पुढची यत्ता फार जळफळे

Submitted by बेफ़िकीर on 3 October, 2016 - 08:48

पुढची यत्ता फार जळफळे तिच्या गुलाबी रंगावर
नववीमध्ये जाण्याआधी हळद लागली अंगावर

विंगेमध्ये महान आत्मे बघ्यांसारखे बसलेले
कुणीच पडदा पाडत नाही जातींच्या वादंगावर

दाद मिळो ह्या अपेक्षेत मी शेर खरडले थोडेसे
दाद मिळाली त्यांना जे लिहिलेत अपेक्षाभंगावर

उंची गाठुन लढण्याइतका संयम कोणाला आहे
नांव कोरले त्यांनी माझे तुटलेल्याच पतंगावर

ती संसारी रमली अन् मी आक्रोशत फिरतो आहे
कुणी औषधावर जगते अन् कुणी काढते अंगावर

कबूल करतो, बघाल तेव्हा माझ्यासोबत असतो मी
तुम्ही कशाला हरकत घेता ह्या माझ्या सत्संगावर

तो, त्याचे ते संत, नि त्यांच्या सोड पालख्या आता तू
किती युगे जगशील मराठी कविते पांडूरंगावर

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी मला जरा अर्थ नाही लागला..
थोडी विस्कटलेली वाटली गझल Sad
थोपु वर पण वाचली होती.

बे.फि.,

मत्ला, अपेक्षाभंग, औषधावर, जातींचा वादंग हे शेर खूप आवडले!

@ दक्षिणा, प्रत्येक द्वीपदी वेगळी कविता म्हणून वाचल्यास संभ्रम दूर होईल. एका द्वीपदीची दुसर्‍या द्वीपदीशी संबंध असावा अशी गजलेत अपेक्षा नसते!

सुरेख गझल...

ती संसारी रमली अन् मी आक्रोशत फिरतो आहे
कुणी औषधावर जगते अन् कुणी काढते अंगावर

ग्रेट...