अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

Submitted by रसप on 26 January, 2017 - 01:21

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-raees.html

.

raees-movie-poster.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शाखा आणि बच्चन.. दोघेही Director's actor आहेत. त्यांच्याकडून काम करवून घेणारा दिग्दर्शक असणं गरजेचं असतं. दोघांनीही असह्य सुमार अशी कामंही बक्कळ केली आहेत, ती त्यामुळेच. त्यामुळे दोघेही सुप्परस्टार्स असले, तरी अभिनेते म्हणून त्यांचा फार उदो करणं मला तरी पटत नाही.
वैयक्तिक सांगायचं, तर मला बच्चन शाखापेक्षा थोडासा जास्त आवडतो.

बच्चन आणि शाखाची तुलना होऊ शकते कारण -

१. दोघेही ट्रेंडसेटर ठरलेले आहेत.
२. दोघेही सुप्परस्टार्स आहेत.
३. दोघेही Director's actor आहेत.
४. दोघांचं सामाजिक वर्तन १-२ अपवाद सोडले तर सारखंच चांगलं आहे. (अपवाद - बच्चनची १९८४ च्या दंगलीतली प्रक्षोभक वक्तव्यं आणि शाखाने दारू पिऊन वानखेडेवर केलेला तमाशा.)
५. दोघेही 'वेल रेड' आणि हुशार आहेत.
६. दोघांनीही प्रचंड मेहनत घेऊन आपलं करिअर बनवलं आहे.

तुम्ही शाहरूख या देहाला बघत आहात, शाहरूख एक आत्मा म्हणून त्याच्याकडे बघा. तुम्हाला असले प्रश्न पडणार नाहीत Happy >>>>>> बापरे खरचं कोणी ईतके वेडे असु शकतात एखाद्या नटासाठी Uhoh

माझा आवडता नट तर प्रत्येक पिक्चरनुसार बदलतो.. कशाला कुणाला ईतके सिरीयसली घ्यायचे. पण त्यातल्या त्यात शारुक पेक्शा आमीर, सलमान अन सध्या थोडाफार अक्षय चांगला वाटतो

अरारा किती तो अट्टाहास एखाद्याला चांगल म्हणण्यासाठी दुसर्‍याला वाईट, सुमार ठरवण्याचा. ऋन्मेश तुला आवडतो ना शाहरुख मग तू त्याचे सिनेमे बघ, उदो उदो कर, वाट्टेल तितके धागे काढ पण अस लोकांच्या गळी उतरवू नकोस रे शाखा ची जपमाळ घेऊन बसा म्हणुन.
ज्याला आवडत ते बघतात, चांगल वाईट म्हणतात आणि पुढे जातात.

बाकी तुझ्या या शाहरुख प्रेमावरुन आठवल. माझा एक भाऊ भलताच अमिताभ प्रेमी त्याचे सिनेमे किमान दोन-तिनदा तरी बघणारच. घरभर जंजीर मधल्या पोलिसीवेशातले आणि ते याराना मधले एलइडी लावलेल्या ड्रेसमधले पोस्टर्स. तो इतका अमिताभवेडा होता की त्याला कुणी चेष्टेत जरी अमिताभ मेला म्हंटल तर रडायला लागायचा. कुलीच्यावेळी अमिताभ अ‍ॅडमिट होता तर ह्याने कुठले नवस बोलले होते तो बरा व्हावा म्हणुन पण नंतर मग तो गंगा जमना सरस्वती, लाल बादशाह, जादुगर सारखे सिनेमे आले आणि भाऊ देखिल त्याच्या करियर मधे गुंतला. तर सांगायच अस की डोळसपणे प्रेम करायला हव उगाच आवडतो म्हणुन काहिच्या काही डोक्यावर घेऊ नये. बाकी तू सुज्ञ आहेसच.

सगळे बाजूला करा.

जगातील युनिवर्सिटीस मधे विद्यार्थ्यांसमोर भाषण देण्याकरीता अमिताभ बच्चन साहेब आणि शाहरूख खान या दोन जणांनाच प्रामुख्याने बोलवतात.
त्यांचा हजरजवाबीपणा, स्मार्टनेस, भाषेवर असणारे प्रभुत्व, आणि आपले म्हणणे श्र्रोत्यांसमोर प्रभावीपणे मांडण्याची कला हे या दोघांकडे आहे.
दोघांच्या स्पीच चे व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहे. शाहरूख खानवर टीका करणार्‍यांनी सुध्दा त्याच्या भाषणांचे प्रचंड कौतूक केले आहे. मग ते येले युनिवर्सिटी मधले असो अथवा धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल मधले असो. प्रत्येक भाषण हे माईलस्टोन आहे असे त्या क्षेत्रातील दिग्गजांचे मत आहे.

सलमान खान सारख्या लोकांना तर महापालिकेच्या शाळेत सुध्दा भाषणाला बोलवत नाही. Biggrin

तुम्ही शाहरूख या देहाला बघत आहात, शाहरूख एक आत्मा म्हणून त्याच्याकडे बघा. तुम्हाला असले प्रश्न पडणार नाहीत >>>> ..... :)))))))

अरे कशाची तुलना करतात?
एकाला येले युनिवर्सिटीमधून डिग्रीधारी लोकांसमोर भाषणाला बोलवतात
आनि दुसरा स्वतःची डिग्री लपवत फिरतोय

Biggrin

वा मस्त चाललय
ते येल university एकदम आवडल. शाखाला oxford ला पण बोलवल होत भाषणाला.
ऋन्मेश तुमच्या शाखाबद्दलच्या सगळ्या पोस्ट्स एकदम भारी. माझा तुम्हाला पुर्ण पाठिम्बा आहे.

शाखाच्या भाषणाबद्दल मी न्यूजमधूनच ऐकले आहे. भाषण पाहिली नाहीत. जर खरेच भारी असतील तर बघायला हवीत. सुचवल्याबद्दल धन्यवाद. जमल्यास याच विकेंडला शोधेन. तरी कोणाकडे यूट्यूब लिंक असेल तर प्लीज शेअर करा .... धन्यवाद Happy

शारूख = मोदी हे वाचून ड्वाले पानावले.
>>>>
ते फक्त स्वतःचे मार्केटींग करायची कला दोघांच्याही अंगात आहे त्याबद्दल म्हटलेय.
ईतर गुणदोष आपापले आहेतच.

अरारा किती तो अट्टाहास एखाद्याला चांगल म्हणण्यासाठी दुसर्‍याला वाईट, सुमार ठरवण्याचा.
>>>>>
मी कोणाला वाईट ठरवले आणि सुमार म्हटले. उलट अमिताभ माझाही आवडीचा आहे म्हणून तर शाहरूखशी तुलना करून त्याला सन्मान देतोय.
पन्नाशीच्या अमिताभला देखील मी फारशी नावे ठेवली नाहीत. पन्नाशीत सळसळता उत्साह राखणे एखाद्याला नाही जमले तर त्याला दोष म्हणता येणार नाही. पण ज्याला ते जमते त्याच्या या गुणाचे कौतुक नको का करायला?

बापरे खरचं कोणी ईतके वेडे असु शकतात एखाद्या नटासाठी Uhoh
>>>
लोकं न पाहिलेल्या देवासाठी वेडे होतात आणि त्याच्या नावाची जपमाळ घेऊन बसतात तर ज्या व्यक्तीने आपले आयुष्य मनोरंजनाने भरून सुंदर आणि सुखकर केले त्याचे कौतुक करायला काय हरकत आहे Happy

सुनिधी,
जर अमिताभ आणि शाहरूख एकाच जमान्यात असते तर वगैरे या कल्पनांना मी कागदावरच्या गप्पा म्हटले. जसे ते आत्याबाईला मिश्या असत्या तर म्हण आहे त्या अर्थाने.
बाकी तुम्ही शाहरूखच्या चांगल्या गुणांच्या केलेल्या कौतुकाबद्दल मला जराही आक्षेप नाही Happy

रिव्ह्यू छान लिहीला आहे. काबीलचाही छानच होता ( प्रतिसाद पण आहे तिकडे).
काबील ला अपेक्षा ठेवून गेले आणि निराशा पदरी पडली. त्यामुळे रईस चिगृत जाऊन पाहण्याचे धाडस होत नाही. नेटवर आल्यावर रेण्ट भरून पाहीन.

रइस पाहिला.... बरा वाटला!
नेहमीच्या टिपीकल गोडधोडपटांपेक्षा मधूनच मग असा एखादा गुन्हेगारीपट बरा वाटतो.... once upon च्या जवळपासही जात नाही पण उगाच बोअरही करत नाही!

शाहरुख, माहिरा, नवाझुद्दिन वगैरेंबद्द्ल बरेच लिहले गेलेय.... त्यामुळे त्यांच्याबद्दल अजून काय लिहा.... मला तो सादिकचे काम करणारा गडी आवडला.... सच्चा आणि सेन्सिबल मित्र टाइप्स!

तुम्ही शाहरूख या देहाला बघत आहात, शाहरूख एक आत्मा म्हणून त्याच्याकडे बघा.>>> ऋबाबाकी जय हो. अध्यात्म ओसंडत आहे ह्या वाक्यात Wink .

Raees starring Shah Rukh Khan and Mahira Khan has collected Rs 139.21 crore till now in the domestic market. According to reports, Raees has crossed Rs. 275 crores at the worldwide box office as of February 6, 2017. At the end of Day 13, the movie had grossed approx. Rs. 277.60 cr. at the worldwide box office. Meanwhile, Hrithik Roshan starrer Kaabil has collected Rs 124 crore.

इति इंडिअन एक्सप्रेस

शेवटी रईसचे एन्काउंटर केल्यावर पोलिसांच्या जीप्स डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? >>>>> हा प्रश्न मलाही पडलाय . असेच टाकून निघून जातात .>>>>>>>>>>>>>बहुदा पार्ट २ काढण्याचा विचार असेल.... शाहरुखला एखादी व्यक्ती उचलून नेते आणि बर करते, बरा झालेला शहारुख सर्वात आधी डोळ्यांचे ऑपरेशन करून एक एक का चुनके बदला घेतो...... वैगरे वैगरे ...रईस पार्ट-२ द कन्क्लुजन.

शहारुख सर्वात आधी डोळ्यांचे ऑपरेशन करून एक एक का चुनके बदला घेतो.. >> Uhoh
कुणाचा बदला? सगळ्यांना तर त्याने मारले.

शहारुख सर्वात आधी डोळ्यांचे ऑपरेशन करून एक एक का चुनके बदला घेतो.. >> Uhoh
कुणाचा बदला? सगळ्यांना तर त्याने मारले.>>>>>>>>> म्हणून तर लिहिले ना चुन चुन के (म्हनजे असेच कोण कोण जे आपल्याला मुवि बघताना शुल्लक वाटले असतील) आता डायरेक्टर च्या डोक्याचा तो ताप माझ्या नाही. हा हा हा .

एक महत्वाचा मुद्दा राहिला.
पिक्चर बघितल्यावर कोणाला असे वाटले हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण आहे, प्रामाणिकपणे सांगा !

शाहरूखवर लिहिला गेलेला आजवरचा सर्वोत्तम मराठी लेख !

मामु कहानी सुनाते रह गये और लडके ने चांद चुम लिया --- हे त्या लेखाचे शीर्षक. जे हिंदी आहे, पण त्यावरून वाद नको हं Happy

http://www.aksharnama.com/client/article_detail/513 - आणि ही त्या लेखाची लिंक
जरूर वाचा. मला शब्द न शब्द, अक्षर न अक्षर पटला.

खरे तर बरेचदा मनात यायचे मला जो थोडाथोडका शाहरूख समजला आहे, त्याचे जे थोडेबहुत स्टारडम मी जाणले आहे, त्याला एक माणूस म्हणून जे ओळखले आहे, किंवा एक सुपर्रस्टार म्हणून त्याचे जे मूल्यमापन मी केले आहे, ते सारे कुठेतरी शब्दबद्ध करावे. पण मग कुठेतरी असेही वाटायचे काय गरज आहे, जो शाहरूख आपल्याला समजला आहे तो आपल्यापुरताच ठेवावा. पण तरीही या ना त्या धाग्यात त्याच्याबद्दल लिहिल्याशिवाय राहवत नाहीच. चित्रपटाचा कोणताही धागा असो, त्याचा उल्लेख माझ्याही नकळत माझ्याकडून नाहीतर कोणाकडून तरी होतोच. कारण आपण कितीही म्हटले की कोणताही कलाकार कलेपेक्षा मोठा नसतो, किंवा कोणताही खेळाडू खेळापेक्षा मोठा नसतो, तरीही जसे क्रिकेटबद्दल लिहिले जाते तेव्हा सचिनचा उल्लेख होणे अपरिहार्यच आहे तसेच हिंदी चित्रपटसृष्टी जी बॉलीवूड म्हणून ओळखली जाते तिचा विषय निघताच शाहरूखचा उल्लेख होणे तितक्याच अपरिहार्यतेने आलेच.

त्या दिवशी मी या धाग्यात एक वाक्य लिहिले होते, "तुम्ही शाहरूख या देहाला बघत आहात, शाहरूख एक आत्मा म्हणून त्याच्याकडे बघा. तुम्हाला असले प्रश्न पडणार नाहीत Happy "

आणि या वाक्याचा नेमका अर्थ न समजलेल्या लोकांनी माझ्यावर शाहरूखचा भक्त असल्याचा शिक्का मारला. मी देखील त्यांना त्या वाक्याचा नेमका अर्थ समजवायच्या भानगडीत पडलो नाही. कदाचित योग्य शब्द सुचले नाहीत म्हणा, किंवा तितका वेळ नव्हता म्हणा, किंवा या धाग्यावर ते अवांतर झाले असते म्हणा...
पण आज हा लेख जणू काही त्याचे उत्तर म्हणूनच खास मराठीत प्रकाशित झाला आहे. आता या मागे माझ्या अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - हे शाहरूखचाच रामजाने, पण लेख जरूर वाचा.

तो लेख मी वाचलाय आणि तो पटला देखील आहे. शाहरुखचा वस्तुनिष्ठपणे यथार्थ लेखाजोखा मांडला आहे. शाहरुख आणि रोमान्स हे समानार्थी शब्द आहेत 90 च्या पिढीसाठी.

पण ऋन्मेष , तुम्ही जे मायबोलीवर शाखाप्रेम उधळता त्यामुळे शाहरुख आवडनेसा होतोय हल्ली.

पण ऋन्मेष , तुम्ही जे मायबोलीवर शाखाप्रेम उधळता त्यामुळे शाहरुख आवडनेसा होतोय हल्ली.
>>>>>

या लॉजिकने पुजार्‍याचा मुलगा नास्तिक व्हायला हवा Happy

तुम्ही जे मायबोलीवर शाखाप्रेम उधळता त्यामुळे शाहरुख आवडनेसा होतोय हल्ली. >>> +१११
अकृत्रिम प्रेम असेल तर असे होत नाही. भक्तांच्या मार्केटिंग मुळे अनेक चांगले नेते, खेळाडू आणि इतर सेलेब्रिटीज मनातून उतरू शकतात.

काहीही argument करून पोस्ट्स वाढवणे हा तुमचा उद्देश आहे हे माहितेय.
असो मी माझं वैयक्तिक मत सांगितलं. गीता वाचायला तसाही माझ्याकडे वेळ नाही. गोंधळ चालू दे तुमचा

Pages