अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

Submitted by रसप on 26 January, 2017 - 01:21

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-raees.html

.

raees-movie-poster.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

जेव्हा शाहरूख, अमिताभ, अजय देवगण, संजय दत्त यासारखे कलाकार जे ईतर चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची भुमिका करतात आणि जनमाणसात त्यांची ईमेज हिरो म्हणून असते, अश्यांनी एखाद्या गुन्हेगारीच्या चित्रपटात डॉन वा गॅगस्टरची भुमिका साकारणे ईथेच मुळात उदात्तीकरणाची सुरुवात होते. ते करायचे नसते तर डॉनच्या भुमिकेत नवाझुद्दीन आणि ईनस्पेक्टरच्या भुमिकेत शाहरूख असता.>>>>>>

सहमत.

आणि हे गुन्हेगारीच उदात्तीकरण आता कस काय बर आठवत कोण जाणे ? ८० - ९० मधे तर लाट होती अशा सिनेमांची . "वन्स अपॉन" तर दाऊद वर होता ना ?>>>>>>
गुन्हेगारीचं उदत्तिकरण मला कधीच आवडलं नाही. इथे मत मांड्ण्याची संधी मिळाली इतकंच.

बघितला रईस. ठीक ठाक वाटला. अश्याच स्टोरीलाइनवरचे सिनेमे आधीही पाहिले असल्याने फार काही वेगळं नाहीये सिनेमात. वेगळं असलंच तर शाहरुखच गुजराती ढंगातल "साहेब , गुजरात कि हवा मैं बेपार है वा बॅटरी मत बोलना " हे डायलॉग . डायलॉग खुसखुशीत आहेत। गाण्यामध्ये फक्त ते उडी उडी लक्षात राहिल.

शाहरुखने अभिनय तर केलाय पण मुळातच स्टोरीमध्ये फारसा दम नसल्याने तोकडा पडतो चित्रपट. नवाजुद्दीन सिद्दीकचा मजुमदार मात्र लक्षात राहतो. चांगलं काम केलंय त्याने. मोहम्मद आयुबला फारसा स्कोप नाही तर माहिरा खान चित्रपटातली नायिकेची जागा भरून काढणे एवढेच काम करते .

शाहरुख फॅन्सना आवडेल तसा . बाकीच्यांनी टीव्हीवर पाहिल्यास फार काही नुकसान होणार नाही .

नाही आवडला चित्रपट.. तीच जुनी मांडणी... जुनी गोष्ट.. जुनीच देह बोली...
गरीब मुलगा..वाममार्गाला लागणे... गँगस्टर.. पैसे.. स्मग्लींग.. तरीही गरीबांचा वाली...आणि अपेक्षित शेवट...
नवाजसाठी बघायचा म्हटला तरीही फार दम नाही.. शा.खा.-माहीरा नो केमिस्ट्री..दोघांची स्टोरी फारच तुटक/अर्धवट..
**
नवीन Submitted by चिमाजी on 27 January, 2017 - 03:35 >>>> अगदी अगदी, हेच लिहायचे होते मला. आज पाहिला, पण थेटरात पहण्याईतका वर्थ नाहीये, असे माझे मत ट्रेलर बघुन ठरलेले आतापण योग्यच वाटतेय.

आजच बघितला. मस्त पिक्चर आहे. अमिताभच्या जुन्या पिक्चरचे काही संवाद जसे लक्षात राहतात तसेच या सिनेमाचेही राहिलेत. स्टंट्स छान आहेत. शाहरूख बेस्ट आहे यात. स्टोरीत काहीही नवीन नाही मान्य. पण पिक्चर भारीये. टोटली अँग्री यंग शाहरूख!!

@ रसप - 'अ डेत इन थ गुंज' नावाचा
कोंकना सें शरमा चा मोवी हारामकोर बरोबरच रेलेज जाला होता.. तुमि पहिला का? पहिला तर प्लीज रेवेयु येवू दया..

ऋन्मेष, 'वेलकम सारख्या विनोदी चित्रपटांमधूनही नाना आणि अनिल कपूर गुन्हेगारांकडे बघायचा समाजाचा दृष्टीकोण बदलतात का' याचे उत्तर नाही असावे. तशा सिनेमात गुन्हेगारी उगीच आपली थोडीशी गंमतीतच दाखवली जाते, मुख्य आत्मा नसतो. (वेलकम कितीवेळा पाहिलाय तरी तेवढेच हसू येते)
गुन्हीगारीचे उदात्तीकरण असुनही आवडलेला सिनेमा म्हणजे 'वास्तव'. मांजरेकरांनी बेश काम केलं त्यात.

उदात्तीकरण म्हणजे वाईट क्रुतींचं Justification , ते सामान्यतः emotional black-mail वर आधारलेलं असतं. नुसत उद्दिश्ट चांगलं असून उपयोग नाही ; ते साध्य करायचे मार्गही चांगलेच पाहिजेत.
वेलकम मधे असे केलेले नाहीये. पात्रांचे profession ते दाखवले आहे इतकेच , ते लोक व त्यांचा व्यवसाय "चांगला" असण्याचा कुठेही दावा केलेला नाहिये चित्रपटात.

'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील.

==> ह ह पु वा. फुकट तिकीटे मिळाली वाटते Happy दिवे घ्या

कसला वैताग आहे हा शिनेमा . माणसाने स्वतःवर किती प्रेम करू नये ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रईस. तद्दन एखादी रटाळ डाक्युमेंटरी पाहिल्यासारखे पदोपदी जाणवते, थोडाफार सुसह्य झालाय तो फक्त नवाजुद्दीन सिद्दीकी मुळे.

मायरा तर शाखाची काकू शोभते चक्क. अयुब ला वाया घालवलाय थोडी फार जान आलीत ती लैला मुळे (सनी बाईंमुळे )

एक तद्दन कचरा पट, पैसे वाया घालवू नका.

मी शाखाचा विरोधक नाही, चक दे, स्वदेस हे माझे आवडीचे चित्रपट पण रईस फक्त आणि फक्त बौद्धीक दिवाळखोरी आहे

पात्रांचे profession ते दाखवले आहे इतकेच , ते लोक व त्यांचा व्यवसाय "चांगला" असण्याचा कुठेही दावा केलेला नाहिये चित्रपटात.
>>>>

गुन्हेगारीच्या व्यवसायातली गंभीरता घालवून टाकली आहे.
असे पोलिसांशी केलेलेही मला फारसे रुचत नाही.

शाहरूख कमालीचा यंगिस्तान दिसलाय त्या बॅटरी लूक मध्ये>>>

शारुक वाटतोय चांगला, पण अगदी यंग वगैरे काही वाटला नाही किमान मलातरी.

दोन्ही परिक्षणं वाचली आणि दोन्ही चित्रपटही पाहिले. काबिल रईसपेक्षा थोडा बरा वाटला. तुम्ही म्हटल्याप्रमाणे रईसची सर्वात मोठी जमेची बाजु आहे शाखा आणि त्याने ती व्यवस्थित पेलली आहे, बाकी एका बाब्याने दहा जणांना लोळवणे वगैरेंचं आताशा काही नवल वाटत नाही... तुमच्याकडे एकच तक्रार आहे फक्त - दोन्ही चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या व्यक्तीरेखेबद्दल लिहिलं असतत तर बर वाटलं असत.

त्याच्यासाठी ते यंगिस्तानच आहे. कारण हातात भिंग घेऊन त्याच्या चेहरयावरची सुरकुती शोधणारे यंदा मूग गिळून निपचित पडलेत. अर्थात नवनवीन मुद्दे पुढे येतच आहेत. आज एक व्हॉटसपवर मेसेज वाचला त्यानुसार तो एका नेत्याची दारूबंदीची रॅली उधळतो त्याचे वर्णन मियांभाई रथयात्रेत तलवार घेऊन घुसले असे अलौकिक करण्यात आले आहे.

परिक्षणात साडेतीन स्टार दिसतायेत वर , अर्ध्याच्या आधीचे तीन चुकुन पडले कि काय Happy ?
असो, तर पाहिला आणि अगदीच फसलेला वाटला रईस !
सुरवात बरी झाली, छोट्या रईस ला चष्मा लागतो, अमीजान कडे पैसे नाहीत म्हणून गांधीजींच्या पुतळ्यावरचा चष्मा चोरतो , वाटलं मस्त खुसखुशीत सुरवात आहे सिनेमाची.. रईस लहान असे पर्यंत मजा वाटत होती पण ५-१० मिनिटात छोटा पोरगा लगेचच शाहरुखच्या रूपात पन्नाशीलाच आला डायरेक्ट .
शाहरुख स्क्रीन वर आला आणि सगळच फिसकट्ल !
कसला बनियेका दिमाग आणि कसली मियाभाईची डेअरिंग , पडद्यावर दिसतो फक्त सेल्फ ऑब्सेस्ड शाहरुख !
मुळात फुंकुन खिळखिळा झालेला ,थकलेला चेहरा हाणामार्या करताना बघणे , एका वेळी अनेकांना बदडणे सीन्स हे अक्षर्शः हस्यास्पद वाटते.
अँग्रीयंग मॅन इमेज टोटली मिसफिट फॉर शाहरुख !
निगेटीव्ह/ सायको रोल्स करणे वेगळं , ते जमून गेलेत ९० च्या दशकातल्या शाहरुखला पण फाइट्स ? नो वे !
अमिताभच्या काला पथ्तरच्या एका फाइट सीनला मुद्दम दाखवलय रइस मधे आणि ते पाहून रईस पण बच्चन स्टाइल मधे सर पटक पटकके हाणतो, त्यात तर असला फरक दिसतो अमिताभ आणि शाहरुख मधे !
अमिताभ स्टाइल दणके द्यायला , समोर बघत मागच्याला उडवायला तशी पर्सनॅलिटी तसा अ‍ॅटीट्युड हवा !
दुसरा अमिताभ होणे केवळ अशक्यं हे मान्यं पण त्यातल्या त्यात न्याय देणारा कोणी मिळाला नाही का ? स्क्रीन वर दिसणारा हा रईस फार किरकोळ दिसतो !
अचाट आणि आतर्क्य सिनेमे तर बच्चननेही भरपूर केलेत पण तो त्याच्या किलर परफॉर्मन्स्नी तारून न्यायचा !
मी अजय देअवगणची फॅन नाही पण आजाकालच्या काळात मग देवगण इन वन अपॉन अ टाइम इन मुंबई , बराच चांगला प्रयत्नं होता.
संजय दत्त, अक्शय कुमार सुध्दा चालला असता पण शाहरुख भयंकर मिसफिट !
असो तर टिपिकल चाऊन चोथा झालेला ८० च्या दशकातला जुना मसाला आणि लक्षात राहील असा कोणाचाही परफॉर्मन्स नसल्यानी रईस अगदीच फसलाय !
नवाजुद्दीन , अतुल कुलकर्णी असल्या सिनेमात का स्वतःला वाया घालवतात ?
अमिताभच्या इमेज मधे शाहरुख हा एक अत्याचार कमी होता कि काय कि लैला मै लैला रिमिक्स मधे सनीताई !
कुठे ओरिजनल लैला मै लैलाची हॉट अँड सेक्सी झीनत आणि कुठे या गावरान गंगुबाई सनीकाकू , लईच मिळमिळीत !
एक बालपणचा रईस बालकलाकार तेवढा आवड्ला, तो दिसतोही अगदी शाहरुख सारखा !
बाकी काहीच आवडलं नाही रईस मधलं.
स्पॉयलरः
( सिनेमा पाहिल्यांनी शंका निरसन करा, चष्मा घालणे आणि बॅटरी याचा काय संबंध ?
शेवटी रईसचे एन्काउंटर केल्यावर पोलिसांच्या जीप्स डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? )

>>म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो
आता ऋ बाळ जीव काढेल, शाखा ला चांगले म्हणल्यावर>> Lol
शाखाच्या पिक्चरचं परिक्षण म्हटल्यावर ऋन्मेष भाऊ इथेच अंथरूण पांघरूण घेऊन पसरलेले दिसतायत.

शाखाचा पिक्चर फुकट बघणंही आमच्या नियमात बसत नाही त्यामुळे पास. माहिरा खानला ती खान असल्यामुळे संधी मिळाली असावी का? नाहीतर चांगल्या हिरोईन्स भारतातही आहेतच की.

Sayo,
Not sure why Mahira was even considered .
Bad acting , very awkward dance movements , zero star value and makes weird asymmetric face movements .. bad bad bad !!
Probably SRK didn't want female lead to overshadow him so he chose to have below average actress lol

सिनेमा पाहिल्यांनी शंका निरसन करा, चष्मा घालणे आणि बॅटरी याचा काय संबंध ?>>>>> चष्मा असण्याऱ्या लोकांना बॅटरी म्हणून चिडवलं जातं. शाळेत चष्मीश लोकांना नेहमी चिडवायचे .

शेवटी रईसचे एन्काउंटर केल्यावर पोलिसांच्या जीप्स डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? >>>>> हा प्रश्न मलाही पडलाय . असेच टाकून निघून जातात .

शेवटी रईसचे एन्काउंटर केल्यावर पोलिसांच्या जीप्स डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? >>>>> हा प्रश्न मलाही पडलाय . असेच टाकून निघून जातात << रईस २ येणार असेल

शाखाच्या पिक्चरचं परिक्षण म्हटल्यावर ऋन्मेष भाऊ इथेच अंथरूण पांघरूण घेऊन पसरलेले दिसतायत.
>>>>

मी रसप यांनीच काढलेल्या हृतिकच्या काबिल धाग्यावर यापेक्षा जास्त लिहिले आहे.
अगदी लोकांनी आता बस्स झाले म्हणेपर्यंत लिहिले आहे.
आमीर खानच्या दंगल चित्रपटाच्या धाग्यावर तर लिहिलेच पण स्वतःही त्यावर तीन धागे काढलेत
तर शाहरूखचा चित्रपट असेल तरच मी तिथे जास्त लिहितो हा गोड आरोप अमान्य Happy

चष्मा असण्याऱ्या लोकांना बॅटरी म्हणून चिडवलं जातं. शाळेत चष्मीश लोकांना नेहमी चिडवायचे .
>>
डबल बॅटरी सिंगल पॉवर देखील चिडवले जायचे Happy
कदाचित हल्ली चिडवत नसतील, म्हणजे त्या काळाचा सखोल अभ्यास करून चित्रपट बनवला गेला आहे तर Happy

शेवटी रईसचे एन्काउंटर केल्यावर पोलिसांच्या जीप्स डेड बॉडी तिथेच टाकून का निघून जातात ? >>>>> हा प्रश्न मलाही पडलाय .
>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स. मलाही हा प्रश्न पडलेला. पण तसाही पिक्चर संपल्याने आता हे टेंशन घेउन घरी का जा म्हणून झटकून टाकला

रईस २ येणार असेल >>>>>>>>>>> आमीन Happy Happy

>>Probably SRK didn't want female lead to overshadow him so he chose to have below average actress lol>> हे अगदी पटण्यासारखं आहे.

Probably SRK didn't want female lead to overshadow him so he chose to have below average actress >> त्याला कुणिच त्याच्या शॅडो मधेही चालत नाही कारण सतत ओवाळु आरती मोड मधे असण आणी व्यावसायिक गणित , तो स्वतः प्रोड्युसर आहे त्यामुळे जे स्वस्तात मिळतिल अशी साईडकास्ट निवडलीये.

म्हणजे स्वतःच्या दम वर चित्रपट चालवू शकेल असा जबरदस्त विश्वास आहे Wink
कुबड्या घेण्यापेक्षा हे चांगले आहे.

>Probably SRK didn't want female lead to overshadow him so he chose to have below average actress lol>> हे अगदी पटण्यासारखं आहे.>>>

त्यांनी पुढे लोल म्हणजे गंमतीने म्हटलेय ते.
बाकी शाहरूखखान समोर कोणत्या कलाकाराने पडदा खाल्लाय असे कधीच घडले नाही.
किंबहुना जे अमिताभला जमले नाही ते एखाद्या हिरोईनला जमेल असा विचारही मनात येणे अशक्य आहे Happy

>>त्यांनी पुढे लोल म्हणजे गंमतीने म्हटलेय ते.>> हो? तिची पूर्ण पोस्ट वाचली नसल्यास वाचणेचे करावे म्हणजे कळेल काय ते.

तो स्वतः प्रोड्युसर आहे त्यामुळे जे स्वस्तात मिळतिल अशी साईडकास्ट निवडलीये.
>>>>
मला नाही वाटत असे. उलट तो कमालीचा व्यावसायिक आहे. त्याच्यासारखे मार्केटींगचे जाण असलेला आणि त्यावर फोकस करणारा कलाकार विरळाच. तो पिक्चरच्या बजेटसाठी कधी विचार करत नाही. उलट तांत्रिक बाबींवर तो सढळ हाताने खर्च करतो. त्याच्यासाठी चार पैसे जास्त गेले तरी चालेल पण त्याचे पिक्चर चालणे जास्त महत्वाचे आहे. मग भले नेट प्रॉफिट कमी का होईना. कारण चित्रपटातून प्रॉफिट कमी झाला तरी त्याचे चाललेले आणि चर्चा झालेले चित्रपट त्याची ब्रॅण्ड वॅल्यू, आणि शाहरूख खान हे ब्रॅण्ड नेम टिकवून ठेवायला मदत करतात आणि त्याच्या जीवावर तो अफाट छापू शकतो.

महिरा खान घेण्यामागे एखादा नवीन चेहरा ही गरज असेलच, पण मुद्दाम खान व पाकिस्तानी कलाकार घेणे ही सुद्धा नक्कीच तिकडचे आणि ईस्लामिक देशांचे मार्केट खायची एक ट्रिक आहे. नवाझुद्दीनलाही नक्कीच स्वस्तातला म्हणून नाही घेतले तर आजच्य तारखेला क्रिटिक्सना आवडणारा एक चेहरा म्हणून घेतलेय. आणि त्याला आपल्या स्टारडम खाली दाबायचा प्रयत्न न करता त्याला त्याची फुल स्पेस देत वापरला आहे. लैला ओ लैला या गाण्यासाठी सनी लिओनने कतरीना कैफ पेक्षाही जास्त पैसे घेतले असतील तर नवल वाटायला नको. चित्रपटाच्या पहिल्याच ट्रेलरमध्ये तिची एकच झलक दाखवणे आणि त्याने साधलेला इफेक्ट यातच ते पैसे वसूल झाले असावेत.

तिची पूर्ण पोस्ट वाचली नसल्यास वाचणेचे करावे म्हणजे कळेल काय ते.
>>>
मला त्या लोलचा जो अर्थ लागला तो सांगितला. खरा अर्थ वेगळा असेल तरी हरकत नाही. त्याने पुढे मी लिहिलेय ते बदलणार नाही Happy
पुढे म्हणजे हे >> बाकी शाहरूखखान समोर कोणत्या कलाकाराने पडदा खाल्लाय असे कधीच घडले नाही.
किंबहुना जे अमिताभला जमले नाही ते एखाद्या हिरोईनला जमेल असा विचारही मनात येणे अशक्य आहे Happy

Pages