शिवाजीराजांचे नव्या दमाचे नवे 'किल्लेदार' ....

Submitted by अजातशत्रू on 22 October, 2016 - 23:52

दिवाळीची आम्ही वाट बघतो आपल्या शिवाजी राजांसाठी ! दिवाळीतल्या फराळ फटाक्यापेक्षा राजांचे आगमन जास्त दणक्यात अन अगदी उत्कंठेने साजरे होते ! सिंहासनाधीश राजे दिवाळीच्या आधी किल्ल्यात स्थानापन्न होतात तोच दिवस खरा दिवाळीचा दिवस !! प्रत्येक अंगणात उभे राहतात गडकोट ! छातीचा कोट फुलून यावेत असे देखणे गडकोट !! काळ्या - करड्या मातीतून बनलेले हे किल्ले कधीच भग्नावस्थेतल्या खंडहरासारखे नसतात , ना यांना खिंडारे असतात, ना चिरे ढासळलेले राजवाडे ना पडलेले महाल !! या सर्व किल्ल्यांमध्ये आपल्या राजाचे धगधगते चैतन्य ओसंडून वाहत असते. नवीन आस मनी घेऊन चिमुकल्या हातांनी नव्या उमेदीने जीव लावून बांधलेले ते काळजाचे बुरुजच असतात, त्याला शोभिवंत करण्यासाठी रोशनदाने, मशाली, टेंभे, चिरागदाने, शामदाने ना उंची झुंबरे यापैकी काही लागत नाही ! या किल्ल्यांना प्रकाशमान करण्यासाठी पुरेशा असतात काळजाच्या पणत्या, ज्यात घामाचे तेल असते अन डोळ्याच्या फुलवाती !
या किल्ल्यांना नसते जीर्ण झालेले, मोडकळीस आलेले भग्नावस्थेतले प्रवेशद्वार, यांना पुठ्ठ्याचेच दार असते पण घरातला वारस याचा पहारेकरी होतो अन डोळ्यात तेल घालून याचे रक्षण करत राहतो......

दिवाळीला आमच्याकडे फटाक्यापेक्षा किल्ल्यांचे वेड अंमळ जरा जास्तच असते. शिवाजीराजे, त्यांचे मावळे अन बुरुजांचा, तोफांचा एक बेदुंध कैफ तेंव्हा सगळ्या अंगणातून ओसंडून वाहत असतो. खरे तर दिवाळी जवळ आली हे मुलाच्या परीक्षेच्या वेळापत्रकावरून आधी कळते ; दसरा होऊन जातो, अभ्यासाचा वेग वाढतो अन कधी सहामाही परीक्षा संपतात काही कळतच नाही ! परीक्षा झाल्या रे झाल्या की सुरु होते किल्ल्याची तयारी ! मग सुरु होते माती आणण्याची कसरत. काळी,करडी चिकण माती जास्त चांगली. मऊशार माती मिळाली की सोन्याहून पिवळे ! दोनेक पोती माती, विटा, दगड-धोंडे, विटांचा चुरा, जुना बारदाणा, अळीव, पुठ्ठे, कार्टूनचे जाड तुकडे,काही फळकुटे आणि गरजेप्रमाणे मुरूम मिळाले की घरातली जाड चाळणी कामाला येते...दरवर्षी नवा किल्ला, नवे आराखडे डोक्यात रुंजी घालत असतात. कधी काल्पनिक तर कधी फोटोनुसार तर कधी अगदी नकाशाबरहुकुम असं काम चालते..

प्रत्येक अंगणात मातीच्या ढिगातून साकारत जातो एक नवा किल्ला, कधी हा ओबड -धोबड वाटतो तर कधी अगदीच डोंगरी मुलखातला वाटतो तर कधी अगदी ओसाड माळावरचा वाटतो, क्वचित अगदी जावळीच्या घनदाट खोरयाची आठवण यावी अशी हिरवाई अवतीभोवती चारेक दिवसात जन्माला येते. हे किल्ले दिसायला कसेही असोत पण हे किल्ले मराठी मनामनातालं किल्ल्यांचं दार्शनिक प्रतिक बनून शिवाजीराजांच्या प्रेमाचे विलोभनीय रुपडे घेऊन अंगणात दिमाखात उभे असतात......हे किल्ले नुसतेच किल्ले नसतात याला तटबंदीही असते अन वाहत्या पाण्याचे खंदक देखील असतात, जोडीला अणकुचीदार माची अन रांगडे बुरुज देखील असतात...साधारणपणे दोनेक दिवसात किल्ला पूर्ण होतो..मग गेरू आणि पिवडी, राखुंडी रंगाचे रंगकाम होते, बारदाण्यावर टाकलेले अळीव तोवर उगवायला लागते...तटबंदी अन प्रवेशद्वार बनते अन बालेकिल्ल्याला रंग चढतो, बुरुजावर तोफा चढतात आणि मग किल्ला अगदी भव्य वाटू लागतो ! किल्ल्यावर मानाचा भगवा झेंडा डौलात उभा राहतो अन किल्ल्याची शान काही और वाटू लागते ....नंतर पुढे सगळे जण ज्या क्षणाची वाट पाहत असतात तो क्षण देखील येतो, सिंहासनाधीश शिवाजे राजे यांचे किल्ल्यातले शुभागमन ! राजे किल्ल्यात आल्यावरच किल्ल्याचा श्वास सुरु होतो तोवर तो किल्ला मराठी मनामनांचा मानाचा अग्रबिंदू झालेला असतो.

शिवाजेराजे स्थानापन्न होताना भले इथे तुतारया फुंकल्या जात नाहीत की नगारखान्यातले नगारे झडत नाहीत की सनया वाजत नाहीत पण इथे गरजतात कानाचे पडदे फाडणारया शिवगर्जनांचे हुंकार ! प्रत्येक किल्ल्याचा चिमुकला किल्लेदार त्याची मावळ्यांची फौज किल्ल्यात जागोजागी तैनात होते अन किल्ला बोलू लागतो... किल्ला अगदी हरखून गेलेला असतो त्याच्या राजाच्या आगमनाने तो सद्गदित होऊन गेलेला असतो, त्याचा ऊर भरून येतो, श्वास फुलून जातो, कंठ दाटून येतो अन प्रत्येक अंगणातले, गल्लोगल्लीचे हे गडकरी - किल्लेदार त्या किल्ल्याची स्थिती मनोमन जाणून एकच मेघदुंदुभीसम घोष करतात,"तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ जय शिवराय", "जय जय जय जय शिवाजी ! जय जय जय जय भवानी!","छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा जयघोषाने तो किल्ला मोहरून जातो, किल्ल्यावरचे मावळे शहारून उठतात अन राजे भरून पावतात....
दिवाळी होईपर्यंत या किल्ल्याची अगदी जीवापाड काळजी घरोघरी घेतली जाते, कधीकधी मावळ्यांच्या पुढ्यात लाडू चिवडा देखील इवल्याशा कागदी थाळीत मांडला जातो तेंव्हा राजे देखील मिश्कीलपणे पण अभिमानाने या नव्या किल्लेदारांकडे डोळे भरून पाहतात...

'राजे होते, म्हणून आम्ही आहोत' ही भावनाच किती प्रेरणादायी आहे याचा हा बालपणीचा जिताजागता अनुभव आयुष्यभराची शिदोरी बनून राहतो...दिवाळी संपल्यावर किल्ल्याची रिकामी जागा काळीज रिते करून जाते, त्या कोपरयात पाहिले तरी काही तरी हरवल्यासारखे वाटते, काही तरी चुकल्यासारखे वाटते....सुट्टी संपते अन शाळा सुरु होते आणि घरोघरचे गडकरी- किल्लेदार शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात आपापल्या किल्ल्यांच्या चित्तरकथा त्यांच्या मैतरांना दिवसभर सांगत असतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यातले बोलके भाव अन चेहरयावरचे विलक्षण तेज अगदी थक्क करणारे असते...

आजकाल सर्वच पक्षांना वा संघटनांना कार्यकर्ते, प्रचारक वा सदस्य मिळवण्यासाठी दरसाली मोहीम राबवावी लागते. मग कुठे काही लोक त्यांच्या पदरात पडतात. पण शिवाजीराजांचे मावळे दरसाली आपसूक वाढत जातात, त्यांना कुठली मोहीम राबवावी लागत नाही की कुठला प्रचार करावा लागत नाही. शिवाजीराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन आपल्या उराशी आपल्या भगव्याची शान बाळगणारे दरसाली नव्या दमाचे नवे किल्लेदार वर्धिष्णू होताहेत ! स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे, स्वराज्याचे तारणहार असणारे त्यांचे मावळे आणि स्वराज्याचा प्राण असणारे अभेदय किल्ले यांचा जो अभूतपूर्व ठसा बालपणी अशा उत्कट पद्धतीने उमटतो की तो माणूस अखेरच्या श्वासापर्यंत याच्या गारुडातून बाहेर येऊ इच्छित नाही !
म्हणूनच म्हणावे वाटते की, 'राजे तुम्ही होता, म्हणून आम्ही आहोत' ही भावनाच खरं किती जीवनदायी आहे. होय ना !!

- समीर गायकवाड .

ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_23.html

( सोबतचे छायाचित्र जालावरून साभार )
sf00-g.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users