दंगल - एका जिद्दीची कहाणी

Submitted by आशुचँप on 25 December, 2016 - 16:22

हा काही रिव्हू नाही आणि असेही मला रिव्हू लिहीताही येत नाहीत. पण दंगल पाहून आल्यावर जे भारावल्यासारखे झाले आहे त्यामुळे दोन शब्द.

एकतर फारा काळाने एक खूप सुंदर बायोपिक बघायला मिळाला. नाहीतर आपल्याकडे बायोपिकच्या नावाखाली काय काय माल मसाला घुसडला जातो हे मेरी कोम, अझर, काही प्रमाणात धोनी आणि भाग मिल्खा भाग ने दिसून आले आहे. पण दंगल अगदी तंतोतंत नाही पण खूपच प्रमाणात मूळ कथेशी इमान राखतो.

मुळात बायोपिक करताना स्टोरी तयार असते, एक लाईन मिळालेली असते, पण ती स्टोरी कशा पद्धतीने मांडायची, कशावर भर द्यायचा, एकीकडे माहीतीपट होऊन कंटाळवाणी, रटाळ न होऊ देता रंजक पद्धतीने सादर करण्याचे शिवधनुष्य अमिर खान आणि टीमने यशस्वीरित्या पेलले आहे.

मुळात महावीर फोगट या व्यक्तिमत्वातच इतके नाट्य भरले आहे त्यात वेगळा माल मसाला घालायची गरजच नव्हती. पूर्णपणे पुुरुषी मानसिकतेने भरलेल्या हरियाणासारख्या राज्यात, जिथे स्त्रीभ्रुण हत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिथल्या एका खेड्यात मुलींना आखाड्यात उतरायला लावायचे ही कल्पनाच अतिशय विलक्षण आहे.

काय काय सोसावे लागले असेल त्यांना आणि त्यांच्या पेक्षा फोगाट बहिणींना. एकतर मनाविरुद्ध वडीलांच्या इच्छेखातर पैलवानी करायची आणि येता जाता हिणकस टोमणे, कुत्सित नजरा आणि न जाणे काय काय झेलले असेल त्या पोरींनी. खरेच सॅल्युट करावा वाटतो त्यांना.

एकतर ज्या वयात खेळ मस्ती करायची त्या वयात कठोर परिश्रम, कडक डाएट, सकाळ -सध्याकाळ एकच ध्यास, घाम, अश्रू, रक्त, दुखापती, मानसिक तणाव. आणि हे एक दोन दिवस किंवा महिने नाही. वर्षानु वर्षे, अखंडीत, एखाद्या व्रतस्थ मुनीसारखे. आणि याचा निर्णय लागणार काही मिनिटात, काही क्षणात. एक चूक आणि इतक्या वर्षांच्या कठोर मेहनतीवर पाणी. त्याने खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात.

अर्थात सगळेच खेळाडू यातून जातात, नाही असे नाही. पण फोगाट बहिणींना केवळ इतकेच नव्हते, कारण त्यांचा पराभव हा चूल-मूल च्या चौकटीत अडकलेल्या समस्त महिलावर्गाचा मानला जाणार होता. मुलींनी हेच करायचं असत, नव्हे त्यांनी तेच केलं पहिजे असे वयात यायच्या आधीपासूनच मनावर बिंबवणारा समाज त्या चुकतायत कधी आणि आपण त्यांना बघा, आम्ही सांगत होतो ना, असे म्हणायला टपला होता. त्या सर्व समाजाच्या नाकावर टिच्चून त्यांनी यश मिळवले. आणि हे सगळे नाट्य दंगल फार सुरेखरित्या तीन तासात मांडतो.

मैदानाव्यतिरिक्त खेळाडू आणि त्याच्या कुटुंबियांना अनेक ठिकाणी लढावे लागते, पैसे, स्पॉन्सरशीप, खेळातले राजकारण, कोचचे हेवेदावे, गटबाजी आणि अजूनही त्यात फार फरक पडलेला नाही, आणि या सगळ्यांना दंगल अलगद स्पर्श करत जातो.

कलाकारांबद्दल तर काय बोलणार. चारही जणींनी (लहान वयातल्या गीता आणि बबीता - झैरा वासिम, सुहानी भटनागर आणि नंतर मोठ्या फातिमा शेख आणि सान्य मल्होत्रा). त्या अक्षऱश भूमिका जगल्यात. अर्थात त्यांच्याकडून कसून मेहनतही करून घेतलीये.

https://www.youtube.com/watch?v=kGZjouuqY4E

इथे त्यांची तयारी बघता येईल.

आणि इथे खऱ्या गीता आणि बबीता दंगल बद्दल बोलताना

https://www.youtube.com/watch?v=wq5nvjSwNnw

अमीर बद्दलही तेच. कुठेही त्याचे स्टारडम जाणवत नाही, एक जिद्दी बाप आणि त्याचे झपाटलेपण अतिशय सुरेख. गिरीश कुलकर्णीही छोट्या भूमिकेत भाव खाऊन जातो.

अॅकडमीचे बरेचसे शूटींग पुण्यात बालेवाडीमध्ये झाले आहे, पडद्यावर बालेवाडी क्रीडा संकुल काय सुरेख दिसते राव, मस्त वाटले एकदम.

दुर्दैवाने युथ कॉमनवेल्थ गेम्स २००८ साली पुण्यात झाल्या त्यात महिला कुस्तीचा समावेश नव्हता नाहीतर फोगाट बहिणींना प्रत्यक्ष लढताना पहायला मिळाले असते.

गुंड बहिण-भाऊ

अर्थात पुण्यातही एक असेच जीते जागते उदाहरण आहे. आळंदी येथील दिनेश गुंड. त्यांनीही त्यांच्या मुलीला अंकिताला लहाणपणापासून कुस्तीचे धडे दिले. तिलाही सरावाला साथिदार न मिळाल्यामुळे मुलांबरोबर डाव खेळावे लागले. आणि आशियाई कॅडेट स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारी ती राज्याची पहिली महिला कुस्तीगीर ठरली. आता तिचा धाकटा भाऊ आदर्श हा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतोय.

पण त्याहून विशेष म्हणजे राज्यातील एकमेव महिलांसाठी वसतीगृह असलेले कुस्तीकेंद्र आळंदी मध्ये आहे आणि विविध राज्यातून आलेल्या मुली तिथे गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहेत.

http://thegoldensparrow.com/lifestyle/breaking-barriers-one-step-at-a-time/

हा मी मध्यंतरी त्यांच्यावर लेख लिहीलेला होता.

ज्याप्रमाणे चक दे इंडिया नंतर देशभरात हॉकीप्रेमाला उधाण आले, तोच कित्ता दंगलने गिरवावा हीच इच्छा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे. रसप यांना सुट्टी मिळालीय का ?

महावीरसिंग आणि त्याच्या मुलींची कथा सिनेमा या माध्यमाला न्याय देत आमीर खानने चांगली मांडलेली आहे.

त्याचबरोबर दंगल मधे मेडल का मिळत नाहीत याबद्दलही नेमके भाष्य आहे . सामाजिक परिस्थिती, मानसिकता याचबरोबर अधिका-यांची बेपर्वाई , त्यांची मानसिकता ठळकपणे मांडले आहे. सरकारी पातळीवर त्याची दखल घेतली जावी / जाऊ शकते. पण सामाजिक परिस्थितीचे काय ? जे वातावरण महावीरसिंगच्या गावात निर्माण झाले, हरियाणा राज्यात झाले ते दंगलमुळे सर्वदूर पोहोचले जावे. मुलांना खेळाडू बनवावे ही जिद्द निर्माण झाल्याशिवाय मेडल्स कसे मिळणार ?

असे बरेच प्रश्नही सिनेमा पाहताना पडतात. कुस्तीगीर होण्याचं स्वप्न महावीरसिंग मुलींवर मनाविरुद्ध लादतो का ? त्याने तसे नसते केले तर मुलींनी कुस्तीगीर होण्याचे स्वप्न पाहीले असते का ? जिथे एक्स्पोझर नाही तिथे मुलांनी काय बनावे हे नेमके कोण आणि ठरवणार ? हरियाणा सारख्या राज्यात ज्या मुलींना महावीरसिंग सारखा पिता लाभत नाही त्यांच्या वाटेला काय येतं हे एका प्रसंगात दिसून येते. भारतातली विषम सामाजिक परिस्थिती बॉलिवूडला खुणावत नाही. दंगल सारख्या सिनेमांनी ही कोंडी फोडली तर भविष्यात भारतीय सिनेमा इराणी सिनेमाप्रमाणेच जगात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो.

छान लिहिलंय, आशुचॅंप!

जिद्द, चिकाटी, परिश्रम... केवळ एवढंच नाही, आणखी बरंच काही आहे त्यांच्यात!
सलाम त्या मुलींना आणि त्या बापाला!

मेडल मिळवायला खपावं लागतंच. लहानपणापासून विशेषता हेरुन भट्टीत तापवावं लागतंच. काही अवसानघातकी लोकांना ह्यात लहान मुलांवर त्यांच्या मनाविरूद्ध होणारे अत्याचार दिसू लागले आहेत. मेडल मिळाले नाही की कुत्सितपणे टोमणे मारणारे हेच असतात बरं!

मस्त आहे लेख .

मेडल मिळवायला खपावं लागतंच. लहानपणापासून विशेषता हेरुन भट्टीत तापवावं लागतंच. काही अवसानघातकी लोकांना ह्यात लहान मुलांवर त्यांच्या मनाविरूद्ध होणारे अत्याचार दिसू लागले आहेत. मेडल मिळाले नाही की कुत्सितपणे टोमणे मारणारे हेच असतात बरं!>>>>> अगदी अगदी. कालच व्हाट्स अप वर एक पोस्ट वाचली . हसावं की रडावं तेच समजलं नाही

जाई, त्याच लोकांकडे रोख आहे माझा. अशा लोकांना आयुष्यात काहीही थोड्याशा मेहनतीत मिळालेले हवे असते. आपल्या शारिरीक, मानसिक क्षमतेच्या कैक पट पुढे जाऊन ध्येय पूर्ण करण्यात काय काय यातना सहन कराव्या लागतात ते यांनी कधी अनुभवलेलं नसतं. आपली विशेषता हेरुन भट्टीत तापवलं जाणं हे तर खर्‍या अर्थाने फार कमी नशिबवान लोकांना प्राप्त होतं. ते सर्व भारतीय मुलांना प्राप्त व्हावे अशी माझी मनापासून इच्छा आहे.

दुसरं असं की आपल्याकडे खेळसंस्कृती नसल्याने अशा गोष्टींकडे बघण्याची जी कुवत, नजर लागते ती सर्वसामान्यपणे नसते. आपल्याकडे कोणी रोज सकाळी उठून व्यायाम करायला, पळायला, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, स्विमिंग काहीही करायला जात असेल तर त्याच्याकडे विशेष बाब म्हणून बघितली जाते, खरं तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टींच नॉर्मलायझेशन करायला हवं. धडधाकट असून कोणी कोणत्याही खेळात सहभागी नसेल तर त्यांच्याकडे विशेषबाब म्हणून बघितले गेले पाहिजे.

दंगल मस्तच आहे...
खुप दिवसांनी एक असा चित्रपट पाहिला जो परत दुसर्यांदा चित्रपटगृहातच जाउन पाहायची ईच्छा झाली आहे..परत एकदा जाणार हे नक्की......आपल्या मुलांना दाखवयला अतिशय मस्त चित्रपट आहे हा...आपापल्या मुलांना आणि मुलींना नक्की नक्की घेउन जा.
सगळी गाणी मस्त...
हानिकारक बापु,
धाकड है धाकड,
दंगल...दंगल
आणि अजुन एक गीता वर चित्रित झालेलं गाण पण मस्त आहे...
चारही मुली अक्षरशः भूमिका जगल्यात..आणि आमिरबद्दल काल म्हणु...त्याला एक स्टँडींग ओवेशन माझ्याकडुन...
गीता च्या शेवटच्या सगळ्या मॅचेस च्या वेळेस खरोखरच स्टेडीयम मद्धे कुस्ती पाहात असल्याचा फील येत होता...
"कमॉन गीता " च्या आरोळ्या चित्रपट्गृहात प्रेक्षकांकडुन येत होत्या...आणि चालु चित्रपटात राष्ट्रगीत सुरु झाल्यावर सगळे उत्स्फुर्तपणे उभे राहिले तेव्हा डोळ्यातुन कधी अश्रु ओघळले कळलच नाही...
चीनच्या वस्तु न वापरणे किंवा नोटांसाठी रांगेत उभे रहाणे म्हणजे राष्ट्रप्रेम असते की नाही ते मला माहित नाही...पण पडद्यावर तिरंगा सगळ्यात वर झळकलेला पाहुन मला जे काही वाटलं ते त्या क्षणी माझ्या साठी माझं राष्ट्रप्रेम एवढं नक्की...

छान लेख. चित्रपट बघायचा आहेच.
इतर देशांतील अश्या व्यक्तींवर तयार झालेले चित्रपट बघायला हवेत मला. म्हणजे तुलनेने आपण कुठे आहोत, ते कळेल.

आपली विशेषता हेरुन भट्टीत तापवलं जाणं हे तर खर्‍या अर्थाने फार कमी नशिबवान लोकांना प्राप्त होतं >>>> खरं आहे नाना..

पूर्ण पोस्टला अनुमोदन.

लेख छान आहे.
शेवटच्या माहितीबद्दल विशेष धन्यवाद!
सपनातैंचा प्रतिसादही छानच.

हॉकी, कुस्ती, रनिंग अशा खेळांबद्दल या सिनेमांमुळे जागरूकता येतेय हे ही छानच.

अजून बॅडमिंटन आणि टेनिसविषयी निघू शकतात सिनेमे.

कुस्ती ह्या खेळाविषयी आणि त्यातल्या नियमांविषयी थोडीफार तरी माहिती मिळाली या निमित्ताने.

आपण पहावा आणि मुलांना आवर्जून दाखवावा असा आहे हा सिनेमा.

आमिर खानची मुलाखत पाहिली.
त्याचा सिनेमातला रोल उलटा शूट केलाय म्हणे.
म्हणजे पहिले खाऊन खाऊन त्याने वजन (९७ कि झाला होता)आणि पोट वाढवले.
फॅट ३७ टक्क्यांवर घेऊन गेला.
आणि मग पाच महिन्यात शिडी उतरून पुन्हा फिट अँड फाईन झाला.
आरोग्याच्या दृष्टीने हे बरोबर नसले तरी सिनेमासाठी इतके मन लावून शरीर बदलणे खूपच प्रशंसनीय आहे.

अमीरच्या तरूणपणातली कुस्ती सगळ्यात शेवटी तो पुन्हा फिट अँड फाईन झाल्यावर शूट केलीय म्हणे.

फातिमा कसली गोड आहे.
प्रियांका गांधींसारखी दिसते.

बरंच काही लिहावंसं वाटतंय सिनेमाविषयी पण अजून बर्‍याच लोकांनी पाहिला नसल्याने आता लिहित नाही.

गीता च्या शेवटच्या सगळ्या मॅचेस च्या वेळेस खरोखरच स्टेडीयम मद्धे कुस्ती पाहात असल्याचा फील येत होता...
"कमॉन गीता " च्या आरोळ्या चित्रपट्गृहात प्रेक्षकांकडुन येत होत्या...आणि चालु चित्रपटात राष्ट्रगीत सुरु झाल्यावर सगळे उत्स्फुर्तपणे उभे राहिले >>>> + १००००० .

चित्रपटात कुठेही भाषणबाजी नाही . मोठमोठाले मोनोलोग्स नाही आहेत .
स्त्री-पुरुष असमानता , लोकांचा स्त्रियांबद्दलचा द्रुष्टीकोन सगळं, लहान लहान प्रसंगातून नेमकं मांडलं आहे.

चित्रपटातले जे अनेक संवाद आवडले त्यातलाच एक आवडता :
"रेफरी , प्रतिस्पर्धी मुलाला : छोरी है , समझ के खेलना .
गीता : बस , छोरी समझके ना खेलना "

चार मुली आणि आमिर खान , यांच्या ईतकेच साक्शी तन्वरचे काम भन्नाट आहे .
बर्याच प्रसंगात ती बोलतच नाही , पण खंबीरपणे नवर्याला मूक साथ देते.
ती नुसती डोळ्यानी बोलते.

आणि एक म्हणजे त्या मुलींचा चुलत भाउ . कित्ती गोड आहे तो .
आपल्या बहिणींबद्दल त्याला प्रेम आहे , जिव्हाळा आहे , आदर आहे , कुठलीही असूया नाही.
नेहमी त्यांच्या सोबत तो उभा रहातो .

मस्त लिहिलसं रे चँपा !
आमीरखान द बेस्ट, गीत्ता बबित्ता सोने पे सुहागा , सग्ळ्यांचीच कामे आवडली. हरियाणवी भाषेचा लहेजा आवडला.

चित्रपटात फक्त एकच चूक आहे.
राष्ट्रकूल स्पर्धेतील जी कुस्ती चित्रपटात दाखवली आहे त्यात गीताने प्रतिस्पर्धीला एकही गुण मिळू दिला नव्हता पुर्ण कुस्तीमधे गीताचे वर्चस्व होते. अवघ्या दोन राऊंड मधे तिने कुस्ती जिंकली होती पण चित्रपटात कुस्तीमधे उत्कंठा वाढवण्याकरीता ती कुस्ती ३ राऊंडची दाखवली गेली तसेच प्रतिस्पर्धी खेळाडूने एक राऊंड जिंकलेला दाखवला.

बघितला,आवडला.अप्रतिम एक्झीक्युट केला आहे सिनेमा.खुप अभ्यास करुन बनवलेला जाणवत होता.छोट्या गिता आणि बबिता क्युट दिसतात.फातिमा सना शेखने मस्त काम केले आहे.पण पडदाभर व्यापून राहतो तो आमिर खान,लगान नंतरचा सर्वोत्तम खेळ.ऑस्करला गेल्यास नवल वाटणार नाही.
बायदवे ,रिव्हु आवडला.कुजकट रिव्हू वाचन्यापेक्षा हे छान लिहिलेत आशु.

छान रिव्ह्यू चँप!
काल सगळेकडे हाउसफुल्ल असल्यामुळे पाहता आला नाही.. आमिर आणि दोघी मुली कॉफी विथ करण मधे आल्या होत्या तेव्हा त्यांनी एक आठवण सांगितली कि दोघींनी महिनाभर ऑडिशन दिल्यावर त्यांचे सिलेक्शन झाले नंतर वर्षभर त्याना कुस्तीचे ट्रेनिंग दिले जात होते. ट्रेनिंगमध्ये त्यांचे बर्‍याचदा हात पाय दुखावले तरी त्या तिथे न सांगता गुपचुप एका फिजिओकडून उपचार करून घेत होत्या, कारण सांगितले तर रोल आपल्या हातचा जाईल अशी त्यांना भिती होती Happy

चित्रपट अजून पाहायचा आहे त्यामुळे त्यावर सध्या तरी नो कमेंट्स.

माझी प्रीतिक्रिया अस्थानी असू शकेल पण तरीही.....

नानकळा यांचा प्राईसाद अजिबातच नाही पटला.

मुलांना त्यांचं क्षेत्र, त्यांची ध्येय, त्यांची यशाची व्याख्या ठरविण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी आयुष्यात कोण व्हावं, काय करावं हे तुम्ही कोण सांगणार. त्यांना प्रोत्साहन जरूर द्या पण त्याला मेडल जिंकायचे आहे का नाही हे त्याने ठरवावं. त्याला ते जिंकायचं असेल तर पालक म्हणून त्याला सपोर्ट करायची, मार्गदर्शन मिळवण्यासाठी, त्याला गरज पडेल तेव्हा त्याला मानसिक आधार देण्याची जबाबदारी पालक म्हणून निभवा.

पण मी मेडल अनु शकलो नाही म्हणून, मी डॉक्टर/ इंजिनिअर होऊ शकलो नाही म्हणून मी ते ओझं माझ्या मुलांच्या मानगुटीवर टाकावे हे चूक आहे.

प्रोत्साहन देणे आणि एखादी गोष्ट करच म्हणून मुलाच्या मानगुटीवर बसणे यात खूप फरक आहे. शिवाय खेळणे, आरोग्यासाठी व्यायाम करणे आणि एखादी स्पर्धा / पदक जिंकण्यासाठी तयारी करणे यात पण फरक आहे.

धाग्यावरील व्याख्येप्रमाणे अवसानघातकी,

अतरंगी Happy

चित्रपट कसा वाटला वरची प्रतिक्रिया इकडे कॉपी पेस्टः-
दंगल मस्त आहे. दमदार स्क्रीप्ट, सुंदर सादरीकरण, सर्वच कलाकारांचे सुंदर अभिनय. विशेष उल्लेख परफेक्शनिस्ट खानचा. के-व-ढा दिसतो तो सिनेमाभर ! सिनेमा संपल्यावर गीत्ता-बबित्ता (अशीच वाचायची ही नावं)-महावीरसिंग सर्वांचे फोटो दिसतात. खराखुरा महावीरसिंग वाटतो आमीर संपूर्ण सिनेमाभर.
हानीकारक बापू, धाकड आणि दलेरच्या भारदस्त आवाजातलं 'दंगल, दंगल' ही गाणी प्रचंड आवडली.

पुढची ओळ स्पॉयलर म्हणून वाचावी / वाचू नये:-
'चक दे' शी बरीचशी साम्यस्थळे जाणवली. प्रत्येकाने पाहून यावर आपापलं मत बनवावं ! शेवटाकडे सिनेमा थोडा ताणल्यासारखा वाटला.

आशुचँप, हा लेख, तसंच त्या लिंक वरचा दिनेश गुंड यांच्यावरचा लेख पण आवडला. या माणसाबद्दल बाकी कुठेच काही वाचायला नाही मिळालं. त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा महावीरसिंग फोगाट यांच्या मेहनतीसारखेच यश मिळो ही सदिच्छा !

मितने लिहिल्यामुळे मलाही आठवलं की मी हि चिकवा वर लिहिलं आहे ते . मग माझेही कॉपी पेस्ट Lol

==========================================
पाहिला दंगल . आमिर महावीर फोगत ही व्यक्तिरेखा अक्षरश: जगला आहे. आमिर खान न वाटता तो पूर्ण चित्रपटभर महावीर फोगत बनतो. त्याच सिनेमादरम्यानच ट्रान्सफॉर्मशन थक्क करणार आहे . त्या मुलींनी पण अप्रतिम काम केलंय. छोट्या गीता बबिता पण इतक्या क्यूट दिसतात. सगळ्या महत्वाचं म्हणजे चित्रपट कुठेही प्रिची न वाटता सहजपणे उलगडत जातो. सगळ्यात मोठं शक्तीस्थान म्हणजे डायलॉग . खुसखुशीत संवाद आहेत. मोठ्या पणीच्या गीता बबिता खरोखर कुस्तीगीर वाटतात त्याचीही मेहनत पडद्यावर दिसते . गाणी देखील सुरेख आहेत. नैना हे गाणं सुंदर जमलंय. शेवटच्या राष्ट्रगीताच्या सिनला थेटरमधल्या प्रेक्षकांनी स्वतःहून स्टँडिंग ओव्हेशन दिले .
सगळ्यात आवडलं ते म्हणजे महावीर फोगत आणि गीतामधील नातं हळुवारपणे दाखवलं आहे. कोचच ट्रेनिंग की वडिलांचा सल्ला मानायच ह्यात होणारी ओढाताण , लहान बहिणीने समजावून सांगितल्यावर वडिलांना फोन केल्यावर केवळ अश्रूनीच बोललेला संवादाचा प्रसंग असे सीन मस्त जमलेत. त्यांच्या चुलतभावाचा रोलही मस्त आहे . बिचारा दोन्हीकडून मार खातो ..

चित्रपटात दाखवलं आहेच पण प्रत्यक्ष आयुष्यात महावीर फोगतना काय किती सहन करावं लागलं असेल हे पाहूनच अंगावर येत. हरयाणासारख्या कर्मठ भागात मुलींसाठी उभं राहताना किती सोसावा लागलं असेल . सुरुवातीला त्यांना मुली आहेत म्हणून खेळू दिल जात नाही आणि दिल जातं ते ही मुली असणं कॅश करण्यासाठी . पहिल्या वहिल्या दंगल दरम्यानच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स पाहून चीड आलेली . ते सहन करायलाही ताकद लागते . सॅल्यूट टू हिम ..

धन्यवाद सर्वांना...

सगळ्यांनीच मस्त प्रतिसाद दिले आहेत, मीत, सपना, नानाकळा आणि अतरंगी यांचे प्रतिसाद तर फारच आवडले.

आता ते लहान मुलांना जबरदस्ती करण्याबाबत, तर थोडक्यात असे की घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण पाजू शकत नाही. मुलांना आवड लावण्यासाठी सक्ती थोडी असावीच, पण त्यानंतर त्या मुलांवर सोडावे. कसे आहे, आतून ती आग पेटल्याशिवाय पदकविजेते नाही होऊ शकत. घरच्यांच्या मनाखातर मैदानावर पाट्या टाकणाऱ्याला कितीही भारी कोच आणि सुविधा द्या तो एका मर्यादेपलिकडे वाढू शकत नाही. या उलट आतून असे स्फुल्लिंग पेटलेले असेल तर कितीही अडचणी आल्या तरी तो खेळाडू त्यातून मार्ग काढून आपली चमक दाखवतोच.

आत्ता ऑलीपिक मध्ये चमकलेले दत्तू भोकनाळ, दिपा कर्माकर, बार्शीसारख्या खेड्यातून आलेली प्रार्थना ठोंबरे, राऊत भगीनी अशी कित्येक उदाहरणे.

आणि सक्तीचे म्हणालात तर जवळपास अनेक महान खेळाडूंच्या लहानपणी त्यांच्यावर सक्ती झाल्याच्या आठवणी सांगिलत्या आहेत. युवराज सिंग म्हणतो क्रिकेटबद्दल शिसारी यावी इतकी मेहनत त्यावर लादली गेली पण त्याचेच फळ आज चाखतो आहे.

या उलट दिपिका पडुकोनला बॅडमिटनची सक्ती केली असती तर ती आज कुठे असती सांगता येणे अवघड आहे. त्यामुळे, याला काहीही प्रमाण नाही, किती ताणाव, किती सक्ती करावी आणि किती स्वातंत्र्य द्यावे हे पूर्णपणे व्यक्ती, परिस्थितीत आणि स्वभाव सापेक्ष आहे,

माझे व्यक्तिगत मत विचारले तर अभ्यासाच्या सक्तीपेक्षा खेळाच्या सक्तीची आज गरज आहे.

आपल्याकडे कोणी रोज सकाळी उठून व्यायाम करायला, पळायला, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, स्विमिंग काहीही करायला जात असेल तर त्याच्याकडे विशेष बाब म्हणून बघितली जाते, खरं तर जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टींच नॉर्मलायझेशन करायला हवं. धडधाकट असून कोणी कोणत्याही खेळात सहभागी नसेल तर त्यांच्याकडे विशेषबाब म्हणून बघितले गेले पाहिजे.

याला प्रचंड अनुमोदन. फिटनेस बाबत जागरुकता वाढत चालली आहे पण अजूनही ती विशेष बाब याच गटात मोडते.

खेळांच्या बाबतीत तर अजूनही कुस्ती आपल्याकडे ग्रामीण भागातलाच खेळ मानला जातो, त्यामुळे पुण्या मुंबईच्या किती मुली कुस्ती खेळायला तयार होतील याबाबत शंकाच आहे. आणि अजूनही टेनिस, बॅडमिंटन सारखे ग्लॅमर कुस्तीला नाही, त्यामुळे निदान शहरात तरी दंगल पडद्यावरच चांगली वाटेल. गावाकडे मात्र चांगला परिणाम दिसून यावा अशी अपेक्षा आहे.

अतरंगी, प्रतिसाद चुकीच्या संदर्भाने घेतल्यास पटणार नाहीच.

तुम्ही म्हणताय तसं महावीर फोगाट यांनी केलं असतं तर भारताला मेडल मिळालंच नसतं.

फोगाट भगिनींनी मिळवलेल्या यशाने आपण आनंदी आहात की नाही?

महावीर ने आपलं स्वप्न मुलींवर लादलं असं नाही वाटलं मला. आधी त्याने तडजोड केलेली असते, सगळं गुंडळून ठेवलेले असतं, पण जेव्हा मुलींमधे पोटेन्शियल दिसतं तेव्हा तो बायको ला म्हणतो मला १ वर्ष दे. मी चूक ठरलो तर पुन्हा तुझ्या हाताखाली चुल्हा चौका करायला घे. नंतर पण मुली एकदा बंड करताना दाखवल्यात. तेव्हाही तो गजर न लावता झोपलेला दाखवलाय. उठतो तेव्हा मुली खरोखर समजून स्वतः प्रॅक्टिस करायला गेलेल्या असतात.

प्रोत्साहन देणे योग्यच. आरोग्यदायी राहण्यासाठी व्यायाम करणे पण योग्य.

सक्ती करू नये.

तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलेत आणि त्याला ते करावेसे वाटले तर वेगळे पण काही काही पालक मुलांचे किती हाल करतात ते पाहून जाऊन त्यांच्या मुस्कडात द्यावीशी वाटते. युवराज सिंग सारखेच उदाहरण एका टेनिसपटूचे पण आहे ना ? युवराज सिंगचेच उदाहरण पुढे घेऊन सोन्यासारख्या बालपणाचा नरक करण्याचा हक्क पालकांना कोणी दिला ? आज मिळणारी फळे हि वेगळी पण ती फळे त्याचा बालपणीचा काळ सुखाचा परत आणू शकतील का ?
त्याच्या पालकांना वाटत होतं की त्याने ख्यातनाम क्रिकेटपटू व्हावं, पण हे त्याला वाटत होतं का ?

पाल्याने पालकांचे हे अत्याचार का सहन करावे? मुलाने त्यांच्या घरात जन्म घेतला म्हणून कि ते त्याचे पालनपोषण कर्ते आहेत म्हणून ?

तुम्ही म्हणताय तसं महावीर फोगाट यांनी केलं असतं तर भारताला मेडल मिळालंच नसतं.>>>>
फोगाट आणि त्यांच्या मुली या विषयावर मला माहित नसताना मी बोलू शकणार नाही.

फोगाट भगिनींनी मिळवलेल्या यशाने आपण आनंदी आहात की नाही?>>>>

माझ्या आनंदाचा प्रश्नच येत नाही. किंबहुना जगातल्या कोणाच्याच आनंदी असण्याचा येत नाही. प्रश्न हा आहे की त्या आनंदी आहेत का ? त्यांनाच ते हवे असेल आणि त्यांना त्यातून आनंद मिळाला असेल तरच त्याचा उपयोग.

Pages