व्हेंटिलेटर

Submitted by कविता केयुर on 19 November, 2016 - 01:34

व्हेंटिलेटर

सिनेमाच्या निमित्ताने परत एकदा या शब्दाची भेट झाली. दोन वर्षांपूर्वी आयुष्यात पहिल्यांदा भेटलेला हाच तो व्हेंटिलेटर. लाईफ सपोर्ट सिस्टिम एवढाच काय तो त्यावेळी समजलेला अर्थ .. पण नंतर वाटलं , आजच मरण उद्यावर ढकलणार एक साधनच ते. अगदी जवळच्या माणसाला व्हेंटिलेटर वर पाहणं , यासारखं दुर्दैव नाही.

काय गंमत आहे पहा, एकीकडे या हॉस्पिटलमध्ये आपली व्हेंटिलेटर शी नव्याने ओळख होते आणि दुसरीकडे आपल्याच जुन्या माणसांची परत नव्याने भेट घडते.. होत राहते ... रोजच.

आपलं कर्तव्य ओळखून दिवस रात्र पेशंटची सेवा करणारे डॉक्टर, नर्स हे लोक एकीकडे आणि फक्त रीत म्हणून भेटायला येणारे दुसरीकडे. बरं , ते आधार द्यायला येतात कि आधार जाणार याची जाणीव करून द्यायला , हेच समजत नाही. खरं तर तेव्हा प्रेमाचा एक हात हवा असतो , जे आपल्या हातात नाही ; तरीही त्यासाठी त्या वरच्याशी भांडायला आधार हवा असतो , डोक्यावर हात ठेवून बोलणारा प्रेमाचा एक शब्द हवा असतो ....

सर्व छान असतांना कधीही भेटायला न येणारे , हक्कानी चौकशीचा कधी एक फोन न करणारे चेहरे मग अचानक आजूबाजूला दिसू लागतात अन् तेंव्हा जीव गुदमरू लागतो. अशा वेळी न सांगता आपलं मन ओळखणारे , पाठीवर प्रेमाने हात ठेवणारे, काहीही न बोलता आपला हात घट्ट धरणारे काही हात आपल्यासाठी व्हेंटिलेटर होतात.

पेशंटचा व्हेंटिलेटर काढायचा कि नाही हा प्रश्न शेवटी डॉक्टर विचारतात आणि तो कर्ता करविता सारेच प्रश्न संपवतो. एक दोन दिवस होत नाहीत तर 'पुढची कार्य ' हा चर्चेचा विषय कानावर आदळतो आणि परत त्याचा श्वास अडकतो. अरे जो गेलाय ते दुःख आधी स्वीकारू तर द्या , मोडलेल्या माणसांना सावरणं महत्वाचं कि हे बोलणं. ज्याच्यावर वेळ येते तोच फक्त कोसळलेला बाकीचे फक्त व्यवहाराने चालणारे. बरं , थोड्या रूढी परंपरा सोडू म्हटलं तर त्यावरून वादंग; अरे ज्या कुटुंबाला फरक पडलाय त्याला ठरवू द्या ना , तुम्ही का विडा उचलता .. तुम्हाला फरक पडलाय का ? नाही ना , नाहीतर 'ती' बातमी मिळाल्यावर आधी जेवून मग नसता आलात हॉस्पिटलात आणि हो काल कुठल्याशा प्रदर्शनात जावून जी खरेदी केली तुम्ही , ते चाललं का तुम्हाला या सुतकात ... अरे किती खोटं जगाल.

कर्तव्य विसरायचं आणि वेळ आली कि हक्काची मागणी करायची , बहुतांश घरात दिसणार एक विदारक सत्य. आयुष्य किती अमूल्य आहे , अस्थिर आहे ते जवळच्या माणसाला जाताना पाहून समजत, पण म्हणून काय तो अनुभव येईपर्यंत वाट पहायची ? तो खोटा अहम आधीच नाही का सोडू शकत आपण. किती आणि कसं जगलोय असा विचार करतांना किती उरलय हे पण तर पाहायला नको का ? मोकळ्या मनानं नात्यांच्या या दुनियेत एक पाऊल पुढे टाकलं , तर आपण काही लहान नाही होणार हे कधी समजणार आपल्याला ?

पण एक बरं झाल, या चित्रपटाच्या निमिताने का होईना आपल्या नात्यांचा विचार तर काहीजण करू लागले. आणि हो अजून इतका वेळ आहे आपल्याकडे ; जे या आधी करायचं राहिलं ते आतां करायला .. एक प्रेमाची मिठी मारायला , हक्कानं काही द्यायला काही घ्यायला , मनापासून माफी मागायला , झालं गेलं विसरून जायला , परत एकदा एकत्र यायला ... कधीही न उलगडलेले नात्यांचे धागे या निमित्ताने उलगडण्याचा प्रयत्न करायला.

कदाचित यामुळे जर कधी आपण व्हेंटिलेटर वर गेलो तर त्यावेळी आपल्या नात्यांना कुठल्याच व्हेंटीलेटरची गरज भासणार नाही , हे नक्कि .......

- कविता केयुर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ दिवसा पुर्वी (१६/११/१६) अगदी ह्याच भावनेतुन गेलेय. डोळ्यात पाणी तुम्हि आणलत, त्यावेळी फक्त लोकाना अनुभवत होते पण रडले नव्हते. १०० % सहमत.