एकशे त्रेपन्न मिनिटांची 'राख' - (Raakh (1989))

Submitted by रसप on 10 December, 2016 - 01:26

'राख' म्हणून एक सिनेमा १९८९ ला येऊन गेला. बासुदांचे (बासू भट्टाचार्य) पुत्र आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शक आहेत. आमीर खानचा हा दुसराच सिनेमा. बहुतेक मर्यादित रिलीज झाला होता कारण काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला तोपर्यंत मला असा कुठला सिनेमा आहे, हेसुद्धा माहित नव्हतं !
युट्युबवर ह्याची प्रिंट आहे म्हणून आवर्जून पाहिला.

जर तंदुरी चिकनला साखरेच्या पाकात घोळवलं किंवा गुलाब जामसोबत हिरवी चटणी घेतली किंवा टीव्हीवर येणाऱ्या कुठल्याश्या सुमार जाहिरातीत दाखवतात तसं ब्लेझर, टाय वगैरेखाली लुंगी नेसली किंवा सायकलला ट्रकचं टायर लावलं किंवा... अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील, तर ते किती विजोड वाटेल, तसंच काहीसं ह्या 'राख'चं झालं आहे. कथानक फुल्टू व्यावसायिक आणि बळंच त्याला समांतर सिनेमाच्या वाटेवर ओढलंय.

एकंदरीत हा सिनेमा तुकड्या तुकड्यांत हास्यास्पद, रटाळ आणि फुसका झाला आहे.
{मी अख्खी स्टोरी सांगणार आहे. काहीही न लपवता. स्पॉयलर वाटत असेल तर पुढे वाचू नका !}

तर काय असतं की, आमीरचं एकीवर प्रेम असतं. त्यांचं बहुतेक अफेअर असतंही, पण ब्रेक ऑफ होतो. सिनेमात ते दाखवलेलं नाहीय. डायरेक्ट ब्रेक ऑफ नंतर पुढे सुरु होतो सिनेमा. एका पार्टीत तिला पार्टीबाहेरचा एक जण छेडतो. न राहवून आमीर त्याला एक ठोसा मारतो. त्या गुंडासोबत त्याचे ४-५ पंटर असतात. पण तो काही करत नाही. गपगुमान निघून जातो ! (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) पार्टी संपल्यावर आमीर तिला घरी सोडायला जात असताना त्याची गाडी ते गुंड लोक रस्त्यात अडवतात, रस्त्यावरच त्याला बदडतात आणि तिचा बलात्कार करतात. ह्या प्रकारानंतर आमीर डिस्टर्ब होतो. डिप्रेस होतो. स्वत:ला अपराधी समजायला लागतो. तो पोलिसांत जातो, पण तिथे त्याला कुणी विशेष दाद देत नाही. In fact, पोलीस इन्स्पेक्टर झालेला पंकज कपूर त्या रात्री रस्त्यावर बलात्कार होत असताना तिथूनच आपल्या बाईकवर गेलेला असतो आणि आमीरने त्याला मदतीसाठी हाका मारलेल्या असतात. तो आमीरचं ऐकून घेतो आणि त्याला मदत करायचं आश्वासन वगैरे देतो. दुसरीकडे डिप्रेस्ड आमीरला त्याचा बाप झापून काढतो. मग हा थेट घर सोडून रस्त्यावर राहायला लागतो. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) एकदा पंकज कपूर त्याला झापत असताना अचानक आमीरला बोलायला सुचतं की, 'अरेच्या लबाडा... त्या रात्री तूच तर होतास बाईकवर ! मी तुला 'हेल्प.. हेल्प' बोललो, तर तू पळून गेलास की !' ही गोष्ट त्याला इतके दिवस बोलावीशी वाटत नाही. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) हा पंकज कपूर म्हणे अनेक दिवस त्या गुंडाच्या मागावर असतोच पण त्याला पुरेसा पुरावा वगैरे मिळत नसतो ! असेल बुवा.. पण एकदाच आमीर त्याला इमोशनल डोस देतो तर त्यावरून ह्याला काय सुरसुरी येते की, हा डायरेक्ट एका पार्टीत त्या गुंडावर शाब्दिक चढतो आणि बंदूकही दाखवतो, हवेत फायरही करतो ! मग काय ? सस्पेंड...!! हे सोयीचं व्हावं म्हणून कमिशनरही त्या पार्टीत असतोच. मग सस्पेंड झाल्यावर हा आमीरला हुडकून काढतो आणि त्याला बदल्यासाठी ट्रेन करतो. त्याच्याकडून व्यायाम वगैरे करवून घेतो. लैच फिल्मी. पण ह्या सगळ्याला अजिबात फिल्मी मानायचं नाही. का ? कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय ! बराच व्यायाम केल्यावरही आमीरचे स्नायू टरटरत वगैरे नाहीत. पण ट्रेनिंग पुरेसं झालेलं असतं. मग पंकज कपूर त्याला एक पिस्तुल आणून देतो. ह्या प्रसंगी आमीर जी प्रतिक्रिया देतो ती म्हणजे लेखक-दिग्दर्शकांच्या खुळचट आणि बिनडोकपणाचा कडेलोट आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यायला हवी असं हास्यास्पद वर्तन, एक सूडाला पेटलेला, कठोर शारीरिक प्रशिक्षण घेत असलेला मनुष्य ते पिस्तुल पाहून करतो. पिस्तुल समोर पाहून, आमीर ते हातात घेतो आणि अक्षरश: लहान मुलाप्रमाणे ते इथे, तिथे रोखून तोंडाने 'ढिश्क्यांssव.. ढिश्क्यांssव' असे आवाज करतो.
हे दृश्य पाहून मी तत्क्षणी सिनेमा बंद केला. कारण तो एक मानसिक धक्का होता. धक्का पचवला आणि मग तमाशा पूर्ण करावा म्हटलं.
ह्यानंतर आमीर बाजारात जाऊन भाजी घेऊन यावी त्या सहजपणे वेगवेगळ्या जागी जाऊन गुंडाच्या डाव्या, उजव्या हातांना मारत सुटतो. हे मारणं, त्याचं चित्रण म्हणजे बाष्कळपणाचा अजून एक नमुना. कुठेही त्यातली तीव्रता जाणवतही नाही.
ह्या फुसकेपणामागे महत्वाचा हात पार्श्वसंगीतकार रणजित बारोटचा आहे. पडद्यावर चाललेल्या प्रसंगाशी अधिकाधिक विसंगत पार्श्वसंगीत कसं देता येईल, ह्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ते सिनेमाभर करतात. (असं खरं तर बोलायचं नसतं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) सिनेमात एकही गाणं नाही, ह्यासाठी मात्र मनापासून आभार मानायला हवे. कारण तेव्हढ्या मिनिटांनी ही रटाळ लांबी थोडीशी कमी झाली ना !

सिनेमा आमीरच्या आत्मकथनातून उलगडत जातो. त्याचा दुसराच सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं ते बोलणं सराईत नाही. एकसुरी, अभिनिवेशशून्य आणि (जसं आजही त्याचं बोलणं बऱ्याचदा असतं तसंच) सपाट कथन सिनेमाभर कंटाळा समसमान राहील, ह्याची दक्षता घेतं.
सिनेमाच्या शेवटी आमीर म्हणतो, 'यह मेरी ज़िन्दगी की राख हैं'
सिनेमाच्या शेवटी आपण म्हणतो, 'यह मेरे १५३ मिनिटों की राख हैं'

युट्युबवरची प्रिंट खराब असावी कदाचित पण संपूर्ण सिनेमा अतिशय काळोखा आहे. त्याचा कंटाळा स्वतंत्रपणे येतो.
छायाचित्रक संतोष सिवन आणि संकलक ए. श्रीकर प्रसाद ह्या दोन दिग्गजांचा हा पहिला सिनेमा होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. बहुतेक सिवन व प्रसाद साहेबांनी ह्या सिनेमानंतर नवीन पाळणे घेतले असावेत.

सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता (पंकज कपूर), विशेष पुरस्कार (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट संकलन (ए. श्रीकर प्रसाद) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले आहेत. (इथे आपण कुत्सितपणे हसू शकतो.)

Raakh,_1989_Hindi_film.jpg

खरं तर सुरुवातीला येणाऱ्या नामावलीत 'Dialogue' ऐवजी 'Dialog' पाहिल्यावर मला जे आश्चर्य वाटलं होतं, त्यावरुनच हे समजायला पाहिजे होतं की सिनेमा किती काळजीपूर्वक बनवला असेल. पण आपलं पण - 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' - असंच आहे ना ! आणि थोडा डाऊट येऊनही मीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !

- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2016/12/raakh-1989.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आठवतोय हा सिनेमा. त्यावेळी अशा मुख्य धारेतल्या होरोंनी समांतर सिनेमात काम करायची पद्धत नव्हती. त्यात अशा चॉकलेट हिरोने, दुसराच सिनेमा असा केला म्हणून कवतिक झाले होते, पण ते सगळे सिनेमा रिलीज व्हायच्या आधी.. नंतर कुठल्या पेपरमधे याचा रिव्यू पण वाचलेला आठवत नाही.

अगदीच जळजळीत राख Lol

त्या 'ढिश्क्यांssव.. ढिश्क्यांssव' सीनसाठी पिक्चर बघण्याची इच्छा होतेय Wink Lol

नैना बलसावर नावाची शांपूची झैरातीतली बै होती तोच हा शिण्मा का? कमाल आहे तुमची. पूर्णवेळ पाह्यला तरी कसा आणि का? मागे एका धाग्यावर लिहिलं होतं तेच लिहितो.

या चित्रपट समीक्षण लिहिण्याच्या व्यवसाय / छंदापायी काय काय पाहायचं तुमच्या नशिबात आहे. भोग आहेत हे सगळे, भोगावेच लागणार (सौ. शिरीष कणेकर)

हम्म.. माझा भाऊ तेव्हा आमिरच्या प्रेमात होता आणि हा चित्रपट त्याने पाहिला होता. बहुतेक त्याला चित्रपट काहीच समजला नसणार कारण घरी येऊन त्याने आमिरने इतकी धडपड जिच्यासाठी केली तिचेच शेवटी दुसऱ्याशी लग्न झाल्याने त्याच्या आयुष्याची राख झाली असे सांगितल्याचे आठवतेय. सुप्रिया पाठक हिरोईन आहे.

मी बहुधा लहानपणी केबलवर हा पिक्चर पाहिला होता. बलात्काराचा सीन सुरू होताच चॅनेल चेंज करावा लागला. त्यानंतर पुढे काय झाले हा प्रश्न कित्येक दिवस छळत होता. मग विसरून गेलो. आज तुमच्या या धाग्यामुळे मनाच्या चोरकप्प्यात अनुत्तरीत राहिलेल्या एका प्रश्नाची आज अखेर राख झाली.

अवांतर -

>>>> सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता (पंकज कपूर), विशेष पुरस्कार (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट संकलन (ए. श्रीकर प्रसाद) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले आहेत.
>>>>>>>

आमीर खानला जर अश्या पिक्चरमध्ये ढिशक्यांव करायचा राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल, आणि तो तोण्ड वर करून त्याचा स्विकार करत असेल, तर फिल्मफेअरमध्ये त्याला एवार्ड न देता शाहरूखला देतात म्हणून रडण्याचा त्याला काही एक हक्क नाहीये.

{{{ आमीर खानला जर अश्या पिक्चरमध्ये ढिशक्यांव करायचा राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल, आणि तो तोण्ड वर करून त्याचा स्विकार करत असेल, तर फिल्मफेअरमध्ये त्याला एवार्ड न देता शाहरूखला देतात म्हणून रडण्याचा त्याला काही एक हक्क नाहीये. }}}

उलट म्हणूनच तर हक्क आहे. म्हणजे कसंय की तो म्हणू शकेल - मी फक्त तिथे " ढिशक्यांव करायचा" सुमार अभिनय केला तरी ते नॅशनल अ‍ॅवॉर्ड देतात तर त्याहून बराच बरा अभिनय करुनही साधेसे फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड का देत नाहीत.

असो. जोक्स अपार्ट -

जो जीता वही सिकंदर या आशयघन चित्रपटाकरिता उत्तम अभिनय करुनही त्याला तेव्हाचा फिल्मफेअर पुरस्कार न मिळता तो बेटा या टुकार चित्रपटाकरिता सवंग अभिनय करणार्‍या अनिल कपूर यास मिळाला तेव्हापासून अमिरचा या पुरस्कारावरील विश्वास उडाला असावा असा माझा अंदाज आहे.

Mr Perfectionist was mighty upset when he didn’t win the Best Actor award for Rangeela at Filmfare Awards in 1996. He felt he deserved the trophy however it was SRK who walked away with the award for his filmDilwale Dulhania Le Jayenge that year. While this whole episode didn’t go down well with Aamir, he even thought that the organisers were always biased towards Shah Rukh.

गूगाळून

राष्ट्रीय असो वा फिल्मफेअर, सगळं मॅनेजेबल* असतं, असं माझं तरी 'ठामेस्ट' मत आहे.

(* मॅनेज करता येण्यासारखं. सगळंच मॅनेजच केलेलंच असतंच, असं म्हणायचं नाहीयेच.)

'अरविंद देसाई की अजीब दास्तान' ची विकी -

Arvind Desai (Dilip Dhawan) is the only son of a rich businessman (Shriram Lagoo) who deals in luxury handicrafts and products. His feelings for his father are mixed. While he hates the latter's dominating nature, he admires his power and lack of scruples. He has long discussions on art and politics with a Marxist friend Rajan (Om Puri), is seeing his father's secretary Alice (Anjali Paigankar) and sometimes he visits a prostitute, Fatima. Much against his wishes, his marriage is arranged to a girl from a high-class family that has just returned from Paris much to the dismay of Alice's mother, who realizes that Alice was time-pass for Arvind and nothing more. Suresh Oberoi has done cameo in movie. The film ends with the craftsman making carpets.

वर दिलेल्या 'प्लॉट'चा विचार केला तर शेवटच्या ओळीचा बाकीच्या पसाऱ्याशी असलेला घनिष्ठ संबंध आणि परिच्छेदातील चौथे वाक्य लक्षात घेता, हा सिनेमा 'राख'चाही बाप असण्याची खात्री वाटतेय. मजा येईल ह्या आत्मक्लेशाची !

{{{ हा सिनेमा 'राख'चाही बाप असण्याची खात्री वाटतेय. मजा येईल ह्या आत्मक्लेशाची ! }}}

बापच काय? हा तर मी आजवर पाहिलेल्या रटाळतम चित्रपटांचा आजोबा, पणजोबाच नव्हे तर पार खापरपणजोबा वाटला मला. मजेचं सोडा, चित्रपट पूर्ण पाहू शकलात तर तो संपल्यावर हायसं वाटेल तुम्हाला.

सूलू_८२

होय असे काही चित्रपट असतात की ज्यांच्या टायटल्सची आपण कल्पनाही करु शकत नाही. मागे मंगला गोडबोलेंच्या एका लेखात "मिस संयुक्ता मिसानी को मिस क्यो कहते है, मिसफिट क्यो नही?" अशा शीर्षकाच्या चित्रपटाविषयी वाचलं होतं पण प्रत्यक्षात असा काही चित्रपट पाह्यला मिळाला नाही.

राख बद्दला आताच कळलं. ढिश्क्यॅव ढिश्क्यॅव भारीच. अ‍ॅवार्ड्स मिळालेत म्हणजे आपल्यालाच न कळण्यासारखं काही भारी असणार.

@ बिपीनच्न्द्र , The film ends with the craftsman making carpets.>>> हे वाचुनच कल्पना येतेय Lol