कुंकू

Submitted by महेश भालेराव on 9 October, 2016 - 23:22

कुंकू

माझं आस्तित्वच मुळी रुजलं होतं
इथल्या परंपरा आणि रूढींच्या कोशात .
मोठ्या तोऱ्यात मी प्रतिष्ठित झालो होतो
ठसठशीत लालभडक वेशात .
मिरवत होतो कित्येकांच्या कपाळी
कर्म बनून, धर्म म्हणून
मांगल्याचे प्रतीक बनत ,
कधी शुभ शकुन, तर कधी सौभाग्य म्हणून
मला पाहताच कित्येकांच्या डोळ्यात
प्रसन्नता , चैतन्य आणि नवी उर्मी चमकू लागायची
मग मीही अजून लाल व्हायचो
अभिमानाने छाती भरून येई पर्यंत ….

पण हल्ली मात्र फार भीती वाटते
अस्तित्वच नष्ट होण्याची
कधीतरी "ते " जाणवते पुरुषांच्या भाळांवर ,
सौभाग्यवतींच्या कपाळावर ......
पण किती लहान होतं गेलोय मी
असून नसल्या सारखा
माझ्यातला आत्मा जणू कधीच ओढून नेलाय
या समाजानं .......
माझ्याशी फारकत घेऊन त्याची "टिकली" कधी झाली कळलं सुद्धा नाही …
"तिनेही" इथल्या लोकांसारखेच भरा भरा रंग बदलले
त्यांच्या बरोबरीनं चालता यावं म्हणून
हिरवी , निळी , काळी , पिवळी ,अगदी पांढरी सुद्धा झाली
पण तिलाही त्यांनी बिनधास्त होऊन
खुशाल लटकावलं भिंती- दरवाज्यांवर ..............

कधी हळदीशी तर कधी अजून कुणाशी संग करीत ,
मी मात्र कोरडाच राहिलो ........
म्हणूनही असेल कदाचित....
माझा रंग मला जोपासता आला....
रक्ताच्या रंगाचा आणि म्हणून सगळ्यांसारखाच
सगळ्यांचाच होऊन राहायचं होतं मला
पण जाती-पाती पासून वाचलो तरी धर्मांची शृंखला नाही तोडता आली मला
माझ्या रंगाच्या कवेत घेऊन ,
सगळ्यांची मनं नाही जोडता आली मला

मी दंग झालो होतो ,
ज्यांनी मला डोक्यावर घेतलं त्यांच्या नादात.
बाकीच्यांच्या हातापर्यंत पोहोचताच नाही आलं ….
शेवटी माझी किंमतही माणसांनीच ठरवली
काहींनी डोक्यावर घेतलं तर काहींनी पुरतं व्यर्ज केलं
भाग्यवानच समजलं पाहिजे, "माणूस " नाही झालो ते
सजीव होण्याची आस नाही लागली कधी आणि
कोणताच रंग नाही बदलावा लागला , अजून तरी .......
मी कुंकू होतो ...मी कुंकू आहे ...आणि कुंकूच राहणार
अस्तित्वाच्या शेवटापर्यंत ...................

महेश बाळकृष्ण भालेराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users