घर असावे घरासारखे - भाग ४ - अंगोला

Submitted by दिनेश. on 12 December, 2016 - 05:26

मी २०१२ सालापासून अंगोलात आहे. आणि एवढ्या काळात मी सहा घरे बदलली. ( पण घाबरू नका, त्यापैकी प्रत्येकी दोन दोन, एकाच एरियात होती, म्हणून दोन दोन चे गट करून लिहितो. )

११ आणि १२ ग्राफानिल, व्हीयाना, लुआंडा - साल २०१२

अंगोलात आल्याबरोबर पहिल्यांदा नऊ महिने मी ग्राफानिल या भागात राहिलो. प्र्त्येक मजल्यावर दोन फ्लॅट्स असलेली २ मजली बिल्डींग आमच्या कंपनीने घेतली होती. त्यात आम्ही सहा जण रहात होतो. दोन बेडरुम्स्चा
सुंदर फ्लॅट होता तो.

ग्राफानिल असे भारदस्त नाव असले तरी ते एक खेडेगाव होते. सर्व बैठी घरे होती. ही बैठी घरे हि खास अंगोलन
पद्धत आहे. चार पाच कुटुंबं मिळून अशी घरे बांधतात त्यात मधे कॉमन भाग असतो. या सगळ्यात जरा ऊंच
जोत्यावर आमची बिल्डींग होती. सभोवताली ऊंच कुंपणाची भिंत होती.

या बिल्डींगमधे मी आधी तळमजल्यावर रहात होतो. खिडकीच्या समोर ४ फुटावर भिंत. मला बाहेरचे काही
दिसेनाच. त्या फ्लॅटमधे मी २ महिने काढले. मग पहिल्या मजल्यावर शिफ्ट झालो.

आता घरातून, समोरचा रस्ता वगैरे दिसत होता. सभोवताली टीपीकल अंगोलन वस्ती. त्या घरातल्यांची
लगबग, मुलांचे खेळ, फेरीवाले सगळे बघत असायचो. अंगोलन सरकार पिण्याचे पाणी, वेगळ्या पाणपोयांवरुन
पुरवते. तिथे एका भिंतीला दोन्ही बाजूने नळ असतात आणि, त्याला सभोवताली जाळीचे कुंपण असते.
आत एक कर्मचारी असतो तो नळांना पाईप लावून जाळीतून बाहेर काढून देतो. नळ आणि पाईप दोन्ही
त्याच्या ताब्यात असते. हे पाणी अगदी कमी दरात ( २ रुपये बादली ) पुरवतात. तिथल्या बायकांची त्या पाण्यासाठी
चाललेली लगबग मी बघत असे. त्यांचा बराच वेळ कपडे धुण्यात जातो. त्यासाठी एक छोटासा सिमेंटचा हौद असतो,
आणि त्यालाच एक उतरता भाग असतो, त्यावर घासून घासून त्या कपडे धूत असत. बहुतेक बायकांच्या पाठीवर
बांधलेले तान्हे बाळ असे... हे सगळे मुद्दाम लिहिले कारण इथल्या लहान मुली पण असाच खेळ खेळतात.
म्हणजे पाठीवर एक ( मोडकी ) बाहुली बांधलेली आणि त्या हौदात खोटे खोटे कपडे धुवायचा खेळ.. !

मुली रिकाम्या वेळी नाचत असत. ( भारतीय नजरांना हा नाच अतिशय प्रोव्होकेटीव्ह वाटू शकतो ) घरासमोरून
बर्याच फेरिवाल्या जात असत. त्यांच्याकडे एक चायनीज लाऊडस्पीकर सारखे उपकरण असे. आपल्या कडच्या
मालाची यादी त्या आपल्या आवाजात टेप करुन त्या उपकरणावर सतत वाजवत असत.

त्या रस्त्यावर काही छोटी दुकाने होती ( त्यातली बहुतेक सोमाली मुसलमानांची होती ) ताजे पाव
आणि इतर सटरफटर सामान मी त्यांच्याकडून घेत असे. मोठे सुपरमार्केट मात्र नव्हते, त्यामूळे मुख्य सामान
मी ऑफिसमधून येतानाच आणत असे. माझे पोर्तुगीज भाषेचे पहिले धडे मी इथेच गिरवले.

रस्त्यावरची लहान मूले माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत. अर्थात लहान मूलांना भाषेचा अडसर कधीच नसतो म्हणा.

घराजवळच्या एका जागी एका मोठ्या गोरखचिंचेच्या झाडाखाली बाजार भरत असे. ते झाड एवढे प्रचंड होते,
कि त्याच्या खोडात एक साठवणीची खोली होती. काही अंगोलन स्थानिक फळे मी इथे चाखली.
या बाजारात भाजी आणि मासे, मटण एकाच विक्रेत्याकडे एकाच ठिकाणी ठेवलेले असे. पण मला आता त्याचे
काही वाटेनासे झाले होते.

घरासमोरचा रस्ता कच्चा होता. पाऊस झाला कि नुसता चिखल होत असे. मग माझे बाहेर जाणे बंद. ऑफिसची
गाडी आली कि त्यात ऊडी मारूनच बसावे लागे. आजूबाजूला शेवग्याची पण बरीच झाडे होती.
ती का लावली होती याची कल्पना नही, कारण हे लोक शेंगा वा पाने खात नाहीत त्याची. मी मात्र तोडून
आणायचो शेंगा.

पण पुढे या बिल्डींगचा जनरेटर बिघडला. खुप प्रयत्न करुन तो दुरुस्त झाला नाही. जवळ जवळ महिनाभर
मी वीज आणि पाण्याचा त्रास सोसला. मग मी नोवा सिदादे दो किलांबा.. या ठिकाणी शिफ्ट झालो.

१३ आणि १४, नोवा सिदादे दो किलांबा ( अर्थ - न्यू सिटी ऑफ किलांबा ) साल २०१३-२०१४

नावाप्रमाणेच नव्याने वसवलेले हे छोटे शहर आहे. ७५० इमारती आहेत इथे आणि शहराची सुंदर आखणी
केली आहे. ३० इमारतींचा एक ब्लॉक. आतमधे काटकोनात रस्ते. ४ ब्लॉकमधे मिळून एक शाळा. तीन मोठी गार्डन्स.. असा सगळा पसारा.

माझा फ्लॅट नवव्या मजल्यावर, आणि ४ बेडरुम्सचा. मी एकटाच होतो तिथे पण कंपनीचे व्हीजीटर्स तिथे
येऊन जाऊन असत. घरात छान सोयी होत्या.

मी तिथे रहायला गेलो तेव्हा, त्या भागात फारशी वस्ती नव्हती. रस्ते निर्मनुष्य असायचे. रस्त्यावर गाड्याही
फारश्या नसायच्या. या कॉलनीच्या सुरवातीलाच केरो ( पोर्तुगीज मधे केरो म्हणजे गरज, वाँट ) नावाचे सुपरमार्केट होते.
पण कॉलनीच्याआतमधे पहिल्यांदा एकही दुकान नव्हते. त्यामुळे आयत्यावेळी काही मिळायची सोय नव्हती. पण सहा आठ महिन्यातच हे चित्र पालटले आणि आत वस्तीही वाढली आणि दुकानेही उघडली.

माझ्या घरातून तिन्ही बाजूने सुंदर दृष्य दिसायचे. सूर्यास्त आणि त्याच सुमाराला उडणारे एमिरेट्स चे फ्लाइट आणि
माझ्या हातात कॉफिचा मग.. असा योग जुळून यायचा ( मला लहानपणापासून विमान उडताना बघायला
खुप आवडते )

मी या कॉलनीमधे बहुदा रोजच रात्री भटकायचो. रस्ते सुंदर होते आणि गार्डन्स पण होती. या कॉलनीला
लागून जंगली आंब्याची खुप झाडे होती. आंब्याच्या सिझनमधे मी हटकून तिथे जात असे. भरपूर आंबे लागत
असत त्या झाडांना ( हे लोकही कच्चे फळ खात नाहीत ) मी गरजेपुरती तोडून आणत असे ती.

प्रत्येक बिल्डींगने आपली खाजगी बागही जपली होती. त्यात स्पर्धाही होती. मी पण माझ्या बाल्कनीमधे
भाजीपाला लावला होता. या घरातही मी भरपूर पदार्थ करुन मायबोलीवर लिहिले. ( त्या काळातल्या माझ्या
प्रत्येक पदार्थाच्या फोटोत दिसणारे देखणे टेबल, या घरातले. )

घरातूनच दोन स्टेडीयम दिसत असत. त्यावरची रोषणाई सुंदर दिसत असे. ही कॉलनी चीन सरकारने
बांधलेली आहे, त्यांचा देखभाल करणारा स्टाफ तिथेच रहात असे. त्यांची एक वेगळी कॉलनी, जवळच
होती, तिथे त्याच्या नवीन वर्षदिनी खुप आतिषबाजी होत असे.

इथल्या सुंदर रस्त्यांवरुन स्थानिक मुले स्केटींग करत फिरत असत. ( त्यांचे कौशल्य बघण्यासारखे असते )
त्यांच्यापैकी काही मुले ओळखीची होती. काही जण माझ्याशी इंग्लीश बोलायचा प्रयत्नही करत.
सकाळी ड्रायव्हरची वाट बघत राहिलो कि शाळेत जाणारी मुले पण बोलायचा प्रयत्न करत.

पुढे पिटा या नावाचे तुर्किश रेस्टॉरंट या कॉलनीत उघडले. त्याची सजावट खुपच सुंदर होती. मला तिथे जायला
खुप आवडत असे. ( एक तत्व म्हणून तिथे अल्कोहोल ठेवत नसत, अंगोलन लोक दारू पिऊन फार
दंगा करतात. ) त्यांचे सलादही पोटभरीचे होत असे मला, शिवाय तुर्की आईस्क्रीम पण मिळे तिथे.

याच कॉलनीत मी दुसर्या एका घरातही १ वर्ष राहिलो. तिथे माझ्या सोबतीला, एक जर्मन साऊथ आफ्रिकन
माणूस होता. ( अॅलन नाव त्याचे ) सहनिवासी कसा असावा, याचा तो आदर्श होता. किचन शेअर करताना, साफसफाई करताना तो प्रत्येकवेळी मला संभाळून घेत असे. पण दुर्दैवाने तो खुप आजारी पडला आणि परत
जोहान्सबर्गला गेला.

फक्त एकच प्रॉब्लेम होता, तो म्हणजे ही कॉलनी माझ्या ऑफिसपासून २५ किमीवर होती. रोज येण्याजाण्यात
खुपच वेळ जायचा. अंगोलात ट्राफिक सर्कल्स नाहीत. यू टर्न्स आहेत, त्यामूळे घरी येताना खुप लांबचा
वळसा घेऊन यावे लागायचे, म्हणून मी ऑफिसच्या जवळ दुसर्या एका कॉलनीमधे शिफ्ट झालो.

या कॉलनीचे भरपूर फोटो मी मायबोलीवर टाकले होते. किलांबा या नावाने सर्च केल्यावर सहज मिळतील.
ही कॉलनी आता गजबजलेली असते. मी एकदोनदा गेलोही नंतर. माझ्या एका मित्राच्या लहान मुलाच्या
वाढदिवसाचे आमंत्रण होते. अंगोलन घरात जेवायला जायचा हा पहिलाच प्रसंग... पण मजा आली.

१५ आणि १६, विडा पॅसिफीका, झांगो झेरो, साल २०१५-१६ ( विडा म्हणजे जीवन !!! )

ही पण किलांबासारखीच पण ऑफिसच्या जवळ असलेली कॉलनी. किलांबा एवढी मोठी नाही.
१४ मजल्यांच्या बिल्डींग्ज आहेत. बिल्डींगच्या आवारात सुरेख बागा आहेत, बाहेरचे रस्तेही आखीव रेखीव आहेत.
पण किलांबाएवढे रुंद नाहीत. त्यात आणखी गाड्या पार्क केलेल्या असतात, त्यामूळे ट्राफिकचा खोळंबा
नेहमीचाच.

इथलेही फ्लॅट्स मोठे म्हणजे ३ बेडरुम्सचे आहेत. घरासमोरुनच मोठा वाहता रस्ता जातो. पण त्या रस्त्याला
लागण्यापुर्वीच ( किलांबाला जायला त्या रस्त्यानेच जावे लागे ) माझे घर येत असल्याने चांगला अर्धा पाऊण
तासाचा प्रवासाचा वेळ वाचतो.

या घराच्या बाल्कनीमधे उभे राहिले कि मोठा परीसर दिसतो. प्रत्येक बिल्डींगला केअरटेकर आहे आणि तो
रविवारी पण उपलब्ध असतो. बिल्डींगला रिसेप्शन आहे. सिक्यूरिटी सिस्टीम आहे.

कॉलनीमधे दुकाने नाहीत पण रस्ता क्रॉस केला कि अलिमेंटा अंगोला नावाचे मोठे सुपरमार्केट आहे. आणि
जवळच एक चिनी संकुल आहे. त्यांच्याकडे इथल्याच शेतातल्या छान भाज्या मिळतात. ( अंगोलामधे शेतीची फारशी पारंपरा दिसत नाही. अलिकडे इस्रायल ने काही प्रयोग सुरु केले आहेत . ) तसेच चायनाहून
आणलेल्या बर्याच वस्तू मिळतात. त्यापैकी वेगवेगळे फळे माझ्या खास आवडीची. ही फळे भारतात बघितली
नव्हती मी कधी.

इथे काही भारतीय मुलांच्या ओळखी झाल्यात पण इथे फार दिवस कुणी रहात नाही ( टिकत नाही. )
भारतातून येण्यापुर्वी खुप जणांना इथल्या परिस्थितीची नीटशी कल्पना दिलेली नसते आणि इथल्या आयूष्याशी
जुळवून घेताना, त्यांना खुप त्रास होतो. खुपदा ओळख करून, फोन नंबरची देवाणघेवाण करतो, पण नंतर अचानक
ती मुले, अंगोला सोडून गेलेली असतात.

इथल्या रस्त्यावर संध्याकाळी आंबे, अवाकाडो, केळी वगैरे विकायला बसतात. त्याशिवाय पाव विकणार्या गाड्या
असतात. या लोकांना रोज पाव लागतोच. पण ते तुरळकच, एरवी रस्त्यावर फार माणसे दिसतात. किलांबात भटकायचो तसा मी इथे भटकत नाही. रात्रीच्या फेर्या बिल्डींगच्या आवारातच मारतो.

इथे बरीचशी वस्ती सोमालियन किंवा सेनेगलीज मुसलमानांची आहे. त्यांना वाटते मी लेबनानी किंवा तुर्किश आहे,
पण माझी अरेबिक आता, सबाह अल खैर, अल्हमदुल्ला, सलाम आलेकूम च्या पुढे फारशी जात नाही.
आता अंगोलातही बर्यापैकी इंग्लीश बोलतात, त्यामूळे पहिल्यांदा आला तसा भाषेचा फारसा अडसर येत नाही.

मी इथे आल्यावर दोन आठवड्यातच माझा शेजारचा माणूस अपघातात वारला. त्याच्या दोन दिवस आधीच आमची
ओळख झाली होती. त्याची लहान मूले आणि बायको तिथेच राहतात. शनिवारी मी लवकर घरी येतो, तेव्हा ती
मूले बाहेरच खेळत असतात. मला बघून ओळखीचे हसतात. कधी कधी पापा म्हणून मिठीही मारतात.
२/३ वर्षाचीच आहेत ती. त्यांना त्यांच्या पापाबद्दल काय आठवत असेल, कुणास ठाऊक ?

पण इथे जवळपास कुठलेच रेस्टॉरंट नाही, त्यामूळे गेल्या दोन वर्षात बाहेर जेवायला जाणे झालेच नाही.
अर्थात बाहेर गेलो तरी मला काही फारसा चॉईस असतो असे नाही. एका मायबोलीकरणीचा आत्येभाऊ
माझ्यासोबत इथे काही महिने होता, तेव्हा त्याला काही खास पदार्थ करुन खिअलवले होते. तो हैद्राबादला वाढलेला होता, त्यामुळे खुप तिखट खायचा. त्याच्या हातचेही पदार्थ मी खाल्ले, पण मला फार तिखट खाणे जमत नाही. पण तोही अंगोला सोडून गेला आहे आता.

तो असताना बाहेर जाणे व्हायचे माझे, पण आता नाही. डी एस टी व्ही, वाचन, गाणी ऐकणे यात माझा बराच
वेळ जातो. विकेंडची सकाळ मित्र मेत्रिंणींना फोन करण्यात जाते.

सध्या मी याच घरात असल्याने, या घराचे काही फोटो...

१) ही माझी बिल्डींग, माझे घर आठव्या मजल्यावर ( पण या फोटोत दिसत नाही.)

Vida Bldg - Copy (2) - Copy

२) इथले क्लब हाऊस

Vida club house - Copy (2) - Copy

३) बिल्डींगच्या सभोवती उत्तम गार्डन राखलेले आहे.

Vida Garden - Copy (2) - Copy

४)

Vida Garden 3 - Copy (2) - Copy

५)

Vida Garned 2 - Copy (2) - Copy

६)

Vida Gulmohar - Copy (2) - Copy

७) बिल्डींग बाहेरचा रस्ता ( पण हा कॉलनीचाच भाग आहे. )

Vida Rasta - Copy - Copy

८) आमच्या बिल्डींगचे रिसेप्शन

Vida reception - Copy

९) घराच्या बाल्कनीमधून दिसणारा रस्ता आणि संध्याकाळ ( कॅमेरा हलला आहे. खरे तर मला सुर्यास्त
टिपायचा होता.. तो परत कधीतरी )

Vida sandhyakal - Copy

आफ्रिका, म्हणजे काहीतरी मागासलेला देश ( हो अनेक जण देशच समजतात ) आहे हे खरे नाही तितकेसे. खरे तर हा एक विशाल खंड आहे.
त्यातल्या ८ देशांना मी भेटी दिल्या. ३ देशांत प्रदीर्घ काळ राहिलो. अत्यंत सुंदर अशा या प्रदेशाची किंचीत
ओळख करुन द्यायचा प्रयत्न केलाय मी गेल्या ३ भागात. पुढच्या भागात माझ्या भारतातील घरांबदल लिहून,
हि मालिका आटोपती घेतो.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा लेखही मस्त. मालीका लवकर संप(व)ल्यासारखी वाटतेय, अजून भाग येऊ द्यात.
आणि हो, फोटोंबद्दल धन्यवाद Happy

ते झाड एवढे प्रचंड होते, कि त्याच्या खोडात एक साठवणीची खोली होती >>> ह्याचाही एक फोटो हवा होता ब्वॉ.

हा लेख पण खुप मस्तच.

बिल्डींग त्याचा सभोवतालचे गार्डन, रिसेप्शन अगदी सुंदर आहेत.

हा पण लेख छान. रिसेप्शन आणि एकंदरीत सगळाच परिसर खूप सुंदर दिसतोय. पाण्याच्या व्यवस्थेविषयी ऐकून गंमत वाटली.
जे बाहेरून जॉब साठी येतात,त्यांना चांगल्या सोयी पुरवल्या जातात असं तुमच्या लेखांवरून वाटलं. मग लोक लौकर पळून का जातात?

आभार...

वेनिल..

इथे अशी मोठमोठी झाडे खुप आहेत. काहिंचे फोटो किलांबा मधे पण सापडतील. हे जे झाड होते ते ऐन भरवस्तीत होते आणि कुठल्याच बाजूने ते पुर्णपणे कॅमेराच्या फ्रेम मधे मावत नव्हते.

सुलक्षणा... फक्त सिनियर लोकांना अशी सुसज्ज घरे मिळतात. ज्युनियर्सना कँप मधे ठेवतात. पण इथे तो प्रश्न नाही. मुख्य प्रश्न आहे तो जेवणाचा. भारतीय पदार्थ मिळत नाहीत, कुठे बाहेर जेवायला जायची सोय नाही, स्वतःला जेवण शिजवता येत नाही... असे त्रांगडे असते. दिवसभर मेहनत केल्यावर जेवणही मनासारखे नाही मिळाले तर माणूस वैतागणारच ना ? असा प्रश्न ( म्हणजे निदान जेवणाचा तरी ) गल्फ देशांत येत नाही. तो केनयातही येत नाही. या देशांत आपण भारताच्या बाहेर आहोत, असेही वाटत नाही.