विषय

Submitted by जयदीप. on 16 January, 2017 - 01:14

विषय झालाय हा गावात चर्चेचा
किरण येईल का घरट्यात आशेचा

कसे वागायचे बागेत दुनियेच्या?
फुले तोडू नका, पडतील ती वेचा

विजेने घेतला का जीव कैद्याचा
किती अलवार होता स्पर्श तारेचा

फुले दिसताक्षणी वळते तुझे डोके
असावा दोष हा नक्कीच मानेचा

हवी आहे तुला ही पारदर्शकता?
जगा, वाचून ये इतिहास काचेचा

कमी नाही तुझ्या माझ्यातले अंतर
कमी होईल का परिणाम हाकेचा

Group content visibility: 
Public - accessible to all site users