छोट्यांची मन

Submitted by मिता on 5 March, 2017 - 02:09

रिमझिमता पाऊस.. संध्याकाळ.. पुणे.. एका छोट्याश्या दुकानासमोरचा कट्टा...
बसायला जागा मिळाली.. फिरून फिरून दमलो होतो.. बसलो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत.. ज्यादा तर कॉलेजचीच पोरं.. साधेपणा नव्हता कुणाच्याच वागण्यात.. कपड्यावरून नसतो ठरवायचा, पण सवय लागलीय नं... असो..
मुद्दा काय, एक मुलगी आली छोटीसी, काली सावली, केस विस्कटलेले.. म्हणाली, ताई पैसे द्या..
तशी असे पैसे द्यायच्या विरोधातच असते मी.. पण पोरगी बघून मन पाघळलं.. दिले थोडे सुट्टे पैसे.. अजून नोट निघत नाही हो खिशातून म्हणून... झालं.. पोरगी खुश.. गेली निघून दुसरीकडं.. समोरच एक बाई झाडाखाली बसली होती छोट्या लेकराला घेऊन दीनपणे... समजून आलं हि लेक पण तिचीच असावी.. थोडा वेळ असाच गेला.. खाण्या पिण्यात.. लोकांना बघण्यात.. पोरं पोरींना बघण्यात.. चकाचक होती ना ती.. नजर आपोआपच स्थिर व्हायची...

झालं, थोड्यावेळाने पुन्हा पोरगी आली पैसे मागायला.. ती विसरली असेल आम्हाला, पण आम्ही तिला नुकतेच पैसे दिलेले.. तस बोलून दाखवलं तिला , कि बाळा आताच तर दिले तुला पॆसे.. पण बाळ काही निरागस नव्हतं हो !!!.. मला म्हणते कशी , ' ताई माझी जुळी बहीण होती ती '.. आता मात्र डोक्यावर हात मारायची वेळ आली..
पोरगी असेल 5-6 वर्षाची.. पण बोलणं? कुणी शिकवलं असेल तिला असं बोलायला .. आईने , बाबाने कि परिस्थितीने.. उचचभ्रु कुटुंबातील पोरांना आई बाबा फुलासारखे जपतात.. इथं मात्र त्यांना रानोमाळ भटकायला सोडतात.. यातून लवकर अनुभवी होत असतील ती बहुतेक.. त्यांना समजलं असेल त्यांना स्वतःच अन्न स्वतः मिळवायचं आहे.. त्या कलेत पारंगत होण्याखेरीज गत्यंतर नसेल त्यांच्याकडं..
या ओघात त्यांचा निरागसपणा जाऊन ड्याम्बिसपणा येत असावा.. आणि आपण मात्र त्यांना वाईट म्हणून मोकळे होतो.. पण दुकानात बसणाऱ्या चकचकीत पोरांसारखं आपल्याला पण मिळावं हीच अपेक्षा असेल नं त्या मागची??

असो.. निघालो तिथून.. जाताना झाडाखालची बाई कोनने चिमुकलीच्या हातावर मेहंदी काढताना दिसली.. रिमझिमत्या पावसात मेहंदीचा रंग फिकट वाटला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच मस्त लिहलंय...
आपण मात्र त्यांना वाईट म्हणून मोकळे होतो>>>>

+१

अतिशय मोजक्या शब्दात हृदयाचा ठाव घेणारा प्रसंग उभा केलाय. अनेक वेळा अश्याच स्वरूपाच्या घटना प्रत्येकाच्याच आयुष्यात सामोऱ्या येत असतात पण परिस्थितीवश आपण सोफिस्टकेडपणा किंवा वेळेचा अभाव अशी सोप्पी कारणे देवून तो प्रसंग इग्नोर करत राहतो. पण ज्यांच्या वाटेला खरोखरच असे भटके जीवन जगायचे नशिबी असते त्यांच्या एकंदर स्वभावात नैसर्गिक सहजपणा जावून स्वार्थी बेरकीपणा वाढत जातो. हासुद्धा एकप्रकारे बालमृत्युच आहे जिथे बालकांचे बालकपणच हिरावून घेतले जाते.