अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

Submitted by रसप on 26 January, 2017 - 01:21

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/01/movie-review-raees.html

.

raees-movie-poster.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रिव्ह्यू आवडला.
'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मधला ड्र्ग्स, दारु याचं स्मगलिंग करणार नाही, करु देणार नाही हे तत्व पाळणारा अजय देवगण आवडला होता. 'रईस' मधे मुळात इकडेच लोचा आहे. मोठया पडद्यावर ट्रेलर पाहिला तेव्हा 'रईस' चं कॅरॅक्टर शाखा ने जबरदस्त उभं केलं असणार ह्याची खात्री आहे . बरोबरीला नवाजुद्दीन ही आहेच. या मुळे सिनेमा पहावा की नाही या संभ्रमात आहे.
अवांतरः - 'काबील' आणि 'रईस' च्या दिग्दर्शकांची अदला-बदल झाली असती तर ! Happy

'काबील' आणि 'रईस' च्या दिग्दर्शकांची अदला-बदल झाली असती तर >>>
तर "कांटे" अ‍ॅसिड फॅक्टरी इ. चित्रपटांसारखा आपल्याला "रईस" पिवळ्या रंगात बघावा लागला असता.

मला यातले संवाद नाही आवडले.. ट्रेलरमधे तरी नाही.. नवाझ साठी बघेल शायद..अय्युब पन आवडता.. पण एखाद्याला चित्रपट पाहायला चल म्हणुन खुप पटवावं लागेल इतके हेटर्स भरलेत माझ्या मित्रपरिवारामधे.. अन हा सगळा विचार फक्त रसप तुमच्या रिव्ह्यु मुळे Happy भगवान बचाए...

कबिल पन चन्ग्ल मोवी आहे ... ह्रिथिक चे बेस्त पेर्फोर्मन्चे आहे अतपर्यन्त्चे>>>> मझ्या म्ते तुम्चे मलाथि या दोन्हि मोवि पेक्शा चन्ग्ल आहे.

शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.
>>>>

एक नंबर!
मी तर हे ट्रेलर बघूनच बोल्लेलो

रसप प्लीज नाही म्हणू नका.. हे परीक्षण तुमच्या नावासह आणि या मायबोली लिंकसह .. वाटल्यास तुमच्या ब्लॉगची लिंक द्या.. त्यासहही.. मी व्हॉटस्स्स्प वर शेअर करणार आहे..

bhayankar faltu pichchar aahe... shahrukh divsendivas bakalpana karat aahe... atishay ghan

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' मधला ड्र्ग्स, दारु याचं स्मगलिंग करणार नाही, करु देणार नाही हे तत्व पाळणारा अजय देवगण आवडला होता. 
>>>>>

हे तत्व आणखीही काही चित्रपटांत पाहिले आहे. पण हे उगाच काहीतरी चांगली बाजू दाखवायची म्हणून वाटते. म्हणजे ईतर सारे बेकायदा गुन्हे ज्यात चोरी लुटमारी खंडणी काळाबाजार खूनखराबा आणि वेळप्रसंगी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निष्पाप जीवांच्या रंगाने हात माखलेले असतात ते सारे गुन्हे माफ ..

मला personally हे असले गुन्हेगारीचे उदात्तीकरण असलेले चित्रपट नाही आवडत.

अनुस्वार देणे काही केल्या जमत नाहिये!>> कॅपिटल एम लिहायचा ex. gaMmat = गंमत

मला personally हे असले गुन्हेगारीचे उदात्तीकरण असलेले चित्रपट नाही आवडत.>> तरी मला John Wick बहोत बहोत आवडला. Happy

क्या बात! रईस पाहण्याची उत्कंठा आता अजून वाढली Happy

माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे >>> अगदी अगदी. हे प्रोमोज मधे पण वाटतं.

>>शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.<<

शाखा रोज सकाळी उठल्यावर आरश्यासमोर "मी मोठा झाल्यावर, मला अमीत अंकल व्हायचंय..." म्हणत असावा...

शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.
>>>>

एक नंबर!
मी तर हे ट्रेलर बघूनच बोल्लेलो>>>>>>>>>>>>>+ १००००००००००

बरोब्बर आहे. शाहरुख जैसा कोइ नही. He is Number 1. जलनेवाले जला करे

शारुक असल्या भुमिका चांगल्या करतो, रोम्यांटिक भुमिकांपेक्षा. त्यामुळे यातही त्याने चांगले काम केले असेल नक्की.
तरी हा सिनेमा फुकट मिळाल्यावरच पहाणार कारण वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे गुन्हेगारांना वावा करणार्‍या कथा आवडत नाहीत. पण शारुक व सिद्दिकी साठी पाहीन.

नाही आवडला चित्रपट.. तीच जुनी मांडणी... जुनी गोष्ट.. जुनीच देह बोली...
गरीब मुलगा..वाममार्गाला लागणे... गँगस्टर.. पैसे.. स्मग्लींग.. तरीही गरीबांचा वाली...आणि अपेक्षित शेवट...
नवाजसाठी बघायचा म्हटला तरीही फार दम नाही.. शा.खा.-माहीरा नो केमिस्ट्री..दोघांची स्टोरी फारच तुटक/अर्धवट..
**

मित्राला अज्जिब्बात आवडला नाही...भावाने सुद्धा सेम रिव्ह्यु दिला...
आता माझापन थेटरात पाहायला पास.. हिम्मत होईना.. तसेपन संवाद आवडले नव्हतेच हे एक कारण पुरेल..
आता जॉली एलएलबी २ बघेल.. आणि हरामखोरसुद्धा Happy

काबिल पहा मित्रनो... मला अवद्ला... ह्रेथेक रोसन् चा अतपर्यन्त्चा बेस्त पेर्फोर्मन्से आहे

छान लिहिलय .
आणि हे गुन्हेगारीच उदात्तीकरण आता कस काय बर आठवत कोण जाणे ? ८० - ९० मधे तर लाट होती अशा सिनेमांची . "वन्स अपॉन" तर दाऊद वर होता ना ?

जेव्हा शाहरूख, अमिताभ, अजय देवगण, संजय दत्त यासारखे कलाकार जे ईतर चित्रपटांमध्ये मुख्य नायकाची भुमिका करतात आणि जनमाणसात त्यांची ईमेज हिरो म्हणून असते, अश्यांनी एखाद्या गुन्हेगारीच्या चित्रपटात डॉन वा गॅगस्टरची भुमिका साकारणे ईथेच मुळात उदात्तीकरणाची सुरुवात होते. ते करायचे नसते तर डॉनच्या भुमिकेत नवाझुद्दीन आणि ईनस्पेक्टरच्या भुमिकेत शाहरूख असता.

तसेच वेलकम सारख्या विनोदी चित्रपटांमधूनही नाना आणि अनिल कपूर गुन्हेगारांकडे बघायचा समाजाचा दृष्टीकोण बदलतात का याचीही एक जनमत चाचणी घ्यायला हवी.

Pages