शी शु पालकत्व

Submitted by विद्या भुतकर on 12 January, 2017 - 14:58

डिस्क्लेमर: प्रत्येकाची 'विनोदा'ची व्याख्या वेगळी असू शकते. त्यामुळे लेख 'विनोदी लेखनात' का दिलाय वगैरे प्रश्न विचारू नयेत.

आयुष्यात ...... (एकदा 'आयुष्यात' या शब्दाने सुरुवात होणाऱ्या गोष्टी मोजल्या पाहिजेत. निदान एका दिवसात किती बोलते ते तरी.) हा तर.... आयुष्यात म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यात, 'सडासंमार्जन' या शब्दाचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे असे समजून बरीच वर्ष काढली. त्यातला 'टिंब' कुठून कुठे गेला असणार हे सूज्ञांस सांगणे न लगे. हा तर.... आयुष्यावर बोलत होते. रोज सकाळी उठून 'प्रातर्विधी' आटोपणे यामध्ये केवळ शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला वेळेत पोचणे आणि तिथे जाऊन 'गुडगुड', गडबड होऊ न देणे इतकाच हेतू होता. उठण्याच्या वेळेवर आत बसायला मिळणारा वेळ ठरतो आणि हो, घरात किती बाथरूम आहेत यावरही. आमच्याकडे एकच असल्याने आई सर्वांना एकेक करून उठवायची किंवा तुमच्या सवयीनुसार. म्हणजे कुणी आत जाऊन डोळे उघडतो, कुणी चहा घेऊन, कुणी ब्रश करून-चहा घेऊन तर कुणी सर्व आटोपून अंघोळीला जायच्या आधी. एकटे असताना किंवा दुकटे झाल्यावरही काही विशेष फरक पडला नव्हता. दिवसातला जास्तीत १५ मिनिटांचा वेळ सोडला तर बाकी वेळ जगातली सर्व महत्वाची किंवा फालतू कामे करायला रिकामा होता. ही पोरं झाली आणि सर्व चित्र बदललं.

शी आणि शू या आयुष्याचा किती मोठा भाग बनू शकतात हे त्यांनीच आम्हाला शिकवलं आहे, अर्थात अजून बऱ्याच गोष्टी शिकवल्यात त्यातली ही एक. जन्म झाल्या झाल्या दोन तासांतच नवऱ्याला 'लहान बाळाचे डायपर कसे बदलायचे' याचा धडा मिळाला होता. नर्सने चांगले शिकवले असावे कारण दोन्ही मुलांच्या वेळी तो त्याला चांगलाच कामात आला(आणि माझ्याही:) ). हॉस्पिटलमध्ये होतो ते तीन दिवस ठीक होतं पण घरी आल्यावर पहिले २ महिने दिवसातून दहा वेळा डायपर बदलायचे म्हणजे जरा जास्तच झालं होतं. बरं त्यात शी चा हिशोब वेगळा, शु चा वेगळा. आणि हे सर्व का करायचं तर बाळाला शी, शु सर्व नियमित होत आहे ना, त्याचा रंग बरोबर आहे ना? हे सर्व कळलं पाहिजे. प्रश्न डायपर वापरतो किंवा नाही याचा नाहीये. प्रश्न हा आहे की दिवसातले किती तास आणि किती वेळ इतर कामे करण्यात घालवत होतो आणि आता तोच शी-शु वर.

बरं, नुसतं असं नाही की साफ केलं आणि झालं. जरा रडायला लागलं की, आजी सुरु होते,"अगं भूक लागली असेल त्याला". नुकतंच दूध पाजून दमलेली आई वैतागते. मग म्हणते,"ढेकर काढला नसेल. ढेकर येतो का बघ" म्हणून बाळ बाबाच्या हातात जातं. बराच वेळ थोपटलं तरी बाळ काही ढेकर देत नाही आणि रडायचंही थांबत नाही. मग आजी अजून एकदा बोलते,"तरी तुला म्हटलं होतं दोन महिने कळ काढ. थोडं बिनचवीचं खाल्लंस तर काही बिघडत नाही. गॅस झाला असेल त्याला. मी ओव्याचा शेक देते". आजी आणि आई शेकण्यात व्यस्त असताना बाबा बायकोसाठी केलेली खीर खाऊन, तिच्यासाठीच केलेला ओवा-तीळ खाऊन बसलेला असतो. ओवा कधी कामाला येतो कधी नाही. काहीच नाही झाले तर ग्राईप वॉटर म्हणजे तर नवीन आई-बाबांसाठी देवाने साक्षात स्वर्गातून पाठवलेलं अमृतच आहे. किती वेळा त्याने रात्रीची झोप वाचवली असेल ते देवालाच ठाऊक. काहीच उपाय चालेनासा झाला तर 'दृष्ट काढणं' तर ठरलेलंच असतं.

पहिले दोन महिने झाल्यावर बाळाला दूध पचायला लागतं. आणि शी करण्याचं प्रमाण कमी होतं. दिवसाला ४ वेळा करणारं बाळ दोन तीन दिवस झाले तरी 'शी' करत नाही म्हणजे काय? किती तो जीवाला घोर? बाळाला काही खायला देता येत नाही त्यामुळे आईवरच सर्व खाण्याचे प्रयोग चालू असतात. काहीही कारण नसलं तरी एरवी हसत खेळत असलेल्या बाळाचा "चेहरा किती कोमेजून गेला गं" म्हणून आजीला वाईट वाटत असतंच. ऑफिसला गेलेले बाबा दुपारी फोन करून 'बाळाने शी केली का नाही?' असे महत्वाचे प्रश्न विचारतात. आईही मग झाल्या झाल्या 'पोरगं बोर्डात आलं' या आनंदात बाबांना फोन लावते. "हो हो अगदी पिवळी. हा सुरुवातीला जरा त्रास झाला त्यामुळे रडत होती. पण खेळतेय आता. हो ना झाली बाई एकदाची. " वगैरे संवाद ठरलेले असतात.

हे काम दुपारी होऊन गेलं तर ठीक. पण तेच मध्यरात्री झालं तर शी पुसायला घेतलेले वाईप चुकून आपल्याच तोंडाला पुसले जातील इतकी झोप येत असते. एखादा उत्साही आई किंवा बाबा असेल तर 'हा चालू दे' म्हणून रात्री दोन वाजताही बाळाशी गप्पा मारत बसतो. तर एखाद्या वेळी, दोन चार दिवसांनी शी झाल्याने पोर एकदम खुश होऊन खेळत असतं आणि इकडे ते कधी झोपून आपल्याला सुट्टी मिळते याचा विचार करत असतो. त्यातही कौतुक असतंच, दुसऱ्या दिवशी एकमेकांशी बोलताना सांगितलं जातं,"हो ना? किती ते चेकळायचं? ".आणि हे कौतुकाचे बोल 'आईबाबांची कशी गंमत केली बाळाने' या टोन मधेच होत असतात. मुलगा असेल तर त्यात तोंडावर तुषार उडणे हे एक नेहमीचेच आहे. आई-वडील होईपर्यंत ज्या गोष्टींचा विचारही केलेला नसतो त्यावर तासनतास डिस्कशन होऊ शकतात. लाईफ चेंजेस सो मच !

मुले साधारण दोनेक वर्षाची झाल्यावर चित्र थोडं बदलत. डायपर नसेल तर उत्तमच आहे, तरी त्यासाठीही बॅग मध्ये ज्यादा कपडे घेऊन जा किंवा ऐनवेळी आपलेही कपडे खराब झाल्यावर धावपळ होऊ नये यासाठी खबरदारी घ्यायलाच लागते. काही सणाला कार्यक्रमाला जायचं असेल तर नक्कीच. नाहीतर पैठणी घातली तर 'तो माझा नव्हेच' म्हणत दिवसभर पोराला बाजूला ठेवावं लागेल. Happy डायपर असेल तर बरेच त्रास टळतात. पण डायपर फेजमधून बाहेर पडणे हेही काही छोटे काम नाही. "बाबा शु आली" म्हणत ते पळत आलं की आईबाबा हातातलं सर्व टाकून त्याला बाथरूममध्ये घेऊन जायला पळतात. बाथरूममध्ये जाऊन खरंच केली तर टाळ्याच! किती ते कौतुक ! Happy पण नुकत्याच मावशी फारशी पुसून गेल्यावर शु केल्यावर सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे असतात. मला तर वाटतं या पोरांना चांगलं माहित असतं काय करायचं नाही ते, तेच करतात !

या फेजमध्ये मुलांना बाहेर नेणं म्हणजे हातात बॉम्ब घेऊन फिरण्यासारखं आहे. एक तर घरून निघताना, तासभर बसवून थोडी का होईना करू दे म्हणून आग्रह करायचा. आणि तरीही तुळशी बागेत एखाद्या दुकानात साडी बघायला बसलं की बरोबर तेव्हाच सुरु होतात,"आई शु आलीय. जोरात आलीय." मग एकतर आईला साडी सोडवत नसते आणि बाबाला कळत नाही की त्याला त्या गर्दीच्या जागी कुठे घेऊन जाणार? कुठल्यातरी हॉटेलात नेऊन आणलं की येताना एक मोठ्ठा फुगा किंवा चॉकलेट मुलाच्या हातात दिसत असतंच. Happy आई खुश आणि मूलही. बाबाची मात्र जोरदार चिडचिड होत असते ती मुलामुळे का बायकोच्या खरेदीमुळे हे मात्र कळत नाही. अशा अनेक ठिकाणी आपली वाट लावण्यात पोरं पटाईत असतात. मॉलच्या दुसऱ्या टोकाला आल्यावर, सिनेमा अगदी महत्वाच्या पॉईंटवर असताना , भांड्यात फोडणी जळत असतानाच बरोबर 'जायचय' म्हणून सांगणे हे तर नेहमीचेच आहे. शिवाय बाथरूममधून ओरडून (अनरिलेटेड) प्रश्न विचारणे, 'आई शी झाली' असं अख्ख्या बिल्डिंगला ओरडून सांगणे, पब्लिक टॉयलेटमधे गेल्यावर शक्य तितक्या घाणेरड्या वस्तुंना हात लावणे, अशी छोटी मोठी कामेही करतात.

आता आमची जरा मोठी झाली. शाळेत जायला लागल्यावर थोडी शिस्त आली. पण तरीही अनेकदा थोडीफार का होईना पळापळ होतेच. कधी पोट बिघडलं तर किंवा पाणी कमी प्यायलं तर थोडं लक्ष द्यावं लागतं. अशा वेळी मग पाणी पिऊन शतपावली करायला लावणं किंवा 'भाज्या भरपूर खा' म्हणून ओरडणं हे करायला काही वाटत नाही. पण ती त्यांची लहानपणीची फेज आठवून हसू येतं. आणि थोडं हुश्श पण होतं. बाकी सध्या जे यातून जात आहेत त्यांना ऑल द बेश्ट !

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उठण्याच्या वेळेवर आत बसायला मिळणारा वेळ ठरतो आणि हो, घरात किती बाथरूम आहेत यावरही.
>>>

अगदी अचुक निरीक्षण व विश्लेषन Happy !!!!

अरे रे! इश्क मुबारक चा पुढचा भाग इतका ट्रॅजिक असेल असं वाटलं नव्हतं ! स्मित >> अरे रे ! ध्यानातच नाही आल. नाहितर १०व्या भागात हे नक्कि आले अस्ते. Wink

>>आई शेकण्यात व्यस्त असताना बाबा बायकोसाठी केलेली खीर खाऊन, तिच्यासाठीच केलेला ओवा-तीळ खाऊन बसलेला असतो. >> Rofl
>>श्क मुबारक चा पुढचा भाग इतका ट्रॅजिक असेल असं वाटलं नव्हतं !>> Proud ज्या वाचकांनी इश्क मुबारक गोष्टीत स्वतःला इमॅजिन केलं असेल त्यांच्याकरता हा लेख न वाचण्याचा सावधानीचा इशारा टाका. शुभमंगलं च्या आधीच पसार होतील बिचारे.

maitreyee, सायो तुमचा इश्क मुबारक चा 'असर' अजून बाकी आहे बहुतेक. :)) अजून दोन दिवस जाऊ द्याय्चे होते बहुदा. Happy

बरेच दिवस झाले हे लिहायचे होते, पण ती कथा चालू होती म्हणून थाम्बले होते.

मॅटर्निटी लिव नंतर मी ऑफिस जॉइन केलं, पहिल्या दिवशी चा अनुभव
मला खुर्ची वर बसल्यावर जाणवल की एका विशिष्ट कोनात वाकलं की मला बाळाच्या शी चा किंचित वास येतोय ओढणी ला...का कोण जाणे मला छान च वाटलं होतं....तसही काही काम तर नव्हतं पहिल्या दिवशी, पण बाळाच्या आठवणी सोबत हा ओळखीचा वास, मला बरंच वाटत होतं....

ह्या शी शु च्या खूप किस्से असतात....जसे जरा मोठे होतात तसे मुलं वर्णन करून सांगतात, आई आज मी ३ शी केली....वगैरे वगैरे....हाहाहा...
सोसयट्यांमध्ये सकाळी, आई झाली, बाबा झाली असं ऐकलं की स्वत्:शीच हसु येतं....

विद्या, अगदी अगदी झालं वाचुन. Happy
सगळ्याच फेजमधुन गेलेय आणि अजुनही जात आहे. छान लिहिलंय.
पोरगं बोर्डात आलं' आणि आजीबद्दल तर सेमच.

एकदम मस्त! अगदी पटलं. फार सविस्तर लिहिण्यात अर्थ नाही, पण ' बाळाला हिरवी शी होते' या प्रश्नाने कित्तीतरी दिवस माझं डोकं खाल्लं होतं. सगळी उपलब्ध पुस्तकं, इंटरनेट, डॉक्टर हे वेगवेगळी उत्तरं आणि उपाय देत होते. हरे रामा! शेवटी पिवळी शी झाली तेव्हा आनंदाने नाचायची बाकी होते Biggrin
आणि बाळ तर मजेत असतं. आठ आठ दिवस शी न करतासुद्धा.

धन्यवाद. Happy

शेवटी पिवळी शी झाली तेव्हा आनंदाने नाचायची बाकी होते >> Lol

आई झाली, बाबा झाली >> haha
कालच पोरान्चे अक्रॉस बाथरुम बोलणे चालू होते. म्हटले गप्प बसा आता. नाहितर, इक्डून 'दीदी तू काय करतेय्स? ' आणि तिकडून 'मी खालच्या बाथरुम मधे आहे. मला ऐकू येत नाहिये' चालू होते. आम्चे कान दोन्हीकडे. Happy

विदया.

आम्ही नुकतेच पॉटी ट्रेनींग चे दिव्य पार पाडलेले असल्यामुळे लेख वाचताना मजा आली. सगळे अनुभव आठवले. मुल ३-४ वर्षांच झालं तरी आई बाबा ज्या तपशीलवारपणे त्याच्या शु शी ची चर्चा करतात त्याला तोड (आणि पर्यायही) नाही Happy
मी लहान असताना माझी पण एक गंमत होती.. मला रेल्वे स्टेशन वर गेलं कि हमखास 'लागायची'. म्हणजे कोण्या पाहुण्यांना घ्यायला जा किंवा स्वतः प्रवासाला जाणार असा, माझा "प्रॉब्लेम" ठरलेला! शेवटी आमच्या घरचे माझ्यासाठी अर्धा तास लवकर पोचायचे! अनेकदा बाबा मला पटकन उभ्या असलेल्या ट्रेन मधे घेऊन जायचे पण तिथे आत बसल्यावर आता ही गाडी कधीही सुटेल आणि आपण आतच अडकू ह्याचीच मला प्रचंड भिती Happy बाबांच्या पेशन्सला मात्र आता दाद द्याविशी वाटते. तेव्हा कधी जाणवलं नाही पण आता माझ्या मुलाच्या वेळी पळापळ करताना ती आठवण नेहमी येते..