ही मंद हवेची झुळूक साधी नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 March, 2017 - 21:43

वृत्त - भूपती

जगण्याला झाले अस्तित्वाचे ओझे
ये-जा श्वासांची उठता-बसता मोज़े
ये परतुन ये एकदा सख्या माघारी
हे वाचुन तुज आयुष्य मखमली बोचे

वाराही हल्ली उदास होउन येतो
ते उदासलेपण अस्तित्वाला देतो
रे कशी करावी दुर्लक्षित ही सळसळ
झोका स्मरणांचा ताबा माझा घेतो

हे तूच सांग ना असे कुठे घडते का ?
काठाला नौका लागुनही बुडते का ?
मैला-मैलांचा प्रवास घडउन येते
गाठून किनारा लाट अशी फुटते का ?

जरी सुगंध ताजा वरचेवर ही वाही
ही श्रांतवते ग्रिष्मातिल लाही लाही
वेळेवर होते वावटळ जीवघेणी
ही मंद हवेची झुळूक साधी नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Use group defaults