चांदण्यत बघण्याची

Submitted by निशिकांत on 17 February, 2017 - 01:42

चांदण्यात बघण्याची

चाहुल देते झुळझुळणारी
हवा तुझ्या येण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

रोमांचांनी मोहरतो मी
तुझी आठवण येता
ध्यास मनाला तुझाच असतो
सदैव उठता बसता
ओढ लागली कधी पासुनी
स्वप्न पूर्ण होण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

समोर ये तू, गीत तुझ्यावर
लिहावयाचे आहे
गूज मनीचे शब्दांमधुनी
रंगवायचे आहे
आपण ठरवू कशी असावी
चाल मस्त गाण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

मनात माझ्या एक कोपरा
गहाण तुझियापाशी
जिथे ठेवल्या शिंपल्यातल्या
आठवणींच्या राशी
तुला मोकळिक सदैव आहे
हृदयी वावरण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

निळ्या चांदण्यातले शिल्प तू
अपार लोभसवाणे
तुझ्या दिशेने नजरकडांचे
मधाळ येणे जाणे
चंद्र सोडुनी आस लागली
फक्त तुला बघण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

तुला कळाव्या कशा झळा त्या
ग्रिष्माच्या जगताना?
वसंत वेडा तुझ्याभोवती
रेंगाळत असताना
तशीही तुला हौस केवढी!
क्षणोक्षणी फुलण्याची
सवय लागली तुझा चेहरा
चांदण्यात बघण्याची

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users