गरीब

Submitted by धनुर्धर on 29 September, 2016 - 01:07

समाजातल्या थोरांनो
एवढे जरा कळेल का?
गरीब आहे जात माझी
मला आरक्षण मिळेल का?

ब्राह्मण, मराठा आणि बहुजन
मीच तळाला या सर्वातुन
सर्व जातीय वस्ती माझी
करा कधीही तुम्ही सर्वेक्षण

दोन वेळच्या भाकरीसाठी
चूल माझी जळेल का?
गरीब आहे जात माझी
मला आरक्षण मिळेल का?

भगवा निळा आणि हिरवा
झेंडा फडकतो वर आकाशी
माझ्या हाती फक्त काठी
आणि पोटात भूक उपाशी

पोटासाठी वणवण माझी
आता तरी टळेल का?
गरीब आहे जात माझी
मला आरक्षण मिळेल का ?

यांना थोडे, त्यांना थोडे
टक्केवारीत अडले घोडे
जातींमधली जात वेगळी
आमच्या हाती ज्यांचे जोडे

विकासाची गंगा थोडी
आमच्याकडेही वळेल का?
'गरीब' आहे जात माझी
मला आरक्षण मिळेल का?

. . . धर्नुधर . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users