गाणे तिमिराचे

Submitted by निशिकांत on 8 October, 2016 - 07:34

प्रकाश पुढती अन् मी मागे, किती पळायाचे?
आळवावया आज घेतले गाणे तिमिराचे

असेल आला शब्दांनाही कंटाळा दु:खांचा
पाचवीस जे पुजले, त्यावर किती लिहायाचे?

झाक आरशा केविलवाण्या चेहर्‍यास माझ्या
खिशात कडकी, मनात धडकी कसे हसायाचे?

जरी घातले बाभुळ काट्यांचे कुंपण होते
संरक्षण ना झाले अपुल्यांपासुन शेताचे

टाकलीस तू भरून झोळी तुझी कृपा देवा!
तुझ्या सावलीविना कसे मी श्वास घ्यावयाचे?

तलवारीशी लढावेच लागेल लेखणीला
"बळी पिळू दे कान"भीत का मूग गिळायाचे?

सावलीसही ध्यानी आले सांजवेळ झाली
तिचे मनसुबे मावळतीला पाठ फिरवण्याचे

स्वभाव अपुले विभिन्न इतके! गुदमर पदोपदी
संस्कृती अशी, तरी जन्मभर साथ जगायाचे

सरळसोट "निशिकात" तुला ना किंमत दमडीची
उपद्रवी गुंडांस भेटते आसन मानाचे

निशिकांत देशपांडे. ९८९०७ ९९०२३ मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users