येलघोल- एक अविस्मरणीय अनुभव

Submitted by shantanu paranjpe on 21 October, 2016 - 03:21

येलघोल हे गाव मावळ तालुक्यात निसर्गरम्य जागी पहुडलेले आहे. आपल्याला कल्पना सुद्धा नाही येणार पण अशा सुंदर ठिकाणी अतिशय सुंदर अशी लेणी वसलेली आहेत. या लेण्यांना भेट द्यायला मात्र थोडे कष्ट घ्यावे लागतात. येलघोलला जाण्यासाठी सर्वप्रथम कामशेतला यावे, त्यानंतर कामशेत वरून तिकोनापेठ/काळे कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागावे. एक १० किमी अंतरावर कडधे नावाचे गाव लागते. कडधे गावातील मुख्य चौकातून डावीकडे वळावे (हा रस्ता सरळ सोमाटणे फाट्यावर जातो). साधारण ३-३.५ किमी पुढे गेल्यावर अर्डव गाव लागते, तिथून उजवे वळण घेऊन पुढे ६-७ किमी अंतरावर असणाऱ्या येलघोल गावात आपण येऊन पोहोचतो!

येलघोल या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे हे गावात गेल्या गेल्याच समजते. गावात थेट मारुती मंदिरापाशी गाडी लावावी. मंदिरापाशी असणाऱ्या अवशेषांमधून येलघोल या गावाला पुरातन इतिहास असणार हे लगेच समजून येते. त्याचे कारण म्हणजे मंदिराशेजारी असणाऱ्या ७-८ समाध्यांचे अवशेष. एका सरळ रेषेत हे अवशेष मांडून ठेवण्यात आलेले आहेत. मंदिराच्या दरवाज्याशेजारी असणारे गजलक्ष्मीचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते. गजलक्ष्मीचे शिल्प सापडणे म्हणजे या भागात समृद्धी नांदत होती हे सहज लक्षात येते. गजलक्ष्मीच्या शेजारीच असणारा दगडात कोरलेला मारुती आपले लक्ष वेधून घेतो. समोरच असलेल्या छोट्या घुमटीमध्ये भैरोबाची मूर्ती ठेवलेली आहे, या सर्व अवशेषांमुळे आणि येथून जवळच असणाऱ्या तिकोना व बेडसे लेण्या व येलघोल येथे असणारी हीनयान पद्धतीची लेणी, यामुळे येलघोल गावाला त्याकाळात बर्यापैकी महत्व असणार हा निष्कर्ष काढायला काहीच हरकत नाही. कदाचित अधिक संशोधन केल्यास येथे काही महत्वाचे अवशेष सापडू शकतात.
येलघोल गावात असणाऱ्या मंदिरापासून येलघोल लेण्यांकडे जाणारा कच्चा रस्ता आहे जो थेट लेण्यांकडे घेऊन जातो. गावकर्यांना रस्ता विचारायचा असल्यास गडदची गुहा कुठे आहे म्हणून विचारावे कारण येथे ही लेणी ही गडदचे स्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उजवीकडून लेण्यांना जाण्यासाठी रस्ता जातो. येथून सरळ जाऊन तिसऱ्या फाट्याला उजवीकडे सिमेंटच्या रस्त्यावर वळावे आणि सरळ चालत राहावे ते लेणी येईपर्यंत. येलघोल गाव ते लेणी हे अंतर साधारणपणे २-२.५ किमी असेल. एक उत्तम पावसाळी भटकंती करायची असल्यास हा २-२.५ किमीचा रस्ता तुम्हाला निराश करणार नाही. वाटेत ठिकठिकाणी सुंदर रानफुले फुललेली असतात..
मजल दरमजल करत तुम्ही लेण्यासमोर येऊन पोहोचता आणि तो परिसर आणि ती शांतता पाहून मन अगदी प्रसन्न होते. पुण्याची शिवथर घळ म्हणून प्रसिद्ध व्हावे इतके सुंदर स्थळ. लेण्यांच्या अगदी शेजारून एक १०-१५ फुटांचा धबधबा पडत असतो आणि आपण त्या धबधब्याचा गंभीर आवाज कानांवर साठवून घेत लेण्यांमध्ये शिरतो. लेण्यातील शांतता मन मोहून टाकते. हे लेणे म्हणजे एक निव्वळ एक गुहा आहे. आतमध्ये शिरल्याशिरल्या हीनयान पंथीयांचे अस्तित्व दाखवणारा एक स्तूप/दागोबा नजरेस पडतो. अगदी कार्ले किंवा भाजे प्रमाणे भव्य नाही पण जुन्या काळात या स्तुपावर नकीच सुंदर नक्षी असली पाहिजे. साधारण ५-५.५ फूट उंचीचा स्तूप लेण्याच्या एका कोपऱ्यात कोरला आहे. तसे या लेण्यांमध्ये फारसे अवशेष सापडत नाहीत. माझ्यामते कधी कधी वास्तूची भव्यता ही केवळ आकारात न मोजता, ती वास्तू जो आनंद आपल्याला देते यात जर मोजता आली तर कदाचित त्या वास्तूकडे आपण एका वेगळ्या नजरेने बघू शकू. महाराष्ट्रात ज्या ज्या अर्धवट गुहा एक त्यापैकीच ही एक. जेम्स फर्ग्युसन असो किंवा जे. बजेस असो, कुणाच्याच लेखांमध्ये या लेण्यांचा किंवा गावाचा उल्लेख सापडत नाही. जणू काही ही लेणी नकाशावरून काही काळासाठी गायब झाली असावीत.
स्तूपाच्या विरुद्ध बाजूला एक छोटी खोली (विहार?) खोदायचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो पण ते सुद्धा काम अर्धवट सोडलेले आहे. या लेण्यांबद्दल विशेष वाटावे असे एकाच म्हणजे येथे कोरण्यात आलेली शिल्पे. एका रेषेत थोड्या थोड्या अंतरावर ५ ते ६ शिल्पे कोरायचा प्रयत्न केलेला येथे दिसतो. आता ही शिल्पे बुद्धाची म्हणायची तर येथे महायान पंथीयांचा वावर झाल्याचे नाकारता येत नाही कारण हीनयान पंथीय बुद्धांची मूर्ती कधीही कोरत नसत. मूर्ती फारश्या स्पष्ट नाहीत त्यामुळे त्या नक्की कुणाच्या आहेत याचा अंदाज लावणे तसे अवघड आहे. पण बुद्धांच्या आकृतीशी थोडेफार साम्य त्या नक्कीच दर्शवतात.
पूर्ण लेणी पाहण्यासाठी साधारण १५-२० मिनिटे पुरतात. एक नवीन सुंदर ठिकाण पाहिल्याचे समाधान मिळवत आपण येलघोल सोडतो ते पुन्हा येथे येण्यासाठीच..

टीप - येलघोल लेण्यांना भेट द्यायला सप्टेंबर हा महिना सर्वात चांगला कारण वाटेवर अनेक प्रकारची रानफुले फुललेली आपल्याला दिसतात पण जर येथील धबधब्याचा अनुभव घ्यायचा असेल तर भर पावसात जावे. येथूनच जवळ असलेली बेडसे, भाजे व तिकोन्याची लेणी सुद्धा पाहणासारखी असून जर व्यवस्थित नियोजन केले तर एका दिवसात हे चारही लेणी पाहून होऊ शकतात.

छायाचित्रे येथे पाहा!
http://shantanuparanjpe.blogspot.in/2016/09/yelghol.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users