अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

Submitted by रसप on 26 January, 2017 - 01:21

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-raees.html

.

raees-movie-poster.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ऋन्मेष मी पण शाखा फॅन आहे आणि या वरच्या वादात मी इतका वेळ तुझ्याबरोबर होतो :). पण अमिताभ आला की अपने रास्ते अलग हो जाते है. अमिताभ पडद्यावर कधीही भारी ठरतो. अभिनय वगैरे जाउ दे, केवळ पॉवर ऑफ पर्सनॅलिटीवर. मोहब्बते मधे दोघांनाही वाया घालवले आहे. पण त्या एका (सूर्याकडे बघण्याच्या) सीन मधे शाखा त्याला परत परत प्रश्न विचारत असतो तेव्हा तो एकदाच त्याच्या कडे वैतागून वळून बघतो तो शॉट बघ. तो सीन अचाट आहे पण इतके त्यातून सहज दिसते.

पडद्यावर भारी पडणे ही शाखाची स्ट्र्रेन्थ नाही. डर मधे सनी सुद्धा त्यात भारी पडतो. शाखाचे प्लस पॉईण्ट्स वेगळे आहेत. तू उगाचच त्याला ओढूनताणून नाही ती स्किल्स चिकटवत आहेस.

माहीराला काय लॉजिक ने निवडले आहे कळत नाही. पाकी घ्या नाहीतर अफगाणी घ्या. हीरॉइन किमान चार्मिंग हवी.

रसप - लेखाबद्दल चित्रपट पाहिल्यावर लिहीतो. असले रोल्स करणे हे शाखाचे काम नाही असेच माझे कायम मत आहे त्यामुळे जरा बिचकतच पाहणार आहे. त्यात जे डॉयलॉग ऐकले आहेत ते अगदीच ऑर्डिनरी वाटलेत.

ॠन्म्या,
तू आहेस त्याचा प्रेमी तर बस त्याची प्रेमपूजा करत Happy
पण सत्य असं आहे कि अत्यंत किरकोळ दिसणार्या आणि रोल मधे अजिबात फिट न बस्स्णार्या शाहरुख पुढे माहिरा सोडून इतर कोणीही त्याच्या पेक्षा सुसह्य दिसली असती.
फार कोणी बरी असती तर भिकारी दिसणार्या रईस कडे अगदीच दुर्लक्ष झालं असतं Proud
बाकी त्याला त्याच्या अनेक को स्टार्स नी सहज ओवह्रशॅडो केलय आणि शाहरुखला मुळात ओव्हरशॅडो करायला सिनियर स्टार बाजुला असायची गरजच नाही, अगदी आलीया भट्ट सुध्दा सहज त्याला ओव्हरशॅडो करते :).
SRK doesn't have that personality , that charisma !

Lokkanna ajibat awadat nahi tari hi lok HAVARATA sarakhe SRK che chitrapat baghayla jatat.. Gammatch aahe

ट्रेलर मधे एकाच सीन मधे खरा शाखा दिसतो - डोळ्यात औषध घालत असताना वळून हिरॉइनकडे बघून डोळा मारतो तो :). स्वदेस मधे सिगारेट फेकत असल्याचे नाटक करून पुन्हा तशीच आत आणून ओढणारा शाखा आठवला.

दीपांजली, मला आपले मत पुर्णपणे मान्य आहे. शाहरूखबाबत हे नेहमीच बघायला मिळते. टोकाचे कौतुक किंवा टोकाचा टिका. त्याला शिखरावर बसवणारे असतात, तितकेच त्याला जराही किंमत न देणारे असतात. त्याला सुपर्रस्टार मानणारे असतात, तर भंगार मानणारेही आढळतात. दोघेही आपल्या मतांवर ठाम असतात आणि गंमत म्हणजे दोघेही आपल्या जागी बरोबर असतात. कारण दोघे आपापल्या आवडीनुसार त्याची पात्रता ठरवत असतात. एक गोष्ट मात्र नक्की. यामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या नक्कीच अफाट असणार. अन्यथा आज तो जिथे आहे तिथे कधीच नसता Happy

फारेण्ड,
अमिताभ पडद्यावर कधीही भारी ठरतो. अभिनय वगैरे जाउ दे, केवळ पॉवर ऑफ पर्सनॅलिटीवर. >>>>>

अमिताभ त्याच्या उतारवयात म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये अगदीच निवृत्तीचा कपिलदेव वाटायचा. त्याचे लाल बादशाह, ईन्सानियत वा मृत्युदाता वगैरे चित्रपट मी फारसे पाहिले नाहीत. पण बडे मियां छोटे मियां मध्ये गोविंदासमोर अगदीच छोटा वाटून राहिलेला. अमिताभ त्याच्या जुन्या पिक्चरमध्ये मलाही आवडलेला असल्याने बडे मियांचा छोटे मिया झालेला बघून मलाही वाईट वाटलेले. नंतर त्याने वयाला साजेश्या भुमिका करायला सुरुवात केली म्हणून, अन्यथा निव्वळ पॉवर ऑफ पर्सनॅलिटी वगैरे त्याची त्या काळात गंडलेलीच.

आणि हो, राहिला प्रश्न डरचा, तर तो कधीचा पिक्चर आहे मला माहीत नाही. पण शाहरूख आवडू लागल्यावर त्याचा एक चित्रपट म्हणून मी पाहिलेला. सनी देओल गिणतीतही नव्हता ते बघताना. अर्थात तेच घायल, घातक किंवा दामिनी बघितले तेव्हा ते सनी देओलचे म्हणूनच बघितले गेले. येस्स, दामिनी कर्रेक्ट! जे दामिनीमध्ये सनी देओलने रिशी पकूरशी केले तेच दुर्दैवाने डरमध्ये त्याच्याशी झाले. शेवटच्या दृश्यात शाहरूखला पटक पटक के मारणार्‍या सनी देओलपेक्षा उडत उडत मार खाणारा आणि त्या जखमी अवस्थेत वेडगळसारखा तू है मेरी किरण गाणारा सनकी शाहरूखच आजही डोळ्यासमोर येतो.

त्यानंतर मी तो एक शाहरूखचा चमत्कार पाहिलेला. नसरुद्दीन शाह सारखा कसलेला अभिनेता, ते देखील भूताच्या भुमिकेत असताना, शाहरूखने साकारलेला गोंधळलेला, भोळाभाबडा युवक अफलातून होता. जर तो चित्रपट मी आधीच पाहिला असता तर तेव्हाच हे भाकीत केले असते की सुपर्रस्टार इज बॉर्न! .. त्यानंतर तो एक राजू बन गया जंटलमॅन.. नानासोबतचा.. हे मी सगळे नंतर पाहिलेले चित्रपट, आधी मला शाहरूख आवडला ते त्याच्या रोमांटीक चित्रपटातून, आणि हे काहीसे त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे. आणि तरीही आवडलेले... खरा शाहरूख असा आहे किंवा तसा आहे हे ईतक्या नेमकेपणाने आणि खात्रीने मांडणे अवघडच. रईसमध्ये मात्र भारी वाटला. मुख्य म्हणजे त्याचे वाढलेले वय जे गेल्या काही चित्रपटांत जाणवू लागलेले ते रईसमध्ये नाही जाणवले. आणि यात मेकअपचा कमाल नसून त्याने जे भुमिकेचे बेअरींग घेतले त्याला श्रेय जाते. अगदी डिअर जिंदगीमध्येही त्याने थोडीशी वयस्कर माणसाची भुमिका केली असूनही आलिया त्याकडे आकर्षित होते हे विश्वासार्ह वाटू लागते हे शाहरूखची जादू ओसरली नाही याचेच द्योतक आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या चित्रपटांबाबत मी आता कमालीचा उत्सुक आहे Happy

यामध्ये त्याच्या चाहत्यांची संख्या नक्कीच अफाट असणार. अन्यथा आज तो जिथे आहे तिथे कधीच नसता
>>>>
Ahat kuthe... Aho shakha che walay mage padat chalale ahe.. box office akade bagha tyachya movies che... Compare kara salman , akshay ani amir shi...

शारुक थंड खलनायक चांगला करतो. यात तसा असेल वाटले होते (वरचा फोटो पाहुन) पण तसं नाहिये वाटतय वरील चर्चेतुन. खरं का? मारामारीत तो शोभत नाही ते पटले. पण या वयातही त्याचे डोईवरील केस भारी आहेत.

हल्लीचा शाहरुख पाहिला कि धक्का बसतो. त्याने काय करून घेतलेय स्वतःचे? त्याच्या वयाचे सलमान आणि आमिर डोळ्याना अजूनही सुसह्य वाटतात, अर्थात वयपरत्वे येणारे फरक त्यांच्यातही दिसतात. पण शाहरुख कैच्याकै दिसतो. पन्नाशीतच त्याचा चेहरा खूप ओढलेला आणि देहबोली सत्तरीची वाटतेय. पडद्यावर जे दिसतेय ते केवळ दयनीय आहे. अमिताभची देहबोली पन्नाशीतल्या त्याच्या त्या पडत्या काळातही अशी दयनीय नव्हती. त्याची चित्रपट आणि भूमिका निवड चुकत होती पण तो स्वतः टाकाऊ वाटला नाही.

शाहरुखची तुलना अमिताभशी करणार्यांना अमिताभ न कळणे समजू शकते पण ज्याचे ते फॅन आहेत तो शाहरुखही त्यांना कळला नाहीये.

काल पाहिला. ठीक वाटला अगदी जितका हाईप केलाय तितका काही आवडला नाहिये. असो . अतुल कुलकर्णी असे रोल्स का करतो हा मला पडलेला प्रश्न. तो काय किंवा माहिरा काय कुणीही चालू शकल असत त्या भुमिकांसाठी.
अगदी छोट्या रोलमधे असलेली रईसची आई भाव खाऊन जाते. नवाजुद्दिन मला फार आवडतो, त्याचा तो मायकल जॅक्सन डांस, एक कटींग बाय टु, मिठाई खाणारा मजमुदार अफलातुन.
गाणी तर एकही लक्षात राहत नाही. फक्त ते जालिमा रेडिओ मिर्चीवर जाता येता ऐकुन माहिती होत.

मी मधे याच्यावर एक धागा ही काढला होता , की लोकाना शाहरूखचा इतका राग का येतो ?
इतका की सलमानही त्याच्यापेक्षा चांगला अ‍ॅक्टर वाटायला लागावा ? एका बाजूला नवाजुद्दीनला घेतले की मुद्दाम पिक्चर चालवायला घेतले म्हणायचे अन दुसरीकडे कुणी ओव्हर्शॅडो केलेल चालत नाही म्हणायचे .

पण एखाद्याला किंवा चित्रपटाला अगदी भिकारी म्हणण्याआधी आपण काय याचा विचार केला तर ?

फार कोणी बरी असती तर भिकारी दिसणार्या रईस कडे अगदीच दुर्लक्ष झालं असतं Proud
बाकी त्याला त्याच्या अनेक को स्टार्स नी सहज ओवह्रशॅडो केलय आणि शाहरुखला मुळात ओव्हरशॅडो करायला सिनियर स्टार बाजुला असायची गरजच नाही, अगदी आलीया भट्ट सुध्दा सहज त्याला ओव्हरशॅडो करते :).
SRK doesn't have that personality , that charisma ! >> बर . Happy

Off screen SRK is still charming and witty.. On screen, not so much these days! Sr Bachchan is still enigmatic both on screen and off screen.

शाहरुखच्या दिसण्यावर काहीही वैयक्तित कमेंट करणं योग्य नाही पण तो सिनेमाभर शाहरुख म्हणुन वावरतो किंबहुना तसा तो वाटत राहतो रईस न वाटता.
राजु बन गया जंटलमन, चखदे मधला शाहरुख फारच आवडले होते इथे मात्र नाही आवडला शाहरुख हे प्रामाणिक मत.

सलमान आणि आमिर डोळ्याना अजूनही सुसह्य वाटतात, अर्थात वयपरत्वे येणारे फरक त्यांच्यातही दिसतात. पण शाहरुख कैच्याकै दिसतो.
>>>>
यालाच म्हणतात आवड आपली आपली..... मला सलमान मुळ्ळीच सुसाह्य वाटत नाही.. अमिर पिके पासून विचित्र दिसायला लागलाय. स्पेशली त्याचे कान.. शाहरुख मला आजही क्युट वाटतो... अर्थात चेहर्‍यावर वय दिसतं पण ते तर मादुरी दिक्षितच्या चेहर्‍यावरही दिसतं... त्यातुन तिचं सौंदर्य कमी होत नाहीच की नाही?

वय 'कॅरी' करणं रेखा सारख्या एखादीलाच जमू शकतं...

सलमान सुसह्य?
म्हणजे सर्जरी करून केस उगवणारा, स्पेशल इफ्फेक्ट्स ने बनवलेली बॉडी पडद्यावर दाखवणारा, सतत अँटीएजिंग इंजेक्शन्स घेतल्यामुळे जबडा हलवताना त्रास होणारा त्यासाठी खास दर १५ दिवसांनी अमेरिकेला जाऊन उपचार घेणारा.
अरे रे रे कसली ३र्ड क्लास चॉईस आहे Biggrin

चित्रपटातील लहानपणीचा शाहरुख/लहानपणीचा रईस, ते मोठ्या कावळ्याचे अंडे आवडले. छान काम केले आहे त्या मुलाने. चित्रपट नाही आवडला. ज्या माहिराच्या 'हमसफर' साठी मी वेडी होते आता वाटू लागले आहे कि कदाचित मी त्या सिरीयलच्या हिरोसाठी बघत असावे. इतकी निराशा तिने केली.

माहिरा खान, निस्तेज, गोरी फटफटीत - दिसते नुसती. सुंदर असेलही पण कुठल्याही प्रसंगात अपील होत नाही तिचं असणं.

माहीरा खान चांगले काम करते मालिकांमध्ये पण मला खात्री होती की तिला हिरोईनचे काम जमणार नाही. पहीला बॉलीवूड सिनेमा आणि ते ही शाखाबरोबर तिला झेपले नसणार! हरकत नाही, तिने मालिकांमध्ये तिचे स्थान आधीच निर्माण केले आहे.

मी नाही बघितला , स्टोरीत काही नाविन्य वाटत नव्हत.
माझ्या नवर्याने बघितला , माहिरा खान अतिशय सामान्य आहे म्हणाला . तिच्या जागी आपली कुठलीही स्टारलेट चालली असती .
मुद्दामून पाकिस्तानातून आयात करायची गरज नव्हती .

माहिरा खानची लाईफ बनली.
एका शाहरूखबरोबर एक चित्रपट करून
आता तिने स्वदेसच्या हिरोईनसारखे गायब झाले तरी चालेन, ईतिहासात तिचे नाव कोरले गेले Happy

मला सलमान मुळ्ळीच सुसाह्य वाटत नाही..
>>>>
मला सुद्धा मैने प्यार कियाचा सलमान जास्त आवडतो. तो रवीना टंडन सोबतचा कभी तू छलिया लगता है किंवा बागी मधील चांदणी रात है तू मेरे साथ है.. जुना सलमान या आताच्या नवीन सलमानपेक्षा खूप क्यूट होता.. का तो बॉडी बनवायच्या मागे लागला समजत नाही, पण त्याची चॉईस.. पण त्या लाटेत बरेच मुलांना मी डोलेशोल्ले बनवत आपल्या सौंदर्याची वाट लावताना पाहिलेय.

पण शाहरुख कैच्याकै दिसतो. पन्नाशीतच त्याचा चेहरा खूप ओढलेला आणि देहबोली सत्तरीची वाटतेय.
>>>>

तरी तो लक्स साबणाच्या आणि फेअर एण्ड हॅण्डसम क्रीमच्या जाहीरातीत येतो Happy

यावरून त्याची क्रेझ अफाट आहे हे मान्य करावेच लागेल

Off screen SRK is still charming and witty.. On screen, not so much these days!
>>>>

ऑफ स्क्रीन म्हणजे ईटरव्यूज आणि शो होस्ट करतो, स्टेजवर एंकरींग करतो त्यात म्हणायचे असेल तर ते देखील ऑनस्क्रीनच झाले एकाअर्थी..
पण येस्स, विटीनेस आणि सेन्स ऑफ ह्युमरमध्ये ही इज द बेस्ट.
मला कधी बोअर झाले तर मी त्याचे शोज आणि ईंटरव्यूज बघतो. मनोरंजनही होते आणि बरेच काही तो शिकवून जातो.

कालही हे पाहिले..
ईथल्या लोकांनीही पाहिले तर बरेच प्रश्नांची उत्तरे मिळतील..

AIB Podcast : feat. Shah Rukh Khan (Part 01)
https://www.youtube.com/watch?v=5LFdcZe7WW4

AIB Podcast : feat. Shah Rukh Khan (Part 02)
https://www.youtube.com/watch?v=HmCfiqW0Y0I

डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? >>>>> हा प्रश्न मलाही पडलाय . असेच टाकून निघून जातात << रईस २ येणार असेल >>> त्यात या शेवटच्या सीन मधला शाहरूख झाँबी म्हणून उठतो आणि पहिला जाऊन नवाजुद्दिनला चावतो वगैरे पहायला धमाल येईल Proud

Pages