सार्थक

Submitted by रेव्यु on 6 February, 2017 - 23:28

आजि सोनियाचा दिनु
"बाबा ,मी निघतोय् ",ला अर्धवट झोपेतच अवि ---अविनाशने -विवेकला आपल्या लेकाला "बॉन व्हॉयेज" असा झोपाळू प्रतिसाद दिला.

अजून पहाट व्हायची होती,बहुधा ३-३० /४ वाजले होते.
विवेक आपल्या नेहेमीच्या प्रदीर्घ दौर्‍यावर युरोपला निघाला होता.
त्याला हे ही माहित होते की त्याची जीवनशैली आता तूफान वेगाची अन तणावपूर्ण झालीये.परिषदा,स्ट्रॅटेजी मीट्स्,परदेशी पाहुणे,त्यांची सरबराई,नव्या उत्पादनांच्या जाहिरातीच्या मोहिमा,विदेशी अन देशातच धावपळीचे दौरे,अगदी पहाटेच्या नाहीतर मध्य रात्रीच्या साता समुद्राकडे नेणार्‍या विमानांच्या वेळा. अन हे पुरेसे नाही म्हणून एक वार्षिक उपचार म्हणून बळजबरीने घेतलेल्या वा लादल्या गेलेल्या, कुठल्या तरी निसर्ग रम्य ठिकाणी- लॅप टॉप अन मोबाईल अन ......थोड्या बहुत कुटुंबाच्या संगतीत काढलेल्या सुट्ट्या-

विवेक नुसता गुरफटला ,नव्हे हरवला -नव्हे चक्रव्यूहात अडकला होता.

अर्धवट झोपेत अवि आपल्या भूतकालात पोहोचला होता.
त्याची पूर्वाश्रमातील जीवनशैली तरी कुठे वेगळी होती? कॉर्पोरेट जगातील जीवन असच असतं --याची त्याला जाणिव होतीच.भारताच्या दूर दूर फेकल्या गेलेल्या कान्याकोपर्‍यात त्याची नियुक्ती झाली होती,तिथे तो आपल्या उत्कर्षाच्या आशेत ,ते मृगजळ आहे की नाही याचा विचार न करता,तमा न बाळगता स्वतःस झोकून द्यायचा.त्याने फॅक्टर्‍या चालवल्या होत्या,नवीन प्रॉजेक्ट्सचे नेतृत्व केले होते-स्वप्नात ही विचार न करू शकणार्‍या ठिकाणी जाऊन केवळ आव्हान म्हणून नवी क्षितिजे गाठली होती.किन्बहुना वर्षातील १००~१५० एक रात्री तरी रेल्वे च्या स्लीपर मध्ये हेड ऑफिस आणि त्या आडगावातल्या फॅक्टरीमध्ये ये जा करण्यात त्याचे जायचे.तो स्लीपर त्याचा दुसरा शयन कक्ष झाला होता.

त्याने आपल्या सर्वच सहकार्र्‍यांवर अतोनात प्रेम केले होते,विश्वास दाखवला होता,त्यांच्याशी नेहेमीच निष्कपटी भावाने अन सौहार्द्रतेने वागला होता,त्यातल्या त्यात आपल्या कामगार बंधूंशी नेहेमीच दिलदारपणे वागायचा.त्याना ही अविची कदर होती.सदोदित हसत मुख, कुठल्या ही परिस्थितीत मनोबल उंच असणारा,सौम्य अन आर्जवात बोलणारा,प्रसंगी वैयक्तिक धोका असूनही स्वतःस पूर्ण झोकून देणारा तो दीप स्तंभा सारखा अवि नामक सहा फूटी मनोरा कुठेही एक हवा हवासा नेता म्हणूनच प्रसिद्ध होता.

कधी कुणाच्या पाठीवर प्रशंसेची प्रेमळ थाप,कधी संपूर्ण ध्यान देवून नुसतेच प्रामाणिकपणे लक्ष केंद्रित करून श्रवण,कधी उमाळ्याने उचंबळून ढाळलेला एकच अश्रू,अन एखादा वरकरणी विसंगत असा धाडसी निर्णय --यामुळे यश बहुतांशी त्याच्या पायाशी लोळण घ्यायचे,पण ते असायचे वादातीत यश -सर्वांचे यश-केवळ त्याचे नाही-त्या मुळे त्या यशाला एक सौम्य अन सुखद पैलू असायचा-उन्माद नसायचा.

तरिही त्याच्या मनोमनी त्याला माहित होते की त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू पूर्णपणे विकसित व्हायचा आहे-किंबहूना त्याने तेवढा वेळ दिला नाहिये.

त्याला निसर्गावर्,कवितेवर्,गाण्यावर अतोनात प्रेम होते.मानवी स्वभावात जे काही ईश्वरदत्त आहे,सुंदर आहे,कलुषित नाहिये त्याचा शोध त्याला घ्यायचा आहे याची टोचणी त्याला व्यथित करायचीं. शुद्ध सौंदर्याशी तारा जुळायच्या.जसे सागराचे नाते चंद्राशी जुळते तसेच काहीसे हे नाते होते.आयुष्याच्या अथांगपणावर त्याचे प्रेम होते.त्याच्या उच्छृखलपणावर ,अचानक आश्चर्य जनक अविष्कार पाहून तो भांबावायचा.

त्याला लोकांचे मिष्किल निरिक्षण करायला आवडायचे,निसर्गाच्या नृत्यात सामिल व्हायला आवडायचे.एखाद्या अनपेक्षित सरीनंतरचे इन्द्रधनुष्य , एखाद्या अर्भकाचे निरागस रडणे,वृद्धेचे दंतहीन बोळक्यातले लोभस स्मित,आईचा आक्रोश,तरुणाईचे आक्रमक राजबिन्डेपण्,कुणाचातरी विनाकारण अहंकार्,पुजार्‍याच्या चेहेर्‍यावरील भक्तिभाव-- ही यादी अंतहीन होती-हे सर्व त्याला मोहायचे-नि:शब्द करायचे-अंतर्मुख करायचे.त्याच्या या अनुभवांच्या,आकर्षणाच्या अभिव्यक्तीस काय मार्ग असावा याचा तो विचार करायचा.
त्याचे जग या सर्वाभोवती परिक्रमा करायचे.

या सर्व धावपळीत वयाची ५८ वर्षे केंव्हा गाठली कळलेच नाही.
खूप लांबचा प्रवास झाला होता-लांब पल्ल्याचा-अन विविध अनुभवांनी नटलेला.जेंव्हा सिंहावलोकन केले तेंव्हा तो थोडा खिन्न झाला--या प्रवासात त्याची अर्धांगिनी अन मुले बरोबर होती का-हो-शरीराने होती -पण मनाने,भावनांनी?
मन पक्की ग्वाही देईना.--

हो--काही क्षण होते साहचर्याचे.काही संधी काळ होते सान्निध्याचे,सहवासाचे.दूर डोंगरामागे अस्तंगत होणार्‍या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या साक्षित धरलेल्या करांचे.राणिखेतच्या स्तब्ध जंगलात आकाशात कूजन करणार्‍या नक्षत्रांचे संगीत ऐकत व्यतीत केलेल्या रात्रींचे,अलिबागला समुद्रकिनारी अनुभवलेल्या पावसांचे,उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या अंताक्षरीचे,कॉर्बेटच्या जंगलात वाघाची डरकाळी ऐकून घाबरून कुशीत मला बिलगणार्‍या मुलांचे,उतारांचलातील रेणुका तलावाच्या किनारी धो धो पावसाच्या साक्षीत अन मित्रांच्या संगतीत गायिलेल्या गाण्यांचे अन कवितांचे.
अन सगळ्यात सुंदर म्हणजे भिमतालाच्या किनारी तिन्ही सांजेस पत्नी तारा अन मुलांच्या ,मावळत्या सूर्याच्या साक्षीने स्वरचित कविता वाचतानाच्या मुलांच्या अन हिच्या चेहेर्‍यावरील भावांचे अन मग
" बाबा-तुम्ही?????? विश्वासच बसत नाही "
म्हणत पिन्गा घालत असलेल्या मुलांचे. ती मात्र सिक्सर-नव्हे गगनभेदी भरारी होती खरी.

पण त्यापलिकडे त्याला दिलासा देणारे त्याच्या स्मृतीत तरी फारसे काही नव्हते.
त्याचे अस्तित्व "नोकरी एके नोकरी" असेच त्याच्या मते होते.

मग मुलं अचानक मोठी झाली.त्यांनी आपापली क्षितीजे शोधून स्वच्छंद विहार सुरू केला,अन आपली स्वप्ने त्यांनी साकारण्यास सुरुवात केली.
विवेक खूप हुशार निघाला.एक प्रतिथयश व्यावसायिक होताच्.बहुराष्ट्रिय कंपनीत लठ्ठ पगारावर लौकिकार्थाने चांगल्या नोकरीवर लागला अन कॉर्पोरेट जंगलात हरवून बसला-आनंदाने की पर्याय नाही म्हणून्-तोच जाणे.

मुलगी विशाखाही मार्गी लागली.लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने बघू लागली आपल्या ग्रअफिक डीजाईनच्या स्वप्नांबरोबर् बहरू लागली.

दुर्दैवाने तारा काही आजारानंतर बहुतांशी अंथरूणासच खिळून राहिली अन तिच्या काळजीत अन सेवेत अविचे दिवस्,जीवन कूर्म गतीने पुढे सरकू लागले.त्यांच्या आयुष्यात्,त्यांच्याच घरात राहूनही आपले काय स्थान काय हा वार्धक्य सुलभ अन काहीसा पूर्वग्रहदूषितही प्रश्न अवि अन तारा-उभायतानाही भेडसावू लागला,व्यथित करू लागला.
पण उभयतांची एकमेकास साथ मात्र दिवसेंदिवस घट्टच होत गेली

शेवटी परिपक्व सत्तरीत आल्यावर्,अविची लेखनाची सूप्त प्रतिभा नवीन वस्त्रे ल्याली.आयुष्यावरील प्रेम या माध्यमातून व्यक्त होवू लागले.दिवसातील कित्येक तास आयुष्यातील आपल्या अनुभवांचा शेला शब्द सृष्टीत विणण्यात जाऊ लागले.आपल्या आयुष्यातील यशापयशाबद्दल्,सुखदु:खाच्या क्षणांबद्दल,निसर्ग सौंदर्याच्या आकंठ प्राशन केलेल्या क्षणांबद्दल लिहिण्यात पुनःप्रत्ययाचा आनंद मिळू लागला.

अन या लेखनाला एकमेव श्रोत्री होती तारा.आपल्या जीवन सख्याची ही नवी प्रतिभा पाहून तिच्या चेहेर्‍यावर अभिमान ओसंडून जायचा.ते दोघे त्या सर्व घडींचे प्रवासी होते.अशाच एका दिवशी त्यांनी लिहिलेल्या कथा मोजल्या.बरोबर १२ अपत्ये होती ती.

मग तारा अन अविचे मित्र अविच्या मागे लागले अन त्या कथा त्यानी प्रकशित करवून घेतल्या.
एका छोट्याश्या सोहोळ्याला घरची फक्त तारा उपस्थित राहू शकली.अविला वाईट वाटणे स्वाभाविक होते.पन मग एवढा वेळ कुणा कडे होता म्हणा.

या यशाची जाणिव विवेकला कदाचित नसावीच्,याची खंत वाटत होती .

पण गेल्या कित्येक वर्षात बापलेकानी असे फुरसतीचे क्षण देखील कितीसे एकत्र अनुभवले होते?सन्ध्याकाळचे जेवण ही एकत्र केंव्हा केले होते आठवत नव्हते-कधी तरी केलेले वाढदिवस्-तेही बाहेर रेस्स्टॉरंटमधले सोडले तर्!!एकत्र आळस केला,वाचन केले,गाणे ऐकले,सिनेमा पाहिला-आठवतच नव्हते.

दुसर्‍या दिवशी विवेकला युरोपला जायचे आहे एवढे मात्र अविला माहित होते,कारण त्याची पूर्वतयारी करण्याच्या गडबडीत तो बाबांच्या प्रकाशन समारंभाला येऊ शकणार नाही असे म्हणाला होता .

समारंभा नंतरही उशीरा रात्री पर्यंत जेंव्हा विवेक परतला नाही तेंव्हा मात्र एक वेडी आशा म्हणून पुस्तकाची एक प्रत विवेकच्या खोलीत दिसेल अशा ठिकाणी ठेवून अवि परतला,एकच वेडी आशा की तो लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात तरी आपल्या बाबांचे ते पुस्तक वाचेल.

असंख्य विचारांच्या कल्लोळात डोळे उघडले तेंव्हा नोकर दारावर टक टक करीत होता.
"साहेब,चहा आणलाय्-सात वाजले-उठता का?"
अविने दार उघडले.समोर नोकराच्या हातात चहाचा ट्रे अन त्यात वर्तमानपत्राच्या लगत रात्री सोडलेले पुस्तक होते.बरोबर प्रकाशनाच्या आमंत्रणपत्रिकेचा लिफाफा ही होता् हे पाहून मात्र अविचे डोळे अपेक्षाभंगाच्या दु:खाने भरून आले,गळ्यातील हुंदका आवरेना.

पण मग लक्षात आले की त्या लिफ्याफ्यात एक पत्रही होते.थरथरत्या बोटानी ते उघडले.
पत्रात अक्षर विवेकचे होते अन मजकूर होता.

अवि वाचत होता-तारा ऐकत होती
"बाबा!! उशीरा आलो-काल रात्रभर झोपलो नाही.तुमचं पुस्तक पूर्ण वाचून काढलं.वाचायलाच हवं.माझ्या बाबांनी लिहिलेलं आहे ना ते?मला माहित होतं लहान पणापासून तुमच्यात ही प्रतिभा आहे.आठवतात का भिमतालला तुम्ही वाचलेल्या कविता?बाबा मला तुमचे हे पुस्तक वाचून खूप अभिमान वाटतोय्.जगातले ग्रेटेस्ट डॅड तुम्ही आहात्-मी चाळिशी गाठलिये तरिही.
अन ,आई खरंच मी काल यायला हवं होतं गं!!-तुमचा विव्या"

आता मात्र बांध फुटला होता!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय!
ते मृगजळ आहे की नाही याचा विचार न करता,तमा न बाळगता स्वतःस झोकून द्यायचा>>>.. अगदी बरोबर, असंच होत असतं.

छान!

खुपच सुंदर आणि भावनिक लिहिले आहे.
गलबलून आले आतून.
मुलांच्या भावविश्वात कायम आई-वडिलांना स्थान असावे,ह्याहून दुसरे सुख काय असणार..
खुप छान.