सोनचाफा

Submitted by निशिकांत on 1 December, 2016 - 10:40

सोनचाफा

सोनचाफा बहरलेला, तू घरी येशील का?
रात्र ही गंधाळलेली ओंजळी भरशील का?

दव कणांनी चिंब झाले स्वप्न सारे तुजमुळे
स्वप्न माझे पाहण्याला तू इथे असशील का?

स्पंदने उबदार माझी तेज झाली का गडे?
गारव्याचा झोत होउन चैन मज देशील का?

चांदणे मज पोळताहे विरह देई यातना
मोकळ्या बाहूत येण्या तू मला पुसशील का?

मी इथे जे भोगते रे! तू तिथे सहतोस का?
भेट होता मजप्रमाणे गोड तू हसशीका?

वाट ही अंधारलेली, काजवे म्या धाडिले
झाकल्या नेत्री पहाटे कैद तू होशील का?

उंच हे आकाश अपुले चंद्रही तो आपुला
तोडण्या तारे भरारी उंच तू घेशील का?

खूप बसलो पाय सोडुन संथ या पाण्यामधे
खोल या आनंदडोही तू मला नेशील का?

पौर्णिमा "निशिकांत" आणी लाट प्रेमाची सवे
याद येता गतक्षणांची तू पुन्हा झुरशील का?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users