मानत आलो

Submitted by ट्यागो on 16 February, 2017 - 13:50

तेलात तेढ ओतता ओतता

माझा फोन वितळून गेला

वीतळ नितळ काळाभोर 

रसरसून घुसला सापळ्यात

उभा कोसळून पडता

सांडून गेलो पटरीवर

मी मानत आलो होतो मराठी माज करतात फुकाचा

मी मानत आलो होतो मराठी खाली मुंड्या पाताळ धुंड्या अस्तेत म्हणून

मी मानत आलो होतो गुजरात्यांनी शिलाजितचे भाव वाढवले

मी मानत आलो होतो पंजाब्यांनी रक्तात पडलेल्या मिर्झाला विचारलं असेल 'ओये कि होया ओये' म्हणून

मी मानत आलो होतो एमपी युपी हीच माझ्या दारिद्र्याची कारणं

मी मानत आलो होतो एक बिहारी सौ पे भारी हे गौतमाचं पाचवं आर्यसत्यय म्हणून

मी मानत आलो होतो बंगाल्यांनी युरोपात वेषांतर करून रेनेसांस घडवला

मी मानत आलो होतो राजस्थानी गुपचूप सरस्वतीत बोर खोदून त्यात मिठाया टाकून पाणी पीत असतील म्हणून

मी मानत आलो होतो सिंधी लोक स्टॅमिना वाढवण्यासाठी ढेकणांचं रक्त पितात 

मी मानत आलो होतो कर्नाटकात शिव्या द्यायच्या असतील तर मराठीत देत असतील म्हणून

मी मानत आलो होतो केरळी लोक आपल्याच घामाला फोडणी देऊन मासे शिजवतात

मी मानत आलो होतो तामिळनाडू नावाचं एक बेट आहे जिथं आर्यांची शिश्न कापून होड्यांवर फडकवली जातात म्हणून

मी मानत आलो होतो तेलंगणा हे सीमांध्राच्या वरच्या मजल्यावर राहणारे लोक आहेत

मी मानत आलो होतो उडीयात धुळीचा पाऊस पडतो आणि बेडकांनी रथावर भुंकून सुभद्रेला अभद्र केलय म्हणून

मी मानत आलो होतो नॉर्थीस्ट बिर्थीस्ट तर माझ्या संडासात हि मावतात

मी मानत आलो होतो हरियानी दुधात टाकून रम पित असतील म्हणून

मी मानत आलो होतो कश्मीरला बायांची पाळी सुद्धा पंढरीठीक्कर पडत असेल

मी मानत आलो होतो दिल्ली एक अंडरग्राउंड शहर आहे जिथून वर यायला पाणबुडीतून पूर्वांचल मध्ये अवतार घ्यावा लागतो म्हणून

म्हणून म्हणून मी मानत आलो 

मान मोडीत काढत आलो

आत्ता पडलोय पटरीवर

लिक्विड स्पेक्ट्रम तवंगभर

उद्या येईल हागणारा

रात्रीनं ओकलीय रंगख्याती अपरंपार 

सूर्याचा चेंडू टप्पा खाऊन

जाऊन धडकेल त्याच्या डोळ्यावर

धुवून घे बा नारायणा

 खरकटं काही ठेऊ नको

माझं डबकं तुझचंय

परकं काही मानू नको.

(dedicated to arun kolatkar)

(मित्र 'अरविंद जोशी'ची कविता, त्याच्याच परवानगीने!)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.