डायरी तशीच राहते...

Submitted by सत्यजित... on 5 January, 2017 - 18:02

वर्षं बदलतात...
एखादी डायरी तशीच राहते!

पानांच्या आडून सतत
बाहेर डोकावणारं मोराचं पीस...
प्रेयसीच्या जन्मतारखेवरुन
लग्नाची तारिख असलेल्या
पानावर हलवलं जातं...
बायको बिचारी कौतुकाने
आनंदात न्हावून निघते..बाकी,
डायरी तशीच राहते!

ही माहेरी जाते तेंव्हा एक-दोन
मित्रं-मैफिली..ठरलेलं जसं...
मग कपाटाच्या कोपऱ्यातुन डायरी
अलगद ओठांपर्यंत येते,
मग घरभर पसरते...हसते,खिदळते,
रडते आणि भिजते...पण तरी,
डायरी तशीच राहते!

माहेरुन येते न येते
अवघं घर डोक्यावर घेवून
बायको घर आवरायला घेते,
नवं-जुनं अडगळीतलं,उपयोगी-टाकाऊ
बरंच सापडतं, ते सांगते...
मला अचानक आठवते डायरी!
फेकली नसेल चुकुन?
कपाट उघडुन पाहतो...
डायरी तशीच राहते!

थकली असशील ना दिवसभर?
म्हणत मी जवळ घेतो,
तोवर ती कविता ऐकव
म्हणून हट्ट करीत बसते..
नुकताच हदरुन सावरलेला मी
जड पावलांनी डायरी घेवून येतो...
डायरी तशीच राहते!

मित्रांसोबत त्या हालतीत असतानाही
बायकोच्या आठवणीनं
ठरलेल्या जागी ठेवलेलं मोरपीस
डोकावून न्यहाळंत असतं...
आमचा रोमान्स!!
मी उसणं हसत बायकोसाठी म्हणून
तेच पान उघडतो...
पुन्हा हदरतो,पाहतो...पाहतो-हदरतो!
मोरपिस जुन्या जागी दिसतं!
गालात हसणारी बायको डोळ्यांनीच
दिलखुलास मान्य करुन म्हणते...अरे वेड्या,

डायरी तशीच राहते...डायरी तशीच राहते!!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users