कसा घडवाल आजचा शिवबा (जागतिक महिला दिनानिमित्त लेख )

Submitted by गवंडी ललिता on 7 March, 2017 - 06:15

कसा घडवाल आजचा शिवबा
एकविसाव्या शतकात आज खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज घडविण्याची गरज भासू लागली आहे. आज आपण म्हणतो की, बेटी बचावो ! बेटी पढावो ! जसं समाज सुधारण्यासाठी मुलांच्या बरोबरीनं मुलींनाही सुसंस्कारित करून, या दोघांनाही शिवाजी महाराजांचे विचार, आचार , तथा नीती अंगीकारण्याची गरज आहे.
शिवबा घडला पाहिजे ही आस आज प्रत्येकाची आहे. पण तो कसा घडावा याचा मात्र गांभीर्याने विचार कुणीच करीत नाही. म्हणून “कसा घडवाल आजचा शिवाजी !” असं म्हणण्याची वेळ आली आहे. समाजात आज भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार चोऱ्यांमाऱ्या, खून, दरोडे या सारख्या अमानुष घटना घडतात, यांना खऱ्या अर्थानं पायबंद घातला पाहिजे. स्त्रीयांना तथा वृद्धांना आज पाहिजे तसे संरक्षण नाही. असं खेदानं म्हणण्याची वेळ आली आहे. कुटुंबातील तथा समाजातील प्रेम, आदर, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, नाती आणि नीती ही सर्व संपली की काय? अशी भ्रामक कल्पना मनात डोकावल्याशिवाय रहात नाही. म्हणून आज आपल्या सर्व माता, भगिनींना, आयांना, बहिनींना तथा समस्त ‘स्त्री’ वर्गाला एवढीच विनंती आहे की, जिजाऊ मातासारखी शिकवण आपल्या मुला-मुलींना देवून त्यांच्यात शिवाजीं महाराजांची नीती, आचार-विचार रुजविले पाहिजेत. तरच समाजात त्यांचा आदर्श निर्माण होऊ शकेल.
आज तशा अर्थानं पाहिलं तर, आजची माता ही मम्मी झाली आहे. तर पिता डॅडी झाले आहेत. ही मम्मी डॅडींची संस्कृती आपली नाही. ही जाणीव सतत आपल्या मनात माता-भगिनी यांनी ठेवली पाहिजे. त्या ऐवजी आई, आईसाहेब, मासाहेब, आबासाहेब, दादा, भाऊ, अण्णा या आपल्या संस्कृतीशी निगडित असलेली संबोधनं वापरून आपल्या संस्कृतीचं जतन केलं तरच या गोष्टी साध्य होतील, असं मला वाटतं.
“कसा घडवाल आजचा शिवाजी !” असं म्हणण्याची वेळ आज आली आहे. यातून आपल्याला शिवाजी महाराज घडवायचे नाहीत, तर आपल्यातला माणूस, मग तो विद्यार्थीदशेपासून घडवायचा आहे. माणूस घडवायचा आहे, आणि तो शिवाजी महाराजांच्या आचार-विचार, नीती मुल्यातून घडवायचा आहे. आज तलवार घेऊन लढणारा शिवाजी नको, तर नितीमुल्यांचे रक्षण करणारा आणि त्यानुसार वागणारा माणूस घडवायचा आहे. ही जबाबदारी आजच्या आपल्या असंख्य माता-भगिनींची तथा ‘स्त्री’ वर्गाची आहे. जसा शिवाजी जिजाऊमातेने घडवला, तसा माणूस आजच्या आमच्या असंख्य माता भगिनींना घडवायचा आहे. आणि तो घडवताना जिजाऊमातेच्या शिकवणूकीतून जसे शिवाजी महाराज घडले, तसा माणूस म्हणजे आजचा शिवाजी आपल्याला घडवायचा आहे. शिवाजी महाराजांचे आचार-विचार, नीती-मूल्य,नाती-मूल्य तथा स्वदेश प्रेम त्यांच्यात रुजवायचे आहे, असा आजचा शिवाजी आपल्याला घडवायचा आहे.
आज आपण सर्वच राष्ट्रपुरुषांच्या नावांचा उदो-उदो करतो, त्यांचा जयजयकार करतो पण त्यांच्या आचार-विचारांचे, त्यांच्या नीती-मूल्यांचे साधे दर्शनही आपल्याला होत नाही. हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो. ही आजची सर्वसामान्य तुमची-आमची स्थिती झाली आहे. नुसत्या जयंत्या तथा पुण्यतिथ्या साजऱ्या करून त्यांचे आचार-विचार साध्य होत नसतात. तर त्यासाठी आपल्याला आपल्या मुलां-मुलींमध्ये त्यांचे आचार-विचार, नीती-मूल्य, नाती-मूल्यही कशी रुजवली जातील याकडे अधिक लक्ष देवून, ती त्यांच्या ठायी रुजविणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे.
शिवबा घडवायचा म्हणजे प्रथम आपण आपल्यातील जिजाऊ शोधली पाहिजे. ती जिजाऊ प्रथम आपण घडवली पाहिजे, घडली पाहिजे. तरच शिवाजी आपल्याला घडवता येईल. पण आज आपण मुलींच्या बाबतीत कोणता विचार करतो? कसा विचार करतो? याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी संवाद करून आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. आपण नेहमी म्हणतो की, यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एक ‘स्त्री’ उभी असते. ही स्त्री म्हणजेच जिजाऊ आहे, सावित्रीबाई फुले आहे, हे मात्र आपण सायीस्कर विसरतो. कारण आपल्याला उपदेश करणे सोपे वाटते, मात्र ते आचरणात आणणे नको वाटते. खरं तर ही आजची शोकांतिका आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची ‘स्त्री’ ही झालर आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला ‘स्त्री’मुळेच शोभा येते. अनादी काळापासून तिला आपण आदिशक्ती मानले आहे. तिच्यातल्या शक्तीमुळेच पुरुष प्रेरित होतो, आणि कार्यकर्तृत्व करायला सज्ज होतो. हे खरं तर त्याचे मूळ आहे. एक ‘माता’ शिकली, एक ‘स्त्री’ शिकली तर ती समस्त कुटुंबाला सुशिक्षित करून चांगल्या प्रकारे वळण लावू शकते. ही केवळ संकल्पना नाही तर हे सत्य आहे. म्हणून प्रथम आपल्यातील ‘स्त्री’मधील जिजाऊचा शोध घ्या. आपल्या घरातील ‘स्री’ला प्रथम जिजाऊ होवू द्या, तिला प्रथम जिजाऊ करा, मग आपोआपच अशा जिजाऊकडून शिवाजी घडवला जाईल. माणसातला माणूस जोपर्यंत आपण घडवत नाही, तोपर्यंत आपण शिवाजी घडवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आज आपण आपल्यातील नितीमुल्य पायदळी तुडवतो आहे. मला तुम्ही असं सांगा की ‘साने गुरुजीं’नंतर किती साने गुरुजी झाले? याचं उत्तर नकारार्थी आहे. कारण नुसती पुस्तक शिकवून किंवा शिकून कुणीही साने गुरुजी होत नाही. त्यासाठी आपल्या मुलांवर साने गुरुजींच्या ‘आई’ सारखे प्रेम करायला आईने शिकलं पाहिजे. ती प्रथम श्यामची आई झाली पाहिजे. त्या मातेनं आपल्या श्यामला घडवलं तेव्हा कुठं ‘श्यामची आई’ मातृहृदयातून पाझरून तुरुंगात तयार झाली. असा घडला श्याम. मात्र दुर्दैव हेच आहे की, आज साठ-सत्तर वर्षानंतरही आपल्याला कोठेही श्याम दिसत नाही. कारण आज ‘श्यामची आई’च हरवली आहे. जशी जिजाऊमाता, सावित्रीबाई यांचा शोध आपल्याला आपल्या मुलींमध्ये घायचा आहे, तसाच शोध श्यामच्या आईचाही घ्यायचा आहे. हा खरा विचार मित्रांनो तथा मैत्रिणिंनो प्रथम तुमच्या आमच्यात आला पाहिजे. नुसत्या “सावित्रीच्या मुली आम्ही !” असं म्हणून भागणारं नाही. म्हणणं फार सोपं असतं पण अंगीकारण मात्र त्या पेक्षाही कठीण असते असं मी पुन्हा एकदा म्हणते. कारण अंगीकारण हे व्रत आहे. असं कठीण व्रत तुम्हाआम्हा भगिनींना घ्यायचे आहे, स्वीकारायचे आहे. माता होणं हे खरं तर सर्वात कठीण व्रत असतं. कारण हे ‘असिधाराव्रत’ आहे. जिजाऊमाता, सावित्रीबाई फुले यांनी हे ‘असिधाराव्रत’ पूर्णतः अंगिकारलं होतं. त्यातूनच त्यांच्या हातून शिवबा घडला, महात्मा फुलेंसारखा समाज क्रांतिकारक घडला. म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ‘स्त्री’ असते याचा साक्षात्कार तुम्हा-आम्हाला असा झाला. तसा तो तुमच्या-आमच्या जीवनातून, वागण्यातूनही व्हायला पाहिजे.
शिवबा घडविताना प्रामुख्याने आपण प्रथम हे स्वीकारलं पाहिजे की, त्यांचे आचार-विचार, नीती-मूल्य सांभाळणारी नाती कशी निर्माण होतील. कारण नातीच माणसातला जिव्हाळा निर्माण करतात. जीवनात प्रेम, आपुलकी, आस्था नात्यातूनच मिळते. नातीच जर नष्ट झाली तर त्या माणसाच्या जीवनाची मातीच होते. म्हणून आपण सर्वांनी नाती सांभाळली पाहिजे. नाती सांभाळणे ही आजच्या काळाची गरज आहे. परंतु आज मात्र माणसातून माणूस आणि नात्यातून नाती दुरावल्यासारखी दिसतात. हीच शोकांतिका आहे.
आज समाजातल्या एक नव्हे तर अनेक शिवबांची गरज आहे. कारण आजही आपल्याला आपल्याचं समाजाला सुसंस्कृत करता आलं नाही; ही खेदाची बाब आहे. कारण कोणताही माणूस जन्मजात चांगला किंवा वाईट नसतो. तो चांगला आणि वाईट त्याच्या संस्कारातून घडतो. म्हणून संस्कार फार महत्वाचे असतात.
माता, भगिनींनो ! घरातले संस्कारच माणसाला आयुष्यभर पुरतात. साथ देतात. आज आपली संस्कृती ही आपणच बंद करून घेतली आहे. ह्या बंद दारच्या संस्कृतीनं आपलं अंगण हरवलं आहे. अशी अंगणं हरवलेली घरं-दारं आपणच आपल्या स्वार्थापायी निर्माण करून ठेवली आहे. पैशामागे धावणारी आजची माणसं आपल्या पोटच्या गोळ्याला पाळणा घरातल्या एखाद्या उर्मट, उद्धट, संस्कार शून्य निर्दयी दायीसारख्या बाईच्या हवाली दिवसभर करून, आपणच आपल्या पोटच्या गोळ्यापासून दूर जातो आहे. मग तुम्हीच सांगा की, त्यांच्यावर आपले लहानपणापासुनचे संस्कार कसे बरे होतील. तसेच आज समाजात आणि कुटुंबात अशी अवस्था दिसते की, मी, माझे कुटुंब म्हणजे माझा नवरा आणि मुलगा एवढीच जर आपण अपेक्षा धरली तर यातून काय साध्य होतं ? जरा विचार करा. आपल्या अंगणातल्या गप्पा-गोष्टी, आजी-आजोबांची मांडी आजच्या नातवाला पारखी होवून बसली आहे. मग संस्काराचं काय होईल याचा जरा गांभीर्याने विचार करा. संस्कार हे मूलतः आपल्या घरातल्या थोरा-मोठ्यांच्या आचार-विचारातून होत असतात. त्यातूनच आपण नकळत घडत असतो. हे नकळत घडणंच माणसाला संस्कार शिकवतात. कारण संस्कार शिकवणं ही काही शिकवण्याची गोष्ट नाही. हे ज्याचं त्यानं साध्य करायचं असतं.
मातांनो- भगिनींनो आपल्याला शिवबा घडवायचा आहे ना मग त्या पुण्य पुरुषाचे विचार प्रथम समजावून घ्या. ज्या मातेच्या पोटी तो जन्माला आलेला आहे त्या मातेला, त्या जिजाऊ मातेला आपल्या मनातून वंदन करून तिच्यातल्या भाव-भावना तुमच्या-आमच्यात रुजवू द्या. मग पहा शिवबा आपोआपच घडेल.
सावित्रीच्या लेकी बनून, जीजामातेचा पदर डोईवर घेऊन तुम्ही आम्ही जेव्हा समाजात वागण्याचा प्रयत्न करू तेव्हाच शिवबा मात्र घडल्याशिवाय राहणार नाही. शिवबाच्या त्या तुतारीचा निनाद सर्व देशभर फिरल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते, म्हणूनच मी म्हणते की,
नव्या युगाचा नवा शिवाजी
आज आमच्यात घडू दे
आज तुतारी वाजवून
स्वर गगनी भिडू दे
घराघरात आमुच्या
तोच शिवाजी जन्मू दे
सावित्रीच्या लेकी आम्ही
पदर जिजाऊचा घेऊ दे
शिकवू आम्ही गनिमीकावा
डाव भ्रष्ट तो उधळू दे
संस्काराची तलवार घेऊन
माय बहिणींना रक्षु दे
मळवट माथी आई भवानीचा
नाद मराठमोळा असू दे
गर्जना आमुची माणुसकीची
रचना जातीची नसू दे
शिकवण ही हो शिवरायांची
आठवण अंतरी असू दे
नव्या युगाचा असा शिवाजी
घराघरात जन्मू दे
-श्रीमती. ललिता गवंडी , अकोले
मोबा. ७७४१०८५५६६

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy
पहिल तर ताई तुमच अभिनन्दन! ! !
पहिला लेख लिहिला ना...म्हणून....

खूप सुन्दर विचार मान्ड्लेत ताई तुम्ही...
खूप आवडला लेख...आणि पटला सुद्धा....

महिला दिन म्हणून सगळं घडवायची जबाबदारी पुन्हा बायकांच्याच/आयांच्याच गळ्यात टाकलीत का? वडिलांना शिवाजी घडवण्याच्या कामात हातभार लागेलसं काही ठेवलंच नाहीत तुम्ही.
>>आज तशा अर्थानं पाहिलं तर, आजची माता ही मम्मी झाली आहे. तर पिता डॅडी झाले आहेत. ही मम्मी डॅडींची संस्कृती आपली नाही. ही जाणीव सतत आपल्या मनात माता-भगिनी यांनी ठेवली पाहिजे. त्या ऐवजी आई, आईसाहेब, मासाहेब, आबासाहेब, दादा, भाऊ, अण्णा या आपल्या संस्कृतीशी निगडित असलेली संबोधनं वापरून आपल्या संस्कृतीचं जतन केलं तरच या गोष्टी साध्य होतील, असं मला वाटतं.>> हे असलं कशाचा कशाशी संबंध नसलेलं लिहून दुसर्‍यांच्या संस्कृतीच्या नावाने खडे फोडणं नेहमीचंच झालेलं आहे. आई, बाबा आणि बाकीची संस्कृतीशी निगडीत संबोधनं वापरुन संस्कृती जतन कशी करायची? (हे असं वाचलं की भारतीय संस्कृती अगदीच तकलादू आहे असं लक्षात येतंय) आणि बदलायची तर नुसती संबोधनंच का? पूर्ण लाईफस्टाईल बदला की. कपडे, खाणं पिणं सगळंच. मोर्चे काढा, जाळपोळ करा पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स आणि बाकी विदेशी जॉईंट्स बंद करायला.

अतिशय सुमार लेख. वॉट्सॅप फॉर्वर्ड म्हणून ढकलला जाईल लवकरच.

महिला दिन म्हणून सगळं घडवायची जबाबदारी पुन्हा बायकांच्याच/आयांच्याच गळ्यात टाकलीत का? वडिलांना शिवाजी घडवण्याच्या कामात हातभार लागेलसं काही ठेवलंच नाहीत तुम्ही.>>> म्हणून तर त्या आपल्याला जिजाउ म्हणतायेत ना . नाहितरी शहाजी होते कुठे शिवाजीच्या जडणघडणीत !!

भावना पोचल्या पण लेख फारच जुन्या काळातला वाटला .

आज तशा अर्थानं पाहिलं तर, आजची माता ही मम्मी झाली आहे. तर पिता डॅडी झाले आहेत. ही मम्मी डॅडींची संस्कृती आपली नाही. ही जाणीव सतत आपल्या मनात माता-भगिनी यांनी ठेवली पाहिजे. त्या ऐवजी आई, आईसाहेब, मासाहेब, आबासाहेब, दादा, भाऊ, अण्णा या आपल्या संस्कृतीशी निगडित असलेली संबोधनं वापरून आपल्या संस्कृतीचं जतन केलं तरच या गोष्टी साध्य होतील, असं मला वाटतं>>> पूर्णत: असहमत .णिषेध
माझा सात वर्शाचा लेक 'ए डॅडी ' जनरेशनचा आहे . आमच्याकडे आजोबाना पप्पा म्हणतात . पण तो रोज सकाळी आंघोळ झाल्यावर न चुकता देवाला नमस्कार करतो , त्याच्या पद्धतीने पूजा करतो. देवळात गेल्यावर साष्टांग नमस्कार घालून नाक रगडतो . दिवाळीच्या दिवशी भले हॅप्पी दिवाली म्हणत असेल , पण बिल्डीन्ग मधले कोणी आजी-आजोबा , पार्किन्ग एरिआमध्ये जरी भेटले तरी आम्ही कोणी न सांगता , वाकून , त्यान्च्या पायाला हात लावून शुभेच्छा देतो . वाढदिवसाला त्याला केकवर मेणबत्ती लागतेच , पण 'आज्जी तु मला ओवाळणार आहेस ना ?" असेही तो आवर्जून विचारतो. अश्या क्षुल्लक गोष्टीनी संस्कृती र्‍हास होत नसते हो !
पैशामागे धावणारी आजची माणसं आपल्या पोटच्या गोळ्याला पाळणा घरातल्या एखाद्या उर्मट, उद्धट, संस्कार शून्य निर्दयी दायीसारख्या बाईच्या हवाली दिवसभर करून, आपणच आपल्या पोटच्या गोळ्यापासून दूर जातो आहे. मग तुम्हीच सांगा की, त्यांच्यावर आपले लहानपणापासुनचे संस्कार कसे बरे होतील. >>>>> या गोष्टी भाषणं देण्यासाठी बर्या वाटतात पण नोकरी करणे आणि त्यासाठी मुलांना पाळाणाघरात ठेवणे ही काही काही लोकांची गरज असते . घरी सासूसासरे असणे हे भाग्य सगळ्यान्च्या नशिबी नसते.

तथाकथीत जिजाउंनी , संस्कृती जपण्यापेक्षा , मुलाला चांगले-वाईट , स्त्री-पुरुष समानता याची जाणिव करून द्यावी , स्वावलंबी बनवावे.

बाकी चालुद्या !!

यावर्षी महिलादिना निमित्त लिंगभेदापलीकडे जावून सर्वांना सामवून घेणारे जग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केलेय. अशावेळी इथे बालसंगोपनाची, संस्कारांची जबाबदारी फक्त आईची, आपली संस्कृती काय ती महान वगैरे घासून गुळगुळीत झालेले गैरसमज कशासाठी?

मला सभेत भाषण ऐकतोय असा भास झाला>>>> अगदी हेच लिहायला आलो होतो.
हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, आधी जिजाऊ शोधली पाहिजे....
आयांनी आपल्यातली जिजाऊ शोधली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे?.
परत बाबा डॅडी अन आई मम्मी झाली म्हणजे काय? आता पुर्वी सारखं नाही फक्त डॅडींच्या पगारात घर चालत तर मम्मीला पण बाहेर जावं लागतं कामाला ही वस्तुस्थिती आहे.
अन निती मुल्यं जपायची म्हणजे लोकांना भाऊ दादा आण्णा म्हणायचं? अन त्यानी काय शिवबा जन्मेल? Lol
आजच्या जगात तर शिवबांच्या काळाचे नियम लावून शिवबा पैदा करायला बघायचं म्हणजे गाडी, विमानाच्या जमान्यात बैलगाड्या मॅनुफॅक्चरिंगचा प्लांट उघडण्यासारखं आहे.
मुल्य असावीत नाही असलीच पाहिजे पण आचार विचार हा काळाशी अनुसरुन असलाच पाहिजे. शिवबा हे एका विशिष्ट काळात निर्माण झालेलं थोर व्यक्तीमत्व आहे हे विसरु नका. काहीही कुठल्याही काळातल्या गोष्टी उचलून त्याची टेंपलेट आताच्या काळाला लावून एकतर गळा काढायचा नाहीतर उगा फुकाचं उपदेशपाणी करायचं.

छ्या! मला वाटलं होतं शिवबा बनवायची स्टेप बाय स्टेप रेसिपी असेल. पण अगदीच पोकळ लेख निघाला!
सावित्रीच्या लेकी बनून, जीजामातेचा पदर डोईवर घेऊन तुम्ही आम्ही जेव्हा समाजात वागण्याचा प्रयत्न करू तेव्हाच शिवबा मात्र घडल्याशिवाय राहणार नाही. >>> म्हणजे नक्की काय?
तुम्ही हे विचार आपल्या जवळपासच्या मैत्रिणी, नात्यातल्या स्त्रिया, मुलींना ऐकवून पाहिलेत का ? - एक उत्सुकता.

जागतिक महिला दिनानिमित्त "कशी घडवाल जिजाऊ?" असा जरी लेख पाडला असता तरी चालले असते.
बाकी इतरांनी वर लिहिलेय त्याच्याशी सहमत.

त्या जिजाऊ मातेला आपल्या मनातून वंदन करून तिच्यातल्या भाव-भावना तुमच्या-आमच्यात रुजवू द्या.>>>>> नक्की कोणत्या भाव भावना त्या तरी कळू द्या?
घरी राहून त्या पोराला आपल्या मांडीवरुन आजी आजोबांच्या मांड्यांवर उड्या मारायला लावून की घरचे पदार्थ (जसे की वरण भात, भाजी) त्याला खायला घालायला लावून की अजून कशानी जिजाऊ तयार होते?

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा महिला अत्याचाराची बातमी आली आहे. वाशिम जिल्ह्यात पाच जणांनी अत्याचार करून महिलेला पेटवून दिले. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. म्रुत्यूपूर्व जबाब व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे...

>>> पाळणा घरातल्या एखाद्या उर्मट, उद्धट, संस्कार शून्य निर्दयी दायीसारख्या बाईच्या हवाली
वा वा! जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या एका वर्गाला सन्मानपूर्वक मोडीत काढल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन.
तुम्हाला मायेचा पदर, पुरुषाच्या कर्तृत्वाची झालर इ.इ. रूपी जीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा!

फडणवीस भाषण देत आहेत असं वाटलं, त्यांच्या टोनमधे.

जिजाऊमाता, सावित्रीबाई फुले यांनी हे ‘असिधाराव्रत’ पूर्णतः अंगिकारलं होतं. त्यातूनच त्यांच्या हातून शिवबा घडला, महात्मा फुलेंसारखा समाज क्रांतिकारक घडला. >>
सावित्रीबाई महात्मा फुलेंच्या मम्मी होत्या ते या निमित्ताने कळलं. धन्यवाद.

मला पण एक शिवबा बनवायचाय. कायकाय घ्यावं लागेल? हे व्हेज मधे येतं का नॉनव्हेज मधे? मी स्वतः नॉनव्हेज आहे तर शिवबा बनवू का? आवडेल का? किती वेळ लागतो?

याटिकानी... ताईंनी ...(नाव काय म्हटलं तेंचं).... आपल्याला बहुमोल मार्गदर्शन केलंय या टिकानी.. आई भवानीची आशिर्वादाने, आई जगदंबेच्या कृपेने आम्ही हा गड चिंकूच असं ह्या ठिकाणी मी ताईसाहेबांना वचन दितो..शिवाजीम्हाराज आपल्या पाटीशी हायेत, याटिकानी आम्हाला विश्वास हाये.
जेहिंत जेम्हारास्ट!

आई जगदंबेच्या कृपेने >> एकट्या भवानीमातेवर अविश्वास? महिला दिनानिमित्त लेख असताना तुम्ही स्त्रीवरील अविश्वास दाखवून तुमची संकुचीत मनोवृत्ती दाखवत आहात. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही.

चान विचार. विशेषतः "शिवबाच्या त्या तुतारीचा निनाद सर्व देशभर फिरल्याशिवाय राहणार नाही" हे वाक्य कानठळ्या वाजवून गेले.

महिलादिन म्हणजे एक त्रासच झालाय, असून अडचण आणि नसून खोळंबा Sad
बाकी, लेखिकेच्या घरी कोण कोण आहे? शिवबा आणि / अथवा फुले की कसं काय? ते कळलं नाही.

नाही उद्या कोणी दुसरया सांगे .... म्हणायला नको, म्हणून आपल.

तुमची कॅटॅगिरी चुकली हो लेखाची. विनोदी लेखन मध्ये हलवा हे.

त्या एक बाई आहेत. कोणीतरी व्हॉटसॅप वर त्य्यांच एक भाषण पूर्वी एकदा पाठवल होत. त्या आठव्ल्या. (त्यांचे नाव मात्र लक्षात नाही आता.) त्या असच काहीतरी माता- बहिणी, त्यांची कर्तव्य, असे काय काय बोलत होत्या. अफाट विनोदी होत्या.

(आज खूप दिवसानी मायबोली बघितले. काही चांगले लेख वाचायला मिळाले तर काही हे असे विनोदी. मजाच आहे की)

जिजाऊचा पदर डोक्यावर असल्याशिवाय शिवबा जन्मणार नाही हे अजून किती हजार महिला दिनी ऐकावे लागणार?

असे लेख पाडले कि आपले महिला दिन कर्तव्य नीट पार पडले म्हणत कृतक्रूज्ञ झालेल्या किती बायका दरवर्षी माबोवर इतरांनी सोसायच्या?

डोक्यावर पदर म्हणजे समाजात आपोआप शिवबा ह्या लॉजिकने नखशिखांत काळ्या बुरख्यात आयुष्य कंठणाऱ्या जिजाउंच्या देशात शिवबांची फौजच उभी असायला हवी. ती का नाहीय याबद्दल ह्या बै एखादा लेख पाडणार आहेत का?

डोक्यावर पदर म्हणजे समाजात आपोआप शिवबा ह्या लॉजिकने नखशिखांत काळ्या बुरख्यात आयुष्य कंठणाऱ्या जिजाउंच्या देशात शिवबांची फौजच उभी असायला हवी. ती का नाहीय याबद्दल ह्या बै एखादा लेख पाडणार आहेत ???>>>>>++++११११११११