विध्वंसाच्या मुखाखालच्या

Submitted by बेफ़िकीर on 12 December, 2016 - 07:57

विध्वंसाच्या मुखाखालच्या कल्लोळावर तरते सृष्टी
एकांताच्या लोभसवाण्या अमूल्यतेवर पडते दृष्टी
लाट लुटारू कवेत घेते नवीन बेटे आणि व्यापते
विश्व विखारी नांव ठेवते उगमाच्या जननीचे उष्टी

भेदरलेल्या बेटासाठी वकील धावे सागरातुनी
न्यायाधीश तपासे खोटे साक्ष-पुरावे सागरातुनी
पत्रकार बदनामी करती, नेते टाळू चाटत बसती
सागरासवे लढतो सागर, चित्र दिसावे सागरातुनी

युगे लोटती, निकाल नसतो, बदनामीचा शिक्का बसतो
बेट हारते गरिमा त्याची, आता अवघा सागर हसतो
विध्वंसाच्या मुखाखालच्या कल्लोळावर बेट भाळते
उगमाच्या जननीला दुनियादारीचा ह्या पत्ता नसतो
===================================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users