सकारात्मकतेची संस्कृती- एक चिंतन

Submitted by सनव on 15 October, 2016 - 00:24

काही दिवसांपूर्वी सध्या खूप कौतुक होत असलेला पार्च्ड नावाचा सिनेमा लावला. राधिका आपटेने व इतरही सर्वांनी अप्रतिम काम केलं आहे. पण एका पॉईंटला मी तो बघायचं सोडून दिलं- इट्स टू सॅड, टू डार्क.
मला त्रास होणारं काही पहायचं नव्हतं. त्याऐवजी फ्रेन्ड्स बघू पुन्हा.
एकेकाळी आपल्याकडे लोक ट्रॅजिडी पहायचे..शोकांतिकांचा ट्रेंड होता. आता अलिकडचे सुपरहीट चित्रपट पाहिले तर कॉमेडी, अ‍ॅक्शन, सस्पेंस, रोमान्स जास्त- शोकांतिका कमीच. सुलतान, एअरलिफ्ट, धोनी- प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी..मुव्ह ऑन..थिंक पॉझिटिव्ह.
हे पॉझिटिव्ह थिंकिंग आता कंपल्सरीच झाले आहे.
फँड्री असाच सहज बघता येण्यासारखा होता. पण 'बघवेल का मला' म्हणून नाहीच बघून झालाय अजून. तेच सैराटच्या बाबत उलट. एकदाच एकदा तो शेवटचा सीन बघितला आणि मग रिपीट मोडवर फर्स्ट हाफच बघायचा..द फन पार्ट्स यू नो.
आपण निगेटिव्ह इमोशन्सपासून दूर पळतो का? सगळ्यांनाच हॅपी व्हायचे आहे. आमच्या इथल्या ब्युटी पार्लरमध्ये हल्ली बॉलिवुड्गाण्यांसोबत एका स्वामीची प्रवचनं लावतात मधून मधून. टॉपिक हाच- हाऊ टू बी हॅपी, थिंक पॉझिटिव्ह वगैरे.
पेला अर्धा भरलेला आहे हे बघा. दु:ख विसरा. 'द सिक्रेट' मध्ये सांगितलंय- तुम्हाला कशाचं वाईट वाटत असेल तर ते विसरा, दुसरा काहीतरी विचार करा.
एक मैत्रिण म्हणते- ते जगजित सिंग वगैरे ऐकत जाऊ नका तुम्ही लोक. कसलं ते दर्द, इश्क, कश्ती, साहिल. सॅड सगळं.त्यापेक्षा काहीतरी हॅपी गाणी ऐकत जा.
नवरसांपैकी एक रस आपण विसरुन जावं असं सध्याचं पॉप कल्चर सांगतं.
आपण डिनायल मोडमध्ये असतो की आपण खूप संवेदनशील झालेले असतो की आपल्याला आता डिस्ट्रॅक्शन्सच इतकी मिळतात की आपल्या इमोशन्स बधीरच होत चालल्या आहेत? आनंद, दु:ख काहीही झालं तरी आपण डोळे फोनवर खिळवून फीड्स स्क्रोल करत राहतो.
कोणी म्हणेल, हे भरल्या पोटी जगणार्‍या लोकांचे चोचले आहेत. एसीत बसून हे लिहायला काय जातंय? इतरांची परिस्थिती बघा. ते खरंही आहे. आम्हाला इतरांच्या सक्सेस स्टोरीज आवडतात. आम्हाला आमची छोटी दु:खं मोठी वाटतात. आम्हाला बरंच काय काय वाटतं ते इतरांनाही वाटत असतं का? अंबानीलाही आणि धारावीतल्या खोपटातल्यानाही? अन्यायाच्या , गुन्ह्यांच्या बातम्या फारशा वाचल्या जात नाहीत, चर्चिल्या जात नाहीत, पण ब्रॅड आणि अँजेलिनाचा काडीमोड ही भारतातही हेडलाईन होते. आम्ही या आभासी जगात स्वतःला विसरुन जायचा प्रयत्न करतो का? दृष्टीआड सृष्टी असं म्हणतो का? डोळे मिटून दूध पिणारी मांजरं ही फक्त मार्जारच असतात की माणसंही!
आर व्ही ऑन द राईट ट्रॅक? सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणे गीतेत आहेत. तिथे तो माधव तर म्हणतो- दु:ख व सुख तुम्हाला समान वाटलं पाहिजे. ओह मग सकारात्मक थिंकिंग नको करायला का? आणि भावना समसमान असल्या तर त्या मनात पोचूच दयायच्या नाहीत का? पिकनिकला गेल्यावर कॉन्फरन्स रुमच्या नेट अ‍ॅक्सेसवर फेसबुक बघावं तसं? मनसोक्त पाण्यात हुंदडल्याचा आनंद नाही. किंवा पाण्यात खेळणं आवडत नसताना उगाच सगळ्यांसोबत पूलमध्ये उतरावं लागल्याचं दु:ख नाही.
उत्तरं काय असतील माहीत नाही पण हे प्रश्न तरी कोणाला पडतात का!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ सनव, उत्तरं काय असतील माहीत नाही पण हे प्रश्न तरी कोणाला पडतात का!>>> एवढया दिवस जाणीव नव्हती. परंतु लेख वाचून मलाही नक्कीच वरील प्रश्न पडलेत. उत्तरं काय आहेत? मलाही माहित नाही. माबोवरील जाणकार येथे आपणांस मार्गदर्शन करतीलच. मी प्रतीक्षेत आहे.

चांगलं लिहिलंय. मला स्वतःला सतत आनंदी, हसरं असं जगता येत नाही पण त्याच वेळी सतत दुर्मुखलेलं, उदास असं ही वाटत नाही. जसे मूड बदलत जातात तसं त्या क्षणी काय करावसं वाटतं तेही बदलत. किंवा कधी उलट पण होतं - एखादी चांगली बातमी ऐकल्यावर मन प्रसन्न होतं किंवा वाईट बातमी ऐकली कि उदास. आणि मला वाटतं हीच जगण्याची खरी गम्मत आहे! नाही तरी एकसुरी आयुष्य किती कंटाळवाणं होऊन जाईल!
एक मात्र आहे की थोडी उत्स्फूर्तता कमी झालेय की काय असं वाटतं कधी कधी!

तुमच्या लेखात जरा सरमिसळ जाणवली.. दु:ख हि भावनाच नकोशी होणे, मिडियाच्या जगात स्वतःला विसरणे, सुख-दु:ख दोन्ही समान वाटणे, डिस्ट्रॅक्शन्समुळे संवेदनशीलता कमी होणे आणि त्या त्या क्षणी त्या त्या क्षणाचा आनंद लुटता येणे/ न येणे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

असो.. तुमचा मूळ मुद्दा दु:ख डिनाय करण्याचा आहे म्हणून त्यावर लिहिते. जे लोक सकारात्मक विचार करायला सांगतात ते दु:ख विसरा असे सांगतात जे कदाचित तुम्हाला पटत नाहीये. पण तुम्हीच सांगा.. दु:ख विसरून मुव्ह ऑन करणे चांगले कि त्याला कवटाळून रडत राहाणे चांगले? साहित्यात लिहितात तशी 'उरी एक भळभळती जखम घेऊन' वगैरे नॉर्मल माणसाला जगता येत नाही. आणि कित्येक वेळी दु:खाच्या भरात समोर आलेल्या आनंदाच्या क्षणांकडे त्याचे दुर्लक्ष होते.

आणि असेही दु:ख विसरा म्हणून विसरता येत नाही. एखाद्या माणसाने प्रिय व्यक्ती गमावल्याचे दु:ख कोणीतरी "आता हे दु:ख विसर" असे सांगून विसरले असे होत नाही. पण निदान तसा प्रयत्न करावाच लागतो. आणि 'दु:ख विसरा' हा मंत्र सतत बजावत राहिला तर आणि तरच छोट्या छोट्या दु:खातून बाहेर पडता येते. आणि ज्यांना दु:खातून बाहेर पडताच येत नाहीये त्यांना "लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन" चा सिद्धांत सांगितला.. तर निदान अजून काही वाईट घडू नये या भितीने तरी लोक आपले दु:ख मागे टाकून.. आपल्याकडे असलेल्या सकारात्मक गोष्टींचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतात.

सकारात्मक विचारांचे किंवा नेहेमी आनंदी असण्याचे फायदे तसेच दु:खी-कष्टी आणि तणावात जगण्याचे शरीरावर होणारे दूरगामी परीणाम हे अध्यात्म आणि विज्ञान दोहोंनी सिद्ध आणि मान्य केलेले असतांना माणसाने दु:खाचा विसर लवकरात लवकर पडू द्यावा हे योग्य आणि तार्किक नाही का?

आपण सारे अर्जुन!
स्थित्प्रज्ञ राहायचे हे जमायला- कोणत्याच भावनेच्या पुरात वाहुन जायचे नाही , इतके सतत लक्षात ठेवायचे .
त्या त्या क्षणातिल आनन्द अथवा दु:ख तेवढ्या क्षणा पुरते उपभोगुन पुन्हा मनाची पाटी कोरी करायचा प्रयत्न करायचा.
असे मला उमगलेले तत्वज्ञान आहे.

आपण सारे अर्जुन!
स्थित्प्रज्ञ राहायचे हे जमायला- कोणत्याच भावनेच्या पुरात वाहुन जायचे नाही , इतके सतत लक्षात ठेवायचे .
त्या त्या क्षणातिल आनन्द अथवा दु:ख तेवढ्या क्षणा पुरते उपभोगुन पुन्हा मनाची पाटी कोरी करायचा प्रयत्न करायचा.
असे मला उमगलेले तत्वज्ञान आहे.

आपण सारे अर्जुन!
स्थित्प्रज्ञ राहायचे हे जमायला- कोणत्याच भावनेच्या पुरात वाहुन जायचे नाही , इतके सतत लक्षात ठेवायचे .
त्या त्या क्षणातिल आनन्द अथवा दु:ख तेवढ्या क्षणा पुरते उपभोगुन पुन्हा मनाची पाटी कोरी करायचा प्रयत्न करायचा.
असे मला उमगलेले तत्वज्ञान आहे.

@ दीपा जोशी, व्वा:!! सुंदर!!! दोनच वाक्यात फार छान विश्लेषण केलेत.

@ पियु, आपलाही प्रतिसाद आवडला.

धन्यवाद प्रतिसादकर्त्यांचे!

@ पियू- खूपच चांगला मुद्दा. सायन्स याबद्दल काय सांगतं हेही महत्त्वाचं आहेच.
आणखी एक म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्द्ल लोकांची जी 'प्रतिक्रिया' असते त्यात सोशल कंडिशनिंग किंवा 'हे असंच असलं पाहिजे' अशा सामाजिक दबावाचा भाग किती हाही प्रश्न पडतो. म्हणजे लोकांना जे वाटत असतं ते आतूनच वाटत असतं (बायॉलॉजिकल रिस्पॉन्स) की 'मला हे असं असं वाटलंच पाहिजे' हे सोशल एक्स्पेक्टेशन पूर्ण करण्याचा नकळत प्रयत्न होत असतो?

दू:खापासून दूर पळणे वाईट, त्याला सामोरं जावं, ते कमी करता येण्यासाठी काय करता येईल ते बघावं, काहिही करता येण्यासारखे नसेल, तर ते वास्तव म्हणून स्वीकारावं... पण त्याला एकदा भिडावंच.. हे माझे मत.

त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न केला तरी ते आपला पिच्छा सोडत नाही. मग सुख भोगताना कुठेतरी अपराधी वाटत राहते, त्यापेक्षा मला वरचा पवित्रा घ्यायला आवडतो.

आणि लोक काय म्हणतील, याला तर मी काहिही महत्व देत नाही.. त्यांना आपण सुखात असलेले बघवत नाही कि दू:खात !!

माझ्या मूड वर आहे.
मी समाधानी असले तर थोडं दु:ख बघू/त्यावर उपाय काढू शकते.
मी दु:खात असताना जगजीत च्या गझल किंवा प्रचंड हताश बातम्या ऐकल्या तर जवळ जवळ छतावरुन उडी मारण्याच्या स्टेज ला जाईन.
विमानातल्या ऑक्सीजन मास्क प्रमाणे 'पुट युवर मास्क फर्स्ट अँड देन हेल्प अदर्स.'

दिनेशदा, अनु- चांगले मुद्दे!

महेश- ही एकच ओळ नव्हे तर गीतेत सततच हाच मेसेज दिला आहे- कर्म करा, गुंतू नका, ऐहिक जीवनापलीकडचा विचार करा. हा हजारो वर्षं जुना मेसेज आणि आताच्या पॉप सायकोलॉजीमधला लॉ ऑफ अट्रॅक्शन यांच्यात काही मेळ बसतो का हा प्रश्न पडतोय!

<< हे पॉझिटिव्ह थिंकिंग आता कंपल्सरीच झाले आहे.>> माझा स्वतःचा अनुभव असा आहे - कांहीं बाबतींत तरी माझ्या मनात 'निगेटीव्हीटी' ठासून भरली होती. लहानपणी ज्या वातावरणात वाढलो, जे अनुभव आले, जें साहित्य वाचनात आलं, त्याचा परिणाम असूं शकेल. [ 'देवदास' कादंबरी व सिनेमा मला खूप आवडतो म्हणून याच निगेटीव्हीटीच्या मुद्द्यावरून दिनेशदानी माबोवर मला एकदां हंळूवारपणे कां होईना पण झांपलंही होतं Wink ], पण नंतर जे मित्र मिळाले, वाचन झालं त्यामुळे बर्‍याच प्रमाणात ही निगेटीव्हीटी आटोक्यात आली व ' पॉझिटीव्ह थिंकींग'चं महात्म्यही लक्षांत आलं. पण याचा अर्थ मला 'देवदास' कमी आवडायला लागलाय असा मात्र नाहीं; तर देवदासच्या वेदनेशीं समरस होतानाही एक उमदं आयुष्य नाहक बरबाद झालं याचं भानही मला आलं. म्हणूनच, << नवरसांपैकी एक रस आपण विसरुन जावं असं सध्याचं पॉप कल्चर सांगतं. >> असं वाटलं, तरीही 'पॉझिटीव्ह थिंकींग'मुळे नवरसांचा आस्वाद स्वतःचा समतोल ढळूं न देतां अधिक रसिकतेने घेतां येतो, ही शक्यताही दाट असावी.

भाऊ, मी नेमका अधल्या मधल्या पिढीतला. त्या काळातले साहित्य बघितले तर नायक आणि नायिका दोघेही मुकाटपणे परिस्थितीला शरण जाणारे असत. त्यावर ग्रीक ट्रॅजेडीचा प्रभाव होता का भारताने इंग्रजांची गुलामगिरी स्वीकारली त्याचा प्रभाव होता, माहीत नाही. पण मला ते कधीच आवडले नाहीत.

पण तेव्हाही परिस्थितीला शरण न जाणार्‍या बंडखोर नायिका होत्याच, ( उदा. कुंकू, घराबाहेर ) पण त्या अपवादच.
मला त्याच जास्त आवडत. आणि थोड्याफार प्रमाणात माझे गुरु आणि आईबाबा पण अशी वृत्ती जोपासावी असे सुचवत असत.

पियू

यांनी जे सांगितले तेच मला म्हणायचे आहे.

आता तर हे शास्त्राने सिध्द झाले आहे की नकारात्मक विचारांनी शरीरावर वाईट परिणाम होतात.

पियू, दिनेश, भाऊ ज्या ज्या सगळ्यांनी सकारात्मकतेला दुजोरा दिला आहे त्या सर्वांना +१

केवळ मूळ लेखातल्या हे वक्तव्य काही पटत नाही...
>>>>अन्यायाच्या , गुन्ह्यांच्या बातम्या फारशा वाचल्या जात नाहीत, चर्चिल्या जात नाहीत, <<<<

खरतर टीवी, वर्तमानपत्रे ह्यात ह्याच बातम्या जास्त ठळकपणे वार्तांकित केल्या जातात. लेखिकेला कदाचित आपण व्यक्तिगत जीवनात, आपल्या मित्रांबरोबर ह्यांची चर्चा करत नाही असे म्हणायचे असावे. पण चोवीस तास, तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या तज्ञांना (?) ह्यावर चर्चा करताना बघून धडकी भरते. अशा घटनात वैयक्तिक पातळीवर आपण काहीच करू शकत नाही ह्या विचाराने नैराश्य येऊ शकते. त्यात ही हजारात एखादा असू शकेल जो खरोखर काही करायला सरसावेल, पण ९७-९९ % लोक उगीचच चडफडत राहतील. खरतर त्यामुळे आजकाल टीवी, वर्तमानपत्रातल्या बातम्या बघवत/वाचवत नाही!

त्याउलट दूरदर्शनच्या बातम्यात नेमाने २/३ चांगल्या बातम्या (जलयुक्त शिवार, शुष्क खड्ड्यामुळे कमी झालेली अस्वच्छता, संपूर्ण महिला ग्रामपंचायतीने केलेली प्रगतीची कामे) ऐकायला खूप बरे वाटते. ह्या उन्हाळ्यात सगळीकडून दुष्काळाच्या बातम्या येत असताना साम टीवीवर अग्रोवन बघायला बरे वाटायचे.

सिनेमा, नाटकं ही आवड खूप वैय्यक्तिक असते आणी ती काळानुरूप बदलत जाते. एके काळी वास्तवदर्शी सिनेमे पहाण्याची आवड बदलत जाऊन, नर्म विनोदी, हलके-फुलके ते डोक्याला त्रास नाही पर्यंत बदलणं हे कॉमन आहे. त्रास, कटकटी, दु:ख प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच. मग तेच परत पैसे आणी वेळ घालवून पहायला का जावं असाही एक विचार असतो.

गीतेतल्या 'सुख दु:क्खे समे कृत्वा' चा उल्लेख झालाय. मला वाटतं ह्या 'समे कृत्वा' मधे समत्वाची भावना - equanimity - अपेक्षित आहे. तिसया अध्यायात, सर्व अनुभव ईंद्रियांमार्फत घेऊनही, त्यात गुंतून न पडता, नियत कर्म निष्काम भावनेनं करण्याचा उपदेश आहे. समोर आलेले अनुभव घेऊन, त्यातून पुढे जात रहाणं, हे अत्यंत नैसर्गिक आहे. कारण तसं न करण्याचा पर्याय उपलब्धच नाहीये. 'This shall too pass' हे नैसर्गिक तत्व च आहे.