाजात अन्य विभागांचा हस्तक्षेप नव्हता; शिवाय झालाच तर त्याला हस्तक्षेप म्हणण्याची मुभाही होती. मटाच्या ऑफिसच्या दाराशी असलेल्या केबिनमध्ये ब्रँड मॅनेजर सुधाकर श्रोत्री बसायचे. ते फारच कमी वेळा तळवलकरांच्या केबिनमध्ये जायचे. तेही अदबीने. संपादकापेक्षा मोठ्या केबिनमध्ये बसलेले ब्रँड मॅनेजर संपादकांना सोयीनुसार चर्चेला बोलावून घेत आहेत आणि त्यांना एकतर्फी सूचना देत आहेत, हे चित्र त्या कार्यालयाने पाहिलं ते खूप नंतर. सर्क्युलेशन वगैरे विभागांचे लोक तर त्यांना भेटणं टाळायचेच. टाइम्सच्या व्यवस्थापनामध्ये तोवर संपादकीय विभाग हा प्रमुख विभाग मानण्याची आणि त्याचा आदर वगैरे करण्याची जुनाट परंपरा होती. त्यामुळे तळवलकरांना त्या पातळीवरही सन्मानाची वागणूक मिळत गेली. ‘मटा’च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच दि. वि. गोखल्यांच्या नेतृत्वाखाली पेपरची अप्रतिम घडी बसली होती. मुंबईच्या वर्तमानपत्रांच्या जगातले कसदार आणि नाणावलेले पत्रकारच वेचून मटामध्ये आणले गेले होते. जे जे अव्वल ते ते मटामध्ये आपसूक यायचं. प्रवेशपरीक्षेतून तावून सुलाखून आलेले उपसंपादक आणि वार्ताहर आपल्या कामात तरबेज असायचे. इतर वर्तमानपत्रांच्या मानाने उपसंपादकांनाही मटामध्ये फारच कमी काम पडायचं. पण, जे करायचं ते अतिशय उत्तम दर्जाचंच करायला लागायचं. उरलेल्या वेळात चर्चा करण्यायोग्य माणसं आसपास असायची, पुस्तकं असायची, वातावरणाला अभ्यासूपणाचा स्पर्श होता. आवडीच्या विषयांवर व्यासंग करण्याची सोय होती. अन्य विभागांशी समन्वयाची जबाबदारी घेतलेली सक्षम माणसं होती. त्यामुळे, तळवलकरांचा दैनंदिन कामकाजातल्या व्यावहारिक आणि तांत्रिक अंगांशी काहीच संबंध नसायचा. ते संस्कारांनी ब्रिटिश आणि रहिवास ढांगेजवळच्या राममहलमध्ये असल्यामुळे सकाळी विशिष्ट वेळी बिनचूक ऑफिसमध्ये हजर होत. पुस्तक वाचू लागत. मग ठरल्या वेळी इतर सहकाऱ्यांबरोबर बैठक व्हायची, दिवसभरातल्या विषयांची चर्चा व्हायची. ‘अग्रलेख’ आणि ‘धावते जग’ या सदराचे विषय ठरायचे, लेखक ठरायचे, ते पुन्हा वाचनात मग्न. मग ठरल्या वेळी लंच. पुन्हा आल्यावर वाचन. अग्रलेखाचं लेखन किंवा नंतरच्या काळात एका बोटाने टायपिंग. (त्यांची बोटं भलतीच जाड होती. त्यामुळे कीबोर्डवर अमुकशेजारी तमुक अक्षर असतं आणि तळवलकरांच्या बोटांनी याऐवजी ते अक्षर दाबलं गेलं असतं, तर काय घोळ होऊ शकला असता, याचं चावट उदाहरण अभिजीत द्यायचा. ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंही असावं.) त्यानंतर ते पुन्हा वाचत बसायचे. संध्याकाळी बैठक झाल्यावर न्यूजरूममधून पेस्टअपचं काम चाललेलं असायचं तिथपर्यंत एक फेरी मारायचे. हात मागे बांधलेले असायचे, जाड बोटं तालात हलत असायची. संपला विषय. पाचनंतर ते घरी रवाना व्हायचे.

हे सुख इतर संपादकांना लाभलं नाही.

****

ऑफिसात तळवलकरांची वाचनतंद्री सहसा कोणी भंग करत नसे.

एकदा संजय दत्तच्या देशद्रोहाच्या प्रकरणात सिनेमासृष्टीचं निवेदन घेऊन आमीर खान आणि अनुपम खेर आले होते (हो अनुपम खेरच!). सगळी टाइम्स बिल्डिंग त्यांच्यामागे गोळा झाली होती. ते जिथे जात तिथे त्यांच्यामागून पाच-पन्नासजण फिरत होते. आमच्या ऑफिसमध्ये ते आले तेव्हा काचेला दीड-दोनशे डोळे लागले होते. आमीर-अनुपम शिवाजीरावांकडे गेले, संपादक कुठे बसतात, ते विचारायला. शिवाजीरावांनी त्यांना सांगितलं, ‘जे काही असेल ते माझ्याकडे द्या. मी त्यांच्याकडे देतो.’ हे हटून बसले. आम्ही त्यांनाच भेटणार. म्हणाले, ‘जा मग.’ हे गेले. दारावर टकटक करून आत गेले. आम्ही उत्सुकतेने पाहू लागलो. तळवलकरांनी विचारलं, ‘कायये?’ त्यांनी सांगितलं, ‘सर, हम फिल्म इंडस्ट्रीसे एक निवेदन लेके आये है…’ तळवलकरांना हे दोघे कोण आहेत याचा काही पत्ता नव्हता. असता तरी फारसा फरक पडला नसता. त्यांनी निवेदन हा शब्द ऐकताच, ‘वो बाहर न्यूज एडिटरको दे दो,’ असं सांगून पुन्हा पुस्तकात डोकं खुपसलं.

तेच तळवलकर थोरल्या विखे पाटलांच्या स्वागताला दारापर्यंत गेले होते. आमच्यातले काहीजण म्हणाले, ‘काँग्रेस कनेक्शन.’

नंतर अत्यंत साध्या, मळकट कपड्यांमधल्या एका वयोवृद्ध माणसाच्या स्वागतासाठी तळवलकर उठून गेलेले पाहिले… त्यांच्याशी अतिशय आदराने वागताना पाहिले… ते कोणी सामाजिक कार्यकर्ते होते… आता कोणतं कनेक्शन जोडायचं असा जोडणाऱ्यांना प्रश्न पडला असेल.

****

तळवलकर नंतर लगेचच रिटायर झाले.

संपादकांच्या सेवानिवृत्तीचे किंवा सेवासमाप्तीचे जे दशावतार असतात, ते त्यांच्या वाट्याला फारसे आले नसावेत. १९९३च्या दंगलींनंतर महाराष्ट्र टाइम्सने बहुजनांच्या भावनेविरोधातली भूमिका घेतली होती. विजय तेंडुलकरांच्या ‘रामप्रहर’ या सदराची ‘बेहरामप्रहर’ अशी संभावना होत होती. मटाने हिंदूंची बाजू लावून धरलीच पाहिजे, असा सर्वसामान्य माणसांचाही कल झाला होता. परिणामी खप कमी झाला होता आणि मटाच्या खपाशी व्यवस्थापनाला काही देणंघेणं आहे, हे त्या काळात अचानक प्रकर्षाने पुढे येऊ लागलं होतं. कुमार केतकरांच्या आगमनाची द्वाही फिरत होती. व्यवस्थापनाच्या अन्य विभागांचा, खासकरून वितरण विभागाचा संपादकीय विभागावर दबदबा निर्माण होण्याचा तो काळ होता.

त्या काळाचे तडाखे नंतर केतकरांना भोगावे लागले.

तळवलकर वेळेत आणि सन्मानाने निवृत्त झाले!

****

निवृत्तीनंतर त्यांनी सचिवालय जिमखान्यात एक पार्टी दिली. त्या पार्टीत सहभागी होण्याची आणि तळवलकरांबरोबर ‘यज्ञकार्य’ करण्याची पहिली आणि अखेरची संधी तेव्हा मिळाली.

तेव्हाही ते भावविवश वगैरे झाले नव्हते. थोडे अधिक गप्पा मारत होते आणि अधूनमधून हसतही होते, हेच आमच्यासाठी नवलाचं होतं.

निवृत्तीआधीच्या टप्प्यात ते थोडेसे सैलावले असावेत. एक-दोनदा बातमीचं भाषांतर करत बसलेलो असताना नेहमीची फेरी मारताना मागून येऊन शेजारी थांबून बातमी कसली आहे, अशी विचारणाही त्यांनी केली होती. मृण्मयी रानडेने केसांत बांधलेल्या एका भल्या मोठ्या आकड्यावर नजर गेल्यानंतर त्यांनी ‘हे केसात काय हिंस्त्र माळलंय या मुलीने’ असंही ते म्हणाले होते. मी गंमतीजंमतीत ‘मटा बॅचलर्स’ क्लब स्थापन केला होता. विविक तहहयात अध्यक्ष होते, शरद कद्रेकर तहहयात सचिव आणि मी तहहयात खजिनदार.

संध्याकाळच्या हलक्याफुलक्या मीटिंगमध्ये कोणीतरी त्यांना हे सांगितलं. ते म्हणाले, ‘त्या माचकरचं काही सांगू नका. तो कधी पार्टी बदलेल त्याचा नेम नाही.’

१४ वर्षांनी का होईना, मी पार्टी बदलली आणि त्यांचा शब्द खरा केला.

****

भावविवशता त्यांच्या स्वभावात नव्हतीच.

ते शक्यतो अतिशय कोरडेपणाने वागायचे आणि तसंच लिहायचे. नंतरच्या शब्दबुजबुजाटी पत्रकारितेत आणखी काही वर्षं व्यतीत करण्याची मजबुरी त्यांच्यावर आली असती, तर त्यांना फार अवघड गेलं असतं.

उत्तम सहकारी, निरंकुश अधिकार, ज्ञानोपासनेला सुयोग्य वातावरण, एकंदरच छापील शब्दांना मोल असलेला वर्तमानपत्रांचा सुवर्णकाळ असे सगळे शुभयोग तळवलकरांच्या संपादकीय कुंडलीत जुळून आले होते. त्यांना साक्षेपी आणि ज्ञानमार्गी संपादक बनता आलं. ते परवडलं.

अर्थात, हे फार सोपं आकलन झालं. त्यांच्या काळात, म्हणजे जवळपास २५ वर्षं मटाचे पंचप्राण त्यांच्या अग्रलेखांतच सामावलेले होते, हे विसरून चालणार नाही. गुणवान सहकाऱ्यांच्या घुसळणीतून निर्माण होणाऱ्या वर्तमानपत्राच्या दर्जावर त्यांचा शिक्का होताच. त्यांची एखादी सूचनाही सगळा नूर पालटून टाकू शकायची. त्यांची छोटीशी कृतीही अन्वर्थक ठरायची.

इंदिरा संत आणि रमेश मंत्री यांच्यात साहित्य संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक झाली, तेव्हा तळवलकरांनी आणि मटाने अर्थातच इंदिराबाईंच्या बाजूने भूमिका घेतली होती. जिंकून आले मंत्री. त्या दिवशी मटामध्ये इंदिराबाईंच्या कवितांवरचा अग्रलेख छापून आला होता.

****

तळवलकर आमच्या पिढीसाठी ‘तळवलकर’च राहिले!

सर्वतोपरि शक्य असूनही ‘गोविंदराव’ बनून ते आमच्या डोक्यावर बसले नाहीत. ‘गोविंदरावजी’ वगैरे लोचटपणाची तर शक्यताच नव्हती. ‘तळवलकरसाहेब’ असं कोणी म्हणालं असतं, तर त्यांनी तडकाफडकी त्याला घरी पाठवला असता. साहेबी आणि ‘सरकी’ला त्यांच्या काळात मज्जावच होता मटामध्ये. आदराने वा मैत्रीत पण सरळ आडनावाने हाक मारायची पद्धत होती.

अनाठायी जवळीक किंवा अधिक्षेप न करता कशाचंही रिपोर्टिंग किंवा मूल्यमापन करायचं, तर हे अंतर राखावं लागतं, हे एक मूल्य त्यांनी आमच्यात नकळत रुजवलं होतं.

तळवलकरांचं निव्वळ ‘तळवलकर’ असणं किती थोर होतं, हे आता कळतंय!

****

लेखक 'बिगुल' या न्यूजपोर्टलचे संपादक आहेत.

हा लेख 'बिगुल'वर पूर्वप्रकाशित असून मायबोली.कॉमवर पुनर्प्रकाशन करण्यास अनुमती दिल्याबद्दल 'बिगुल' व श्री. मुकेश माचकर यांचे मनःपूर्वक आभार.

****
प्रकार: 

हा लेख जास्त आवडला. आपल्यासारख्या वाचकाला पेपर चे बद्ललेले रूप दिसते त्याचे आतले वर्णन चपखल वाटते.

IBN Lokmat channel वर "आठवणीतले तळवलकर" कार्यक्रम आता सुरु आहे. ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी.

अप्रतिम लेख...

1989 मधे इथे अमराठी क्षेत्रातील लायब्ररीतील टेबलावर मला एक मथळा दिसला-‘अभी तो मैं जवान हूं...’

अख्खं पान भरुन लेख होता...बघितलं तर तो मटा हाेता...तो पूर्ण लेख वाचायला मला तीन दिवस लागले...(कारण अमराठी क्षेत्रात राहणारा असल्यामुळे मराठी वाचनात गती नव्हती...)

तर या तीन दिवसांत एके शनिवारच्या मनाेरंजन पुरवणीत अशोक कुमारच्या ‘बेवफा’ चित्रपटावरील प्रकाश जोशींचा लेख बघितला, तो देखील वाचून काढला. तो ‘यादें’ स्तंभ पाक्षिक होता...मी लाइब्रेिरयन कडून मटा चे जुने शनिवार चे अंक मिळविले...त्यांत अंदाज होता...

मग मी विचारपूस करुन मटा विकत घेऊ लागलो...सुरवातीला यादें साठीच घेत होतो...

पण पंधरा दिवसांत मला मटा चं वेगळेपण ठळकपणे जाणवलं...त्यातील अग्रलेख, पुरवणी मधील लेख, खूपच माहिती देणारे होते...

शिवाय हॉलीवूड, अंतरराष्ट्रीय घडामोडींवर तज्ञांचे विश्लेषणात्मक लेख असायचे...

मी मटा च्या प्रेमात पडलो...

रोज सकाळी मटाची वाट बघायचो...

89 ते 93 पर्यंत मी मटाचा नियमित वाचक होतो...

या दरम्यान मटामधे कधीच गोविंदरावांचा फोटो बघितल्याचं आठवत नाही... (‘ग्रंथांच्या सहवासात’ मधे त्यांनी जो लेख लिहिला होता त्यात त्यांचा फोटो होता असं आठवतं...पण तो लेख माझ्याकडून हरवला...)

छान लेख आणि आठवणी.

आता तळवळकरांनी लिहिलेले त्या वेळचे अग्रलेख कुठे वाचायला मिळतील का?

लेख छान आहे.

मटा कधीही घरात आला नाही. माझ्या घरात माझ्या जन्माआधीपासून लोकसत्ता होता, पेपर वल्याने कधी चुकून मटा टाकला तरी त्याला हात लावावासा वाटत नसे. मटा म्हणजे थिल्लर काहीतरी असे डोक्यात होते आणि त्याची भाषा, त्यातले फोटो बघून तो समज अधिकाधीक दृढ होत गेला. त्यामुळे चांगले अग्रलेख वाचायचे राहून गेले की काय असे आता वाटतेय.

हम्म्म्म म्हणजे महाराष्ट्र टाईम्स ' मराठीतील पहिले सॉफ्ट पोर्न दैनिक ' होण्या च्या पूर्वीचा काळ हा !

मी मटा वाचायचे कधीच बंद केले आहे. सध्या कोण असते त्याचे संपादक म्हणे ?

Pages