आज की नारी

Submitted by जाईजुई on 25 February, 2009 - 07:25

(मी_ना यांच्या बहुचर्चित लेखावर आधारित)

०६-जून-२००५
सहा वाजत आले अजून कॉल चालूच आहे. ह्यानंतर समरी करुन पाठवायची युकेला, मग टीमला त्यांची टास्क नेमून द्यायची आणि मग लॅपटॉप बंद करून ६:१५ ची बस गाठायची. आज बस चुकवून चालणार नाही ओव्युलेशन स्टडीसाठी जायचय त्यानंतर डॉक्टरांना भेटून घरी जायचय. रन नेहा रन!

हुश्श.. मिळाली बस बाबा. डॉक्टरांची सातची वेळ पाळता येईल.

वेळ? कसली वेळ पाळलीये आपण? आपल्या नि निखिलच्या लग्नाला चार वर्ष झाली. पण दोघांची प्रमोशन्स, ऑनसाईट्स, जॉब हॉप्स यातून वेळच झाला नाही आपल्याला बाळाचा विचार करायला. पुन्हा स्वत:च घर घेणं, सेटल होणं! हम्म! तरी काही फार उशिर नाहीये झालेला, २८ वर्षांचे तर आहोत आपण.

१०-जुलै-२००७
आज सिरम बीटा एचसीजी ची टेस्ट करायची आहे. संध्याकाळी रिझल्ट्स मिळतील. ह्यावेळी पॉझिटिव असेल का? कि पुन्हा गेल्यावेळेसारख, missed abortion? किती दिवस हे चालू आहे? दोन वर्षे ! प्रत्येक महिन्यात वाट बघायची, पुन्हा येऊन टेस्ट करायची. मला तर अनादी काळापासून हे चक्र चालू आहे असं वाटतय!

Am I a manager of a project with ever extending "go - live" date? I hope it will not turn out to be a project which never "kicked off"

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा डेट मिस्स झाली तेंव्हा वाटले, संपला आमचा बेंच पिरियड, डिलिवरीची तयारी करा, नऊ महिन्यांनी "go-live" ! पण अळवावरचं पाणी वाहूनच गेलं. कोणीही कितीही समजावलं तरी It hurts! एवढी सगळी आव्हान पुरी केलीत ना आपण ऑफिसमध्ये? करीअर, अभ्यास सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत की मग काय कमी आहे आपल्यात? की स्त्रीत्वच कमी पडतय? आपण खूप lightly घेतोय का मातृत्व?

पण आईच्या वेळी कशी सगळे काम करून आणि आहारशास्त्र वै. न पाळूनही मूलं कशी व्हायची?

१२-जुलै-२००७
नेहा.. शांत हो. एक पायरी पूर्ण झालीये, अजून गड चढायचाय. so project pregnancy kicked off... finally! ह्यावेळी नीट काळजी घ्यायची.

कुठची तरी एक गोष्ट वाचली होती - बाळ आईच्या मनात रुजण्याआधी भिती रुजते ह्या कल्पनेवर आधारित! खोटे नाहिये हे! फेब्रुवारीपर्यंत सगळ व्यवस्थित झाले पाहिजे. आता पुन्हा काही झालं तर नाही झेपणार.. शरीरापेक्षा मनाला. तना-मनाने गुंतून जाणं आणि पुन्हा पुन्हा तुटून, विखरून जाणं जमणारच नाही.

विचार पण पॉझिटिव करायला हवेत आता!

----------------------------
१७-एप्रिल-२००७

ह्या पोरीच कस होणार ? कालच कळलय दोघांना कि गर्भ नीट धरला नाहिये. ९ आठवडे झालेत. डॉक्टरांनी क्युरेशन करायला सांगीतलय पण ही ऐकत नाहिये. क्युरेशननंतर ६ महिने वाट पहावी लागेल म्हणताहेत. ही म्हणते माझ्याकडे वाट बघायला वेळच नाहिये. नाही तरी ब्लीडिंग सुरु झालच आहे आता. नॉर्मल अबॉर्शन व्हाव म्हणुन आंबे आणि पपई खातेय नेहा. डॉक्टरांनी गोळ्यापण दिल्यात.

किती समजावलं कि माझ्या वेळची गोष्ट वेगळी होती. आमच्या शरीराला किती व्यायाम होता ? नेहा पोटात होती तेंव्हा फॅक्टरीला होते मी आणि २४ वर्ष वय. ह्यांच्यासारखे बसून काम नी अरबट - चरबट खाण नव्हते आमचे, घरच सकस अन्न होत.

नोकरी आणि करीअरमध्ये बराच फरक असतो. करीअर करायचे म्हणजे झोकून द्यायला लागते ग तुम्हा आजकालच्या मुलींना! किती जवाबदार्‍या आणि वेगळी जीवनपद्धती आहे तुमची?

आई व्हायची आसपण आणि करीअर न सोडण्याची इच्छासुद्धा! कसे जमणार दोन्ही दगडांवर पाय ठेवून?

परमेश्वराला काळजी!

----------------------------
३०-जुन-२००७

धक्-धक्

----------------------------

२५-ऑगस्ट-२००७

मिळाला हो मुहुर्त आमच्या सूनबाईंना!

निखिलला मुलगा किंवा मुलगी काही होवो, आनंदच आहे त्याचा. ह्या वयात मुलं होत आहेत ह्याचच कौतुक. पण नातवंडांच्या पूर्ण वेळ जबाबदार्‍या नको वाटतात आता. आता आमची मुलं मोठी आहेत, त्यांचे संसार त्यांनी संभाळावेत. लग्न होऊन घरात आली तेंव्हाच मी स्पष्ट सांगून टाकलं होतं, तुम्हाला काय करीअर करायचय ते करा, पण स्वतःच्या जबाबदारीवर मुलांना जन्म घाला.

पुन्हा आमच्या वेळी नसलेली बालसंगोपनाची नवी पद्धती आहे सध्या! त्यानिमित्तने उगाच वाद व्हायला नको. आम्ही जायचं आमच्या जुन्या पद्धतीने वागायला, भरवायला आणि शिस्त लावायला आणि ह्यांचा पापड मोडायचा!

आम्ही आमचं आयुष्य घालवलं चूलीसमोर, मुलांसाठी. सगळी उमेद गेली एका माणसाच्या पगारात भागवताना. घर घेणं, मुलांची शिक्षणं ह्यात कधी स्वतःच्या हौसेसाठी काही खर्चच करता आले नाहीत. सासू सासरे, मुलांच्या परिक्षा, आई वडील ह्यांच्या मध्ये कधी वेळच झाला नाही फिरायला जायला कुठे!

ह्यांच्या रीटायरमेंट्चा आलेला पैसा आहे. इतर सगळी व्यवधानं संभाळून झालीयेत. आम्हाला आमच्या आयुष्याची second inning अनुभवायची आहे.

-------------------------
२८-ऑगस्ट-२००७

Estimate at completion? Estimate to Complete?

१०-सप्टेंबर-२००७

कोंबडी पळाली कोंबडी कोंबडी.......

--------------------------

२०-ऑक्टोबर-२००७

आज निखिल यायचाय युकेहून. उद्या लगेच अ‍ॅनोमली स्कॅनला जाणार आहेत दोघे.

त्याला ऑनसाईट जाताना तिला एकटं सोडून जावं लागणार ह्याचच वाईट वाटत होतं. पुन्हा इथून तिच ऑफिसही दूर पडतं तस. गेल्या वेळच्या अनुभवामुळे दोघेही घाबरतात जरा.

निखिलने हट्टच धरला होता की मी येईपर्यंत स्कॅनसाठी थांब. बाळ अव्यंग आहे ना ते त्यालापण बघायचय.

नवरात्रीत देवीची ओटी भरलीये मी आणि तिला मागणं केलय की सगळं नीट होऊ दे. नेहाची चोर ओटी भरुन पाठवेन तिला परत.

-------------------------

२२-ऑक्टोबर-२००७

आईबरोबर देवळात गेले तेंव्हा किती प्रसन्न वाटत होतं? सजवलेली मूर्ती, साजिरी आरास, उदबत्तीचा सुगंध आणि समईसारखा शांत पण ओजस्वी असा देवीचा चेहरा.. काही बिनसूच शकत नाही, जगात काही अमंगल धडणारच नाही असा विश्वास ठेवणारी आई!

आजच्या रिपोर्टवरून तरी देवाने तिचा विश्वास सार्थ ठरवलेला दिसतोय. बाळाचे छोटे छोटे हात, धडधडणारं हृदय! whattoexpect site वरून येणार्‍या mailersवरून बाळाच्या वाढीची कल्पना येते पण डोळयांनी पाहिल्यावर वेगळच वाटत! गेल्या Training मध्ये शिकलेला फॉर्म्युला वापरला तर Estimate At Completion is matching the budget. so hopefully variance कमी असेल.

लेप्रोस्कोपी, आयव्हीएफ यातले काही न करता गर्भधारणा झाली आणि इथवर पोहोचलो. आता नॉर्मल डिलीव्हरी झाली की माझं बाळ माझ्या कुशीत!

---------------------
१६-डिसेंबर-२००७

ह्या नेहाचे ना सगळे विचार वेगळीकडेच चालतात.

आज सकाळी डोहाळेजेवणाला तिला रामायण, रामरक्षा आणि मारुती स्त्रोत्र दिलं वाचण्यासाठी की बाळावर चांगले संस्कार व्हावेत. आता संध्याकाळी म्हणाली, "अहो आई, आता रोज जमेल तसे वाचेन मी हे पण पोटात असताना रामायण वाचून आपण बाळावर गर्भसंस्कार करणार आणि बाहेर आल्यावर ते सर्वत्र महाभारत बघणार. मग गोंधळ नाही का होणार बाळाचा? आणि ज्या रामाला एका धोब्यापासून सीतेच रक्षण नाही करता आलं तो बाळाचं कस करणार?"

काय सांगायचं हिला? नशिब विचारल नाही ते की मारूतीसारखी बलदंड मुलगी झाली तर काय? वाचेन म्हणाली आहे ना त्यातच भरुन पावलं!

---------------------
१६-फेब्रुवारी-२००८

गेले १२ तास मणक्यातून ओटीपोटात सळसळत जाणारी वेदना, आता तीव्र होतेय. सहन करणं केवळ अशक्य! माझ्या संपूर्ण अस्तित्वातून काही तरी पीळवटून, सुटून वेगळं होतय.

painless delivery साठी भूलतज्ञांना बोलवा... थोडा तरी आराम मिळेल, शेवटच्या कळा द्यायला energy हवीये मला.

आई, किती वेळ रहाणार ह्या वेदना? पुन्हा पुन्हा येणार्‍या कळा?

परमेश्वरा!

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

निखिलला मुलगी झाली हो! गोड आहे, अगदी बापावर गेलीये.

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

आईSSSSSSS...... भ्याSSSSSSS........

-----------------------
१६-फेब्रुवारी-२००८

सुटली माझी लेक. सगळी उस्तवार करुन, नऊ महिने पूर्ण करून, वेणा सोसून तिने तिच्या लेकीला जन्म दिलाय. जगदंबे, तुझ्या कृपेने केळं धरली माझी!

आता लेकीसाठी आणि लेकीभोवती जग फिरेल नेहाच, देण्या लेकीला माहेर, माय नांदते सासरी !

-----------------------
२०-मे-२००८

मी पार्टटाईम ऑफिसला येतेय हे बरं झालं, अन्वेषाला पण हळू हळू सवय होईल आणि गरज पडली तर घरून पण कॉल घेता येतील.

ह्या वर्षीच्या रीव्ह्यू सायकलमध्ये मला जमेत तरी धरतील नाही तर पुन्हा हे वर्ष वाया!

-----------------------
१८-सप्टेंबर-२००८

उम्म्, आई उचलून घे.... बाबा बाबा! हम्म !

-----------------------
५-जानेवारी-२००९

हे नवीन घर कुणाचे आहे? इथे खूप थंडी आहे!

बाबा कुठे आहे? बाबा, बाबा!

-----------------------
८-मार्च-२००९

सगळ किती पटकन झालं. अर्थव्यवस्थेचे डोलारे त्सुनामी आल्यासारखे वाहून गेले. भारतात येणार्‍या कामाचा ओघही कमी झाला. कंपनीने माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून इथे युरोपात पाठवलयं, भारतात काम पाठवण्याच्या कामाला गति द्यायला.

अनु निखीलला खूप miss करतेय. सारखा बाबाचा घोश चाललाय. तरी बर आई आलीये बरोबर. निक्सला मूळीच आवाडले नाहीये मी तिला इथे आणणे. पण एवढ्या लहान मूलीला सोडून येणं पण कठीण वाटतं. ह्यातन कामाची जबाबदारी आणि नात्यांचे ताण. सैरभैर व्हायला झालं होतं!

आज इथल्या दूरदर्शनवरचे महिलादिन विशेष कार्यक्रम पाहिले. आफ्रिकेतल्या स्त्रिया बघीतल्या - आपल्या मुडदुशा पोरांना थानाशी घेऊन ते जगावे ह्यासाठी निष्फळ प्रयत्न करणार्‍या! पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी कंबोडीयातल्या छोट्या छोट्या मुली प्लॅस्टीकचे कॅन वहाताना पाहिल्या. लगेच राजस्थानातल्या आणि आमच्या देशावरच्या पाण्याच्या दुर्भीक्ष्यात असेच पाणी वाहिल्याने, दुष्काळी कामांच्या निमित्ताने डोक्यावर वीटा वाहिल्याने पोरींच्या डोक्यांवर पडलेल्या चात्या आठवल्या. माबोवरही काश्मीरातल्या स्त्रियांची अवस्था वाचली.

कसले करीअर आणि बाळाचे प्रश्ण घेऊन बसतोत आपण? ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग, रिसेशन, बाळ होणं हे आपले नुसते चर्चेचे विषय. आपण आपल्या सुरक्षित कोषात राहून हे सगळे विचार करतोय. अस नाही जमल तर वैद्यकीय मदत वापरून मुलांना जन्म देऊ शकतोय कि आपण, आयव्हीएफ, लेप्रोस्कोपी, कॅल्शिअम, फॉलिक टॅब्लेट्स बरेच उपाय आहेत, अनेक तपासण्या आणि उपाय आहेत. जन्माला आलेल्या आपल्या लेकीसाठी देखिल देशोदेशीची खेळणी, कपडे, औषध आणि खाऊ आहे. पण जन्माला आल्यापासूनच अभावग्रस्त आयुष्य जगणार्‍या ह्या मुलींच काय? ज्यांना प्राथमिक शिक्षण मिळताना वांदे आहेत, आताच पिण्याच्या पाण्याचेही ओझे आहे त्यांना काय फरक पडतो आमच्या सुक्या चर्चासत्रांनी? ज्या मूलींना स्त्रीत्व कळण्यापूर्वीच खुडलयं त्यांना नोकरी कि करीअर असे प्रश्ण पडत असतील का?

बर जे अभावात आहेत किंवा ज्यांचे मानवी हक्क नाकारलेत त्यांना मिडीया, सेवाभावी संस्था कोणी ना कोणी तरी मदत करतय. आमच्या भारतातल्या सर्व साधारण नोकरी करत किंवा न करता गृहउद्योगातून संसाराच ओझे वहाणार्‍या, रोजच्या रोज कौटुंबिक हिंसेला सामोर्‍या जाणार्‍या किंवा केवळ मूलीचा गर्भ आहे म्हणून जन्माला येण्यापूर्वीच खुडलेल्या स्त्रीत्वाला कोण वाली आहेत?

कशी अशी आजची आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली, थोडे फार तरी निर्णय स्वतः घेऊ शकणारी , शानदार अपार्टमेंटमध्ये राहून व्यर्थ चिंताच जाळ स्वत:भोवती विणणारी मी? दुसर्‍या स्त्रियांच्या वेदनांबद्दल अनभिज्ञ असलेली आजची स्त्री?

समाप्त

गुलमोहर: 

छान आहे लेख पण जरा तुटक वाटतोय. म्हणजे नेहाच नक्कि काय झाल ते कळल नाही. पण तिघी विचार पध्द्तीचे वर्णन नीट जमले आहे

पुढच्या लेखाची वाट बघतेय

???

छानच आहे आणि करीयर करणार्‍या स्त्रियांची होणारी तगमग पण छान दाखवलीत तुम्ही...पुढचा लेख लवकर टाका हिच विनंती...

To the world you may be the one person, but for one you are the world !!!

शिर्षक "आज की नारी" असं असायला पाहिजे होतं का?

जाईजुई,क्रमशः लिहिले आहेस म्हणजे अजुन लिहिणार आहेस तर..
म्हणजे जाणवत असलेला तुटकपणा किंवा कमी, भरुन निघेल..
तिघींचं मनोगत छान मांडलं आहेस.. आई आणि सासु दोघींच्या भुमिका आणि त्याला धरुन त्यांचे विचार छान मांडलं आहेस..
नेहाची अवस्था, करीयर आणि बाळासाठी असणारी घालमेल छान सांगितल आहेस.

-------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

खरच मला वाट्ल माझ्या मनातल कुणितरि बोलतय !
आवडला लेख!
Happy

विषय चांगला आहे. पण वाचताना थोड्/न तुटक वाटतय. आई आणि सासूबाई याच्या कॅरेक्टर्सना नाव दिल्यास जास्त बरे होइल. म्हणजे क्रमशः मधला पुढचा संवाद समजायला सोपे जाइल.
--------------
नंदिनी
--------------

अजून चांगला होऊ शकेल हा लेख. नंदिनीला अनुमोदन, म्हणजे जिथे तारीख दिली आहे तिथे नाव दिलंस तर सोपं होईल. Happy हा लेख नक्की पूर्ण कर हं.
----------------------
एवढंच ना!

१२-जुलै-२००७
नंतर
१७-एप्रिल-२००७...
???

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू

ती वेगवेगळ्या व्यक्तींची त्या त्या तारखेची मनोगतं आहेत.व्यक्ती कथेत नंतर आली असली तरी मनोगत आधीच्या तारखेचं आहे.

सिरम बीटा ईसीजी ची टेस्ट करायची >> एच सी जी टेस्ट असतेना ?? की आजकाल इसीजी काढला की हे पण कळतं का Happy
हिंदी चित्रपटातले डॉ नाडी पाहूनच सांगायचे ' मां बननेवाली है ' तसं काही आहे का Wink

दिड वर्ष झालय ना आता शोनू त्यामूळे टेस्ट्च्या डिटेल्स मध्ये जरासा घोळ झालाय! प्रत्येक अटेम्प्ट्ला ३वेळा केली होती ही टेस्ट. एचसीजीच प्रमाण दुपटीपेक्षा जास्त होतय की नाही ह्याकडेच जास्त लक्ष दिलं गेलं, टेस्टच्या नावापेक्षा. Sad आता योग्य तो बदल केलाय.

एचसीजीची इंजेकशनस आणि progesterone tablet treatment पण mention करायची राहिलीच!

जाईजुई, किती कठिण गं? गरोदरपणाच्या टर्म्स, प्रोजेक्ट च्या भाषेत.... मस्तं जमलय. पुढच्या भागाची वाट बघते.
मला तरी तुटकपणा जाणवला नहीये अजूनतरी. पण प्रत्येकाची स्वगतं, पूर्णं वाचली कीच कळतय कोण बोलतय ते... हे मात्रं नक्की.

अगदी मस्त. मला नेमक हेच म्हणायच होत. पण या लेखात नेहा लकीच म्हणायची. पण जगात अश्या कितीतरी मुली आहेत ज्यांना या पेक्षा कठीण परिस्थीतीतुन जावे लागते. पण माझ्या दोन्ही लेखातला आशय अगदी नेमका पकडुन धरला आहे.

केलाय पूर्ण. अजून काही लिहावसं वाटलच नाही. आजची स्त्री असून माझ्या अनुभवकक्षा कशा माझ्याच भोवती फिरत आहेत ते जाणवलं म्हणुन हे लिखाण इथेच संपवलं! Uhoh

जाई, स्वतःची व्यथा तु छान मांडली आहेस. पण मला वाटतं की शेवटी अजुन थोडं लिहायला हवं होतस.
इनफॅक्ट तु खुपच छान पद्धतीने विषय मांडला आहेस.
आवडली कथा.

---------------------------------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

मस्त झालाय शेवट..खराखुरा. आवडला.
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

तुमच्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन आभार.

लिहायला सुरुवात केली तेंव्हा फक्त माझ्यासारख्या बर्‍याच जणीच डोळ्यासमोर होत्या - सुखवस्तु, करिअरसाठी बाळाचा निर्णय पुढे ढकललेल्या किंवा नवीन जीवनमानामूळे प्रेग्नंसी कठीण झालेल्या. मग बाळाला सोडून जास्त तासाचे काम, मग बाळाला वेळ देउ शकत नाही तर खेळणी घेउन भरपाई वै. असं बरच डोक्यात होतं.

पण महिला दिनाच्या निमित्ताने हे कार्यक्रम बघीतले, लिखाण वाचले नी आपले दु:ख कस पीसांच्या गादीवर झोपणार्‍या राजकन्येसारखे आहे ह्याची जाणीव झाली. मी आजच्या स्त्रीचे प्रतिनीधीत्व मी करतेय का? नाही! म्हणून लिखाण इथेच आणि हेच विचार मांडून थांबवलं.

जाईजुई, अत्यंत सुंदर लेख. मांडणी थोडी विस्कळीत असली तरी शिवट खूप मस्त आहे. जमलेच तर तुमचा जो शेवट आहे त्यावरून् पहिला भाग थोडासा बदला. म्हणजे एकसंधता येइल.
लिखाण वाचले नी आपले दु:ख कस पीसांच्या गादीवर झोपणार्‍या राजकन्येसारखे आहे ह्याची जाणीव झाली. मी आजच्या स्त्रीचे प्रतिनीधीत्व मी करतेय का? नाही!
>> अगदी अगदी.
--------------
नंदिनी
--------------

जाईजुई, सुरेख... खरच.
भरल्यापोटी सुचणारे विचार...
अतिशय संयम हवा... असा लेख संपवताना. नंदिनीशी सहमत. थोडा विचार करून मुळचा बदलता आला तर... दोन पद्धतींमधे लिहिलेला दिसणार नाही.
पण लेख सुरेख उतरलाय गं.

विवेचन आवडलं. Happy
खास करुन वेळेच्या ऐवजी खेळनी वैगरे.

खुप छान टिपलय भावनांना.

सुखवस्तु, करिअरसाठी बाळाचा निर्णय पुढे ढकललेल्या किंवा नवीन जीवनमानामूळे प्रेग्नंसी कठीण झालेल्या. मग बाळाला सोडून जास्त तासाचे काम, मग बाळाला वेळ देउ शकत नाही तर खेळणी घेउन भरपाई वै. असं बरच डोक्यात होतं.>>>>>>>>>>>> हे सगळही वाचायला आवडले असते.

-प्रिन्सेस...

जबरदस्त. हे आत्ताच वाचलं. 'तसले"दिवस संपता संपत नाहीत- डॉक्टरांच्या क्लिनिकातले आणि मशिनीतले सगळे निर्जंतूक अनुभव, आणि एकेकजण तर अक्षरशः आपण ह्युमनब्रिडींगच करतोयतच्या थाटात, हे करुन पाहुया का? नाही ते.. यशस्वी चाचण्यांचे संख्याशास्त्र. आणि अयशस्वींचे?
माझ्या ओळखीचे एक चौथे आयविएफ करायला निघालेले आहेत- अरे टेक्नोलॉजी झाली म्हणजे काय ४ आयवीएफ करायचे?.आणि आजकाल काय कोणजाणे सुलभ प्रसुती आणि ठणठणीत प्रकृती जशी काय नामशेषच होत चाललीयेत- अक्षरशः इतकी उदाहरणं पाहिलीत आजूबाजूची. दत्तक घेऊ इच्छीणा-यांचे अनुभव तर अजूनच थोर. दत्तक देणा-या एजंस्या (योजनापूर्वक शब्द वापरलाय) कधी कधी अक्षरशः गॅस एजंस्यांच्या वरताण असतात. पण रस्त्यावर बघावं तर सिग्नल सिग्नलला पोरं आपली गजरे विकतायेत, बुटं पॉलिश करतायेत, पुस्तकं विकतायेत, भिक मागतायेत, ग्लास विसळतायेत, विटांवर खेळतायेत. पोरांच्या कडेवर एखादं पोर असतच. सिग्नल वरचे एक दृष्य मरेस्तोवर डोळ्यासमोर राहील. एक छोटीशी मुलगी पदपथावर आडवी झोपलिये. शेजारी माय गजरे ओवतेय. गज-यांना पोतं आहे, पण मुलीला ? एक मांजरीएवढं कुत्र्याचं गव्हाळ पिल्लू तिचा गाल चाटतय, माय वेळ असेल तेव्हा त्याला बाजूस ढकलतेय, पण तिला गजरे करायचेत- तिचे हात सरसर सरसर फुलं ओवतायेत आणि डोळे/तोंड "घ्या ना काकू/ओ आज्जी "करतायत. कुत्रा टांग वर करुन..... झोपलेली पोर आणि मोगरे दोघांवरती ओघळ वाहात जातो ....... !

धन्यवाद रैना, तुमचा अनुभव पण सांगीतल्याबद्दल.

अहो, अर्धवेळ मोकरी सुरु केली ना तेंव्हा ठाण्याच्या ३ हात नाक्याला गाडी थांबली होती आणि बाहेर १ वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन १० वर्षाची मुलगी भिक मागत होती. छोट बाळ मे महिन्यातल्या उन्हामुळे ग्लानी येऊन पडलं होतं तरीही ती मोठी मुलगी तिला दुपारी १ च्या उन्हात फिरवत होती.

आम्ही मुलांसाठी तडफडतो इथे आणि ही लोकं त्यांना असे वापरतात? आता प्रत्येक लहान भिकारी बाळात माझी लेक दिसते. :(वेगळीच भीती वाटते, शब्दात सान्गता येणार नाही अशी बोच लागून रहाते. Sad

जाई-माफ करा पण "ही लोकं यांना अशी वापरतात "? हे पटले नाही. कोणी जाणूनबुजून करेल असे वाटत नाही. उलट बाईनी घरी पोर ठेवलं तर तिचं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. या देशातली/जगातली गरिबी आणी नष्टचर्य. पण "आम्ही मुलांसाठी तडफडतो इथे " यातली दैवगती आणि परस्परविरोधी वस्तुस्थिती समजते पुरेपूर.
वेगळीच भीती वाटते, शब्दात सान्गता येणार नाही अशी बोच लागून रहाते>>> ही भावना पुरेपूर पोचली. कळतय मला. ती भावना शब्दात व्यक्त करायचीच भिती वाटते. शब्द आणायला जो विचार करावा लागेल, त्यातून जगलो वाचलो तरच शब्द सूचतील. Happy

Jaijuee कथा छान आहे. "स्वामी तिन्ही जगान्चा आईविना भिकारी"...तसच I would say "स्वामीनि सगळ्या सुखांची मुलाविना भिकारीच" हे माझ personal opinion आहे.

Pages