लढता लढता शहीद करती---

Submitted by निशिकांत on 4 October, 2016 - 01:24

( उरी सेक्टरमधे पाकचा हल्ला, त्या नंतर भारताने केलेला सर्जिकल हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानची चालू असलेली कोल्हेकुई. हे सर्व बघून सुचलेली एक रचना. या कवितेत माझी नेहमीची सौम्य भाषा, कशी कुणास ठाऊक, हरवून गेली लिहिताना. त्यासाठी क्षमस्व! )

सैनिक अमुचे संस्काराने परोपकारी
इष्ट चिंतिती त्यांचेही, ज्यांच्यांशी लढती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

जिहाद खावा कशासवे? हे कळले नाही
तेच सांगती धर्मांधांना करा तबाही
म्हणे तयांना हजार मिळतिल व्हर्जिन पोरी!
मेल्यानंतर जन्नत, देतो खुदा बधाई !
भ्रष्ट करोनी मुले धाडती मरावयाला
चिथावणारे ऐषारामी जीवन जगती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

दुष्ट इरादे पूर्ण करायाला कोल्ह्यांनो
डाग लावले जिहादास कोणी रक्तांचे?
गुन्ह्यास नाही क्षमा जगी, वाटते असे की;
झूठिस्ताना! घडे तुझे भरले पापांचे
कायनात संपवणे तुमची कार्य आमुचे
ओझे तुमचेअसह्य झाले, कण्हते धरती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

पूर्वज ज्यांचे प्रताप राणा, शिवबा, झाशी
ब्रीद शत्रुला सळो की पळो करावयाचे
मनी नांदते तिव्र भावना, एकदा तरी
तळहातावर शीर घेउनी निघावयाचे
त्सुनामीस शत्रूच्या थोपवण्याला सैनिक
अभेद्य कातळ आपुल्याच छातीस बनवती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

सहनशीलता नसते लक्षण दौर्बल्याचे
प्रसंग येता रणांगणी त्वेषाने लढतो
नापाकांनो ! ध्यान असूद्या अशी लढाई
अंतिम असते, लढताना इतिहास घडवतो
लपवायाला तोंड नसावी कुणास जागा
अशी वेळ आणूत निश्चये शत्रूवरती
मौत मरावी कुत्र्याची ही जरी लायकी
त्या शत्रूंना लढता लढता शहीद करती

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users