आता नव्या जखमांना.....

Submitted by मीनल कुलकर्णी on 24 February, 2017 - 21:10

आता नव्या जखमांना......
झाले किती आघात याची मोजदाद नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!

चालू कशास मी जुनी मळलेली वाट धरुनी
मिळेल मार्ग नवा माझ्या पाऊलखुणांवरुनी
पायी रुतल्या काट्यांची तमा मी बाळगत नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!

चांदण्यांची सलगीही झाली आता नकोशी
रात्र कंटाळून निजते पहाटेच्या उशाशी
स्वप्ने कोणतीच माझ्या पापण्यात नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!

हा दोष ना सु-याचा घावच खोल होता
पण सु-यामागचा तो हात अनमोल होता
विश्वास कशास म्हणतात ऐकिवात नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!

हे दुःख नाहीच मुळी की मृत्यू डोकावतो
पण थोडी फूस मिळता काळ सोकावतो
काळास रोखण्याची हिंमत कुणात नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!

झाले किती आघात याची मोजदाद नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!
- मीनल

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच....
हा दोष ना सु-याचा घावच खोल होता
पण सु-यामागचा तो हात अनमोल होता
विश्वास कशास म्हणतात ऐकिवात नाही
आता नव्या जखमांना जागा मनात नाही !!