अरमान था गुलशन पर बरसूँ

Submitted by सुमुक्ता on 19 December, 2016 - 05:02

खूप दिवसांनी काल निवांतपणे गाणी ऐकत बसले होते. तलत महमूद ह्यांनी गायलेले इतना ना मुझसे तू प्यार बढा ऐकत बसले होते. त्यात एक कडवं आहे

अरमान था गुलशन पर बरसूँ
एक शोख के दामन पर बरसूँ
अफ़सोस जली मिट्टी पे मुझे
तक़दीर ने मेरी दे मारा

हे गुलशन म्हणजे आपण नंदनवन म्हणू...तर अशा नंदनवनात पाऊस होऊन मला पडायचे आहे पण दैव कसे असते पहा. मला त्याने तापल्या मातीत बरसायला लावले. छाया चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत नायक हे गाणे म्हणतो ते मला माहित नाही. पण हे कडवं ऐकले की "काय करायचे होते आणि दैवामुळे मी कुठे येऊन पडलो" असा विचार करणाऱ्या नायकाला अतीव असहाय्य वाटत असले पाहिजे असे मला नेहेमी वाटत आले आहे.

पण आज अगदी वेगळाच विचार मनात चमकून गेला. वाटले "अरे नंदनवनात बरसून तू काय करणार? ते तर आधीच नंदनवन आहे. बरसलास काय आणि नाही बरसलास काय!! त्या नंदनवनाला काय फरक पडतो? पण तापल्या मातीत बरसलास तर तर त्या मातीचा दाह तरी शांत होईल. तुझ्या क्षमतेचा संपूर्ण वापर तेव्हाच होईल. तुझ्यासारख्या ढगाला नंदनवन विसरून जाईल पण तापली माती तुला सदैव लक्षात ठेवेल. हा अफ़सोस करत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत आपल्या अंगी असलेल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणे हेच तुझ्या हिताचे आहे. कदाचित तापल्या मातीचे नंदनवन करण्याची क्षमता तुझ्यात आहे म्हणूनच तुझ्या "तक़दीर"ने तुला तेथे पाठविले असेल!!!

तळटीप: येथे ह्या गीताच्या गीतकारावर (राजेंद्र कृष्ण) टीका करण्याचा मुळीच हेतू नाही कारण चित्रपटात हे गीत कोणत्या परिस्थितीत म्हटले गेले आहे ह्याची मला मुळीच कल्पना नाही. मी केवळ माझा अनुभव लिहिला आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित तापल्या मातीचे नंदनवन करण्याची क्षमता तुझ्यात आहे म्हणूनच तुझ्या "तक़दीर"ने तुला तेथे पाठविले असेल>>>>>>>>>> सलाम!!!

सुमुक्ता, जली मिट्टी म्हणजे भाजलेली माती जी sterile असते आणि जिच्यात काही उगवून येत नाही. म्हणून अशा मातीवर बरसण्याचा त्या आवारा बादल ला अफसोस असावा असं मला वाटतं (वाक्य फारच बहुभाषी झालं आहे पण असो!)

धन्यवाद सचिन, अभिनव, पद्म आणि जिज्ञासा.

Clarification करिता धन्यवाद जिज्ञासा!! प्रत्येकाची गरज जिथे जिथे आहे तिथेच कदाचित प्रत्येकजण असतो. तेव्हा अफसोस करण्यापेक्षा आपली गरज काय आहे हे जाणून घेणे अधिक चांगले असे म्हणायचे होते मला.

सुमुक्ता, फारच गहराईमधे जाऊन विचार करता असे दिसते Happy
तुमचे विश्लेषण छान आहे, पण तरी जिज्ञासा यांचे जास्त चपखल वाटले.

धन्यवाद महेश. गहराईमधे जाऊन अजिबातच विचार केला नाही. सहज गाणे ऐकताना सुचलेला विचार आहे म्हणून तर तो flawless नाही Happy

सुमुक्ता ताई, सुंदर विचार...

‘इतना ना मुझसे तू प्यार बढा...’ या गीताची मी फक्त सिचुएशन सांगतोय...

‘इतना ना मुझसे तू प्यार बढा...’ छाया चित्रपटांतील गीत होतं. नायक सुनील दत्त, नायिका-आशा पारेख होते। सोबतीला नासिर हुसैन, निरुपा राय होती।

नायक कवि असून कफल्लक, तर नायिका लक्षाधीशाची मुलगी। योगायोगाने नायिका या कविचा शोध घेत येते। आणि मित्राच्या मदती ने कवि महाशय आपलं बस्तान बसवतात... म्हणजेच ते आशाचे शिक्षक म्हणून रुजू होतात...

याने ओळख लपविल्यामुळे नायिका या नावाजलेल्या शायरला शोधता-शोधता प्रेस मधे येते। तर नायक दार लावून घेतो आणि तिथे हे वरील गाणं म्हणतो। जणूं तो तिला सुचवतो की मला विसरुन जा। कारण मी आवारा वादळासारखा आहे...

पण ती पिच्छा सोडत नाही...या गीतात खूपच सूचक शब्दांत ती आपली बाजू ठणकावून सांगते...
---------------